४७
अविश्वासा घरी । विकल्प नांदे निरंतरी ।
भरला अंगी अविश्वास । परमार्थ तेथे भूस ।
सकळ दोषांचा राजा । अविश्वास तो सहजा ।
अविश्वास धरिला पोटी । एका जनार्दनी नाही भेटी ।
भावार्थ:
अविश्वास हा सर्व दोषांमधला सर्वात अपायकारक दोष समजला जातो. ज्याच्या मनात इतरांबद्दल अविश्वास असतो त्याचे मन अनेक प्रकारच्या संशयाने, विकल्पाने ग्रासलेले असते. तेथे आत्मविश्वासाचा अभाव असून सद्गुरूंविषयी श्रध्दा निर्माण होऊ शकत नाही. जेथे श्रध्दा नाही, तेथे परमार्थ सुदृढ होणे शक्य नाही; असे एका जनार्दनी म्हणतात.
४८
अविश्वासा पुढे । परमार्थ कायसें बापुडे ।
अविश्वासाची राशी । अभिमान येतसे भेटीसी ।
सदा पोटी जो अविश्वासी । तोचि देखे गुण-दोषांसी ।
सकळ दोषा मुकुटमणी । अविश्वास तोचि जनी ।
एका जनार्दनी विश्वास । नाही त्यास भय काही ।
भावार्थ:
मनातील अविश्वासामुळे अभिमान निर्माण होतो. अहंकाराने इतरांचे गुण-दोष पहाण्याची वृत्ती बळावते, त्यामुळे परमार्थाची हानी होण्याची भिती वाढते. एका जनार्दनी सांगतात की ज्याचा गुरुवचनावर पूर्ण विश्वास असतो, तो कोणत्याही भयापासून मुक्त होतो.
४९
एक नरदेह नेणोनि वाया गेले । एक न ठके म्हणोनि उपेक्षिले ।
एकांते गिळले । ज्ञान-गर्वे ।
एक ते साधनी ठकिले । एक ते करू करू म्हणतचि गेले ।
करणे राहिले । ते तैसें
ज्ञाने व्हावी ब्रह्म-प्राप्ति । ते ज्ञान वेंची विषयांसक्ती ।
भांडवल नाही हाती । मा मुक्ति कैची ।
स्वप्नींचेनि धने । जागृती नोहे धर्म ।
ब्रह्माहमस्मि समाधान । सोलीव भ्रम ।
अभिमानाचिया स्थिती ब्रह्मादिका पुनरावृत्ति ।
ऐसी वेद-श्रुति निश्चये बोले ।
एका जनार्दनी । एकपण अनादि ।
अहं आत्मा तेथे । समूळ उपाधी ।
भावार्थ:
काही साधक मानवी देहाचे महत्त्व समजून न घेतल्याने, काही ज्ञानाचा गर्व झाल्याने, तर काहीची उपेक्षा झाल्याने वाया गेले. काही अयोग्य पद्धतीने साधना केल्याने फसले, तर काही निश्चय दृढ नसल्याने किंवा आळस बळावल्याने साधनेत प्रगती करु शकले नाहीत. ब्रह्मप्राप्ति व्हावी यासाठी जे ज्ञान संपादन केले ते इंद्रियसुखाच्या शोधात खर्च करून ज्ञानरुपी भांडवल गमावून काही मुक्तिला पारखे झाले. मी ब्रह्मरुप आहे हे जाणून त्यातून समाधान मानणे, हा केवळ भ्रम आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अभिमानाने ब्रह्मादिक (ब्रह्मा, विष्णू, महेश आदि) देवांचेसुध्दा स्वर्गातून पतन होते असे वेद-श्रुती वचन आहे. मी देह नसून आत्मरुप आहे, हे अनादी तत्व जाणून उपाधीरहित होणे अधिक श्रेयस्कर आहे.
५०
लोखंडाची बेडी तोडी । आवडी सोनियाची घडी ।
मी ब्रह्म म्हणता अभिमान । तेथे शुध्द नोहे ब्रह्मज्ञान ।
जैसी देखिली जळ-गार । शेवटी जळचि निर्धार ।
मुक्तपणे मोला चढले । शेवटी सोनियाचे फांसा पडिले ।
एका जनार्दनी शरण । बध्द-मुक्तता ऐसा शीण ।
भावार्थ:
लोखंडाची बेडी तोडून आवड म्हणून सोन्याची बनवली, तरी ते शेवटी बंधनकारकच आहे. मी ब्रह्म आहे हे शुध्द ज्ञान नसून केवळ अभिमान आहे, जसे मेघातून पडलेल्या गारा हे पाण्याचेच घनरुप आहे. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मुक्तीसाठी साधना केल्याने लोकांकडून लौकिक मिळाला पण तो सोन्याच्या बंधनात सापडून वाया गेला. बंधन आणि मुक्तता हा केवळ जाणिवेचा शीण आहे.
५१
मी एक शुचि । जग हे अपवित्र । कर्मचि विचित्र । ओढवले ।
देखत देखत । घेत असे विख । अंती ते सुख । केवी होय ।
अल्पदोष ते । अवघेचि टाळी । मुखे म्हणे । सर्वोत्तम बळी ।
अभिमाने अशुचि । झालासे पोटी । एका जनार्दनी । नव्हेचि भेटी ।
भावार्थ:
विषाची परिक्षा घेऊनही जाणूनबुजून ते विष प्राशन करणे हे विचित्र कर्म आहे, त्यातून शेवटी कोणतेही सुख लाभणार नाही. अभिमानाची बाधा विषासारखी घातक असून मीच तेवढा पवित्र आणि बाकी सर्व जग अपवित्र असे समजून वागल्याने साधकाचे मन अशुध्द बनते आणि तो गुरु-उपदेशाला अपात्र ठरतो, असे एका जनार्दनी प्रतिपादन करतात.
५२
ममता ठेवुनी घरी-दारी । वाया का जाशी बाहेरी ।
आधी ममत्व सांडावे । पाठी अभिमाना खंडावे ।
ममता सांडी वाडे कोडे । मोक्ष-सुख सहजी घडे ।
एका जनार्दनी शरण । ममता टाकी निर्दाळून ।
भावार्थ:
साधक मोक्ष-मुक्तीसाठी प्रयत्न करीत असतांना मोह आणि ममता त्याला बंधनकारक होतात. सगे-सोयरे, नातेवाईक, पत्नी, पुत्र आणि कन्या यांच्या ममतेमध्ये तो मनाने गुंतून पडतो. तसेच घरदार, संपत्ती, सांसारिक सुख यांचा मोह असतो. एका जनार्दनी म्हणतात, हे ममत्व आधी सोडून नंतर अभिमानाचा त्याग केल्यास मोक्ष-सुख सहज साध्य होते.
५३
मोह ममता ही समूळ नाशावी । तेव्हाचि पावावी चित्तशुध्दी ।
चित्तशुध्दि झालिया । गुरुचरण-सेवा । तेणे ज्ञानठेवा । प्राप्त होय ।
एका जनार्दनी । प्राप्त झाल्या ज्ञान । ब्रह्म परिपूर्ण अनुभवेल ।
भावार्थ:
मोह-ममतेचे पूर्ण निरसन झाल्यानंतर साधकाचे चित्त शुद्ध होते. हे शुध्द झालेले चित्त गुरुसेवेत पूर्ण रममाण होते. त्यामुळे गुरुकृपा होऊन ज्ञानप्राप्ती होते. एका जनार्दनी सांगतात, गुरुकृपेने संपूर्ण ब्रह्मज्ञान होऊन ते प्रत्यक्ष अनुभवता येते.