एकादशी महात्म्य - वरुथिनी एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.


युधिष्ठिर म्हणाला,
‘वासुदेवा, तुम्हाला नमस्कार असो. चैत्र वद्य एकादशीचे नाव काय व तिचा महिमा काय ? ते मला सांग.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘राजा, या एकादशीचे नाव वरुथिनी आहे. ती या लोकी आणि परलोकी सौभाग्य मिळवून देणारी आहे. या वरुथिनी एकादशीच्या व्रतामुळे निरंतर सुख मिळते. पाप नष्ट होते. आणि सौभाग्यप्राप्ती होते. जी दुर्भागी स्त्री हे व्रत करील तिला सौभाग्य प्राप्त होईल. ही एकादशी सर्व लोकांना इष्टभोग व मुक्ती मिळवून देणारी आहे. या एकादशी व्रतामुळे मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात आणि जन्ममरणाचा त्याचा फेरा बंद होऊन त्याची गर्भवासातून कायमची मुक्तता होते. वरुथिनीचे व्रत करुनच मांधाता स्वर्गाला गेला. धुंदुमार वगैरे अनेक राजे हे व्रत करुनच स्वर्गाला गेले. प्रत्यक्ष भगवान शंकरही या व्रतानेच ब्रह्मकपालापासून मुक्त झाले. मनुष्याला दहा हजार वर्षे तपश्चर्या करुन जे फल मिळते तेच पुण्यफल वरुथिनी एकादशी केल्याने मिळते. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाचे वेळी आठ हजार तोळे सोने दान करुन जे फळ मिळते, तेच फळ वरुथिनी एकादशीचे व्रत करणार्‍या मनुष्याला मिळते. जो श्रध्दावान मनुष्य वरुथिनी एकादशीचे व्रत करतो तो त्याला इच्छा असलेले फळ या लोकी व परलोकी मिळवतोच.
राजा, ही एकादशी पवित्र असून पावन करणारी आहे. ती महापातकांचा नाश करते. आणि व्रतकर्त्याला ऐश्वर्य भोग व मुक्ती मिळवून देते. राजा, अश्वदानापेक्षा गजदान श्रेष्ठ तर गजदानापेक्षा भूमिदान श्रेष्ठ आहे. त्यापेक्षा तिलदान श्रेष्ठ, तिलदानापेक्षा सुवर्णदान श्रेष्ठ व सुवर्णदानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ आहे. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान दुसरे झाले नाही व होणार नाही. कारण पितर, देव आणि मनुष्य यांची तृप्ती अन्नानेच होत असते. हे श्रेष्ठ राजा, अन्नदानाची बरोबरी कन्यादान करते असे कवी म्हणतात. तसेच कन्यादानाची बरोबरी करणारे गोदान आहे असे स्वत: भगवान विष्णूंनी सांगितले आहे; पण या सर्वप्रकारच्या दानांपेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे. वरुथिनी एकादशी केल्याने या विद्यादानाचे फळ मनुष्याला मिळते. पापामुळे मोह होऊन जे लोक कन्येचे द्रव्य घेतात व त्यावर जगतात ते प्रलयकाळपर्यंत नरकात जातात. म्हणून मनुष्याने कधीही कन्येचा मोबदला घेऊ नये. सर्व प्रयत्न करुन हे टाळावे. राजा, जो मनुष्य लोभाने कन्याविक्रय करुन धन घेतो; तो पुढच्या जन्मात निश्चितपणे मांजर होतो. पण जो मनुष्य कन्या अलंकृत करुन कन्यादान करतो त्याला मिळणार्‍या पुण्याचे गणित करणे चित्रगुप्तालाही जमत नाही. असे जे कन्यादानाचे अगणित पुण्य आहे, तेच पुण्य वरुथिनी एकादशीचे व्रत करणार्‍या मनुष्याला मिळते. काशाच्या भांडयात भोजन करणे, मांस, मसूरा, चणे, कोद्रू, भाजी, मध, परान्न, दुसर्‍यांदा भोजन व मैथुन या दहा गोष्टी व्रत करणार्‍याने दशमीचा वर्ज्य कराव्यात. ध्यूतक्रीडा (सोंगटया खेळणे), झोप, विडा, दंतधावन, दुसर्‍यावर दोषारोप करणे, कपट, पतिबरोबर भाषण, रागावणे व खोटे बोलणे हे सर्व एकादशीला वर्ज्य करावे. काशाचे भांडे, मांस, मसुरा, मध, व्यर्थ भाषण, व्यायाम, प्रवास, दुसर्‍यांदा भोजन, मैथुन, हजामत, तेल लावणे आणि परान्न या गोष्टी द्वादशीला वर्ज्य कराव्यात. राजा, हे सर्व नियम पाळून जो वरुथिनी एकादशीचे व्रत करतो त्याच्या सर्व पातकांचा क्षय ही एकादशी करते व अंती अक्षय मोक्ष मिळवून देते. एकादशीच्या दिवशी जे लोक जागरण करुन जनार्दनाची पूजा करतात ते सर्व पापातून मुक्त होऊन परमगती मिळवतात. म्हणून जे लोक पापभीरु आहेत आणि रात्रीचा शत्रू असलेल्या सूर्याचा पुत्र यम याची ज्यांना भीती वाटते त्या सर्व मनुष्यांनी खूप प्रयत्न करुन वरुथिनी एकादशीचे व्रत करावे. वरुथिनी एकादशीचे हे माहात्म्य जो वाचेल आणि ऐकेल त्याला हजार गाई दान दिल्याचे पुण्य मिळेल आणि तो सर्व पापांतून मुक्त होऊन शेवटी विष्णुलोकाला जाईल.
॥ याप्रमाणे भविष्योत्तर पुराणातील वरुथिनी एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP