मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
सगुण साक्षात्कार

सगुण साक्षात्कार

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.


१९१

अवघें चि त्रैलोक्य आनंदाचें आतां ।चरणीं जगन्नाथा चित्त ठेले
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन
एका जनार्दनी एकपणें उभा । चैतन्याची शोभा शोभलीसे

भावार्थ

अनाथांचे नाथ अशा स्वामी जनार्दनांच्या कृपा-प्रसादानें माय-बाप जगन्नाथाच्या चरणीं चित्त एकाग्र झाले. एका जनार्दनी एकटाच जगन्नाथाच्या चैतन्याची शोभा अवलोकन करीत असताना तिन्ही लोक आनंदाने भरून गेले आहेत अशी अनुभूती त्यांना आली.

१९२

चंद्राहूनि शीतळ रवीहूनि सोज्वळ । तेणें मज केवळ वेधिलें बाई
अमृताहूनि स्वादु गगनाहूनी मृदु । रुपेविण आनंदु देखिला बाई
एका जनार्दनी आनंदु परिपूर्णं । काया वाचा मन वेधिलें बाई

भावार्थ

चंद्रापेक्षा शीतल, सूर्यापेक्षा निर्मळ, प्रकाशमान, अमृतापेक्षा रुचकर, आकाशापेक्षा मृदु अशा श्रीहरीनें चित्त वेधून घेतले. काया, वाचा मन पूर्णपणे एकरूप झाले. श्रीहरीचे रुप दिसेनासे झाले आणि केवळ परिपूर्ण आनंद सर्व विश्व व्यापून उरला आहे असा भास झाला. श्रीहरी-दर्शनाचे असे यथार्थ वर्णन एका जनार्दनी करतात.

१९३

आनंद अद्वय नित्य निरामय । सावळा भासतसे मज लागीं
वेधू तयाचा माझिया जीवा । काया वाचा मनोभावा लागलासे
वेधलेसें मन झालें उन्मन । देखतां चरण गोड वाटें
पाहतां पावतां पारुषला जीव । एका जनार्दनी देव कळों आला

भावार्थ

सावळा श्री हरी म्हणजे नित्य, निरामय, अतुलनीय आनंद आहे असे मनाला वाटते. काया, वाचा, मनाला या सावळ्या रुपाने जीवाला भुरळ घातली असून वेध लावला आहे. या रुपाकडे आकर्षित झालेल्या मनाचे उन्मन झालें असून ते उच्च पारमार्थिक पातळीवर स्थिर झाले असून देहभान विसरून केवळ चरण-कमळावर दृष्टी खिळून राहिली आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, या अनुभवातून देव सत् चिदानंद स्वरुप आहे याची प्रचिती आली.

१९४

जगाचें जीवन मनाचे मोहन । योगियांचे ध्यान विठ्ठल माझा
द्वैताद्वैताहूनि वेगळा विठ्ठल । कळां पौर्णिमेची
न कळे चि आगमा नेणवे चि दुर्गमा । एका जनार्दनी आम्हां सापडला

भावार्थ

विठ्ठल जगताचा आधार, भक्तांच्या मनाला मोह घालून भक्ती. -साधनेंत गुंतवून टाकणारे, योग्यांना ध्यान लावणारे असामान्य रुप असून हा विठ्ठल द्वैत व अद्वैत यापेक्षा वेगळा आहे. पौर्णिमेच्या चंद्र कलेप्रमाणे तो परिपूर्ण आहे. विठ्ठलाचे स्वरूप वेद, शास्त्र, श्रुती यांना सुध्दा समजण्यास कठीण आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, प्रेमळ भक्तांना मात्र हा विठ्ठल सहज सापडतो.

१९५

आजीचा सुदिनु आम्हां झाला आनंदु ।
सकळां स्वरूपीं स्वयें देखें गोविंदु
पाहिला गे मायें आतां सांगू मी कैसे ।
जेथें पाहें तेथें गोविंद दिसे
पाहतां पाहणें तटस्थ ठेलें ।
सबाह्य अभ्यंतरी पुरुषोत्तमें कोंदलें
या परी पाहतां हरुष होतसे मना ।
एका जनार्दनी धणी न पुरे मना ।

भावार्थ

या अभंगात संत एकनाथ गोविंद-भेटीचा आनंद व्यक्त करीत आहेत. सर्वांच्या मनाला आणि देहाला व्यापून उरणारा गोविंद पाहिला पण तो अनुभव शब्दांत वर्णन करता येत नाही. जेथे पहावे तेथे गोविंद च दिसतो. गोविंदाला पहात असतांना दृष्टी त्याच्या ठिकाणी खिळून राहिली आणि मन तटस्थ झाले. या पुरुषोत्तमाने मन आतून बाहेरून व्यापून टाकले. मनाला एव्हढा आनंद झाला असूनही दर्शन सुखाने मनाचे समाधान होईना. असे एका जनार्दनी म्हणतात.

१९६

चतुर्भुज श्याम मूर्ति । शंख-चक्र ते शोभती
पीतांबर वैजयंती । रुळती गळां
देव देखिला देखिला । तेणें संसाराचा ठावो पुसिला
विदेही तो भेटला । भक्त तयातें
दोघां होतां चि मिळणी । नुरे देव-भक्तपणीं
फिटली आयणी सर्व कोड कठिण
छंद पाहिजे नामाचा । निश्चयो काया मनें वाचा
एका जनार्दनी त्याचा । देव होय अंकित

भावार्थ

चार भुजा असलेली, हातामध्ये शंख, चक्र परिधान केलेली, पीतांबर नेसलेली, गळ्यांत वैजयंती माळ शोभून दिसणारी सांवळी मूर्ती पाहिली आणि विश्वाचा पसारा दिसेनासा झाला. देहाचे भान हरपून गेले. हा विदेही भक्त जेव्हां देवाला भेटला तेव्हां देवाचे देवपण आणि भक्ति एकरुप झाली. भक्तीचे रहस्य उलगडले. या अनुभवाचे वर्णन करून एका जनार्दनी म्हणतात, काया, वाचे, मने नामाचा छंद जोपासल्याने देव भक्ताच्या अंकित होतो.

१९७

अवघा व्यापक दाविला । माझा संदेह फिटला
मन होते गुंडाळले । आपुले चरणीं पै ठेविलें
नाहीं पहावया दृष्टी । अवघा जनार्दन सृष्टि
दुजा हेत हारपला । एका जनार्दनी एकला

भावार्थ

सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेने विश्वव्यापक परमात्म्याचे दर्शन घडले आणि मनतील सर्व शंकांचे निरसन झाले. मनाच्या सर्व वृत्ती आवरून ते सद्गुरू चरणांशी एकाग्र केले. अवघी सृष्टी जनार्दन स्वामींच्या रूपाने नटली आहे, दृष्टी या रूपांत हरवून गेली, मनांत दुसरी कोणतीही ईच्छा उरली नाही असे एका जनार्दनी म्हणतात.

१९८

जन्म मरणाचे तुटलें सांकडें । कैवल्य रोकडें उभें असे
डोळियाचा डोळा उघड दाविला । संदेह फिटला उरी नुरे
एका जनार्दनी संशय चा नाहीं । जन्म-मरण देहीं पुन्हां नये

भावार्थ

कैवल्याचा दानी विटेवर उभा असलेला प्रत्यक्ष पाहिला, ज्ञानियाच्या राजा डोळ्यापुढे साकार उभा राहिला आणि मनातला संदेह फिटला. जन्म मरणाचे संकट कायमचे टळले. एका जनार्दनी या देहाला पुन्हा जन्म-मरण येणार नाही असे खात्रीपूर्वक सांगतात.

१९९

सायासाचें बळ । तें आजि झालें अनुकूल
धन्य झालें धन्य झालें । देवा देखिलें हृदयी
एका जनार्दनी संशय फिटला ।देव तो देखिला चतुर्भुज

भावार्थ

अंतकरणाच्या गाभाय्रांत देवाचे दर्शन झाले आणि धन्य झालो, जीवनात आतापर्यंत केलेले सायास (साधना) फळाला आली. शंख, चक्र, गदा, पद्म परिधान केलेल्या या चतुर्भुज देवाला पाहिलें आणि मनातले सारे संशय समूळ नाहिसे झाले असे एका जनार्दनी कृतार्थ भावनेनें सांगतात.

२००

आजी देखिलीं पाउलें । तेणें डोळें धन्य झाले
मागील शीण भारु । पाहतां न दिसे निर्धारु
जन्माचें तें फळ । आजि झालें सुफळ
एका जनार्दनी डोळां । विठ्ठल देखिला सांवळा

भावार्थ

एका जनार्दनी म्हणतात, सावळ्या विठ्ठलाची चरण-कमल दृष्टीस पडली आणि या डोळ्यांचे पारणे फिटले. जन्मभर केलेल्या साधनेचे सुफळ पदरांत पडले. मागचा सारा शीण-भार उतरुन गेला, कुठल्या कुठे दिसेनासा झाला.

२०१

इच्छा केली तें पावलो । देखतां चि धन्य झालों
होतें सुकृत पदरीं । तुमचे चरण देखिले हरि
गेलें भय आणि चिंता । कृतकृत्य झालों आतां
आजि पुरला नवस । एका जनार्दनी झालों दास

भावार्थ

परमेश्वर दर्शनाची अंत्यंतिक इच्छा होती ती पूर्ण झाली. देव -दर्शन होतांच धन्यता पावलो. जन्मोजन्मीच्या सत्-कृत्याचे फळ पदरांत पडले, हरि-चरणांचे दर्शन झाले. आजवर केलेल्या तपस्येचे सार्थक झाले, मनातले सारे भय सगळ्या चिंता लयास गेल्या. एका जनार्दनी सांगतात, सद्गुरू जनार्दन स्वामींचा दास व्हावे असा नवस केला होता तो पुरवला गेला.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP