अहिंसा-सत्यादी व्रते निष्ठेने पाळावी
संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे.
३८
श्रुती सांगती परमार्था । हिंसा न करावी सर्वथा ।
संकल्प नाशी तो संन्यासी । तेथे कल्पना कायसी ।
वेद बोले सर्वा ठायी । एकावाचुनी दुजे नाही ।
एका जनार्दनी बोधु । नाही तंव न कळे वेदु ।
भावार्थ:
श्रुतींचे वचन आहे परमार्थ साधु इच्छिणार्यांनी हिंसा करू नये. वेदांच्या वचनाप्रमाणे अहिंसा आणि सत्यवचन निष्ठेने पाळावे. शस्त्राचा आघात करून शरिराला घायाळ करणे आणि खोटे बोलून, अविश्वास दाखवून मन दुखावणे या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी किंवा समान आहेत. एका जनार्दनी सांगतात की श्रुतींचा किंवा वेदांचा जोपर्यंत खरा बोध होत नाही, तोवर त्यातील रहस्य कळणार नाही.
३९
ब्रह्मांडाची दोरी । हालवी जो एक्या करी ।
भूतीं परस्परे मैत्री । ती एके ठायी असती बरी ।
पंचप्राणांचे जे स्थान । तये कमळी अधिष्ठान ।
एका जनार्दनी सूत्रधारी । बाहुली नाचवी नाना परी ।
भावार्थ:
ब्रह्मांडरूपी पाळण्याची दोरी भगवंताच्या हातात असून तो एका कराने तो हालवित आहे. पंचप्राण हृदयांत स्थित असून कमळ हे त्याचे अधिष्ठान आहे. कठपुतळ्यांचा खेळ करून दाखवणारा हातामधील दोरीने बाहुली नाचवून नाना प्रकारचे नाच करून दाखवतो. एका जनार्दनी म्हणतात, तो ब्रह्मांडनायक सूत्रधारी असून सर्व प्राणिमात्रांकडून अनेक प्रकारच्या क्रिडा करवून घेतो. सर्व प्राणिमात्रांमध्ये परस्परांविषयी मैत्रीची भावना असावी.
४०
असत्याचा शब्द नको माझे वाचे ।
आणिक हो का ओझे भलतैसे ।
अणुमात्र रज डोळां न साहे ।
कैसा खुपताहे जन-दृष्टी ।
एका जनार्दन असत्याची वाणी ।
तोचि पाप-खाणी दुष्ट-बुध्दि ।
भावार्थ
ज्याप्रमाणे धुळीचा अगदी बारीक कण डोळ्यात गेला तरी तो डोळ्यात खुपतो, तसेच असत्य भाषण लोकांच्या डोळ्यांत सलत राहते. दुसर्या कोणत्याही पापाच्या ओझ्यापेक्षा असत्य वाणी हे मोठे पाप आहे. असत्य वाणी ही दुष्ट बुध्दी असून अनेक पापांची खाणी आहे. म्हणून एका जनार्दनी परमेश्वराला प्रार्थना करतात की, असत्य शब्द वाचेवाटे कधीही बोलले जाऊ नयेत.
४१
अर्थ नाही जयापाशी । असत्य स्पर्शेना तयासी ।
अर्थापाशी असत्य जाण । अर्थापाशी दंभ पूर्ण ।
अर्थापोटी नाही परमार्थ । अर्थापोटी स्वार्थ घडतसे ।
अर्थ नको माझे मनी । म्हणे एका जनार्दनी ।
भावार्थ:
या भजनात संत एकनाथ अर्थाने कसे अनर्थ घडतात याचे वर्णन करीत आहेत. पैसा मिळवण्यासाठी लबाडी, खोटेपणा यांचा आश्रय घेतला जातो. पैसा मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी दांभिकता व स्वार्थीपणाचा अवलंब करावा लागतो. अर्थामुळे साधक परमार्थाला पारखा होतो. आपल्या मनात पैशाविषयी विचार कधीही येऊ नयेत असे एका जनार्दनी म्हणतात.
४२
विषयाचे अभिलाषे सकळ भेद भासे ।
विषय-लेश तेथे मुक्ति केवि वसे ।
विषय तृष्णा सांडी मग तु साधन मांडी ।
वैराग्याची गोडी गुरूसी पुसे ।
स्त्री-पुरुष भावना भेद भासे ।
तेथें ब्रह्म-ज्ञाना गमन कैचें ।
कणुभरित जो डोळा शरीरासी दे दु:ख ।
अणुमात्र विषय तो संसार-दायक ।
एका जनार्दनी निज-ज्ञान शक्ति ।
निर्विषय मन ते अभेद भक्ति ।
भावार्थ:
संसारातील सर्व भेदाभेद केवळ इंद्रियांच्या विषय-तृष्णेने भासतात. जेथे विषयांची प्रिती आहे, तेथे मुक्ती राहू शकत नाही. जेथे मनात स्त्री-पुरुष हा भेद निर्माण होतो, तेथे ब्रह्मज्ञान प्रवेश करु शकत नाही. धुळीच्या एका कणाने भरलेला डोळा शरीराला दु:ख देतो, तसाच विषयाचा अत्यल्प संसर्गसुध्दा संसारबंधनास कारणीभूत ठरतो. यासाठी साधकाने विषयतृष्णेचा सर्वस्वी त्याग करून नंतरच साधनेला सुरवात करावी. या विवेकानंतरच वैराग्य येते हे ज्ञान गुरूंकडून प्राप्त होते. सद्गुरुंकडून मिळालेली ज्ञानशक्ति, विषयवासनांपासून मुक्त झालेले मन हेच अभेद भक्तिचे मुख्य लक्षण आहे असे एका जनार्दनी म्हणतात.
४३
हीचि दोनी पै साधने । साधके निरंतर साधणे ।
पर-द्रव्य पर-नारी । यांचा विटाळ मने धरी ।
नको आणिक उपाय । सेवी सद्गुरूचे पाय ।
म्हणे एका जनार्दनी । न लगे आन ते साधन ।
भावार्थ:
परक्याचे धन आणि परस्त्री या दोन गोष्टींचा मोह टाळण्याचा सतत अभ्यास व सद्गुरूंची निरंतर सेवा याशिवाय अन्य कोणत्याही साधनाची गरज नसल्याचे संत एकनाथमहाराज आवर्जून सांगतात.
४४
कनक कांता न ये चित्ता । तोचि परमार्थीं पुरता ।
हेचि एक सत्य सार । वाया व्युत्पत्तीचा भार ।
वाचा सत्यत्वे सोवळी । येर कविता ओवळी ।
जन तेचि जनार्दन । एका जनार्दनी भजन ।
भावार्थ:
परमार्थ हा शब्द कोणत्या मूळ धातूपासून निर्माण झाला, त्याचा अर्थ काय यांचा व्यर्थ उहापोह करण्यापेक्षा परमार्थी कसा ओळखावा हे जाणून घेणे अधिक उद्बोधक आहे. कनक (धनसंपत्ती) व कांता (स्त्री-सौख्य) याविषयी ज्याच्या चित्तात मोह निर्माण होत नाही तो परमार्थी समजावा असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सत्य हेच केवळ सार असून वाचेने सत्यवचन बोलणे हेच शुध्दपणाचे लक्षण असून जन हेच जनार्दनाचे रुप आहे, जनसेवा हीच ईश्वरसेवा होय.
४५
रस सेविण्यासाठी । भोगवी जन्माचिया कोटी ।
रसनेअधीन सर्वथा । रसनाद्वारे रस घेता ।
जव रसना नाही जिंकिली । तंव वाउगीच बोली ।
एका जनार्दनी शरण । रस रसना जनार्दन ।
भावार्थ:
जिवात्मा रसनेच्या अधीन राहून जिव्हेद्वारा सर्व रसांचा आस्वाद घेतो. या रसमयतेचे सेवन करण्यासाठी तो अनेकदा जन्म-मरणाच्या बंधनात अडकतो. ज्याचे जिभेवर बंधन नाही (बोलण्यात) त्याचे बोल पोकळ आहेत असे समजावे. जनार्दनस्वामी शरणागत संत एकनाथ म्हणतात, रस व रसना दोन्ही जनार्दनाचे रुप आहे.
४६
पक्षी अंगणी उतरती । ते का गुंतोनि राहती ।
तैसे असावे संसारी । जोवरी प्राचीनाची दोरी ।
वस्तीकर वस्ती आला । प्रात:काळी उठोनि गेला ।
शरण एका जनार्दन । ऐसे असतां भय कवण ।
भावार्थ:
दाणे टिपण्यासाठी पक्षी अंगणांत येतात, पण ते तेथे गुंतून राहात नाहित. संसारिकांनी संसारात असे राहावे जसा वाटसरू एका रात्रीच्या निवार्यासाठी धर्मशाळेत उतरतो आणि सकाळी निघून जातो. जनार्दनस्वामींना शरणागत असलेले संत एकनाथ म्हणतात, अशा प्रकारे निष्काम वृत्तिने जन्ममरणाचे भय संपते.
N/A
References : N/A
Last Updated : March 31, 2025

TOP