मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
आत्म-साक्षात्कार

आत्म-साक्षात्कार

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.


२५१

चित्त चैतन्या पडली गांठी । न सुटे मिठी ।
संचित कर्माची झाली आटी । उफराटी दृष्टि
कैचा आठव दृश्याचा खुंटली वाचा । उदय झाला सुखाचा
देह विदेह वाढले मीतूंपणे । एका जनार्दनी सहज एकपणें

भावार्थ

सद्गुरू कृपेने चित्त चैतन्य या अविनाशी तत्वाशी एकरुप झाले आतां त्यांची ताटातुट होणे शक्य नाही. पूर्विच्या संचित कर्मांची बंधने तुटून पडली. बाह्य विश्वाच्या दृश्यांवर जडलेलें मन उलटे फिरुन अंतर्यामी स्थिर झाले. अनिर्वचनिय सुखाचा उदय झाला, त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द सापडेनासे झाले. देह बुध्दी लयास जावून मी तूं पणाच्या द्वैत भावनेचा निरास झाला. एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरू कृपेने विदेही अवस्था सहज प्राप्त झाली.

२५२

जाणती हे कळा हारपोनि गेली ।वृत्ति मावळली तया माजीं
पाहतां पाहणें हारपोनि गेले । मी माझे सरलें तयामाजीं
अंतरी बाहेरीं पाहतां शेजारी । शून्याची वोवरी ग्रासियेली
ग्रासियेले तेणें चंद्र सूर्य दोन्ही । एका जनार्दनी आनंद झाला

भावार्थ

जाणिवेची कळा लोप पावली, मनाच्या सर्व वृत्ती मुळापासून मावळल्या, पाहतां पाहतां सर्व दृष्ये हारपून गेली. एका जनार्दनी म्हणतात, मनाचे मीपण त्या साक्षात्कारांत संपून गेलें. चित्ताच्या अंतरंगात, बाह्यविश्वांत सभोवतालच्या अवकाशात ते च आत्मरुप व्यापून राहिले. त्या आत्मरुपाने चंद्र, सूर्याला ग्रासून टाकलें. या आत्मरुपाच्या साक्षात्काराने अवर्णनीय आनंदाचा अनुभव आला.

२५३

सत्व रज तम गेले निरसोनि । दृश्याची लावणी कैसी झाली
गेल्या माघारीं पाहतां न दिसे । स्वतां तो प्रकाश सदोदित
अंतरीं बाहेरीं पाहतां शेजारी । प्रकाश अंतरीं लखलख
एका जनार्दनी प्रकाश संपूर्ण । सवे नारायण बिंबलासे

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, या अविनाशी आत्मरुपांत त्रिगुणात्मक (सत्व, रज, तम)सृष्टी विरुन गेल्या सारखं वाटले. सारे विश्व मावळलें. मागे वळून पाहताना केवळ प्रकाशा शिवाय कांहीच दिसेनासे झाले. त्या लखलखीत प्रकाशाने सर्व विश्व अंतर्बाह्य व्यापून टाकले. सूर्यनारायण उदयास आले.

२५४

त्रिभुवनाचा दीप प्रकाश देखिला । हृदयनाथ पाहिला जनार्दन
दीपांची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीप देहीं दिसे
चिन्मय प्रकाश स्वयं आत्मज्योति । एका जनार्दनी भ्रांति निरसली

भावार्थ

अंतरंगात वसत असलेल्या सद्गुरू जनार्दन स्वामींचे दर्शन झाले आणि त्रिभुवन उजळून टाकणार्‍या दिपाच्या प्रकाशाचा भास झाला. सद्गुरू कृपेचा दीप व वातीचा प्रकाश दीप कलिके सारखा हृदयाच्या गाभार्यांत प्रकाशमान झाला असे एका जनार्दनी सांगतात.

२५५

काना वाटे मी नयनासी आलो । शेखीं नयनाचा नयन मी झालो
दृष्टि, द्वारा मी पाहें सृष्टि । सृष्टि हरपली माझें पोटी
ऐसें जनार्दनें मज केलें । माझें चित्ताचें जीवपण नेले
एका जनार्दनी जाणोनि भोळा । माझे सर्वांग झाला डोळा

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेची किमया आपण कानांनी ऐकली आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालो, स्वामींचे दर्शन होतांच नयनांना नविन दृष्टी प्राप्त झाली. आत्म-स्वरुपाचे रहस्य समजून आले आणि बाह्य- सृष्टि लोप पावली. आत्मरुपाच्या साक्षात्काराने देहाचे मी पण , चित्ताचे जीवपण विलयास गेले. सर्वत्र चैतन्य रुप दिसू लागले. सर्वांग डोळा बनून या चैतन्य स्वरुपाचा विलक्षण अनुभव आला.

२५६

उपाधीच्या नांवे घालियेलें शून्य । आणिक दैन्यवाणें काय बोलू
टाकुनिया संग धरियेला देव । आतां तो उपाय दुजा नाहीं
सर्व वैभव सत्ता जयाचें पदरीं । झालों अधिकारीं आम्ही बळें
एका जनार्दनी तोडियेला संग ।झालों आम्ही नि:संग हरिभजनें ।

भावार्थ

एका जनार्दनी या भजनांत म्हणतात, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या उपदेश प्रमाणे त्यांनी सर्व उपाधी सोडून दिल्या इंद्रियांचा संग सोडून देऊन केवळ देवाला आपलासा केला. हरिभजनाचा छंद लागला, या छंदाने मन नि:संग झाले. सर्व वैभव, सद्गुरूंचे असून ते च सर्व सत्ताधारी आहेत, त्यांच्या च कृपेनें अधिकारी बनलो.

२५७

माझें मीपण देहीं चि मुरालें । प्रत्यक्ष देखिलैं परब्रह्म
पर -ब्रह्म सुखाचा सोहळा । पाहिलास डोळा भरुनिया
ब्रह्म-ज्ञानाची तें उघडली पेटी । झालो असें पोटीं शीतळजाणा
एका जनार्दनी ज्ञानाचें तें ज्ञान । उघड समाधान झालें जीवा

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ परब्रह्म स्वरुपाचा अनुभव वर्णन करीत आहेत. परब्रह्म सुखाचा अवर्णनीय सोहळा त्यांनी डोळे भरून पाहिला आणि त्यांचे मीपण लयास गेले. ब्रह्मज्ञानाचे रहस्य उलगडले, अंतःकरण शांत झाले. एका जनार्दनी म्हणतात परब्रह्म हे साक्षात ज्ञान त्या ज्ञानाचे रहस्य समजले. मन पूर्ण समाधान पावले.

२५८

मन रामीं रंगलें अवघे मन चि राम झालें
सबाह्य अभ्यंतरी अवघें रामरुप कोंदलें

चित्त चि हारपलें अवघें चैतन्य चि झालें
देखतां देखतां अवघे विश्व मावळलें

पाहतां पाहतां अवघें सर्वस्व ठकलें
आत्मा रामाचें ध्यान लागलें मज कैसे

क्रिया कर्म अवघे येणें चि प्रकाशें
सत्य मिथ्या प्रकृती पर राम चि अवघा भासे

भक्ति अथवा ज्ञान शांति आणिक योग - स्थिति
निर्धारितां न कळें राम-स्वरूपीं जडली प्रीति
एका जनार्दनी अवघा राम चि आदी अंती

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ अपूर्व भक्ती-रसाच्या अनुभवाचे वर्णन करतात. मन राम-नामांत इतके रंगून गेले की मन रामरुपच झालें. अंतरांत आणि बाह्य विश्वांत सर्वत्र रामरुपच कोंदून राहिले आहे असे वाटले. चित्त या रामरुपी चैतन्यांत हारपून गेले आणि पाहतां पाहतां सारा विश्वाचा भास दिसेनासा झाला. मी पणाची जाणिवच संपून गेली. आत्मारामाच्या स्वरुपाचे अखंड ध्यान लागले. भासमान, मायावी प्रकृतीत केवळ रामच भरून राहिला. भक्ति, ज्ञान योग आणि शांति यांचे मनवरील पटलच दूर झाले आणि राम-स्वरूपावर प्रिति जडली. एका जनार्दनी म्हणतात, रामच केवळ विश्वाच्या आदी अंती आहे याचा साक्षात्कार झाला.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP