मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
भक्तीचे स्वरूप आणि गौरव

भक्तीचे स्वरूप आणि गौरव

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.


२०२

भगवद्भावो सर्वां भूतीं । हें घि ज्ञान हें चि भक्ति
विवेक विरक्ति । या चि नांवें
हें सांडूनि विषय- ध्यान । तें चि मुख्यत्वें अज्ञान
जीवीं जीवा बंधन । येणें चि दृढ ।
आठव तो परब्रह्म । नाठव तो भव-भ्रम
दोहींचे निज-धर्म । जाण बापा
आठव विसर चित्तीं । जेणें जाणिजेती
तेंचि एक निश्चिती । निजरूप
एका जनार्दनी । सहज निज-बोधनी
सबाह्य अभ्यंतरीं । पूर्ण परमानंदु

भावार्थ

सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी आत्मरुपाने (चैतन्य रुपाने) एकच भगवंत भरून राहिलेला आहे हा सर्वाभूती असणारा भगवत्-भाव हेच ज्ञान, हिच भक्ति! याच भगवत् -भावाला विवेक आणि विरक्ति । अशी ही नावें आहेत. या ज्ञान, भक्ति, विवेक, विरक्ती चा त्याग करून इंद्रिय विषयांचे चिंतन करणे हे च अज्ञान होय. त्यामुळेच जीवाला जन्म-मृत्युचे बंधन पडतें. परमात्म्याची सतत आठवण हें च परब्रह्म आणि परमात्म्याचा विसर हाच संसार-सुखाचा मोह. परब्रह्म हे अविनाशी, शाश्वत तर संसार विनाशी, अशाश्वत आहे. या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत हे जाणून घेणे जरूरी आहे. आठव आणि विसर यांची जाणिव करून देणारे आपले च निजरूप आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, एकदां हा बोध झाला कीं, चित्त आतून बाहेरून पूर्णानंदाने भरून जाते कारण सगळी कडे याच विश्वंभराची विविध रूपे दिसू लागतात.

२०३

भक्तीचे उदरीं जन्मले ज्ञान । भक्तीने ज्ञानाला दिधलें महिमान
भक्ति तें मूळ ज्ञान तें फळ । वैराग्य केवळ तेथींचे फूल
फूल फळ दोन्ही येत येरा पाठीं । ज्ञान वैराग्य तेवीं भक्तीचे पोटी
भक्तीविण ज्ञान गिवसती वेडे । मूळ नाही तेथे फळ केवीं जोडे
एका जनार्दनी शुध्द भक्ति-क्रिया । ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पायां

भावार्थ

येथे संत एकनाथ भक्तीचे महत्त्व वर्णन करतात. भक्ती ही ज्ञानाचे उगमस्थान असून भक्तिमुळे च ज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भक्ती हे मूळ असून वैराग्य हे भक्तिच्या रोपट्यावर उमललेले सुंदर फूल असून ज्ञान हे फळ आहे. फूल व फळ एकमेकांच्या पाठोपाठ येतात तसे भक्तिच्या पोटी ज्ञान व वैराग्य! भक्ती शिवाय ज्ञान मिळवू पाहणे म्हणजे मुळा शिवाय फळाची अपेक्षा करण्या सारखे वेडसर पणाचे आहे. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, भक्ती-साधना ही एव्हढी पवित्र गोष्ट आहे कीं, ब्रह्मज्ञान भक्तिच्या पायाशी लोळण घेते.

२०४

भक्ति-प्रेमाविण ज्ञान नको देवा ।
अभिमान नित्य नवा तयामाजी
प्रेम-सुख देई प्रेम -सुख देई ।
प्रेमे विण नाहीं समाधान
एका जनार्दनी प्रेम अति गोड ।
अनुभवी सुरवाड जाणतील

भावार्थ

भक्ति-प्रेमा शिवाय जे ज्ञान प्राप्त होते त्यां मुळे मनांत अहंकार निर्माण होऊन अभिमान वाढतो तो साधनेत बाधा निर्माण करतो असे सांगून एका जनार्दनी असे ज्ञान देऊ नये अशी विनंती देवाला करतात. देवाने आपल्याला प्रेमसुख द्यावे कारण प्रेम-भक्तिच्या समाधानाची गोडी अवीट असून अनुभवी लोक ती जाणतात, असे एका जनार्दनी म्हणतात.

२०५

भक्तीच्या पोटीं मुक्ति पै आली । भक्तीनें मुक्तीतें वाढविले
भक्ति ते माता मुक्ति ते दुहिता । जाणोनि तत्वतां भजन करीं
भक्ति सोडूनि मुक्ति वांछिती वेडी । गूळ सोडुनी कैसी ते गोडी
एका जनार्दनी एक भाव खरा ।भक्ति मुक्ति वाटूनि आलिया घरा

भावार्थ
भक्ति-साधना करता करता साधकाला मुक्ती प्राप्त होते भक्ती ही माता असून मुक्ती ही तिची कन्या (दुहिता) आहे हे जाणून घेऊन परमेश्वराचे भजन करावें असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, भक्ती सोडून मुक्तिची ईच्छा करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे, गूळ टाकून देऊन गोडी चाखण्याची ईच्छा करण्या सारखे अडाणी पणाचे आहे. भक्तिद्वारे सलोकता - मुक्ति मिळवून परमेश्वराच्या सन्निध जाणे हा च खरा भक्ति-भाव आहे.

२०६

अभेदा वांचून । न कळे भक्तीचे महिमान
साधितां साधन । विठ्ठल-रूप न कळे
मूळ पाहिजे विश्वास । दृढता आणि त्रास
मोक्षाचा सायास । येथे कांहीं नको चि
आशा मनीषा सांडा परते । काम क्रोध मारा लाते
तेणें चि सरते । तुम्ही व्हाल लोकी
दृढ धरा एक भाव । तेणें चरणीं असे ठाव
एका जनार्दनी भेव । नाहीं मग काळाचें

भावार्थ

ध्यान-योग, ज्ञान-योग, कर्म-योग या पैकी कोणत्याही मार्गाने विठ्ठलाचे रूप कळेलच असे नाही. भक्तिमार्गात देव व भक्त वेगळे राहत नाही, अभेदा शिवाय परमात्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर च भक्तीचे महत्त्व समजून येते. मोक्ष प्राप्तीसाठी करावे लागलेले सायास, साधना करतांना घेतलेला त्रास, चंचल मनाला वळवतांना करावा लागणारा निर्धार या पैकी काहिही भक्ती मार्गात अपेक्षित नाही. विठ्ठलावर असलेला अढळ विश्वास पुरेसा असतो. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मनातील सर्व ईच्छा, कामना, सोडून देऊन काम, क्रोधाला जिंकून विठ्ठलावर दृढ भक्तिभाव ठेवल्यास त्याच्या चरणी पूर्ण शरणागती पत्करल्याने कळीकाळाचे भय संपून जाईल यात शंका नाही.

२०७

अभाग्य न भजती भगवंती । त्यांस पृथ्वी असे जडत्व देती
जळें दिधली त्यां अधोगती । तेजे दिधली संताप-वृत्ति
वायूने दिधलें त्यां चंचलत्व । नभें दिधलें भाव-शुन्यत्व
महातत्वें हरिलें निज-सत्व । मायें दिधलें त्यां ममत्व
सभाग्य भावें भजती भगवंती ।त्यास पृथ्वी देतसे निज शांती
जळें दिधली मधुररस-वृत्ति ।तेजें दिधली निजतेज-प्रभादिप्ति
वायु उपरमे दे निश्चलत्व । नभें दिधलें त्यां अलिप्तता
महत्तत्वें दिधलें शोधित-तत्व । मायें दिधलें सद्विद्या परमतत्व
एका जनार्दनी निज-भक्ति । तै अलभ्य लाभ होय प्राप्ति
भूते महाभूतें प्रसन्न होती । तेणें न भंगे ब्रह्म-स्थिति

भावार्थ

अभागी लोक परमेश्वराचे भजन करीत नाहीत, पृथ्वी अशा लोकांना जडत्व देते कारण जडत्व हा पृथ्वीचा गुण आहे. दुसरे महत्-तत्व जळ (पाणी), पाणी नेहमी उताराकडे वाहते, भाग्यहीन लोकांना हें तत्व अधोगती देते. तिसरे तत्व आहे तेज, तेजाचा गुण आहे दाहकता, अभागी लोकांना तेज संताप-वृत्ति देते. वायुचा गुण चंचलपणा अभागी लोक मनाने वायुसारखे चंचल असतात परमेश्वराच्या भजनांत रंगून जाऊ शकत नाही. भावशुन्यता अलिप्तपणा हा आकाशाचा गुण आहे अभागी लोक भक्ति-रसांत रममाण होऊ शकत नाही. या उलट भाग्यवंत भगवंताला भक्तिभावाने पुजतात, पृथ्वी त्यांना शांति देते. पाण्यापासून समरसता मिळते. तेजा पासून बुध्दीची तेजस्विता प्राप्त होते. वायूकडून निश्चलता आणि आकाशाकडून अलिप्तपणा प्रदान केला जातो. अशा प्रकारे पंच महाभूतांकडून भाग्यवान लोक अलौकिक सत्वे मिळवतात. एका जनार्दनी म्हणतात, या गुणांमुळे भाग्यवंत प्रेम-भक्तीत रंगून जातात, समाधान, शांति यांचा अलभ्य लाभ होतो. माते कडून सद्विद्या हे परम-तत्व मिळते. पंच-महाभूतें प्रसन्न होतात अशा भाग्यवंतांची ब्रह्मस्थिती कधी भंग पावत नाही.

२०८

देव प्रसन्न झाला माग म्हणे वहिला ।
भक्त घरोघरी विचार पुसो गेला ।
भाव की भ्रांति आळस की भक्ति ।
विचारुनि व्यक्ति ठायी ठेवा ।
अरे हे गुह्य कुडे करू नये उघडे ।
तरी द्वारोद्वार पुसो जाय वेडे ।
एका जनार्दनी शीतल भाव ।
आळसेचि देव दुरावला ।

भावार्थ

एका साधकावर देव प्रसन्न झाला आणि हवे ते माग असे म्हणाला. साधक प्रत्येक घरात जाऊन देवाकडे काय मागावें असे विचारू लागला. भक्ति मागावी की भ्रांति, आळस मागावा की भक्ति? एका जनार्दनी म्हणतात, हे भक्तीचे रहस्य असून ते जाणून घेणें आवश्यक आहे ते सद्गुरू च सांगू शकतात. आळसाने देव आणि भक्त यांच्यांत दुरावा निर्माण होतो.

२०९

मी वासुदेव नामे फोडिता नित्य टाहो ।
देखिले पाय आता मागतो दान द्या हो ।
सावळे रुप माझ्या मानसी नित्य राहो ।
पावन संत-वृंदे सादरे दृष्टि पाहो ।
सांडोनि सर्व चिंता संतपदी लक्ष लागो ।
मुक्त मी सर्व संगी सर्वदा वृत्ति जागो ।
भाविक प्रेमळांच्या संगतीं चित्त लागो ।
अद्वैत-वृत्ति चालो अक्षयी भक्ति-योग ।
स्वप्नी हि मानसाते नातळो द्वैत-संग ।
अद्वयानंद-वेधे नावडो अन्य भोग ।
अक्रियत्व चि वाहो सक्रियारूप बोध ।
पाहता विश्व माते निजरुप दाखवी ।
सत्कथा -श्रवण कर्णी पीयुष चाखवी ।
रसने नाममंत्र सर्वदा प्रेम देई ।
तोषला देवराणा म्हणे बा रे घेई
हे दान पावले सद्गुरू शांति-लिंगा ।
हें दान पावलें आत्मया पांडुरंगा ।
हें दान पावलें व्यापका अंतरंगा ।
हें दान पावलें एका जनार्दनी दोष जाती भंगा ।

भावार्थ

या भजनांत संत एकनाथ देवाकडे प्रार्थना करून काही मागणे मागत आहेत. ते वासुदेवाच्या नावाने व्याकुळतेने टाहो फोडून दान देण्यासाठी चरणांशी विनंती करतात. पांडुरंगाचे सावळें रुप मनांत सतत राहावें आणि संतजनां विषयीं आदरभावना असावी. सर्व चिंताचे निराकरण होऊन संत -चरणांचे ध्यान लागावें , जे भाविक प्रेमळ भक्त असतील त्यांच्या संगतींत चित्त रममाण व्हावें, ईंद्रियविषयांच्या मोहा पासून मन मुक्त व्हावें, अशी ईच्छा व्यक्त करून संत एकनाथ म्हणतात, मनातले द्वैत संपून अद्वैत भक्तियोगाचे अखंड आचरण घडावे, या भक्तीत मिळणार्‍या आनंदात ईतर सर्व भोगांचा विसर पडावा. स्वप्नांत सुध्दा द्वैत भावनेचा स्पर्श ना घडावा. या सर्व चल आणि अचल सृष्टींत भरलेला परमात्मा डोळ्यांना दिसावा. परमेश्वराच्या सत्कथा रुपी अमृत कर्णांना चाखावयास मिळावे, रसनेला देवाच्या नामाचे प्रेम निर्माण व्हावे. एकनिष्ठ भक्ताची ही प्रार्थना ऐकून देवानें आनंदाने दान दिले. हे दान शांतीरुप सद्गुरूंना, आत्मरुप पांडुरंगाला, सर्वव्यापी सर्वेश्वराला पावलें असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, या दानाने आपले सर्व दोष नाहिसे झाले, आपण कृतार्थ झालो.

२१०

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ।
भाव-भक्ति भीमा उदक त वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ।
दया क्षमा शांती हेचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ।
देखिली पंढरी देही जनी वनी । एका जनार्दनी वारी करी ।

भावार्थ
संत एकनाथांनी रचलेले आणि भीमसेन जोशींनी स्वरबद्ध केलेले हे भजन अतिशय लोकप्रिय झाले असून त्यात संत एकनाथांनी मनुष्यदेहाला पंढरीची उपमा देऊन विठ्ठल हा या देहातील आत्मा आहे असे सूचित केले आहे. पंढरपूर ज्या भीमानदीवर वसलेले आहे त्या नदीतून भाव-भक्ती चे उदक वाहत आहे अशी सुंदर कल्पना केली आहे. चंद्रभागेचे वाळवंट दया, क्षमा, शांतीरुपी वाळूने बनलेले आहे, या पंढरीत पांडुरंग शोभून दिसत आहे आणि वैष्णवजन पांडुरंगाच्या प्रेमरसात तल्लीन होऊन नाचत आहेत. एका जनार्दनी म्हणतात, या पंढरीचे दर्शन प्रत्येकाने आपल्या अंतरंगात, आपल्या सहवासातील जनमानसात आणि सभोवतालच्या सजीव सृष्टीत घ्यावे. ही पंढरीची वारी हा अत्यंत आनंददायक अनुभव आहे.

२११

नवविधा भक्ति नव आचरती । त्यांची नाम-कीर्ति सांगू आता ।
एक एक नाम घेता प्रात:काळी । पापा होय होळी क्षणमात्रे ।
श्रवण परीक्षिति तरला भूपती । साता दिवसात मुक्ति झाली तया ।
श्रीशुक आपण करूनि कीर्तन । उध्दरिला जाण परीक्षिति ।
हरिनाम-घोषे गर्जे तो प्रल्हाद । स्वानंदे प्रबोध झाला त्यासी ।
पायांचा महिमा स्वयें जाणे रमा । प्रिय पुरुषोत्तमा झाली तेणे ।
पृथुराया बाणले देवाचे अर्चन । तेणे समाधान पावला तो ।
गाईचिया मागे श्रीकृष्ण-पाउले । अक्रूरे घातले दंडवत ।
दास्यत्व मारुती अर्चे देह-स्थिती । सीता-शुध्द कीर्ति केली तेणे ।
सख्यत्व स्वजाति सोयरा श्रीपति । सर्व भावे प्रीति अर्जुनाची ।
आत्म-निवेदन करुनियां बळी । झाला वनमाळी द्वारपाल ।
नवविधा भक्ति नव जे केली । पूर्ण प्राप्ती झाली तया लागी ।
एका जनार्दनी आत्म-निवेदन । भक्ती दुजेपण उरले नाही ।

भावार्थ

या भजनात संत एकनाथ नवविधाभक्तीचे आचरण करणार्‍या नऊ भक्तांची महती सांगत आहेत. प्रात:काळी या भक्तांचे नामस्मरण केल्यास काया, वाचा मनाने केलेल्या सर्व पापांची होळी होते. पांडवांचा वंशज परिक्षित राजाने सात दिवस भागवत ग्रंथाचे श्रवण केले आणि त्यांची संसार-बंधनातून सुटका होऊन मुक्ति मिळाली. श्रीशुकानी केलेले कृष्णलीलांचे किर्तन श्रवण करुन परिक्षिताचा उध्दार झाला. हरिनामाचा अखंड जप करुन प्रल्हादाला प्रभुकृपेचा लाभ झाला. पादसेवन भक्तीने लक्ष्मी पुरषोत्तम विष्णुला प्रिय झाली अर्चनभक्तीने पृथुराजाला निरंतर शांती-समाधानाचे वरदान मिळाले. कृष्ण-वधाचा हेतूने प्रेरित होऊन कंसाने अक्रुराला गोकुळात पाठवले तेथिल गोप-गोपिकांचे निष्काम प्रेम पाहून आणि गाईंच्या मागे फिरणारी श्रीकुष्णाची पाऊले पाहून वंदनभक्तीने अक्रुर तरुन गेला. दास्यत्वभक्तीने मारुतीने सीता-शुध्दी केली आणि श्रीरामाकडून चिरंजीवपद प्राप्त केले. सख्यभक्तीने अर्जुन श्रीहरीचा सखा, सोयरा बनला. आत्मनिवेदनभक्तीने बळीराजाने श्रीहरीला आपला द्वारपाळ बनवले. या नऊ अनन्य भक्तांना नवविधाभक्तीने परमेश्वराची प्राप्ती झाली. एका जनार्दनी म्हणतात, आत्मनिवेदनभक्तीने देव व भक्तात दुजेपण उरत नाही.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP