मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
निष्काम कर्म-योग

निष्काम कर्म-योग

संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.


१५

आधी घेई निरपेक्षता । त्याचे चरण वंदीन माथा ।
निरपेक्षाची आवडी । ब्रह्मज्ञान घाली उडी ।
निरपेक्षावाचून । नाही नाही रे साधन ।
एका जनार्दन शरण । निरपेक्ष पाविजे ज्ञान ।

भावार्थ:

निरपेक्ष भक्ती, निरपेक्ष कर्म हेच निरपेक्ष ज्ञान मिळवण्याचे एकमेव साधन आहे. निरपेक्षतेशिवाय अन्य कोणतेही साधन नाही. निरपेक्ष साधकाच्या प्रेमामुळे प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान धाव घेते असे सांगून एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी निरपेक्षपणे शरणागत झाल्याने ब्रह्मज्ञानाचा अधिकारी झाला.

१६

आशा-बध्द करिती वेदांचे पठण । तेणे नारायण तुष्ट नोहे ।
आशा-बध्द करिती जप तप हवन । तेणे नारायण तुष्ट नोहे ।
निराशी करिती देवाचे कीर्तन । एका जनार्दन तुष्ट होय ।

भावार्थ:

जेव्हा साधक काहितरी फळ मिळवण्यासाठी वेदांचा अभ्यास, पठण करतो. त्यामुळे नारायण प्रसन्न होत नाही. जप, तप, होम हवन ही नैमित्तिक कर्मे जेव्हा सत्ता, संपत्ती, संतती, लौकिक मिळवण्याच्या आशेने केली जातात, तेव्हाही नारायण संतुष्ट होत नाही. जेव्हा केवळ मनाच्या समाधानासाठी, चित्तशुध्दीसाठी जी कर्मे केली जातात, तेव्हा एकनाथांचे जनार्दनस्वामी आनंदित होतात.

१७

वेदयुक्त मंत्र जपता घडे पाप । मी मी म्हणोनि संकल्प उठतसे ।
यज्ञादिक कर्म घडता सांग । मी मी संसर्ग होता वाया ।
एका जनार्दनी मीपणा टाकून । करी कृष्णार्पण सर्व फळ ।

भावार्थ:

योग-याग, होम-हवन करतांना ज्या वेदमंत्रांचे पठण केले जाते ते मंत्र मुख्यतः कामनापूर्तीसाठी गायले जातात. त्यामुळे मनात नवनवे संकल्प उठतात. या संकल्पानुसार यज्ञादिक कर्मे यथासांग पार पाडली जातात. त्यामुळे मनाला मीपणाचा संसर्ग होतो. अहंकाराची बाधा होते. यासाठी एका जनार्दनी सांगतात, मीपणाचा त्याग करून केलेल्या सर्व कर्माची फळे श्रीकृष्ण नारायणाला श्रध्देने अर्पण करावी.

१८

कर्म करिसी तरी कर्मठचि होसी । परी निष्कर्म नेणसी कर्मामाजी ।
ब्रह्मालागी कर्म सांडणे हे कुडे । पाय खंडोनि पुढे चालु पाहसी ।
एका जनार्दनी सर्व कर्म पाही । सांडी मांडी नाही तये ठायी ।

भावार्थ:

कर्म करतांना निष्कर्म होणे हेच कर्माचे अंतिम साध्य आहे. फलाशा सोडून कर्म करणे म्हणजे कर्माचे फळ ईश्वराला समर्पित करणे होय. परंतु कर्म करत असताना आपण निष्कर्म न होता अधिकाधिक कर्मठ होत जातो. ब्रह्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्नात आपली सर्व नित्य व नैमित्तिक कर्मे सोडून देणे म्हणजे पाय तोडून टाकून पुढे चालण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. कारण कर्म हेच ब्रह्मज्ञानाचे मुख्य साधन आहे असे सांगून एका जनार्दनी कोणतेही कर्म सोडू नये असे आग्रहाने सांगतात.

१९

धावू नको सैरा कर्माचिया पाठी । तेणे होय दृष्टि उफराटी ।
शुध्द-अशुध्दाच्या न पडे विवादा । वाचे म्हणे सदा नारायण ।
एका जनार्दनी ब्रह्मार्पण कर्म । तेणे अवघे धर्म जोडतील ।

भावार्थ:

योग्यायोग्यतेचा कोणताही विचार न करता साधक कर्माच्या पाठीमागे लागला तर तो निष्कर्मी बनण्याची ऐवजी कर्मठ बनतो, त्याची दृष्टी उफराटी बनते असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, कर्माची कोणती पध्दत शुद्ध व कोणती अशुध्द यांच्या वादात न पडता, वाचेने सतत नारायणाचे नाम घेत कर्म केले की ते ब्रह्मार्पण होते व सर्व धर्मांचे पालन केल्याचे श्रेय मिळते.

२०

प्रपंच परमार्थ एकरूप होत । आहे ज्याचा हेत रामनामी ।
परमार्थे साधे सहज संसार । येथे येरझार नाही जना ।
सहज संसारे घडे परमार्थ । लौकिक विपरीत अपवाद ।
एका जनार्दनी नाही तया भीड । लौकिकाची चाड कोण पुसे ।

भावार्थ:

रामनामाचा अखंडित जप करीत जो प्रपंच करतो त्याचा प्रपंच व परमार्थ एकरूप होतो, म्हणजे प्रपंच करीत असताना त्याला परमार्थ साधतो. रामनामस्मरणात संसार सहजपणे घडून येतो. याविपरीत उदाहरण हा अपवाद समजावा. येथे जन्म-मरणाची बंधने तुटून पडतात, असे एकनाथ महाराज सांगतात.

२१

जगाचिये नेत्री दिसे तो संसारी । परी तो अंतरी स्फटिक शुध्द ।
वायाचि हाव न धरी पोटी । वाउगी ती गोष्टी न करी जगा ।
स्त्री-पुत्र-धन नाही तेथे मन । इष्ट मित्र कारण नाही ज्याचे
एका जनार्दनी प्रपंच परमार्थ । सारिकाचा होत तयालागी ।

भावार्थ: रामनाम घेत संसार करणारा साधक जगाच्या दृष्टीने संसारी असला तरी तो अंतर्यामी स्फटिकासारखा शुध्द असतो. लौकिक, सत्ता, संपत्ती याविषयी त्याच्या मनात लालसा नसते. पत्नी, संतती याविषयी संसारात असूनही ममत्व नसते. असा भक्त सामान्यांना विपरीत वाटतील अशा गोष्टी करीत नाही. इष्ट मित्रांना खुष ठेवण्याचा प्रयत्न तो करीत नाही. असा भक्त संसारात राहून परमार्थ साधत असतो असे एका जनार्दनी म्हणतात.

२२

उत्तम पुरुषाचे उत्तम लक्षण । जेथे भेद शून्य मावळला ।
भेद शून्य झाला बोध स्थिरावला । विवेक प्रगटला ज्ञानोदय ।
जिकडे पाहे तिकडे उत्तम दर्शन । दया शांती पूर्ण क्षमा अंगी ।
एका जनार्दनी उत्तम हे प्राप्ती । जेथे मावळती द्वैताद्वैत ।

भावार्थ: ज्या पुरुषाच्या चित्तातील मी-तू पणाचा भेद, द्वैत-अद्वैत हा भेद पूर्णपणे लयास गेला आहे तो उत्तम पुरुष समजावा. सर्व प्रकारचे भेदाभेद नाहिसे होऊन चित्त शुद्ध झाले असता सद्गुरुने केलेला बोध चित्तात स्थिरावतो, विवेक प्रकट होऊन ब्रह्मज्ञान होते. जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी केवळ एकच आत्मतत्व भरून राहिले आहे असा प्रत्यय येतो. सर्वत्र परमेश्वराचे उदात्त दर्शन घडते. अशा साधकाचे मन दया, क्षमा, शांती यांनी भरून जाते. एका जनार्दनी म्हणतात, जेथे द्वैत संपून अद्वैताचा अनुभव आला तेथे ही उत्तम लक्षणे दिसून येत असल्याचे जाणवते.

२३

समुद्र क्षोभे वेळोवेळी । योगिया क्षोभेना कोणे काळी ।
समुद्रा भरते पर्व-संबंधे । योगी परिपूर्ण परमानंदे ।
समुद्र सर्वदा तो क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ।
योगियाची योग-स्थिती । सदा परमार्थ भक्ति ।
एका जनार्दनी शरण । योगियांचे जे योगचिन्ह ।

भावार्थ:

येथे एकनाथमहाराज समुद्र व योगी यांची तुलना करीत आहेत. अनेकवेळा समुद्रात वादळे निर्माण होतात, वडवानल उठतात. योगी पुरुषांच्या अंत:करणातमात्र कधीच क्षोभ निर्माण होत नाही. पर्वकाळी अमावस्या, पौर्णिमेला समुद्राला भरती येते. योगीमात्र सदासर्वकाळ परमानंदाने प्रसन्नचित् असतो. समुद्राचे पाणी क्षारयुक्त असते, तर योगेश्वराचे चित्त माधुर्याने परिपूर्ण असते. सदा परमार्थभक्ति ही योगीजनांची कायमस्वरूपी योग-स्थिति असते. जनार्दनस्वामींच्या चरणी शरणागत असलेले संत एकनाथ योग्यांची योगचिन्हे सांगून योग्याचा महिमा वर्णन करतात.

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP