एकादशी महात्म्य - रमा एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.  


युधिष्ठिराने विचारले,
‘जनार्दना, आश्विन महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय ? व तिचे माहात्म्य काय ? तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणून कृपा करुन मला सर्व सांग.’
श्रीकृष्ण म्हणाले,
हे धर्मराजा, ऐक, मी काय सांगतो ते. ही एकादशी मंगलकारक असून रमा या नावाने प्रसिध्द आहे. ती महापातकांचा नाश करते, तिचे माहात्म्य मी एका कथेच्या द्वारेच तुला सांगतो. ऐक तर ....
पूर्वी मुचकुंद नावाचा राजा प्रसिध्द होता. तो इंद्राचा मित्र होता. तसेच यम, वरुण, कुबेर, बिभिषण हेही त्या राजाचे मित्र होते. हा मुचकुंद राजा विष्णुभक्त व सत्यप्रतिज्ञ होता. तो निष्कंटक राज्य करीत असताना चंद्रभागा नावाची श्रेष्ठ नदी त्याची मुलगी म्हणून जन्माला आली. पुढे ती उपवर झाली तेव्हा राजा मुचकुंदाने चंद्रसेन राजाचा मुलगा शोभमान याला दिली. तो शोभमान राजा एकदा सहजच आपल्या सासर्‍याकडे म्हणजे राजा मुचकुंदाकडे आला होता. त्यावेळी खूप पुण्य देणारे रमा एकादशीचे व्रत येऊन ठेपले. तेव्हा त्याची पत्नी चंद्रभागा फार चिंतेत पडली. ती देवाला म्हणाली, ‘हे देवा माझा पती फार अशक्त आहे. त्याचे आज काय होईल ? त्याला भूक अजिबात सहन होत नाही. आणि माझे बाबा तर फार कठोर राज्यकर्ते आहेत. ते दशमीच्या दिवशी आपल्या राज्यात तीन वेळा दवंडी पिटवतात की, उद्या एकादशी आली आहे. तेव्हा या हरिदिनी कोणीही जेवू नये. तेव्हा आता काय करावे ?’ त्याप्रमाणे दवंडी झालीच.
ती ऐकून शोभमान राजा आपल्या पत्नीला म्हणाला,
‘प्रिये, मी आता काय केले पाहिजे ? माझे हे चांगले शरीर नाश पावणार नाही, यावर उपाय कर.’
चंद्रभागा म्हणाली,
‘आर्यपुत्र, माझ्या पित्याच्या घरी, एकादशीच्या दिवशी कोणीही काहीही खाऊ नसे असा नियम आहे. या दिवशी हत्ती, घोडे, उंट वगैरे पशूंनाही गवत घातले जात नाही की पाणी दिले जात नाही. असे असल्यामुळे या एकादशीच्या दिवशी या घरी मनुष्यांना जेवण कसे काय मिळेल ? तुम्हाला जर एकादशीला जेवायचे असेल तर या घरातून बाहेर पडले पाहिजे. तेव्हा सर्वांचा विचार करुन काय ते ठरवावे.’
शोभमान राजा म्हणाला,
‘प्रिये, तू सत्यच सांगितले आहेस. मी एकादशीचे उपोषण करीनच. माझ्या दैवानुसार काय व्हायचे असेल ते होऊ दे.’ याप्रमाणे शोभमान राजाने दैवावर विश्वास ठेवून रमा एकादशीचे व्रत करण्याचा निश्चय केला. एकादशीच्या दिवशी तो भुकेने व तहानेने व्याकुळ झाला व त्याला फार दु:ख झाले. त्याचे शरीर शिणले. इतक्यात सायंकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला, रात्र सुरु झाली. हरिपूजा व जागर यात ज्यांना रस आहे, अशा वैष्णवांना एकादशीची रात्र फार आनंद देते. पण धर्मराजा, उपोषण सहन न झाल्यामुळे शोभमान राजाला ती रात्र फारच दु:खदायक गेली. शेवटी दुसर्‍या दिवशी सूर्योदयाच्या वेळी उपोषण सहन न झाल्यामुळे तो शोभमान राजा मरण पावला. मुचकुंद राजाने राजास योग्य असलेल्या विधिनुसार त्याचा अंत्यविधी पार पाडला. त्यावेळी चंद्रभागा सती जात होती; पण पित्याने अडवल्यामुळे ती सती गेली नाही. पतीचे और्ध्वदेहिक विधी झाल्यावर चंद्रभागा पित्याच्याच घरी राहू लागली. धर्मराजा, रमा एकादशीच्या व्रतप्रभावाने त्या शोभमान राजाला मंदर पर्वतावर रम्य देवपूर मिळाले. त्या देवपुराची बरोबरी कोणतेच नगर करु शकले नसते. ते नगर अजिंक्य होते. त्या नगराचे गुण मोजता न येण्यासारखे होते. त्या नगरात अनेक राजवाडे होते, आणि त्या राजवाडयांचे स्तंभ सोन्याचे होते. ते स्तंभ वैदूर्य मण्यांनी व स्फटिकांनी मढवले होते. अशा त्या राजवाड्यामुळे ते नगर फार शोभून दिसत असे. शोभमान या नगराचा राजा होता. तो उत्तम सिंहासनावर बसत असे, त्याच्या डोक्यावर पांढरे स्वच्छ छत्र असे, आणि चामरे ढाळली जात असत. तो किरीटकुंडले धारण करीत असे आणि उत्तम प्रकारचे हार व केयूर ही भूषणे घालीत असे. गंधर्व त्याची स्तुती करीत असत, आणि अप्सरांचे समुदाय त्याची सेवा करीत असत. असा तो शोभमान राजा देवराज इंद्राप्रमाणे शोभत असे. एकदा काय झाले ? मुचकुंद राजाच्या राज्यात राहणारा सोमशर्मा नावाचा ब्राह्मण तीर्थयात्रेच्या निमित्ताने फिरत फिरत मंदर पर्वतावरील देवपुराला आला. तेथे त्याला राजा शोभमान दिसला. हा आपल्या मुचकुंद राजाचा जावई आहे, हे त्याने ओळखले. सोमशर्मा त्याच्याजवळ गेला. त्याला पाहून शोभमान आसनावरुन उठला. त्याने सोमशर्म्याला नमस्कार केला. त्याने सोमशर्म्याला आपल्या सासर्‍याचे, प्रिय पत्नीचे व सर्व नगराचे कुशल विचारले.
तेव्हा सोमशर्मा म्हणाला,
‘राजा, तुझ्या सासर्‍याच्या घरी सर्व कुशल आहेत. तुझी पत्नी चंद्रभागा कुशल आहे व सर्व नगराचेही कुशल आहे. राजा, आता तू मला तुझा वृत्तांत सांग. तुला येथे पाहून मला फार आश्चर्य वाटत आहे. हे नगर फार सुंदर व आश्चर्यकारक आहे. असे सुंदर नगर कधी कोणी पाहिलेही नसेल. राजा, तुला हे नगर कसे मिळाले, ते तू सांगशील का ?
शोभमान राजा म्हणाला,
‘रमा एकादशीचे उपोषण केल्यामुळे हे नगर मला मिळाले आहे. पण हे नश्वर आहे. ते मला शाश्वत मिळेल व त्याचा नाश कधीच होणार नाही यासाठी मी काय करावे ? ही कामगिरी तू पार पाडशील का ?
सोमशर्मा ब्राह्मणाने विचारले,
राजा, हे नगर नश्वर आहे, हे कशावरुन ? आणि ते शाश्वत होण्यासाठी मी काय कामगिरी केली पाहिजे ते मला सांग. मी ती न चुकता पार पाडीन.’
शोभमान राजा म्हणाला,
‘मी हे रमा एकादशीचे व्रत श्रध्देशिवाय केले, त्यामुळे मला मिळालेले स्थान शाश्वत नाही. ते स्थान शाश्वत व नित्य कशाने होईल ते मी सांगतो. ऐक तर. मुचकुंद राजाची सुंदर कन्या चंद्रभागा आहे, तिला तू हा माझा सर्व वृत्तांत सांग. म्हणजे माझे येथील स्थान शाश्वत होईल.’ ते ऐकून सोमशर्मा आपल्या नगरात परतला आणि त्याने सर्व वृत्तांत चंद्रभागेला सांगितला. ब्राह्मणाचे ते बोलणे ऐकून चंद्रभागेचे नेत्र आश्चर्याने विस्फारले. ती म्हणाली, ‘हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तुम्ही मला ही स्वप्नाची हकीगत सांगता आहात की प्रत्यक्ष घडलेला वृत्तांत सांगता आहात ?’
सोमशर्मा म्हणाला,
‘बाळे, मी तुझा पती त्या महावनामध्ये प्रत्यक्ष पाहिला. देवांच्या नगराप्रमाणे असलेले त्याचे अजिंक्य नगर मी स्वत: पाहिले, पण ते स्थान त्याला शाश्वतचे मिळालेले नाही. ते त्याला शाश्वत प्राप्त होईल, असे काहीतरी तुलाच करता येईल, ते तू कर.’
चंद्रभागा म्हणाली,
‘श्रेष्ठ ब्राह्मणा, मी पतिदर्शनाला फार उत्सुक झाले आहे. मला तेथे घेऊन न्चल. मी माझ्या व्रताच्या पुण्याने माझ्या पतीच्या नगरातील स्थान शाश्वत होईल असे करीन. तू आम्हा दोघांचा संयोग करुन दे. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, वियोग झालेल्या पति-पत्नींचा संयोग घडवला तर मोठे पुण्य प्राप्त होते.’ चंद्रभागेचे हे बोलणे ऐकून सोमशर्मा तिला बरोबर घेऊन निघाला. लौकरच तो मंदर पर्वतावरील वामदेव ऋषीच्या आश्रमात पोचला. तेथे त्या दोघांनी सर्व वृत्तांत वामदेवाला सांगितला, तो सर्व त्याने ऐकला. नंतर त्याने उज्ज्वल वेदमंत्रांनी चंद्रभागेला अभिषेक केला. ऋषीमंत्राच्या त्या प्रभावाने आणि एकादशी व्रताच्या पुण्याने ती चंद्रभागा दिव्य देहाची झाली. तिला दिव्यगती प्राप्त झाली. हर्षाने तिचे नेत्र विस्फारले आणि ती पतीजवळ पोचली. आपली प्रिय पत्नी आलेली पाहून शोभमानला फार आनंद झाला. त्याने आपल्या पत्नीला जवळ बोलावले आणि आपल्या डाव्या बाजूला बसवले. चंद्रभागेला फारच आनंद झाला. आपल्या प्रिय पतीला आवडेल अशा गोड शब्दात ती म्हणाली, ‘हे प्रिया, माझ्याजवळ किती पुण्य आहे ते मी तुला सांगते, ऐक. मी माझ्या पित्याच्या घरी आठ वर्षांची झाले, तेव्हापासून या एकादशीचे व्रत श्रध्दायुक्त अंत:करणाने व सांगितलेल्या विधीनुसार करत आले आहे. त्या पुण्याच्या प्रभावाने तुझे हे देवपूर प्रलयकालपर्यंत टिकेल. येथे सर्व इच्छा पूर्ण होतील.’ हे धर्मराजा, याप्रमाणे ती चंद्रभागा दिव्य रुपाची झाली व दिव्य अलंकाराने शोभू लागली. तिने पतीसह अनेक दिव्य भोग भोगले. शोभमान राजालाही दिव्य देह प्राप्त झाला आणि चंद्रभागेसह मंदर पर्वतावर तो दिव्य भोग भोगू लागला. हे धर्मराजा, ही रमा एकादशी चिंतामणीप्रमाणे इच्छित मनोरथ पूर्ण करणारी आहे. ती कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करते. अशा या एकादशीचे माहात्म्य तुला सांगितले आहे. हे राजा जे श्रेष्ठ पुरुष या एकादशीचे व्रत करईल त्यांची ब्रह्महत्येसारखी पातकेसुध्दा निश्चितपणे नष्ट होतील. रमा नावाच्या या एकादशीचे माहात्म्य जो ऐकेल तो सर्व पापांपासून मुक्त होईल आणि विष्णुलोकात त्याची पूजा होईल.

॥ याप्रमाणे श्रीब्रह्मपुराणातील रमा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP