एकादशी महात्म्य - आमलकी एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.


मांधाता राजाने विचारले,
हे महाभागा, ब्रह्मदेवपुत्रा वसिष्ठा, माझ्यावर जर तुझी कृपा असेल तर माझे कल्याण होईल असे सर्व व्रतांतील उत्तम व्रत मला सांगा. त्या व्रताचा इतिहास व रहस्यही सांगा.’
वसिष्ठ ऋषी म्हणाले,
राजा, मी आता तुला सर्व व्रतांचे फल देणारे आमलकी एकादशीचे व्रत सांगतो. हे व्रत सर्व पापांचा नाश करते. व सर्व लोकांना मोक्ष मिळवून देते. एक हजार गाई दान करण्याचे फल हे व्रत केल्याने मिळते. या आमलकी एकादशीचा पुरातन इतिहास मी आता सांगतो. या व्रताने पूर्वी हिंसा करणार्‍या व्याधानेही मुक्ती मिळवली होती. पूर्वी वैदिश नावाचे नगर होते. तेथील नागरिक धष्टपुष्ट व आनंदित असत. त्या नगरात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चारी वर्णांचे लोक राहत होते. व त्यांच्यामुळे ते नगर अलंकृत झाले होते. हे नृपश्रेष्ठा, ते नगर नेहमी वेदघोषाने दुमदुमलेले असे. त्या श्रेष्ठ नगरात कोणी नास्तिक नव्हता किंवा दुष्ट कृत्य करणाराही कोणी नव्हता. या नगरात सोमवंशात उत्पन्न झालेला शशिबिंदू राजाचा पुत्र चैत्ररथ राज्य करीत होता. तो धार्मिक व सत्यप्रतिज्ञ होता. त्या राजाला हजार हत्तींचे बळ होते. तो शस्त्र आणि शास्त्र यांत सारखाच पारंगत होता. असा हा धर्मज्ञ व धर्मात्मा राजा पृथ्वीचे पालन करीत असताना त्याच्या राज्यात कोणीही कृपण नव्हता. दरिद्री मनुष्य तर कुठेही दिसत नसे. त्याच्या राज्यात धान्याचा सुकाळ होता. प्रजा सुखी व निरोगी होती. दुष्काळाचे नावही ऐकू येत नसे. नगरातील सर्व प्रजा विष्णुभक्तीत मग्न होती. सर्वांमध्ये राजा तर विशेष विष्णुभक्त होता. विष्णुपूजेत त्याला फार रस वाटत असे. त्याच्या राज्यात शुक्ल एकादशीला व कृष्ण एकादशीला कोणतेही नागरीक जेवत नसत. ते सर्वजण सर्वप्रकारचे शूद्र धर्म सोडून केवळ हरिभक्तीमध्ये तत्पर राहत असत. अशा तर्‍हेने राजा व नागरीक हरिभक्तीत मग्न राहून सर्व प्रकारची सुखे उपभोगत असताना खूप वर्षे निघून गेली. राजा, एकदा क्रमाने फाल्गुनाच्या शुध्द पक्षातील पुण्यकारक आमलकी एकादशी येऊन ठेपली. त्या एकादशीच्या दिवशी बालकांसह आणि वृध्दांसह सर्वांनी व्रतांचे नियम पाळले आणि उपवास केला. या व्रताचे मोठे फळ मिळते हे राजाला माहीत होतेच. तेव्हा त्या श्रेष्ठ राजाने नदीच्या पाण्यात स्नान केले आणि सर्व लोकांसह देवालयात येऊन तेथे पूर्ण कुंभाची स्थापना केली. कुंभाजवळ छत्र लावले. व जवळ पादुका ठेवल्या. त्या कुंभात पंचरत्ने घातली. आणि सर्व सुगंधी पदार्थांचे विलेपन करुन तो सुगंधित केला. कुंभाच्या भोवती दीपमाला लावल्या. आणि कुंभावर परशुरामाची स्थापना केली. नंतर त्या राजाने सर्व ऋषींसह आणि सर्व नागरिकांसह परशुराम देवाची आणि आवळीची पूजा केली. त्यावेळी त्यांनी प्रार्थना केली की, ‘हे रेणुकेचा आनंद वाढविणार्‍या जमदग्नीपुत्रा परशुरामा, तुला नमस्कार असो. तुझ्यावर आवळ्याच्या वृक्षाची छाया केली आहे. हे परशुरामा, तूच आम्हाला ऐश्वर्य व मुक्ती देतोस. ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेल्या हे आवळी, तू सर्व पातकांचा नाश करतेस. तुला नमस्कार असो. मी दिलेला अर्घ्य घे. हे आवळी, तू तर ब्रह्मस्वरुप आहेस. श्रीरामचंद्राने तुझी पूजा केली होती. मी तुला ज्या प्रदक्षिणा घातल्या आहेत, त्यामुळे तू माझी सर्व पापे नाहीशी करुन टाक.’
याप्रमाणे सर्वांनी भक्तीने पूजा केली आणि जागरण केले. इतक्यातच तेथे एक व्याध आला. तो भुकेने व श्रमाने व्याकुळ झाला होता. जवळच्या मोठ्या ओझ्याने तो दमला होता. कुटुंब पोषणासाठी तो जीवहिंसा करीत असल्यामुळे सर्व धर्मांनी त्याला बहिष्कृत केला होता. भुकेलेला असतानाच त्याने आमलकी एकादशीचा तो जागर पाहिला. तेथे लावलेल्या दीपमाला पहात तो तेथेच बसला. ‘हे सर्व काय आहे ?’ असा विचार मनात येऊन त्याला मोठे आश्चर्य वाटले. तेथे त्याने स्थापन केलेला कलश व त्यावरील दामोदर देवही पाहिला. त्याने आवळीचा वृक्ष, तेथील दीपोत्सव वगैरे सर्व पाहिले. व तेथील लोक विष्णुगुणानुवर्णनाची कथा सांगत होते तीही ऐकली. तो भुकेलेला असूनही त्याने एकादशीचे माहात्म्य ऐकले. रात्री जागरण करीत आश्चर्ययुक्त अंत:करणाने त्याने ती रात्र घालवली. सकाळ झाल्यावर नागरीक नगरात परत गेले. व्याधही प्रसन्न मनाने घरी परतला व त्याने भोजन केले. नंतर खूप काळ लोटल्यावर व्याध पंचत्वात विलीन झाला. त्याला एकादशीचा उपवास घडला व रात्री जागरण घडले होते. त्या पुण्यामुळे त्याला पुढच्या जन्मी चतुरंग सेनेसह विस्तीर्ण राज्य प्राप्त झाले. जयंती नावाच्या नगरात विदूरथ नावाचा राजा होता, त्याच्या पोटी हा व्याध जन्माला आला. आता त्याचे नाव वसुरथ होते. तो चतुरंगसेनेमुळे बलाढय होता. त्याचे राज्य धनधान्याने संपूर्ण भरलेले होते. आता तो निर्भयपणे दहा हजार गावांचे ते राज्य उपभोगू लागला. तो राजा कांतीने चंद्रासारखा, तेजाने सूर्यासारखा, व पराक्रमात विष्णुसारखा होता. तो पृथ्वीप्रमाणे क्षमाशील, धार्मिक, सत्य तेच बोलणारा, विष्णुभक्तीत तत्पर, वेद जाणणारा, सतत काम करणारा व प्रजेचे पालन करण्यात तत्पर होता. तो नाना यज्ञ विधिपूर्वक करीत असे व आपल्या पराक्रमाने शत्रूच्या गर्वाचा नाश करीत असे. तो नित्य अनेक प्रकारची दाने देत असे. एकदा तो शिकारीला गेला असताना दैवयोगाने मार्ग चुकला. त्याला दिशा समजेनाशा झाल्या. तो श्रमाने व भुकेने व्याकुळ झाला, व दमला. त्या घोर व गहन वनात एका वृक्षाखाली हात उशाला घेऊन तो झोपला. इतक्यात त्या डोंगराळ प्रदेशात राहणारा म्लेच्छांचा समुदाय शत्रूंचा पराभव करणार्‍या त्या राजाजवळ आला. त्या राजाने या म्लेच्छांना शिक्षा केली होती म्हणून ते राजाचे वैरी झाले होते. त्या दानशूर राजाला वेढा घालून ते म्लेच्छ उभे राहिले व म्हणू लागले, ‘हा राजा आपला पूर्वीचा वैरी आहे ! त्याला ठार करु या. याने आमचे पूर्वज, पिते, चुलते, बंधू, नातू, भाचे, मामे यांना ठार केले आहे. त्या सर्वांना आमच्या स्थानातून याने हुसकले व दशदिशांना पळवून लावले.’ असे बोलून त्या म्लेच्छांनी पाश, दांडपट्टे, तलवारी, धनुष्यबाण वगैरे हत्यारे सज्ज केली आणि त्या राजाला मारायला चालून गेले. त्यांनी फेकलेली शस्त्रे राजाच्या शरीरावर पडली. पण एकही शस्त्र शरीरात शिरले नाही ! आपली सर्व शस्त्रे व्यर्थ गेल्याने ते म्लेच्छ फार घाबरले. ते भीतीने इतके निर्जीव झाले की त्यांना एक पाऊलही पुढे टाकणे शक्य झाले नाही. त्या चेतना निघून गेलेल्या यवनांची शस्त्रे कुंठित झाली व राजाला मारायला आलेले ते सर्वजण दीनवाणे झाले. त्याचे वेळी राजाच्या शरीरातून एक सर्वांगसुंदर स्त्री उत्पन्न झाली. तिच्या अंगाला उत्तम सुगंध येत होता. तिने दिव्य अलंकार धारण केले होते. तिच्या अंगावर दिव्य वस्त्रे होती व दिव्य माला धारण केल्या होत्या. तिने क्रोधाने भिवया चढवल्या होत्या. तिच्या विस्फारलेल्या लाल नेत्रांतून जणू अग्नीच्या ठिणग्या बाहेर पडत होत्या. तिने आपल्या हातातील चक्र उगारले होते. त्यामुळे ती दुसरी कालरात्रीच आहे काय असे वाटत होते. ती स्त्री आधीच अतिशय दु:खी झालेल्या म्लेच्छांवर संतापाने धावून गेली व तिने ते पापकर्म करणारे म्लेच्छ ठार केले. इतक्यात तो राजा त्या गडबडीने जागा झाला तेव्हा त्याला ते अद्भुत कृत्य दिसले. म्लेच्छांचा समूह ठार झालेला पाहून राजाला हर्ष झाला. त्याच्या मनात आले, ‘माझे हे हाडवैरी म्लेच्छ कोणी मारले असावेत ? माझ्या कोणत्या हितकर्त्याने हे मोठे काम केले आहे ?’ राजा असा आश्चर्यचकित होऊन विचार करीत बसला होता. इतक्यात आकाशवाणी झाली की, ‘भगवान केशवाशिवाय असे रक्षण दुसरा कोण करील ?’ अशी आकाशवाणी ऐकून राजाचे नेत्र आश्चर्याने व आनंदाने विस्फारले. नंतर तो राजा वनातून विघ्न न येता कुशल घरी परत आला. त्या धर्मबुध्दी वसुरथराजाने इंद्राप्रमाणे पृथ्वीचे राज्य केले.
वसिष्ठ ऋषी म्हणाले,
‘हे राजा, जे नरश्रेष्ठ आमलकी एकादशीचे व्रत करतात ते वैकुंठ लोकास जातात याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही.
॥ याप्रमाणे श्रीब्रह्मांडपुराणातील आमलकी एकादशीचे माहात्म्य पूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP