एकादशी महात्म्य - उत्पत्ति एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.


महाराष्ट्रात अमावास्या हा महिन्याचा शेवट असतो, तर उत्तर हिंदुस्थानात पौर्णिमा शेवटचा दिवस असून कृष्णपक्षाने महिन्याची सुरुवात होते. म्हणजे आपली कार्तिक वद्य प्रतिपदा ही उत्तर हिंदुस्थानात मार्गशीर्ष-वद्य-१ होते व त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची सुरवात होते. त्यामुळे पोथीतील एकादशींची नावे महाराष्ट्रातील पंचांगाप्रमाणे जुळवून घेतली आहेत. त्यामुळे घोटाळा होणार नाही.)
श्री गणपतीला वंदन असो !
सूत ऋषी म्हणाले,
ऋषींनो, प्राचीन काळी श्रीकृष्णाने एकादशीचे व्रत धर्मराजाला सांगितले. व्रताचे माहात्म्य व विधी सुध्दा सांगितला. ते सर्व ऐका. एकादशीचे व्रत सुरु झाले कसे, व या व्रताचे माहात्म्य आहे तरी काय? या व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते. ऐका तर !

धर्मराजाने विचारले,
‘श्रीकृष्णा, जनार्दना, एकादशीला उपवास केला किंवा एकदाच (नक्त) केले तर त्याचे कोणते पुण्य लाभते ? हे व्रत कसे करायचे ? सर्व काही सांगावे.’
श्रीकृष्ण म्हणाले,
कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीच्या शुभ दिवशी उपोषण करावे. आधी दशमी तिथीला सकाळी दंतधावन करुन एकदाच जेवावे. दिवसाच्या आठव्या भागात भगवान दिवाकराचे-सूर्याचे तेज मंद होऊ लागले की भोजन करावे. यालाच नक्त-भोजन म्हणतात. रात्री भोजन करणे हे नक्त-भोजन नव्हे. एकादशीच्या दिवशी सकाळी उठून उपोषणव्रताचा संकल्प करावा, निश्चय करावा. मध्यान्ही नदीत, तलावात, किंवा विहिरीत स्नान करावे. नदीतील स्नान उत्तम, तलावातील मध्यम व विहिरीतील स्नान कनिष्ठ असते. नदी, तलाव जवळ नसतील तरच विहिरीवर स्नान करावे. स्नानाचे वेळी अंगाला थोडी माती लावावी. व मनात ध्यान करावे की, ‘हे पृथ्वी, मी तुझी माती मस्तकावर लावतो कारण ही माती अश्वांनी व रथांनी तुडवली आहे व विष्णूची पाऊले या मातीला अनेक अवतारात लागली आहेत ! म्हणून पृथ्वीमाते, तू माझे पाप धुऊन टाक. मला परमगती मिळू दे !’ व्रत करणाराने असे मृत्तिकास्नान करावे. एकादशी-व्रत करणाराने, पतित, पाखंडी, चोर, खोटे बोलणारे, देवाब्राह्मणांची व देवांची निंदा करणारे, दारुडे, दुराचारी, यांच्याशी भाषणही करु नये. दुसर्‍याचे द्रव्य घेणारे किंवा परमेश्वराचे द्रव्य पळवणारे, वगैरे सर्व दुराचार्‍यांशी बोलू नये. ते दिसलेच तर तो दोष घालवण्यासाठी सूर्याकडे पहावे. नंतर गोविंदाची पूजा करुन नैवेद्य अर्पण करावा. भक्तिभावाने देवापुढे दिवा लावावा. या दिवशी झोप व स्त्रीसंग वर्ज्य करावा. भक्तिगीते गावी, शास्त्रचर्चा करावी व त्यातच दिवस व रात्र घालवावी. रात्री भक्तिभावाने भरलेल्या मनाने जागरण करावे व ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांची क्षमा मागावी. राजा, धर्मात तत्पर असलेल्याने शुक्ल व कृष्ण पक्षांतील एकादशांमध्ये फरक करु नये.
याप्रमाणे जो एकादशी करतो त्याला काय फळ मिळते ते ऐक. शंखद्वार-तीर्थांत स्नान करुन गदाधराचे दर्शन घेऊन जे पुण्य मिळते ते एकादशीव्रतामुळे मिळणार्‍या पुण्याच्या एक सोळांश भागापेक्षा कमीच असते ! संक्रातीला दान दिल्याने जे पुण्य मिळते त्याच्या चार-लक्षपट पुण्य एकादशीव्रताने मिळते. व्यतिपात-योगावर दिलेलेया दानाच्या पुण्यापेक्षा हे एकादशीचे पुण्य लक्षपट असते. सूर्यग्रहण व चंद्रग्रहण लागले असता कुरुक्षेत्रात स्नान करुन जे पुण्य मिळते तेच या एकादशीच्या उपोषणाने प्राप्त होते. अश्वमेध यज्ञ केल्यामुळे जे फल मिळते त्याच्या शंभरपट फल एकादशीव्रताने मिळते. ज्याच्या घरी दररोज एक लक्ष तपस्वी ब्राह्मणांना साठ हजार वर्षपर्यंत भोजन दिले जाते, त्याला मिळणारे पुण्य आणि एकादशीच्या उपवासाचे पुण्यफल सारखेच असते ! वेदविद्यापारंगत ब्राह्मणांना एक हजार गाई दान दिल्याने जे पुण्य मिळते त्याच्या दसपट पुण्य एकादशीच्या व्रताने मिळते. ज्याच्या घरी रोज दहा ब्राह्मण जेवतात, त्याला मिळणार्‍या पुण्यापेक्षा दहापट पुण्य एका ब्रह्मचार्‍याला भोजन दिल्यामुळे मिळते. व त्याच्याही दहापट पुण्य विद्यादान केल्यामुळे मिळते. विद्यादानाच्या पुण्यापेक्षा दहा पट पुण्य भुकेल्या माणसाला अन्नदान केल्यामुळे मिळते. अन्नदानाच्या दानाची बरोबरी दुसरे कोणतेही दान करु शकत नाही. अशा अन्नदानामुळे स्वर्गातील सर्व पितर व देव तृप्त होतात. असे अन्नदानाचे पुण्य मिळणे देवांनाही दुर्लभ असते. पण हे सर्व पुण्य एकादशीव्रताच्या पुण्य़ाची बरोबरी करु शक्त नाही. पूर्ण उपोषण न करता एकदाच संध्याकाळी फराळ घेतल्यास व्रताचे अर्धे फळ मिळते. व एक वेळ आहार घेतल्यास एक चतुर्थांश फळ मिळते. संपूर्ण उपवास, नक्त म्हणजे संध्याकाळी फराळ, किंवा एक वेळ जेवण या तिघांपैकी एकतरी व्रत एकादशीला करावेच. दान, यमनियम, यज्ञ, या सर्वांची आपल्या श्रेष्ठत्वाविषयी गर्जना एकादशी व्रतापुढे किरकोळ ठरते. जे संसारातील विविध तापांना भितात, त्यांनी एकादशीचे उपोषण अवश्य करावे. ‘धर्मराजा, तू विचारतोस म्हणून सांगतो की, एकादशीच्या दिवशी जेवण घेऊ नये, तसेच नखे बुचकळलेले पाणी पिऊ नये. उपासासाठी सुरण किंवा कोनफळ खाऊ नये. तुला सांगितलेले हे एकादशीचे व्रत सर्व व्रतांत उत्तम आहे. हजार यज्ञ केल्यानेही या व्रताची बरोबरी होत नाही.

धर्मराजाने विचारले,
‘श्रीकृष्णा, एकादशी ही तिथी पुण्यकारक आहे, असे तू म्हणतोस, मग ही एकादशी तिथी इतर तिच्यांपेक्षा सर्वांत पवित्र कशी झाली ते सांग.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘पूर्वी कृतयुगात मुरु नावाचा दानव होता. तो अद्भुत व क्रूर होता. सर्व देवांना त्याची फार भीती वाटत होती. त्याने सर्व देवांचा आध्य-देव इंद्र जिंकला. तसेच आदित्य, वसू, ब्रह्मदेव, वायू, अग्नी, या सर्व देवांनाही त्याने जिंकले. हे पांडवा, त्या उग्र दैत्याने सर्व देवता जिंकल्या. तेव्हा इंद्राने शंकराला वृत्तान्त सांगून विचारले की, आम्ही सर्व देव स्वर्गातून भ्रष्ट होऊन पृथ्वीवर भटकत आहोत. आमचे पुढे काय होणार ? या स्थितीतून सुटण्याचा उपाय सांग’.
शंकर म्हणाले,
‘हे देवातील श्रेष्ठ इंद्रा, ज्याच्या ध्वजावर गरुड आहे त्या जगन्नाथाला म्हणजे विष्णूला तू शरण जा. तो शरण आलेल्यांचे रक्षण करतो. धनंजया, शंकराचे हे बोलणे ऐकून तो मोठ्या मनाचा इंद्र इतर सर्व देवांसह जगन्नाथ जेथे झोपला होता तेथे गेला. क्षीरसागरात निद्रेत असलेल्या त्या जगाच्या स्वामीला पाहून इंद्राने हात जोडले. आणि तो विष्णूची पुढीलप्रमाणे स्तुती करु लागला, ‘तू सर्व देवांचा देव आहेस. सर्व देव तुला नमस्कार करता. माझा तुला नमस्कार. हे कमलनेत्रा, मधु-दैत्य व इतर दैत्यांचा संहार करणार्‍या, आमचे रक्षण कर. दैत्याला भिऊन मी व माझ्या बरोबर आलेले सर्व देव, हे जगन्नाथा, तुला शरण आलो आहोत. या सृष्टीचा निर्माता तूच आहेस. सर्व विश्वाला तू मातेप्रमाणे आहेस व पतीप्रमाणे आहेस. हे विश्व तूच उत्पन्न करतोस. त्याचे रक्षण व संहारही तूच करतोस ! सर्व देवांना तुझीच मदत हवी आहे. हे प्रभो, तूच त्यांचे सांत्वन करु शकतोस. ही पृथ्वी व आकाश तुझीच रुपे आहेत. तूच विश्वावर उपकार करणारा, आहेस. तू त्रैलोक्यप्रतिपालक आहेस. एक ब्रह्मदेव आहेस. सूर्य, चंद्र, अग्नी ही तुझीच रुपे आहेत. अग्नीच्या रुपाने तूच देवांना होमांचा हविभगि पोचवतोस. यज्ञात हवन करण्याचे द्रव्य, हवनाचे मंत्र, तंत्र, ऋत्विज, जप, यज्ञाचा यजमान, यज्ञ आणि यज्ञफल घेणारा परमेश्वर हे सर्व तूच आहेस ! या चर आणि अचर सृष्टीत, प्रत्येक अणू-रेणूत तूच भरुन राहिला आहेस. हे देवादिदेवा, तू शरणागतावर प्रेम करणारा आहेस. हे महायोग्या, आम्हा भ्यालेल्या देवांचे रक्षण कर व आम्हाला आश्रय दे. हे जगन्नाथा, दानवाने जिंललेले आम्ही सर्व देव स्वर्गातून भ्रष्ट होऊन पृथ्वीवर भटकत आहोत. आम्हाला तार.’
इंद्राची अशी प्रार्थना ऐकून श्री भगवान विष्णू म्हणाले,
‘सर्व देवांना जिंकणारा हा महामायावी दैत्य आहे तरी कोण ? त्याचे नाव काय ? तो राहतो कुठे ? त्याचे सामर्थ्य किती आहे ? व त्याला आश्रय कोणाचा आहे ? हे इंद्रा, निर्भय होऊन हे सर्व मला सांग ?’

इंद्र म्हणाला,
भक्तावर अनुग्रह करणार्‍या हे देवाधिदेवा भगवंता, पूर्वी ब्रह्म वंशात उत्पन्न झालेला नाडीजंघ नावाचा दैत्य होता. त्या मुरु नावाचा अतिप्रसिध्द पुत्र आहे. त्याची चंद्रवती नावाची प्रचंड नगरी आहे. तो महापराक्रमी व दुष्टबुध्दी दैत्य त्या नगरीत राहतो. त्याने सर्व विश्व जिंकले आहे. आणि सर्व देवांना स्वर्गातून बाहेर हाकलून स्वत:च्या ताब्यात ठेवले आहे. इंद्र, अग्नी, यम, वायू, ईश, चंद्र, निऋती, आणि वरुण या अष्ट दिक्पालांचे काम तो स्वत:च करीत आहे. तो सूर्य होऊन जगात तेज पसरवीत आहे. तो स्वत:च पर्जन्य झाला आहे. यामुळे सर्व देवांना तो अजिंक्य झाला आहे. भगवंता, त्या दानवाला जिंकून घे, आणि देवांना जय मिळवून दे.’
इंद्राचे हे बोलणे ऐकून जनार्दन रागावले आणि इंद्राला म्हणाले,
‘हे देवेन्द्रा, त्या महाबलाढय शत्रूला मी ठार करीन. सर्व महापराक्रमी देवांनी माझ्या बरोबर चंद्रवती नगरीकडे यावे.’ याप्रमाणे आज्ञा होताच भगवंताला पुढे करुन सर्व देव चंद्रवती नगरीकडे निघाले. त्या नगरीत असंख्य दैत्य दिव्य अस्त्रांनी सज्ज होऊन गर्जना करीत त्या दैत्यासह उभे आहेत, असे देवांनी पाहिले. त्या दैत्यांनी युध्द सुरु करुन अनेक देव मारणे सुरु केले, तेव्हा सर्व देव युध्द सोडून दाही दिशांत पळून गेले ! भगवान हृषिकेश संग्रामात उपस्थित आहेत हे पाहून ते रागावलेले दैत्य हातात नाना प्रकारची शस्त्रे घेऊन भगवंतावर धावून आले. सर्व देव पळाले आहेत असे पाहून शंख, चक्र, गदा धारण करणार्‍या भगवंताने दैत्यांवर तीव्र विषसर्पासारखे बाण सोडले. व त्यांची शरीरे वेधली. अशा प्रकारे भगवंताने बाण मारलेले शेकडो दानव मरण पावले. मात्र त्यांपैकी मुरु दानव एकटाच पुन:पुन: युध्द करीतच राहिला. भगवान हृषिकेश त्याच्यावर जी जी अस्त्रे सोडीत ती सर्व त्याच्या तेजाने वेगहीन होऊन त्याच्या अंगावर फुलाप्रमाणे हलकी होऊन पडू लागली ! याप्रमाणे शस्त्रास्त्रे मारुनही तो दैत्य जिंकणे शक्य होईना. तेव्हा रागावलेल्या भगवंताने आपल्या पुष्ट व गोल बाहूंनी त्या दैत्याशी बाहुयुध्द सुरु केले. हे बाहुयुध्द देवांची एक हजार वर्षे चालले. त्यामुळे भगवंत दमून गेले आणि बदरिकाश्रमाकडे निघून गेले. तेथे हेमवती नावाची फारच सुंदर गुहा होती. तेथे झोप घ्यावी म्हणून जगाच्या स्वामीने-विष्णूने-त्या गुहेत प्रवेश केला. ‘हे धर्मराजा, त्या गुहेला एकच द्वार होते, व तिचा विस्तार बारा योजने होता. (एक योजन=चार कोस) हे पांडुपुत्रा, युध्द करुन मी दमलो होतो. आणि मला दैत्याची भीतीही वाटत होती. म्हणून मी तेथे जाऊन झोपलो. माझ्या पाठीमागे लागलेला तो दानव गुहेत आला. मी झोपलो आहे असे पाहून त्याने मनात विचार केला की ‘दानवांचा नाश करणार्‍य या विष्णूला मारावे.’ पण त्या दुष्टबुध्दी दानवाच्या मनातील हा विचार जाणून माझ्या शरीरातून एक महातेजस्वी कन्या उत्पन्न झाली. तिच्या हातात दिव्य व तेजस्वी आयुधे होती. हे पांडुपुत्रा, त्या श्रेष्ठ दानवाने ही देवी युध्दाला तयार आहे, हे पाहिले. देवीने त्याला युध्दासाठी पुकारले. त्यांचे युध्द सुरु झाले. युध्द करणार्‍या देवीला पाहून त्या दैत्याला फार आश्चर्य वाटले. त्याच्या मनात आले, अतिशय उग्र व वज्रासारख्या आयुधांनी युध्द करणारी ही भयंकर देवी कुणी उत्पन्न केली असावी बरे ?’ असे मनात येऊन त्याने त्या कन्येबरोबर युध्द चालूच ठेवले. त्या युध्दात त्या महादेवीने त्या दैत्याची सर्व आयुधे तोडून टाकली व त्याचा रथही क्षणातच मोडला. तेव्हा तो दैत्य बाहुयुध्द करण्यासाठी वेगाने धावून आला. त्यावेळी हाताच्या तळव्याने देवीने त्याच्या हृदयावर प्रहार केला. तेव्हा तो दैत्य जमिनीवर पडला. पण तो पुन: उठला आणि त्या कन्येला मारण्याच्या आकांक्षेने पुन: तिच्या अंगावर धावून आला. त्यावेळी देवीने क्रोधाने प्रहार करुन दैत्याचे मस्तक तोडले. तो दैत्य जमिनीवर पडला. व लागलीच त्याचे शीर जळून गेले. नंतर दैत्य यमलोकात गेला. देवांशी वैर करणारे उरलेले दैत्य भीतीने दीन होऊन पाताळात पळून गेले. भगवंत निद्रेतून जागे झाले तेव्हा त्यांना समोरच मरुन पडलेला असुर दिसला आणि एक कन्या समोरच हात जोडून व विनयाने नम्र होऊन उभी आहे असे दिसले. ते पाहून आश्चर्याने विस्फारलेल्या नेत्रांनी त्या जगाच्या स्वामीने विचारले, ‘हा दुष्ट मनाचा दानव युध्दात कोणी मारला ? या दानवाने सर्व देव, गंधर्व, मरुद्गण, नाग, आठ दिक्पाल या सर्वांना सहज जिंकले होते. मी युध्दात दमल्यावर त्याच्याच भीतीने पळून या गुहेत येऊन झोपलो होतो. कोणी करुणा येऊन माझे रक्षण केले आहे ?’
ती कन्या म्हणाली,
‘हे प्रभो, मी आपल्याच अंशापासून उत्पन्न झाले असून मीच या दैत्याला मारले आहे. भगवान झोपले आहेत हे पाहून हा दैत्य तुम्हाला मारण्याचा विचार करीत होता. हा दैत्य त्रैलोक्याला काट्याप्रमाणे सलतो हे जाणून मी त्या दुरात्म्याला मारले व सर्व देवांना निर्भय केले आहे. सर्व शत्रूंना भय निर्माण करणारी ही मी तुमचीच महाशक्ती आहे. हे प्रभो, त्रिलोक्याचे रक्षण करण्याकरिता लोकांना त्रास देणारा दानव मी मारला यात कोणते आश्चर्य आहे ?’
भगवान म्हणाले,
‘हे पुण्यशीले, तू या श्रेष्ठ दानवाला मारलेस म्हणून मी संतुष्ट झालो आहे. देवांना संतोष वाटत आहे व सर्वत्र आनंदीआनंद झाला आहे. हे व्रत धारण करणारे, पुण्यशीले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तरी वर मागून घे. देवांनाही दुर्लभ असा वर मी तुला देईन हे नक्की !’
ती कन्या म्हणाली, ‘हे देवाधिदेवा, जर तू संतुष्ट असलास तर मला पुढीलप्रमाणे वर दे. (‘तू वचन दे, की) माझ्या या जन्मदिवशी उपवास करणार्‍या मनुष्याला मी महापातकापासून तारीन. संपूर्ण उपवास करणार्‍यापेक्षा अर्धे पुण्य नक्त करणार्‍याला, व त्याच्या अर्धे एकवेळ भोजन करणार्‍याला मिळावे. जो जितेन्द्रिय या दिवशी भक्तिभावाने माझे व्रत करील, त्याला तुमच्या कृपाप्रसादाने शंभर कल्पकोटी वर्षे वैष्णवलोक प्राप्त होवो व तेथे त्याला सर्व सुखोपभोग मिळोत. जो या दिवशी उपवास, नक्त किंवा एकवेळ भोजन करील त्याला, भगवंता, तू धर्म, संपत्ती, व मोक्ष द्यावास.
श्री भगवान म्हणाले,
‘हे कल्याणी, तू जे म्हणालीस ते सर्व होईलच. जे तुझे भक्त होतील ते माझेच भक्त असतील. या तिन्ही लोकात ते प्रसिध्द होतील व शेवटी ते माझ्याकडे येतील. तू माझीच शक्ती असून एकादशी तिथीला उत्पन्न झालीस म्ह्णून तुझे ‘एकादशी’ हेच नाव प्रसिध्द होईल. एकादशी पाळणारांची सर्व पापे मी जाळून टाकीन व त्यांना शाश्वत पद-वैकुंठस्थान-देईन. तृतीया, अष्टमी, नवमी, चतुर्दशी व विशेष करुन एकादशी या तिथी मला फार प्रिय आहेत. या तिथींना व्रते करणार्‍यांना सर्व तिथींहून अधिक पुण्य, सर्व दानांना मिळणार्‍या फळांपेक्षा अधिक फळ व सर्व व्रतांपेक्षा जास्त पुण्य प्राप्त होईल, हे अगदी सत्य आहे असे मी तुला सांगतो.’ एकादशी देवीला असा वर देऊन भगवान् तेथेच अंतर्धान पावले. वर मिळाल्याने एकादशी संतुष्ट झाली. हे अर्जुना, एकादशीचे व्रत जो कोणी करील, त्याच्या शत्रूंचा मी नाश करीन व त्याला परम गती मिळवून देईन. जे (मनुष्याशिवायही) अन्य हे एकादशीचे महाव्रत करतील त्यांची विघ्ने मी दूर करीन व त्यांना सर्वसिध्दी प्राप्त होतील. धर्मराजा, एकादशी कशी उत्पन्न झाली हे मी सांगितले आहे. ही एकादशी नित्य पाळली तर ती सर्व पापांचा क्षय करते. सर्व पापे नष्ट करणारी व महापुण्ये मिळवून देणारी ही एकच एकादशी आहे. सर्व लोकांना सर्व सिध्दी मिळवून देण्यासाठी ही एकादशी उदय पावली आहे. एकादशी व्रतात शुक्ल किंवा कृष्ण-एकादशीत फरक करु नये. दोन्ही एकादशा पाळाव्या. त्या दोन्ही एकादशा सारखेच फळ देतात. गाय काळी असो किंवा पांढरी, दोघींना दूध सारखेच असते. तसेच या दोन एकादशींचे फळ असते. हे अर्जुना, जे लोक भेदबुध्दी न बाळगता एकादशीचे व्रत करतात ते शेवटी जेथे गरुडध्वज भगवंत असतात त्या परमस्थानाला म्हणजे वैकुंठाला जातात. जे मानव विष्णूच्या भक्तीत मग्न आहेत ते धन्य आहेत.
जो एकादशीचे माहात्म्य नित्य वाचतो, मनन करतो त्याला अश्वमेधाचे पुण्य लाभते यात काय संशय ? जो विष्णुभक्ती परायण एकादशीची ही सुमंगल कथा दिवसा व रात्री, विष्णूभक्ताचे मुखाने सांगितलेली ऐकतो तो आपल्या कोटी कुळांसह विष्णुलोकी राहतो. जे कोणी या एकादशी-माहात्म्याचे नित्य नियमाने एक चरण तरी ऐकतील त्यांची ब्रह्महत्येसारखी पापेसुध्दा नाश पावतील यात संशय नाही. हे अर्जुना, भगवंताला संतोष देईल असा विष्णुधर्मासारखा दुसरा धर्म नाही, गीतेसारखा दुसरा शास्त्रार्थ नाही, व एकादशीसारखे दुसरे व्रत नाही.

॥ याप्रमाणे उत्पत्ती-एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP