एकादशी महात्म्य - पद्मिनी एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.  


युधिष्ठिराने विचारले, ‘हे जनार्दना, अधिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी कोणती असते, तिचे नाव काय व पूजाविधी कसा असतो ? सर्व मला सांगा.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘अधिक मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘पद्मिनी’ असे नाव आहे. ही फार पुण्यकारक आहे. या दिवशी उपोषण केल्यास ही एकादशी त्याला पद्मनाभपुराला म्हणजेच वैकुंठाला नेते. या एकादशीची कीर्ती महापुण्यकारक व पापांचा नाश करणारी अशी झाली आहे. तिचे माहात्म्य वर्णन करण्यास चार मुखांचा ब्रह्मदेवही समर्थ नाही. पापराशींचा नाश करणारे आणि मुक्ती व ऐश्वर्य मिळवून देणारे पद्मिनी एकादशीचे हे व्रत आहे. याचा व्रतविधी पूर्वी मी नारदाला सांगितला होता.’
श्रीकृष्णाचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिराला फार आनंद झाला. त्याने श्रीकृष्णाला पद्मिनी एकादशीचा व्रतविधी विचारला. तो प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले,
‘धर्मराजा, मुनींनाही माहीत नसलेले पद्मिनी एकादशीचे व्रत कसे करावे ते मी सांगतो. ऐक तर.
दशमीच्या दिवसापासूनच पद्मिनी एकादशीच्या व्रताची सुरुवात करावी. दशमीच्या दिवशी काशाच्या भांडयात भोजन, मांस, मसुरा, चणे, कोद्रू, भाजी, मध व परान्न या आठ गोष्टी वर्ज्य कराव्या. त्या दशमीच्या दिवशी क्षार व मीठ नसलेले व हवन करण्याजोगे अन्न घ्यावे व ब्रह्मचर्यव्रत धारण करुन जमिनीवर झोपावे. एकादशीचा दिवस उजाडताना प्रातर्विधी आटोपून बारा चुळा भराव्या. शुध्द होऊन व्रताकरता तत्पर राहावे. सूर्योदय झाल्यावर व्रत करणार्‍याने उत्तम तीर्थावर स्नान करायला जावे. स्नानासाठी शुध्द गोमय, माती, दर्भ व आवळकाठीचे चूर्ण घ्यावे. नंतर विधिपूर्वक स्नान करावे.
मृत्तिका स्नान करताना पुढील प्रार्थना करावी. ‘हे मृत्तिके, शतबाहू श्रीकृष्णाने वराहरुप घेऊन तुझा उध्दार केला. हे मृत्तिके, तू ब्रह्मदेवाने दिलेली आहेस. काश्यप ऋषीने तुला अभिमंत्रित केले आहे. हे मृत्तिके, मला शुध्द कर. आणि हरीपूजनाला योग्य बनव.’ गोमय स्नान करताना पुढील प्रार्थना करावी, हे गोमया, तू सर्व प्रकारच्या औषधीपासून उत्पन्न झालेला आहेस. गाईच्या उदरात राहिल्यामुळे तू भूमी पवित्र करणारा झाला आहेस. तू मलाही पवित्र कर. आवळकाठीची पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी. ‘हे धात्री, तू ब्रह्मदेवाच्या जीवनापासून उत्पन्न झालेली आहेस. तू सर्व त्रिभुवनाला पवित्र करतेस. तुझ्या स्पर्शाने माझे अंग निर्मळ व पवित्र होऊ दे.’ अशी प्रार्थना करावी की, ‘हे शंख, चक्र, गदा धारण करणार्‍या देवाधिदेवा, तू जगाचा स्वामी आहेस. तुझ्या तीर्थात स्नान करण्याची मला आज्ञा दे.’ नंतर वरुणस्तुतीचे वेदमंत्र म्हणावे आणि आपण कोणत्याही जलाशयात स्नान करीत असलो तरी गंगा-यमुना-गोदावरी वगैरे महानद्या आणि तीर्थे यांचे स्मरण करीत विधियुक्त स्नान करावे.
राजा, नंतर तोंड, पाठ, हृदय, हात, मस्तक व शरीराचा खालचा भाग या क्रमाने अंग पुसावे आणि आणि पांढरे स्वच्छ धुतलेले आणि जीर्ण न झालेले पवित्र वस्त्र धारण करावे. नंतर विधिपूर्वक संध्या करुन ऋषी व पितर यांचे तर्पण करावे. नंतर विष्णुमंदिरात जाऊन विष्णूची पूजा करावी. एक मासा सुवर्णाची राधिकेसहित कृष्णाची प्रतिमा करावी, त्याचप्रमाणे पार्वतीसह शंकराची तशीच प्रतिमा करावी. व या प्रतिमांची विधिपूर्वक पूजा करावी. धान्य-राशीवर तांब्याचा किंवा मातीचा घडा ठेवावा, त्याला दिव्य गंध लावावे व उत्तम वस्त्रे वेढावी. कुंभाची स्थापना करुन त्यावर सोन्याचे, तांब्याचे किंवा चांदीचे पात्र ठेवावे. त्यावर देवाची विधियुक्त स्थापना करावी व पूजा करावी. गंध, धूप, चंदन, अगरु, कापूर वगैरेंनी सुवासित केलेल्या पाण्याने देवाला स्नान घालावे. कस्तुरी, केशर, नाना प्रकारची फुले, पांढरीशुभ्र कमळे, व त्या काळात होणारी उत्तम फुले परमेश्वराला अर्पण करावी. यथाशक्ति नाना प्रकारचे नैवेद्य देवाला अर्पण करावे. तुपाचा दिवा, धूप, कापुराची आरती वगैरेंनी विष्णू आणि शंकर यांची पूजा करावी.
देवापुढे भक्तिपूर्वक नृत्य-गायन करावे. एकादशीचे दिवशी, पतित व पापी यांना स्पर्श करु नये, त्यांच्याशी बोलूही नये. खोटे भाषण करु नये. खरे व पवित्र बोलावे. रजस्वलेला स्पर्श करुन नये. गुरु व ब्राह्मण यांची निंदा करु नये. एकादशीच्या दिवशी उपोषण करताना पाणीही पिऊ नये. ज्याला निर्जल उपोषण करण्याची शक्ती नसेल, त्याने फक्त जलपान करावे. ज्याला जलपान करुन राहण्याचे सामर्थ्य नसेल, त्याने फक्त दूध प्यावे, इतर काही खाऊ नये. रात्री भक्तिगीते गाऊन विष्णूपुढे जागरण करावे. रात्री प्रत्येक प्रहराला विष्णूची आणि शंकराची पूजा करावी. पहिल्या प्रहराच्या पूजेच्या वेळी नारळ अर्पण करावा. दुसर्‍या प्रहराच्या पूजेच्या वेळी बेलफळ अर्पण करावे. तिसर्‍या प्रहराच्या पूजेच्या वेळी महाळुंग अर्पण करावे. चौथ्या प्रहराच्या पूजेच्या वेळी सुपारी व नारिंग यांनी अर्घ्य द्यावा. पहिल्या प्रहराच्या जागरणामुळे अग्निष्टोम यज्ञाचे पुण्य मिळते. दुसर्‍या प्रहराच्या जागरणापासून वाजपेय यज्ञाचे पुण्य़ मिळते. तिसर्‍या प्रहराच्या जागरणापासून अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. चवथ्या प्रहराच्या जागरणापासून राजसूय यज्ञाचे पुण्य मिळते. हया एकादशीच्या जागरणाइतके दुसरे श्रेष्ठ पुण्य नाही. दुसर्‍या श्रेष्ठ विद्या नाहीत, याहून श्रेष्ठ यज्ञ नाही. किंवा याहून श्रेष्ठ तपश्चर्याही नाही. या एकादशीचे व्रत करणार्‍याला पृथ्वीवरील सर्व पुण्यतीर्थांत स्नान केल्याचे पुण्य मिळते. तसेच सर्व पुण्यक्षेत्रे पाहिल्याचे पुण्य मिळते. याप्रमाणे सूर्योदयापर्यंत जागरण करावे. सूर्योदय झाल्यावर पुण्यकारक तीर्थात स्नान करावे. घरी आल्यावर विधिपूर्वक देवाची पूजा करावी, ब्राह्मण-भोजन घालावे, स्थापन केलेला कुंभ व विष्णूची प्रतिमा यांची विधिपूर्वक पूजा करावी. व ते सर्व ब्राह्मणाला अर्पण करावे. या सर्व विधीप्रमाणे जो मनुष्य हे मुक्ती देणारे व्रत इहलोकी करतो, त्याचा जन्म सफल होतो.
श्रीकृष्ण म्हणाले,
‘धर्मराजा, तू विचारल्यावरुन पद्मिनी एकादशीचे माहात्म्य मी तुला सांगितले आहे. राजा, पद्मिनी एकादशीचे व्रत केल्याने सर्व व्रते केल्याचे फळ मिळत असते. धर्मराजा, या पद्मिनी एकादशीच्या बाबतीत पूर्वी पुलस्त्य ऋषीने नारदाला एक सविस्तर कथा सांगितली होती. ती सुंदर कथा मी तुला आता सांगतो, ऐक तर.
पूर्वी कार्तवीर्याने आपल्या कारागृहात रावणाला अडकविले होते. त्यावेळी पुलस्त्य ऋषीने कार्तवीर्य राजाची याचना करुन रावणाची सुटका केली. ही आश्चर्यकारक गोष्ट ऐकून त्या तेजस्वी मुनिश्रेष्ठ पुलस्त्य ऋषीला नारदाने भक्तिभावाने विचारले, ‘हे मुनिश्रेष्ठा, दशमुख रावणाने इंद्र वगैरे सर्व देव जिंकले होते. अशा रणविशारद रावणाला कार्तवीर्य राजाने कसे जिंकले ?’
नारदाचे हे बोलणे ऐकून पुलस्त्य ऋषी म्हणाले,
‘वत्सा नारदा, कार्तवीर्य राजाचा जन्म कसा झाला, ते मी तुला सांगतो. ऐक तर. नारदा, पूर्वी त्रेतायुगात माहिष्मती नावाच्या नगरीत कृतवीर्य नावाचा बलाढ्य राजा होता. तो हैहय राजाच्या कुळातील होता. या राजाला प्राणाहून प्रिय असणार्‍या एक हजार बायका होत्या; पण त्या हजार स्त्रियांपैकी एकीलाही राज्यभार धारण करील असा एकही पुत्र झाला नाही. त्याने पुत्र व्हावा म्हणून देवांना व पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक यज्ञ केले. महान सिध्दांची पूजा केली. त्यांनी सांगितलेली अनेक प्रकारची व्रते केली, उपवास केले, पण त्याला पुत्र झाला नाही. ज्याप्रमाणे भूक लागलेल्या मनुष्याला अन्नाखेरीज इतर उपभोग सुख देत नाहीत, त्याप्रमाणे त्या राजाला पुत्राशिवाय राज्यही सुखाचे वाटेना. त्या राजाने मनात विचार केला की, ‘तपश्चर्या केल्यानेच मनातील इच्छा सिध्दीला जात असतात.’ असा विचार करुन त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. त्या धर्मावर निष्ठा असलेल्या राजाने वल्कले परिधान केली, जटा धारण केल्या. आता त्याने आपले राज्य उत्तम मंत्र्यांच्या हाती सोपवले. आणि तो तपश्चर्या करायला घरातून निघून गेला. राजा तपश्चर्या करायला जात आहे, हे पाहून त्याच्या राण्यांपैकी मुख्य राणी पद्मिनी आपला पती कृतवीर्य याच्याबरोबर गंधमादन पर्वतावर गेली. ती हरिश्चंद्र राजाची कन्या होती. तिने सर्व अलंकारांचा त्याग केला. आणि एकच वस्त्र नेसून ती पतीबरोबर गेली. कृतवीर्यं राजा गंधमादन पर्वतावर गदाधर देवाचे ध्यान करीत तपश्चर्यां करु लागला. तप करताना दहा हजार वर्षे गेली. तरीही त्याला पुत्र झाला नाही. आपला पती कृतवीर्य राजा तपश्चर्येने कृश झाला आहे, त्याची फक्त हाडे व स्नायू राहिले आहेत, हे त्याच्या बायकोने-पद्मिनीने-पाहिले. म्हणून तिने सर्व स्त्रियांत श्रेष्ठ व महापतिव्रता असलेल्या अनुसूयेला नम्र होऊन विचारले, ‘हे पतिव्रते अनुसूये, माझा पती कृतवीर्य तप करीत आहे. त्याला दहा हजार वर्षे झाली, तरीही कष्टांचा नाश करणारा म्हणून प्रसिध्द असलेला भगवान विष्णू अजून आमच्यावर प्रसन्न होत नाही. हे महाभाग्यवती अनुसूये, भगवान माझ्यावर निरंतर प्रसन्न होण्यासाठी मी कोणते व्रत करु ? मला असे व्रत सांग की, ज्यामुळे चक्रवर्ती व बलिष्ठ पुत्र होईल.’
कमळासारखे नेत्र असलेल्या पद्मिनीचे हे बोलणे ऐकून अनुसूयेने तिला आनंदाने व्रत सांगितले. ती म्हणाली, ‘हे सुंदरी पद्मिनी, बारा महिन्यांपेक्षा वेगळा असा अधिक मास आला आहे, हा अधिक मास बत्तीस महिन्यांनी एकदा येतो व त्यात दोन एकादशा येतात. त्यातील पद्मिनी नावाची ही एकादशी फार श्रेष्ठ आहे. या एकादशीचे व्रत विधिपूर्वक करावे. उपोषण करावे व जागरण करावे. यामुळे भगवान तत्काळ प्रसन्न होतो, व पुत्र देतो.’
‘धर्मजारा, कर्दमाची कन्या अनुसूया हिने पद्मिनी एकादशीचा सर्व व्रतविधी त्या पद्मिनीला सांगितला. त्यानंतर त्या पद्मिनीने अनुसूयेने सांगितलेल्या व्रतविधीप्रमाणे एकादशीचे व्रत केले. एकादशीच्या दिवशी तिने पाणीही न पिता उपोषण केले. रात्री गीत-नृत्य वगैरे कार्यक्रम करुन भगवंतापुढे जागरण केले. व्रत पूर्ण होताच भगवान विष्णू लागली प्रसन्न झाले. गरुडावर बसून ते पद्मिनीकडे आले आणि म्हणाले, ‘हे शोभने पद्मिनी, तुला हवा असलेला वर मागून घे.’ ते ऐकून त्या सुंदर हास्य करणार्‍या पद्मिनीने भगवंताची स्तुती केली, व ती म्हणाली, ‘जो काय वर द्यायचा तो माझ्या पतीला द्या.’
हे ऐकून भगवान जनार्दन म्हणाले, ‘मला अधिक मासाइतका दुसरा कोणताही महिना प्रिय नाही. हे शोभने पद्मिनी, तू या महिन्याच्या एकादशीचे उपोषण विधिपूर्वक केले आहेस. हे कल्याणी, या व्रताने तू मला प्रसन्न करुन घेतले आहेस. तुझ्या पतीला इच्छा असेल तसा वर मी देईन.’
पद्मिनीला असे सांगून भगवान विष्णू कृतवीर्य राजाला म्हणाले, ‘राजेंद्रा, तुझ्या मनात असेल त्यानुसार इच्छित वर मागून घे. कारण तुझ्या प्रिय पत्नीने तुझी तपश्चर्या फलाला यावी म्हणून पद्मिनी एकादशीचे उपोषण करुन मला संतुष्ट केले आहे.’ भगवान विष्णूचे हे बोलणे ऐकून कृतवीर्य राजाला आनंद झाला. त्याने महापराक्रमी पुत्र मागितला. सर्वांनी या पुत्रापुढे नम्र झाले पाहिजे अशी त्याची इच्छा होती. वर मागताना तो म्हणाला, ‘हे मधुसूदना जगन्नाथा, तो माझा पुत्र तुझ्याशिवाय इतर देव, मनुष्य, नाग, दैत्य, गंधर्व, राक्षस वगैरेंकडून जिंकला जाऊ नये.’ त्याची ही मागणी ऐकून भगवान विष्णू ‘तसेच होईल,’ असे म्हणाले व अंतर्धान पावले. कृतवीर्य राजाचे मन प्रसन्न झाले. त्याला आनंद झाला. तो कृतकृत्य झाला. आता तो माहिष्मती नगरात परतला. नगरातील स्त्री-पुरुषांची मने आनंदाने भरुन गेली होती.
थोडयाच दिवसांत कृतवीर्य राजाला राणी पद्मिनीकडून कार्तवीर्य नावाचा पुत्र झाला. तो महाबलाढय होता. त्याच्या बरोबरीचा मनुष्य त्रैलोक्यात नव्हता. म्हणून त्याला दशमुख रावणाचा पराभव करता आला. गदा धारण करणार्‍या चक्रपाणी भगवान नारायणाशिवाय कार्तवीर्य राजाला जिंकू शकेल असा त्रैलोक्यातही कुणी नव्हता. म्हणून हे नारदा, कार्तवीर्य राजाने रावणाला जिंकले याविषयी तुला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. अधिक महिन्याच्या प्रभावामुळे आणि त्या महिन्यातील पद्मिनी एकादशीचे उपोषण केल्यामुळे देवाधिदेव विष्णूने महाबलाढय कार्तवीर्य पुत्र दिला होता.’ पुलस्त्य ऋषीने नारदाला असे सांगितले आणि तो ऋषी प्रसन्न चित्ताने निघून गेला.
श्रीकृष्ण म्हणाले,
‘धर्मराजा तू विचारल्यावरुन अधिक महिन्यातील शुक्ल एकादशीचे हे उत्तम व्रत मी तुला सांगितले आहे. जे लोक हे पद्मिनी एकादशीचे व्रत करतील, ते सर्वजण हरीपदाला जातील. हे धर्मराजा, तुला तुझ्या मनातील काही इच्छा पूर्ण करायची असेल तर तू हे व्रत कर.’
श्रीकृष्णाचे हे बोलणे ऐकून धर्मराजाला फार आनंद झाला त्याने आपल्या भावांसह एकादशीचे हे व्रत विधिपूर्वक केले.
सुत म्हणतात, ‘हे ब्राह्मणा, तू विचारल्यावरुन मी अधिक महिन्यातील पद्मिनी एकादशीचे माहात्म्य तुला सांगितले आहे. हे माहात्म्य पुण्यकारक, पवित्र, आणि पापनाशक आहे. आता तुला आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे ? जे लोक अधिक महिन्यातील शुक्ल एकादशीचे शुक्ल एकादशीचे व्रत भक्तिभावाने करुन उपोषण करतील ते या पृथ्वीवर धन्य होतील. जे लोक या एकादशीचा समग्र विधी ऐकतील, त्यांनाही पुण्यातील काही भाग मिळेल. जे लोक हे एकादशी माहात्म्य संपूर्ण वाचतील किंवा ऐकतील ते सर्वजण वैकुंठलोकाला जातील.

॥ याप्रमाणे अधिक महिन्यातील
पद्मिनी एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP