मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
मिथ्या साधनांच्या मागे लागु नका

मिथ्या साधनांच्या मागे लागु नका

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.


२४

प्रतिमेचा देव केला । काय जाणे ती अबला ।
नवस करिती देवासी । म्हणती पुत्र देई वो मजसी ।
देव खोटा नवस खोटा । एका जनार्दनी रडती पोटा ।

भावार्थ

पाषाणाची, धातूची, देवाची मूर्ती तयार करून ती मंदिरात ठेवतात. मंदिरात देवदर्शनाला आलेल्या स्त्रिया भक्तिभावाने या प्रतिमेला पुत्रप्राप्तीसाठी नवस बोलतात. एका जनार्दनी म्हणतात, प्रतिमेचा खोटा देव खरा मानून केलेला नवस फळाला येणे शक्य नसते, फसगत होऊन केवळ दु:खच पदरी पडते.

२५

देव दगडाचा भक्त तो मेणाचा । आइका दोहींचा विचार कैसा ।
खरेपणा नाही देवाचे ते ठायी । भक्त अभाविक पाही दोन्ही एक ।
एका जनार्दन ऐसे देवभक्तपण । निलाजरे जाण उभयतां ।

भावार्थ:

दगडाचा देव आणि मेणाचा भक्त याविषयी एकनाथमहाराज आपले मत व्यक्त करतात. खरा देव दगडाच्या प्रतिमेत नसून तो भाविक भक्ताच्या अंतरात नांदतो. दगडाचा देव व अभाविक भक्त दोन्ही खोटे आहेत असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, खोट्या देवाची कामनापूर्तीसाठी पूजा करणारे दोन्ही दांभिक, निलाजरे होत.

२६

नीचाचेनि स्पर्शे देवो विटाळला । पाणिये प्रक्षाळूनी सोवळा केला ।
देवापरिस जळ सबळ केले । ज्ञान ते दुर्बळ होऊनि ठेले ।
एका जनार्दनी साच नाही भाव । संशयेचि देव नाही केला ।

भावार्थ:

नीच (दलीत) माणसाच्या स्पर्शाने देव विटाळला (अशुध्द) झाला म्हणून पाण्याने धुऊन शुध्द केला. जो परमेश्वर सजीव व निर्जीव सृष्टीतील सर्वांच्या अंतर्यामी वास करुन सर्वांना पावन करतो तो नीचाच्या स्पर्शाने अपवित्र कसा होऊ शकेल आणि पाण्याने धुऊन तो सोवळा केला असे मत व्यक्त करणे म्हणजे पाण्याला देवापेक्षा अधिक सबळ मानणे हे अज्ञानाचे लक्षण असून ते ज्ञानाला कमीपणा आणते असे सांगून एका जनार्दन म्हणतात, जेथे मनातील भक्तिभाव खरा नसेल, तेव्हा मनात संशय निर्माण होतो आणि देवाविषयी विपरित भावना व्यक्त केली जाते.

२७

केले तुंवा काय जाउनिया तीर्था । सर्वदा विषयार्था भुललासी ।
मनाची ती पापे नाही धोवियेली । वृत्ति हे लाविली संसारीच ।
तीर्थ-यात्रा-योगे कीर्ति ही पावली । बुद्धि शुध्द झाली नाही तेणे ।
एका जनार्दन सद्गुरू-पाय धरी । शांतीचे जिव्हारी पावशील ।

भावार्थ:

सदासर्वदा इंद्रियविषयांचा ध्यास असलेला सामान्य भक्त त्या विषयत भुलून जातो, त्याच्या सर्व वृत्ति संसारात गुंतलेल्या असतात. तीर्थयात्रेला जाऊन त्यांना काही गौरव, थोडी प्रतिष्ठा प्राप्त होते. पण त्याच्या मनाची पापे धुतली जात नाहीत किंवा बुध्दी शुध्द होत नाही, मनाची पापे आणि बुध्दीची मलिनता जाण्यासाठी सद्गुरुंना शरण जावे लागते. संतसंगतीत अंतरंगात शांतीचा उदय होतो, असे एका जनार्दनी सांगतात.

२८

हृदयस्थ असोनि का रे फिरसी वाया । दीप आणि छाया जयां परी ।
आत्मतीर्थी सुस्नात झालिया मन । आणिक साधन दुजे नाही ।
एका जनार्दनी मनासी आवरी । मग तु संसारी धन्य होसी ।

भावार्थ:

परमात्म्याचे अधिष्ठान आपला हृदयात असतांना, त्याला शोधण्याची धावपळ करणे व्यर्थ आहे. जिवा-शिवाची जोडी दीप-छाये सारखी आहे. आत्मस्वरुपाच्या पवित्र तीर्थात मन भिजून शुध्द होणे यासारखे दुसरे साधन नाही असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मनाच्या सर्व वृत्ती आवरून वागल्यास संसारी धन्यता मिळते.

२९

देव देव म्हणूनि फिरताती वेडे । चित्त शुध्द नाही तरी देव केंवि जोडे ।
पाहे तिकडे देव आहे । दिशा व्यापुनी भरला राहे ।
एका जनार्दनी आर्तभूत । देव उभा असे तिष्ठत ।

भावार्थ:

देवाचा शोध घेत सामान्यजन वेड्यासारखी फिरतात. ज्याचे चित्त शुध्द नाही, त्याला देवाचा साक्षात्कार घडणे शक्य नाही. खरा भक्तीभाव असलेल्या भाविकाला सर्व दिशा व्यापून देव सर्वत्र भरला आहे असा अनुभव येतो. सर्व सृष्टीत भरुन राहिलेली देवाची अनंत रूपे त्याला सतत दिसत असतात, असे एका जनार्दनी म्हणतात.

३०

जिवाचे जीवन जनी जनार्दन । नांदतो संपूर्ण सर्व देही ।
वाउगी का वाया शिणती बापुडी । काय तयार जोडी हाती लागे ।
एका जनार्दनी वाउगी ती तपे । मनाच्या संकल्पे हरि जोडे ।

भावार्थ:

सर्व प्रकारच्या जीवांचे प्राणतत्व असलेला जनार्दन सर्व प्राणिमात्रांच्या देहात वास करतो, हे जाणून न घेणारे अज्ञानी-जन देवाचा शोध घेत व्यर्थ श्रम करून काया झिजवतात. एका जनार्दनी म्हणतात, यज्ञ-याग-तप या साधनांनी देव प्रसन्न होत नाही तर मनाच्या संकल्पसिध्दीने हरि जोडला जातो.

३१

आपुली पूजा आपण करावी । ही जंव ठावी राहटी नाही ।
कासया ती पूजा जाणिवेचा शीण । त्याहुनी अज्ञान बरा दिसे ।
एका जनार्दनी ज्ञानाज्ञाने । पुजावे चरण विठोबाचे ।

भावार्थ:

आपण स्वत:च परमेशाचे रूप आहोत ही जाणीव ठेवून आत्मसन्मान हीच खरी देवपूजा आहे हे समजून न घेता देवपूजेचा व्यर्थ अट्टाहास करण्यापेक्षा अज्ञानी असणे अधिक बरे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, जाणतेपणी किंवा अजाणतेपणी विठोबाला भक्तिभावाने शरण जाऊन त्याचे चरण पूजावे हेच योग्य होय.

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP