१६८
सुंदर ते ध्यान मांडिये घेउनी । कौसल्या जननी गीती गाये ।
सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी । गोपाळ गौळणी खेळताती ।
सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी । पुंडलिका पाठी, उभे असे ।
सुंदर ते ध्यान एका जनार्दनी । जनी वनी मनी भरलासे ।
भावार्थ
अत्यंत मोहक अशा रामाला मांडीवर घेऊन कौसल्यामाता गीत गाते. मनमोहन बालकृष्ण नंद राजाच्या अंगणात गोपाळ, गोपिकांबरोबर खेळ खेळतो. सर्वांगी सुंदर असा श्रीकृष्णभक्त पुंडलिकासाठी चंद्रभागेच्या तटावर उभा राहिला आहे. एका जनार्दनी म्हणतात, हाच परमेश्वर विश्वातील सकळ लोकात, सर्व वनस्पतींमध्ये आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात भरून राहिला आहे.
१६९
वेद जया लागलं नित्य वाखाणिती । तो हा वेदमूर्ति पांडुरंग ।
रवि-शशी दीप्ति जेणे प्रकाशती । तो हा तेजोमूर्ति पांडुरंग ।
पांचा भूतांची जो करितो झाडणी । तो ज्ञान-खाणी पांडुरंग ।
राजा त्रैलोक्याचा गुरुराज स्वामी । वसे अंतर्यामी पांडुरंग ।
प्रभा हे जयाची पसरली जनी । चि ची खाणी पांडुरंग ।
परोपकारी लागी अवतार केला । आनंदाचा झेला पांडुरंग ।
नेई भक्तांसी जो आपल्या समीप । तो हा मायबाप पांडुरंग ।
इतिकर्तव्यता हेचि दास लागी । सेवावा हा जगी पांडुरंग ।
एका जनार्दनी देह हरपला । होउनी राहिला पांडुरंग ।
भावार्थ
सामवेदासह चारही वेद ज्याचे नित्य स्तवन करतात असा हा पांडुरंग वेदमूर्ती म्हणुन पुजला जातो. सूर्य, चंद्र या ज्योती प्रकाशित करणारा पांडुरंग तेजोमूर्ती म्हणुन ओळखला जातो. पृथ्वी, आकाश, जल, अग्नी, वायु या पाचही महाभूतांवर ज्याची सत्ता आहे असा पांडुरंग ज्ञानाची खाण असून तो स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांचा गुरुराज स्वामी आहे. असा हा पांडुरंग सर्वांच्या अंतरंगी वसत असल्याने त्याची प्रभा सर्वत्र व्यापून राहिली आहे आणि जगत्-जन याच पांडुरंगाच्या रुपाने नटले आहे. सामान्य लोकांच्या उध्दारासाठी पांडुरंग अनेक अवतार धारण करतो. एकनिष्ठ भक्तांना वैकुंठात स्थान देवून चिरंजीव करतो. असा हा पांडुरंग प्रेमळ भक्तांचा मायबाप बनून त्यांना आनंदी करतो, अशा पांडुरंगाचे दास होऊन सेवा करण्यातच जीवनाची सार्थकता आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अनन्य भक्त पांडुरंगाशी एकरुप होऊन पांडुरंगच होतो.
१७०
विश्व पाळिताहे हरि । दासा केवी तो अव्हेरी ।
नव मास गर्भवास । नाही भागला आम्हांस ।
बाळपणी वाचविले । स्तनी दुग्ध ते निर्मिले ।
कीटक-पाषाणात असे । त्याचे मुखी चारा असे ।
धरा धरा हा विश्वास । एका जनार्दनी त्याचा दास ।
भावार्थ
जो पांडुरंग विश्वाचे पालन करतो, तो आपल्या भक्तांकडे दुर्लक्ष करणार नाही. नऊ महिन्यांच्या गर्भवासात सांभाळ करतो, बाळपणी पोषण करण्यासाठी दुधाची सोय करतो. पाषाणात वसत असलेल्या बेडकीसाठी जो चारा पुरवतो, त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा असे एका जनार्दनी सांगतात.
१७१
चरणांची थोरी । जाणे गौतम-सुंदरी ।
हृदयाची थोरी । भक्त जाणती परोपरीने ।
करांची ती थोरी । जाणे सुदामा निर्धारी ।
सम-चरणींची शोभा । एका जनार्दन उभा ।
भावार्थ
श्री रामाच्या चरणांची थोरवी गौतम ऋषीची पत्नी पतिव्रता अहिल्याच जाणू शकते. ऋषींच्या शापाने पाषाण बनलेली अहिल्या रामाच्या केवळ पद-स्पर्शाने शाप-मुक्त होते. परमेश्वराच्या हृदयाची थोरवी भक्त प्रल्हाद, ध्रुव, पुंडलिक या सारखे प्रेमळ भक्तच समजू शकतात. मित्र सुदाम्याची नगरी सुवर्णाची करणार्या श्री हरिच्या हातांची थोरवी केवळ सुदामा च जाणू शकतो. विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या सम-चरणांची शोभा केवळ एका जनार्दनच अनुभवू शकतात.
१७२
चरण वंदिती कां निंदिती । ते हि हरिपदा जाती
चरण वंदितां तरली शिळा । निंदिता तारिलें शिशुपाळा
ऐसे चरणांचे महिमान । एका जनार्दनी शरण
'भावार्थ
परमेश्वराच्या चरणांना वंदन करणारे एकनिष्ठ भक्त जसे परमेश्वराच्या समीप राहाण्याचा मान मिळवतात तसेच देवाची निंदा करणारे सुध्दां सलोकांत जातात. श्रीरामाच्या चरणांना भक्तिभावाने वंदन करणारी अहिल्या राघवाने शाप -मुक्त केली. शिशुपाळ सतत श्री कृष्णाचा द्वेष करीत असे , पांडवांच्या राजसूय यज्ञ-प्रसंगी गवळ्याचा पोर असे संबोधून श्री कृष्णाला भर-सभेंत अपमानित केले. अखेर शंभर अपराधा नंतर श्री कृष्णाने शिशुपालाचा सुदर्शन चक्राने वध केला परंतू शिशुपाल ही मुक्ती चा अधिकारी झाला. एका जनार्दनी परमेश्वराच्या चरणांचे महिमान वर्णंन करतात.
१७३
बहुतांची मतांतरे तीं टाकुनी । विठ्ठल-चरणी बुडी दे का
नव्हे तुज बाधा काळाची आपदा । ध्याई तूं गोविंदा प्रेम-भरित
जनार्दनाचा एका लिहून चरणी । बोलतसे वाणी करुणा-भरित
भावार्थ
जगांत अनेक भिन्न भिन्न स्वभावाचे लोक असतात त्यांची मते, विचार भिन्न असणे स्वाभाविक आहे. या मत -भिन्नतेकडे दुर्लक्ष करून विठ्ठल भक्तिंत दंग होऊन राहिल्यास कोणतिही संकटे , काळाची बाधा भेडसवणार नाहीत असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, भक्ती-प्रेमाने गोविंदाचे ध्यानांत मग्न व्हावे.
१७४
निवांत श्रीमुख पहावें डोळे भरी ।
तेथें नुरे अंतरी इच्छा कांही
चरणीं ते मिठी घालावें दंडवत ।
तेणें पुरे आर्त सर्व मनीचे
हृदय-कमळीं पहावा तैसा ध्यावा ।
एका जनार्दनी विसांवा सहज चि
भावार्थ
निवांतपणे बसून श्री हरीचे मुख डोळे भरून पहावें या दर्शनाने मनातील सर्व वासना लोप पावतात. श्री हरीला दंडवत घालून चरणांना मिठी घातली की, मनातील सर्व कामना पूर्ण होतात. अंतरंगात दडलेल्या श्री मुर्तीचे ध्यान करतांना मनाला सहजपणे विसावा प्राप्त होईल असे एका जनार्दनी सांगतात.
१७५
राम हें माझ्या जीवींचे जीवन । पाहतां मन हें झालें उन्मन
साधन काही नणें मी अबला । श्याम हें बीज बैसलेंसे डोळां
लोपली चंद्र सूर्याची कळा । तो माझा राम जीवींचा जिव्हाळा
प्रकाश दाटला दाही दिशा । पुढें हो मार्ग न दिसे आकाशा
खुंटली गति श्वासा -उच्छवासा । तो राम माझा भेटेल कैसा
यांसी हो साच परिसा कारण । एका जनार्दनी शरण तरी च साधन
भावार्थ
सावळ्या श्री रामाची मूर्ती पाहातांना ती डोळ्यांत रुतून बसली. राम-मुर्तीच्या प्रभेने चंद्र सूर्याचा प्रकाश लोपून गेला. राम-मुर्तीची प्रभा दाही दिशांत व्यापून राहिली. आकाशातिल पुढील मार्ग दिसेनासा झाला. श्वासाची गती खुंटली. श्री राम हा साधकांच्या जीविचा विसावा असून त्याच्या दर्शनानें मनाचे उन्मन होते. मन व्यवहारिक पातळीवरुन पारमार्थिक पातळीवर स्थिर होते. राम-भेटीची आस लागते. एका जनार्दनी म्हणतात, राम-चरणी संपूर्ण शरणागती हे च एकमेव साधन आहे. त्यां मुळे मनाची तळमळ शांत होईल.
१७६
कृष्णा धांव रे लवकरी । संकट पडलें भारी
हरि तूं आमुचा कैवारी । आलें विघ्न निवारी
आजि कां निष्ठुर झालासी होईल बा गति कैसी
अनाथ मी देवा परदेशी । पांव तूं वेगेसीं
आतां न लावी उशीर । अनर्थ करील फार
एवढा करीं उपकार । दे दर्शन सत्वर
कंठ शोषला अनंता । प्राण जाईल आतां
पदर पसरितें अच्युता । पाव रुक्मिणी -कांता
ऐकुनी बहिणीची करुणा । आला यादव -राणा
द्रौपदी लोळत हरि-चरणा । एका जनार्दना
भावार्थ
येथे एका जनार्दनी द्रौपदी वस्त्र हरणाच्य प्रसंगाचे वर्णन करतात. या प्रसंगी द्रौपदीने केलेला कृष्णाचा धांवा करूण-रसाने भरला आहे. आपण भयंकर मोठ्या संकटांत सापडलो असून हे विघ्न निवारण करण्यासाठी श्री हरीने सत्वर धावून यावे कारण हरि आपला कैवारी असून अनाथ एकाकी पडलेल्या बहिणीसाठी त्यानें वेगाने धाव घ्यावी अशी कळकळीची विनंती द्रौपदी करीत आहे. कंठ शोषला असून प्राण जाईल अशी व्याकूळ अवस्था झाली आहे. आता उशीर केल्यास फार मोठा अनर्थ घडून येईल, या प्रसंगी निष्ठुर न होतां, अच्युताने त्वरेने येऊन उपकार करावा अशी पदर पसरून विनंती केली आहे. बहिणीची करुणा येऊन दयाघन यादव-राणा धावत आला आणि द्रौपदीने हरि-चरणाशी लोळण घेतली.
१७७
तें मन निष्ठुर कां केलें । जें पूर्ण दयेनें भरलें
गजेंद्राचे हाके सरिसे । धांवुनियां आलें
प्रल्हादाच्या भावार्थासी । स्तंभी गुरगुरलें
पांचाळीच्या करुणा-वचने । कळवळूनी आलें
एका जनार्दनी पूर्ण कृपेनें ।निशिदिनी पदीं रमले
भावार्थ
परमेश्वराचे मन कृपेने, कारुण्याने पूर्णपणे भरलेलें आहे, याची अनेक वेळां प्रचीती आली आहे. जेव्हां गजेंद्राचा पाय मगरीने पकडून त्याला पाण्यांत ओढून नेवू लागली तेंव्हा प्राणांतिक वेदनेनें संकटात सापडलेल्या गजेंद्राने श्री हरिची प्रार्थना केली असतां श्री कृष्णाने धावत येऊन गजेंद्राची सुटका केली. प्रल्हादाचा भक्तिभाव जाणून नरसिंह रुपाने खांबातून प्रगट होऊन हिरण्यकश्यपू नावाच्या दैत्याचा वध केला. द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगी पांचाळीचा करुणेचा धांवा ऐकून कळवळले आणि मदतीसाठी धावून आले. एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पूर्ण कृपेने मन प्रेम-भक्तिने रात्रं-दिवस प्रभू-चरणीं रममाण झाले.
१७८
भजन नाहीं मी अकर्मी वायां ।अभिनव अवगति झाली देवराया
नीचा नीच मीचि एक । मजवरी उपरी वर्ते सकळ लोक
अंधा अंध अधोगत पाहीं । मजहूनि अंध कोणी नाहीं
एका जनार्दनी नीच हा गेला । मुंगियेचे पायी सगळा सामावला ।
भावार्थ
जो मनुष्य जन्माला येऊन परमेश्वराचे भजन करीत नाही तो कर्म न करणारा कर्म-करंटा समजला जातो. ही माणसाची अधोगती आहे. तो सर्वांत नीच पातळीवर असतो. त्याच्यापेक्षा सर्व लोक उच्च पातळीवर असतात. अज्ञानी व्यक्ती इतरांना अज्ञानी समजते. परंतू त्याच्या पेक्षा अज्ञानी कोणी नाही हे त्याच्या लक्षात येत नाही. एका जनार्दनी विनयाने आपली गणना अशा अज्ञानी लोकांमध्यें करतात.
१७९
आनंदाचा भोग घालीन आसनी । वैकुंठ-वासिनी तुझे नांवे
येई वो विठ्ठल अनाथांचे नाथें । पंढरी -दैवते कुळ-देवी
आपुलें म्हणावे सनाथ करावें ।एका जनार्दनी वंदावें संत-जना ।
भावार्थ
या भजनांत संत एकनाथ आपण अनाथ असून वैकुंठवासी विठ्ठलाने आपणास साथ करावें अशी प्रार्थना करीत आहेत. पंढरीच्या या कुल-देवीने या भक्तास आपलेसे केल्यास ही पंढरी आनंदाने भरुन टाकीन असे एका जनार्दनी म्हणतात.
१८०
मागणें हें चि माझें देवा । दुजेपण दुरी ठेवा
मी-तूं ऐसी नको उरी । जनार्दना कृपा करीं
रंक मी एक दीन । माझें करावें स्मरण
नीच सेवा मज द्यावी । एका जनार्दनी आस परवावी
भावार्थ
या भजनांत एका जनार्दनी देवाला प्रार्थना करतात कीं, देव व भक्त यां मध्ये दुजेपणा, मी-तू पणा असा द्वैतभाव नसावा. गुरु-कृपेनेच परमेश्वराशी अद्वैत साधणे शक्य होईल अशी श्रद्धा असल्याने संत एकनाथ सद्गुरू कडे याचना करतात, आपण अत्यंत दीन-दुबळे असून स्वामींनी कोणत्याही प्रकारची नीच सेवा देऊन उपकृत करावे. आपली आठवण ठेवून मनाची आस पुरवावी.
१८१
जेथे जेथें मन जाईल वासना । फिरवावें नारायणा हें चि देई
वारंवार द्यावा नामाचा आठव । कुबुध्दीचा ठाव पुसा सर्व
भेदाची भावना तोडावी कल्पना । छेदावी वास-समूळ कंद
एका जनार्दनी नको दुजा छंद । राम कृष्ण गोविंद आठवावा
भावार्थ
ज्या ज्या ठिकाणी मनाची वासना जाईल तेथून ती परत फिरवावी एव्हढी एकच मागणी एका जनार्दनी नारायणाकडे करीत आहेत. वारंवार नामाची आठवण द्यावी, भेदाची भावना तोडून वाईट वासना समूळ नाष्ट करावी राम कृष्ण गोविंदा शिवाय मनाला दुसरा कोणताही छंद नसावा आशी ईच्छा एका जनार्दनी येथें व्यक्त करतात.
१८२
सर्वा भूतीं तुझे रूप । हृदयी सिध्द चि स्वरूप
इतुलें देई अधोक्षजा । नाही तरी घोट भरीन तुझा
सकळांहूनी करी सान । सकळिका सम समान
नि:शेष दवडोनिया स्वार्थ । अवघा करी परमार्थ
एका जनार्दनी मागे । नाही तरी घाला घालीन अंगे
भावार्थ
सर्व प्राणिमात्रांच्या अंतरंगी परमात्म्याचे रुप विराजमान आहे याची जाणीव सतत हृदयांत जागृत राहू द्यावी अशी अपेक्षा संत एकनाथ येथे व्यक्त करतात. सर्वच सजींवांवर सारखीच कृपा-दृष्टी ठेवावी, मनातील स्वार्थीपणाची भावना नाहिशी करून सर्वांना परमार्थी करावें, अशी निर्वाणिची मागणी एका जनार्दनी श्री हरीच्या (अधोक्षज) चरणांशीं करीत आहेत.
१८३
तुज सगुण जरी ध्याऊं तरी तूं परिमाण होसी
तूज निर्गुण जरी ध्याऊं तरी तू लक्षा न येसी
सात चि वेद-पुरुषा न कळसी श्रृती -अभ्यासेंसीं
तो तूं नभाचा जो साक्षी शब्दीं केवीं आतुडसी
जय रामा रामा सच्चिदानंद रामा
भव-सिधु-तारक जय मेघ-श्यामा
अनंत-कोटी-ब्रह्मांडधीशा अनुपम्य महिमा
अहं सोनं ग्रासून हें तों मागतसे तुम्हां
अष्टांग योगे शरीर दंडुनी वायुसी झुंज घेऊं
तेथें बहुसाल अंतराय तयाचा येतसे भेऊ
कर्म चि जरीं आचरूं दृढ धरूनियां बाहो
तेथें विधि - निषेधाचा मोठा अंगीं वाजतसे धावो
जनीं जनार्दन प्रत्यक्ष डोळां कां न दिसे यासी
समताहंकृती योगी बुडविती साधन आश्रमासी
एका जनार्दनी सिध्द साधन कां न करिसी
सांडी मांडी न लगे मग तूं अवघा राम चि होसी
भावार्थ
परमेश्वराचे सगुण रुपांत ध्यान करावे तर तो विश्व-व्यापी परमेश्वर एकदेशी बनून स्थळ-काळानें मर्यादित होतो. निर्गुण रूपांत ध्यान करीत असतांना रुप डोळ्यांना अगोचर असल्याने ध्यानात येत नाही. याच कारणाने वेदांना आणि श्रुतींना परमेश्वराचे रूप अगम्य आहे. जो परमात्मा अनंत आकाशाचा साक्षी आहे त्याचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायकाचा महिमा वर्णनातित आहे. अष्टांग योगाच्या अभ्यासाने किंवा कर्मयोगाचे नियमित आचरण करूनही या परम तत्वाचा वेध घेता येत नाही. एका जनार्दनी म्हणतात, या सर्व अवघड मार्गांनी जाण्यापेक्षा भक्ती-मार्गाचा अंगीकार करणे सुलभ आहे. राम-नामाचा जप करता करता भक्त देव बनतो. सत् चिदानंद , भवतारक मेघश्याम रामाचे नाम च सिध्द-मंत्र आहे.
१८४
जय गोविंदा परमानंदा ऐक माझे बोल
निर्गुणरूपे असतां तुझें कांहीं च नव्हे मोल
मग तूं माया धरूनि अति झालिसी सबळ
नसतें देवपण अंगीं आणुनि चाळविसी केवळ
नसतां तुज मज भेद देवा लटिके जीवपण देसी
आपुलें ठाईं थोरपण आणुनी आमुची सेवा घेसी
नसती अविद्या पाठीं लावुनी संसारीं गोंविसी
नाना कर्मे केली म्हणुनि आम्हां कां दंडिसी
आपुली महिमा वाढो म्हणुनी आकस आरंभिलें
तुज मज देवा वैर ऐसे करितां नव्हे भले
ऐसें तुज मज वैर म्हणुनी गुरुसी शरण गेलों
देव-भक्तपण कोण्या कर्मे मग पुसों लागलं
सद्गुरु म्हणती सर्व हि मायिक निश्चयें वोलिलों
देव आणि भक्त एक चि गोष्टीसी पावलों
आतां सद्गुरु-वचनें तुझे गिळीन देवपण
तुझिया नेणों भक्तावरी घालीन पाषाण
जीव शिव दोन्ही मिळोनि मग मी सुखें राहीन
तुज मज रुप ना रेखा त्याते निर्धारीन
ऐसे भक्तबोल ऐकुनी देवा थोर उपजली चिंता
विवेक-बळें करुनी माझे देवपण उडवील आतां
या लागीं भिणें भक्त-जनांसी ऐक्य करुनी तत्वतः
एका जनार्दनी दर्शन द्यावें लागेल त्वरितां
भावार्थ
या भजनांत संत एकनाथ देवापुढे देवा विषयी तक्रार करीत आहे. परमानंद गोविंदाला आपले खडे बोल सुनावले आहेत. परमेशाने सगुण रुप धारण केले नसते तो केवळ निर्गुण निराकार रुपांत असतां तर भक्तांच्या दृष्टीने काहीं मोल नाही. हे भक्तांचे मनोगत जाणून देवाने मायेचा आधार घेऊन नसते देवपण स्विकारलें आणि भक्तांना खोटे जीवपण दिले. स्वता:कडे थोरपणा घेऊन भक्तांकडून सेवा घेऊ लागला. भक्तांची अविद्या, अज्ञान यांचा फायदा घेऊन त्यांना जन्म-मरणाच्या संसार-चक्रांत अडकवले. आपले महत्त्व वाढवण्यासाठी कर्मफल म्हणून शिक्षा देऊ लागलास. एका जनार्दनी म्हणतात. असा आकस धरून वैर करणे योग्य नाही. देव -भक्तांत असे वैर निर्माण झाल्याने भक्त गुरु-चरणाला शरण गेले. देवाला देवपण आणि भक्ताला भक्तपण कोणत्या कर्माचे फळ आहे असे विचारु लागले. ही सर्व माया (नश्वर) आहे असा सद्गुरुंनी निर्णय दिला. देव आणि भक्त एकरुप आहेत या सद्गुरू वचनाने देवाचे देवपण गळून पडले. जीव हे शिवाचे अंशरुप आहे, देव -भक्तांत अद्वैत आहे. या सिध्दाताने भक्त सुखी झाले असून देवाला चिंता लागली. भक्त विवेक बळाने आपले देवपण उडवील अशी चिंता लागून राहिल्याने देव च भक्त -जनांना घाबरू लागला. आता भक्तांसी ऐक्य करण्यासाठी देवाला दर्शन द्यावे च लागेल असे एका जनार्दनी म्हणतात.