मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
स्वधर्माचरणाचे अगत्य

स्वधर्माचरणाचे अगत्य

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.




परमार्थाचे वचना द्यावे अनुमोदन । तेणे नारायण संतोषत ।
विषयिक वचना देता अनुमोदन । तेणे नारायण क्रोध पावे ।
भक्ति-प्रेम-वचना द्यावे अनुमोदन । तेणे नारायण संतोषत ।
दुर्बुध्द वचना देता अनुमोदन । तेणे नारायण क्रोध पावे ।
एका जनार्दनाचे वचना द्यावे अनुमोदन । तेणे जनार्दन संतोषत ।

भावार्थ:

परमार्थवचनांचा आनंदाने स्विकार केल्याने नारायण प्रसन्न होतात. याउलट इंद्रियविषयांचे चिंतन केल्याने नारायणाचा कोप होतो. भक्ती आणि प्रेमाच्या वचनांनी नारायण प्रसन्न होतात, तर वाईट विचारांचा अंगिकार केल्याने नारायण क्रोधिष्ट होतात. एकनाथमहाराज म्हणतात, सद्गुरू जनार्दनस्वामींची वचने स्विकारल्यास स्वामी संतोष पावतात.



मेघ वर्षे निर्मळ जळ । परी जैसे बीज तैसे फळ ।
तैसे भक्त अभक्त दोन्ही । वेगळीक वेगळेपणी ।
एका जनार्दनी गुण । चंदन वेळू नोहे समान ।

भावार्थ:

मेघ सर्व काळी सर्व स्थळी, निर्मळ जळाचा वर्षाव करीत असतात, तरीही झाडांवर येणारी सर्व फळे एकाच प्रकारची नसतात. जसे बीज तसे फळ येते, हा निसर्गनियम आहे. चंदनाच्या बीजापासून चंदनाचे झाड आणि बांबूपासून बांबू उगवणार या निसर्ग नियमाचा दाखला देवून एका जनार्दनी स्पष्टीकरण करतात की, भक्त आणि अभक्त एकाच भगवंताचे अंश असले तरी त्यांचे स्वाभाविक गुणधर्म भिन्न असल्याने ते परस्परांपासून वेगळे असतात.

१०

अधर्मे अदृष्टाचे चिन्ह । विपरीत वचन ते ऐका ।
भांडारी ठेविला कापूर उडे । समुद्रामाजी तारू बुडे ।
ठक येवोनि एकांती । मुलाम्याचे नाणे देती ।
परचक्र विरोध धाडी । खणित लावुनी तळघरे फोडी ।
पाणी भरे पेवा आत । तेणे धान्य नासे समस्त ।
गोठण शेळ्या रोग पडे । निमती गाईम्हशींचे वाडे ।
भूमि-निक्षेप करू जाती । ते आपुल्याकडे धुळी ओढिती ।
ऐसी कर्माची अधर्म-स्थिती । एका जनार्दनी सोशी फजिती ।

भावार्थ:

जेव्हा लोकांमध्ये अधर्म, अनाचार यांचे प्राबल्य वाढते तेव्हा भविष्यात घडून येणार्‍या गोष्टींची विपरित चिन्हे दिसू लागतात. धान्याच्या कोठारातील कापूर उडणे, समुद्रात जहाज बुडणे, ठकांकडून फसवणूक होणे, परचक्र येऊन तळघरे फोडली जाणे, धान्याच्या पेवात (कोठारात) पाणी भरुन सगळं धान्य नासून जाणे, गाई-म्हशी, शेळ्या यासारख्या पाळीव प्राण्यांवर रोग पडून मृत्यु येणे, भूकंप होऊन जमीन खचणे ही सर्व अधर्म वाढल्याची लक्षणे आढळून येतात. या अधर्म-स्थितीत लोकांना असुरक्षितता, अवहेलना सोसावी लागते असे एका जनार्दनी म्हणतात.

११

जया करणे आत्म-हित । स्वधर्म आचरावा सतत ।
कर्मे नित्य नैमित्तिक । ब्रह्मप्राप्ती लागी देख ।
तीचि नित्य आचरावी । चित्तशुध्दी तेणे व्हावी ।
एका जनार्दनी कर्म । ईशभक्तीचे हे वर्म ।

भावार्थ:

ज्या साधकांना स्वतःचे हित साधायचे असेल त्यांनी आपली नित्य व नैमित्तिक (रोज नियमितपणे करावी अशी नित्य व काही निमित्ताने करावी लागणारी नैमित्तिक) कर्मे यथाकाल, यथाविधी, यथासांग पूर्ण करून स्वधर्माचे आचरण करावे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, कर्माच्या आचरणाने आपले चित्त शुध्द होऊन आत्मदर्शनाचा मार्ग मोकळा होतो. ईश्वरभक्तीचे हेच रहस्य आहे.

१२

ज्यासी करणे चित्तशुद्धी । कर्मे आचरावी आधी ।
तरीच होय मन:शुध्दी । सहज तुटती आधि-व्याधि ।
चित्ताची स्थिरता । होय उपासने तत्वतां ।
चित्त झालिया निश्चळ । सहज राहिल तळमळ ।
एका जनार्दनी मन । होय ब्रह्म-रूप जाण ।

भावार्थ:

कर्माने चित्त-शुद्धी होते हा पारमार्थिक सिध्दांत सांगून एका जनार्दनी म्हणतात, ज्यांना चित्त-शुध्दीची आस लागली आहे त्यांनी कर्माचे आचरण करावे. त्यामुळे मनाची मलिनता नाहिशी होऊन ते शुध्द होते. परिणामी मनाचे रोग (आधि) व देहाच्या व्याधी सहज तुटतात. देवाच्या नियमित उपासनेने चित्ताची स्थिरता लाभते. चित्त निश्चळ झाल्याने मनाची तळमळ नाहिसी होते आणि मन आत्मस्वरुपाशी एकरुप होते.

१३

नित्य-नैमित्तिक कर्मे आचरावी । तिही ते पावावी चित्तशुध्दि ।
चित्त स्थिर व्हाया करी उपासना । भजे नारायणा एका भावे ।
विवेक-वैराग्य-प्राप्ति तत्प्रसादे । चित्ता लागे वेध सद्गुरूचा ।
सद्गुरू-कृपेने पूर्ण बोध होय । नित्य त्याचे पाय हृदयी धरी ।
एका जनार्दनी ठेवूनिया मन । मनाचे उन्मन पावलासे ।

भावार्थ:

नित्य, नैमित्तिक कर्मे सद्भावनेने आचरावी, कारण त्यामुळे चित्तशुध्दी होते. चित्त स्थिर होण्यासाठी नारायणाची अनन्यभावे उपासना केल्याने नारायणकृपेने विवेक व वैराग्याची प्राप्ती होते. विवेक व वैराग्य आले की सद्गुरूभेटीची ओढ लागते. सद्गुरूने कृपा केल्याने पूर्ण आत्मबोध होतो. आत्मबोधाचा लाभ करुन देणार्‍या सद्गुरूचरणांची नित्य सेवा करावी असे सांगून एकाजनार्दनी सांगतात, सद्गुरूचरणांशी मन एकाग्र केल्याने मन शुध्द होऊन उच्च पातळीवर स्थिर झाले, मनाचे उन्मन झाले.

१४

परब्रह्म-प्राप्ती लागी । कर्मे आचरावी वेगी ।
चित्त शुध्द तेणे होय । भेटी सद्गुरूचे पाय ।
कर्म नित्य नैमित्तिक । प्रायश्चित्त जाण एक ।
उपासन ते चौथे । आचरावे शुध्द चित्ते ।
तेणे होय चित्त स्थिर । ज्ञानालागी अधिकार ।
होय भेटी सद्गुरूची । ज्ञानप्राप्ति तैची साची ।
प्राप्त झाल्या ब्रह्मज्ञान । आपण जग ब्रह्म परिपूर्ण ।
एका जनार्दनी भेटला । ब्रह्म-स्वरूप स्वयें झाला ।

भावार्थ:

नित्यकर्म, नैमित्तिक कर्मे, प्रायश्चित्त कर्मे व चौथी उपासनाकर्मे केल्याने चित्त शुध्द होऊन परब्रह्म प्राप्ती होते. चित्त स्थिर होऊन ज्ञानासाठी अधिकारी बनते. सद्गुरुंची भेट हीच ज्ञानप्राप्ती होय, आत्म-स्वरुपाशी पूर्णपणे एकरूप होणे हेच ब्रह्मज्ञान. एकनाथमहाराज जनार्दनस्वामींना भेटले आणि ब्रह्मज्ञान होउन ब्रह्म-स्वरूप झाले असे म्हणतात.

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP