अभंग १५२
संत-संगतीने झालें माझें काज । अंतरी ते निज प्रगटले ।
बरवा झाला समागम । अवघा निवारिला श्रम ।
दैन्य दरिद्र्य दूर गेले । संत-पाउले देखता ।
एका जनार्दनी सेवा । करीन मी आपुल्या भावा ।
भावार्थ:
संतकृपेने अंतरंगात हरिचे रूप प्रगट झाले. मनीचा हेत पूर्ण झाला. ही जिवा-शिवाची भेट फारच सुखदायक झाली. सर्व परिश्रमाचे निवारण झाले. संतांच्या चरण-दर्शनाने अवघे दैन्य, दारिद्र्य लयास गेले. एका जनार्दनी म्हणतात, अत्यंत भक्तिभावाने संताची सेवा करावी.
१५३
कैवल्य-निधान तुम्ही संत जन । काया वाचा मन जडले पायी ।
सर्व भावे दास अंकित अंकिला । पूर्णपणे झाला बोध देही ।
जे जे दृष्टी दिसे ते ते ब्रह्मरूप । एका जनार्दनी दीप प्रज्वळला ।
भावार्थ:
संतजन मोक्षप्राप्तीचे सर्वोतम साधन आहे, ते कैवल्य-निधान म्हणून ओळखले जातात. देहाने मनाने व वाचेने साधक संतांशी जोडले जातात. जे जे दृष्टीला दिसते ते ते सर्व ब्रह्मरूप आहे असा संपूर्ण बोध होऊन अंतरात ज्ञानदीप प्रकाशित होतो. या अपूर्व लाभाने साधक संताचा कायमचा दास बनतो.
अभंग १५४
धन्य दिवस झाला । संत समुदाय भेटला ।
कोडे फिटले जन्माचे । सार्थक झाले पै साचे ।
आजि दिवाळी दसरा । संत-पाय आले घरा ।
एका जनार्दनी झाला । धन्य दिवस तो माझा ।
भावार्थ:
संतांचा समुदाय भेटल्याने मनातले सर्व संशय विलयास गेले. मनुष्य देहाचे सार्थक झाले. आजचा दिवस धन्य झाला कारण संतांचे पाय घराला लागले. जनार्दनस्वामींनी एकनाथांचा शिष्य म्हणून स्विकार केला. घरात दिवाळी, दसरा साजरा झाला असे एका जनार्दनी म्हणतात.
१५५
केला संती उपकार । दिधले घर दावूनी ।
न ये ध्यानी मनी लक्षी । तो प्रत्यक्षी दाविला ।
संकल्पाचे तोडिले मूळ । आले समूळ प्रत्यया ।
एका जनार्दनी कृपावंत । होती संत सारखे ।
भावार्थ:
ज्या परमेश्वराचे रुप ध्यानाने, मनाने, बुध्दीने प्रयत्न करूनही दिसत नाही त्या विठ्ठलाचे घर दाखवून तो प्रत्यक्ष डोळ्यांना दाखवला हे संतांचे फार मोठे उपकार आहेत. मनातला संकल्प फळास आला. एका जनार्दनी म्हणतात, सर्व संत सारखेच कृपावंत असतात.
अभंग १५६
मोकळे ते मन ठेविले बांधूनि । जनार्दन-चरणी सर्व भावे ।
स्थिर मती झाली वार्ता तेहि गेली । द्वैताची फिटली सर्व सत्ता ।
एका जनार्दनी धन्य संतसेवा । उगविला गोवा गुंतत सर्व ।
भावार्थ:
मोकाट भटकणारे मोकळे मन सद्गुरू जनार्दनस्वामींच्या चरणाशी बांधून ठेवले. सर्वभावे त्यांना शरण गेल्याने बुध्दी गुरुचरणांशी स्थिर झाली. मनातील द्वैतभाव विलयास गेला. मनातील संशयाचा गोंधळ निमाला. एका जनार्दनी म्हणतात, संतसेवेमुळेच हे सर्व घडून आले. संतसेवा धन्य होय.
अभंग १५७
संत-द्वारी कुतरा झालो । प्रेम-रसासी सोकलो ।
भुंकत भुंकत द्वारा आलों । ज्ञान-थारोळ्या बैसलो ।
कुतरा भुंकत आला हिता । संती हात ठेविला माथा ।
कुत्रा गळ्याची साखळी । केली संतांनी मोकळी ।
एका जनार्दनी कुतरा । दात पाडुनी केला बोचरा ।
भावार्थ:
संत एकनाथ सांगतात, कुत्रा होऊन भुंकत भुंकत संताच्या दाराशी आलो. संताच्या ज्ञानरुपी थारोळ्यात (डबक्यात) बसून प्रेमरसाचे प्राशन केले. आपल्या हितासाठी याचना करीत असतांना संतानी कृपा करुन मस्तकावर हात ठेवला आणि गळ्याची साखळी मोकळी केली. याचना करणारे तोंड दात पाडून बोचरे केले. येथे एका जनार्दनी आपली गुरुनिष्ठा व विनयशीलता प्रकर्षाने प्रकट करीत आहेत.
गुरु-भक्ति
अभंग १५८
मनोभाव जाणोनि माझा । सगुण रुप धरिलें वोजा
पाहुणा सद्गुरू-राजा । आला वो मायें
प्रथम अंत:करण लाभ । चित्त शुध्द आणि मन
चोखाळोनि आसन । स्वामींनी केलें
अनन्य आवडीचे जळ । प्रक्षाळिलें चरण-कमळ
वासना समूळ । चंदन लावी
अहं जाळियेला धूप । सद्भाव उजळिला दीप
पंच प्राण हे अमूप । नैवेद्य केला
एका जनार्दनी पूजा । देव भक्त नाहीं दुजा
अवघा चि सद्गुरु-राजा होवोनी ठेला
भावार्थ:
शिष्याचे मनोगत सद्गुरूंनी जाणून घेतले आणि सगुण रुपाने साकार झालें. सद्गुरु-राजा पाहुणा होऊन घरासी आला असून त्यांच्या कृपेनें अंत:करण म्हणजे चित्त व मन शुध्द झाले. या निर्मळ अंतकरणांत स्वामींनी आपले आसन स्थिर केलें गंगाजला सारख्या पवित्र जलानें सद्गुरुंचे चरण धुतले. वासना रुपी चंदनाचे खोड उगाळून त्याना चंदनाचा टिळा लावला. अहंकार रुपी धूप व सद्भावनेचा दीप प्रज्वलित केला. प्राण, आपान, व्यान उदान, समान या पंच-प्राणांचा नैवेद्य केला. अशा प्रकारे सद्गुरुंची षोडपोचारे पूजा केली, असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, देव व भक्त यांमध्ये द्वैत नसून सद्गुरू हेच देवता रुप आहेत यांत संशय नाही.
अभंग १५९
श्रीगुरुंचे नाम-मात्र । तेचि आमुचे वेदशास्त्र ।
श्रीगुरुंचे चरण-रज । तेणे आमुचे झाले काज ।
श्रीगुरुंची ध्यान-मुद्रा । तेचि आमुची योग-निद्रा ।
एका जनार्दनी मन । श्रीगुरु-चरणी केले लीन ।
भावार्थ:
श्रीगुरुंचे नाम हेच शिष्यांचे वेदशास्त्र असून सद्गुरुंच्या चरणाची धूळ मस्तकी धारण केल्याने शिष्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. श्रीगुरुंच्या प्रतिमेवर ध्यान लावून उपासना करणे हीच शिष्याची योग-निद्रा होय असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरुंच्या चरणी मनाला सर्वार्थाने लीन केल्याने योग-निद्रेचा अपूर्व अनुभव मिळाला.
अभंग १६०
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ।
देव तयाचा अंकिला । स्वये संचला त्याचे घरा ।
एका जनार्दनी गुरु देव । येथे नाही बा संशय ।
भावार्थ:
गुरु हाच प्रत्यक्ष परमेश्वर आहे असा ज्याचा दृढ विश्वास असतो त्याच्यावर परमेश्वराचा विश्वास असतो. देव त्याचा अंकित असतो. देव स्वत: हा त्याच्या घरच्या पाहुणा म्हणून येतो. सद्गुरू जनार्दनस्वामी परमेश्वराचे रूप आहेत याबाबत कोणताही संशय नाही असे एका जनार्दनी नि:संशयपणे सांगतात.
अभंग १६१
सेवेची आवडी । आराम नाही अर्ध घडी ।
नित्य करिता गुरु-सेवा । प्रेम पडिभर होत जीवा ।
आळस येवोचि सरला । आराणुकेचा ठावो गेला ।
तहान विसरली जीवन । भूक विसरली मिष्टान्न ।
ऐसे सेवे गुंतले मन । एका जनार्दनी शरण ।
भावार्थ:
गुरुसेवेची मनात आवड निर्माण झाली की अर्धा ताससुध्दा आराम करावा असे वाटत नाही. सतत गुरुसेवेत गुंतलेल्या मनात गुरुविषयीचा प्रेमभाव वाढत असून आळस कायमचा पसार होतो. आराम करण्याची इच्छाच होत नाही, तहान, भूकेची जाणिवच होत नाही. गुरुसेवेत अशारितीने मन एकाग्र होते, असे एका जनार्दनी म्हणतात.
अभंग १६२
येवढे जया कृपेचे करणे । रंक राजेपणे मिरवती ।
तो हा कल्पतरु गुरु जनार्दन । छेदी देहाभिमानु भव कंदु ।
कृपेचे गोरसे धावे कामधेनु । तैसा माझा मनु देखलासि ।
एका जनार्दनी तया वाचुनि कही । दुजे पाहणे नाही मनामाजी ।
भावार्थ:
सद्गुरू जनार्दनस्वामी इच्छिलेले फळ देणारे कल्पतरु असून त्यांनी देहाभिमान समूळ नाहीसा करुन भव-बंधने छेदून टाकावित. संतकृपेने रंकाचा राजा बनतो. सद्गुरू जनार्दनस्वामी हे कामधेनु असून त्यांच्या कृपारुपी गोरसासाठी मनाला वेध लागला आहे. स्वामींच्या कृपाप्रसादाशिवाय कोणत्याही इतर वासना मनात नाही असे एका जनार्दनी म्हणतात.
अभंग १६३
साधावया परमार्था । साह्य नव्हेती माता-पिता ।
साह्य नव्हेती व्याही जावुई । आपणा आपण साह्य पाही ।
साह्य सद्गुरू समर्थ । तेचि करिती स्व:हित ।
एका जनार्दनी शरण । नोहे एकपणा वाचून ।
भावार्थ
परमार्थ साधण्यासाठी आई-वडील, व्याही, जावई यापैकी कुणाचेही साह्य होत नाही. आपणच आपले साह्यकारी असतो. परमार्थात सद्गुरूच समर्थपणे मदत करु शकतात. तेच आपले हित करु शकतात. एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरूचरणी एकनिष्ठपणे शरणागत होण्यानेच परमार्थ साधणे शक्य आहे.
अभंग १६४
दासा दु:ख झाले फार । वेगी करा प्रतिकार ।
पुण्य-स्थान मी पावलो । गुरु-चरणी विश्रामलो ।
कर जोडूनिया सिर । ठेवियेले पायांवर ।
जन्म-नाम जनार्दन । मुखी गुरु-अभिमान ।
भावार्थ:
संत एकनाथ म्हणतात, सद्गुरू जनार्दनस्वामींच्या पुण्यपावन नगरात येऊन गुरुचरणांचा आश्रय घेतला, दोन्ही कर जोडून चरणांवर मस्तक ठेवले. स्वामींवर पूर्णपणे विसंबून दासाच्या दु:खाचा प्रतिकार करण्याची काकुळतीने विनंती केली.
अभंग १६५
जन्मोजन्मीचे संचित । गुरु-पायी जडले चित्त ।
ते तो सोडिल्या न सुटे । प्रेम-तंतू तो न तुटे ।
दु:खे आदळली वरपडा । पाय न सोडा हा धडा ।
एका जनार्दनी निर्धार । तेथे प्रगटे विश्वंभर ।
भावार्थ:
अनेक जन्मांचे साचलेले पुण्य-कर्म फळास आले आणि गुरु-चरणांशी चित्त (मन) जडले. प्रयत्न करुनही आता ते गुरुचरणांपासून अलग होणार नाही, हा प्रेमाचा धागा तुटणार नाही. कितीही दु:खे कोसळली तरी गुरु-चरण सोडणार नाही असा मनाचा निश्चय असून गुरुचरणीच विश्वंभर प्रगट होईल असा विश्वास एका जनार्दनी प्रगट करतात.
अभंग १६६
जय जय वो जनार्दने विश्वव्यापक संपूर्ण वो ।
सगुण अगुण विगुण पूर्ण पूर्णानंदघन वो ।
ब्रह्मा विष्णु रुद्र निर्माण तुजपासोनी वो ।
गुण-त्रय उभय-पंचक तूचि अंत:करणी वो ।
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या उन्मनी हे स्थान वो ।
विश्व तेजस प्राज्ञ प्रत्यगात्मा तू संपूर्ण वो ।
त्वंपद तत्पद आणिक असिपद ते तू एक वो ।
नसोनि एकपणी एका एकी जनार्दन वो ।
भावार्थ:
सद्गुरू जनार्दनस्वामी प्रत्यक्ष परमेश्वराचे रूप असून ते संपूर्ण विश्वव्यापक आहेत. ते सगुण, निर्गुण या दोन्ही विशेष रुपाने अस्तित्वात असून आनंदमय आहेत. ब्रह्मा, विष्णु, महेश ही सद्गुरुंची वेगवेगळी रूपं आहेत. सत्व, रज, तम, पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये या सर्वांच्या अंतर्यामी सद्गुरूरुपच अवस्थित आहे. सावधानता, स्वप्नावस्था, गाढ झोप, साक्षात्कारी व मनाची उदात्तता या सर्व अवस्थांचा सद्गुरू साक्षीदार आहे. सद्गुरू विश्वरूप, स्वयंप्रकाशी, सर्वज्ञानी असून चैतन्यरुपाने सर्वात्मक आहेत. अहम्, त्वम् व तत्पदाने सद्गुरू सर्वांच्या चित्तात विराजमान आहेत. सद्गुरू जनार्दन व एका जनार्दनी देहाने वेगळे दिसले तरी आत्मरुपाने ते एकरुपच आहेत असे एका जनार्दनी म्हणतात.
१६७'
रामाईवो । सीतेकारणे रामे रावण वधिलियो ।
देवगण सोडून सुखी केलीयो ।
कृष्णाईवो देवकी बंदीशाळे त्याकारणे धावलीयो ।
धरुन लीला कंसमामासी मारलीयो ।
बोधाईवो । भक्तिभाव देखुनी तिष्ठत भीमातीरीयो ।
पुंडलीकाकारणे सकळ जग उधादरिलीयो ।
एका जनार्दनी देखिलीयो । आई वैदीण प्रसन्न झालीयो । सकळ सुख देखलियो ।
भावार्थ
या भजनात संत एकनाथ राम-कृष्ण लीलांचे वर्णन करतात. सीतेसाठी श्रीरामांनी रावणाचा वध करून सर्व देवांची रावणाच्या बंदीवासातून सुटका केली. श्रीकृष्णाने आपल्या देवकीमातेची कंसाच्या बंदीशाळेतून सुटका करण्यासाठी कंसमामाचा वध केला. पुंडलिकाचा भक्तिभाव पाहून त्याच्यासाठी भीमा नदीच्या तीरावर अठ्ठावीस युगे तिष्ठत उभा राहून सकळ जगाचा उध्दार केला. एका जनार्दनी म्हणतात, आई जगदंबा प्रसन्न झाल्याने सर्व सुख प्राप्त झाले.