एकादशी महात्म्य - प्रबोधिनी एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.  


नारदाने विचारले, ‘हे पितामह ब्रह्मदेवा, प्रबोधिनी एकादशीचे माहात्म्य आम्हाला सांगा.’
ब्रह्मदेव म्हणाला, हे ऋषिश्रेष्ठा नारदा, प्रबोधिनी एकादशीचे हे माहात्म्य पाप नष्ट करणारे, पुण्य वाढवणारे आणि सुबुध्द लोकांना मुक्ती देणारे आहे. ऐक तर. नारदा, पाप नष्ट करणारी ही कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी जोपर्यंत आली नाही तोपर्यंतच भागीरथी गंगा, मीच पाप नष्ट करणारी आहे.’ अशी गर्जना या पृथ्वीवर करीत असते. त्याचप्रमाणे पुष्कर वगैरे तीर्थे, सर्व समुद्र व सर्व पुण्यकारक सरोवरे ही सर्व प्रबोधिनी एकादशी आली नाही, तोपर्यंतच आपल्या पुण्यत्वाची प्रौढी मिरवतात. प्रबोधिनी एकादशीचे एकच उपोषण केले असता मनुष्याला हजार अश्वमेध व शंभर राजसूय यज्ञ केल्याचे फळ मिळते.’
नारदाने विचारले,
‘पितामहा ब्रह्मदेवा, प्रबोधिनी एकादशीला एकवेळ भोजन केल्याने काय फळ मिळते ? नक्त भोजन केल्याने किती पुण्य मिळते आणि उपवास केल्यास किती पुण्य मिळते ? ते सर्व मला सांगा.’
ब्रह्मदेव म्हणाला,
‘नारदा, या प्रबोधिनी एकादशीला एकभुक्त राहिले असता एका जन्माचे पाप नष्ट होते. नक्त व्रत केले तर दोन जन्मांचे पाप नष्ट होते. आणि उपोषण केले तर सात जन्मांचे पाप नष्ट होते. हे पुत्रा नारदा, ही प्रबोधिनी एकादशी जे दुर्लभ व अप्राप्य असेल असे फळ मिळवून देते. त्रैलोक्यातही न मिळणारे फळ ही एकादशी मिळवून देते. ही एकादशी न मागितलेले फळही मिळवून देत असते. तुमच्या पापांचा ढिगारा मेरुमंदार पर्वताएवढा का झालेला असेना, ते सर्व पाप प्रबोधिनी एकादशीचा उपवास केला असता जळून जाते. पूर्वीच्या हजार जन्मांत केलेले पाप प्रबोधिनी एकादशीच्या रात्री जागरण केल्यास कापसाच्या राशीप्रमाणे सहज जळून जाते. हे मुनिश्रेष्ठा, जो मनुष्य या प्रबोधिनी एकादशीचा उपवास मनोभावाने व विधिपूर्वक करतो त्याला संपूर्ण फळ मिळते. त्याचे पुण्य थोडे असले तरी ते मेरूपर्वताइतके वाढते. पण जो मनुष्य हे व्रत विधिशिवाय करील त्याने मेरुपर्वताइतके पुण्य केले तरी त्याला त्याचे फळ कणभरही मिळणार नाही. जो मनुष्य मनोभावाने केवळ प्रबोधिनी एकादशीचा उपवास करण्याबद्दल चिंतन करील त्याची पूर्वीच्या शंभर जन्मांतील पातके नष्ट होतात. प्रबोधिनी एकादशीला जो जागरण करतो, त्याची पूर्वीची, वर्तमान काळची आणि पुढची, दहा हजार कुळे विष्णुलोकाला जातात. या एकादशीला जागरण करणार्‍या मनुष्याचे पितर त्यांच्या पूर्व कर्मामुळे नरकात पडले असते तर ते त्यातून मुक्त होतात व त्यांना दिव्य अलंकार प्राप्त होऊन ते सर्वजण विष्णुलोकात राहू लागतात. हे मुनिश्रेष्ठा नारदा, प्रबोधिनी एकादशीच्या रात्री जागरण करणारा मनुष्य ब्रह्महत्येसारख्या घोर पातकात्तूनही मुक्त होतो. ब्राह्मणाला अश्वमेधासारखे यज्ञ करुनही जे फळ मिळत नाही, ते फळ प्रबोधिनी एकादशीचे रात्री जागरण केल्यास सुखाने मिळते. या एकादशीचे रात्री जागरण केल्यास जे फळ मिळते ते फळ सर्व तीर्थांत स्नान केल्यास किंवा गोप्रदाने, सुवर्णदान, किंवा पृथ्वीदानही केले तरी प्राप्त होत नसते. नारदा, जो प्रबोधिनी एकादशीचे व्रत करतो, त्यालाच कुळात जन्मलेला पुण्यवान म्हणता येते. तो आपल्या जन्माने आपले कुळ पवित्र करतो. जो प्रबोधिनी एकादशीचे व्रत निष्ठेने करतो, त्याच्या घरात त्रैलोक्यातील सर्व तीर्थे वास्तव्य करीत असतात. म्हणून सर्व कामे बाजूला ठेवून चक्रपाणी विष्णू प्रसन्न व्हावा यासाठी हरिबोधिनी एकादशीचे व्रत केले पाहिजे. जो या एकादशीचे उपोषण करतो, तो ज्ञानी, तपस्वी, योगी व जितेंद्रिय समजला जातो. ही प्रबोधिनी एकादशी धर्माचे सार देते. ही एकादशी विष्णूची फार आवडती आहे. म्हणून या एकादशीला एकदा जरी उपोषण केले तरी तो उपोषण करणारा मनुष्य मुक्ती मिळवण्यास पात्र ठरतो. या एकादशीचे उपोषण करणार्‍या मनुष्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. प्रबोधिनी एकादशीला जागरण केले असता कायिक, वाचिक व मानसिक पापे नष्ट होतात. स्वत: गोविंद परमात्मा त्या पापांचे क्षालन करतो.
हे वत्सा नारदा, या एकादशीचे दिवशी मनुष्य जनार्दनाला उद्देशून जे स्नान, दान, जप, होम, वगैरे करतो ते सर्व अक्षय होते. या व्रताने जनार्दनाला संतुष्ट करणारा मनुष्य सर्व दिशा उजळून टाकून विष्णुलोकाला जातो. मागच्या शंभर जन्मांमध्ये बालपणी, तरुणपणी किंवा म्हातारपणी जे लहानमोठे पाप केले असेल, ते सर्व पाप या एकादशीच्या दिवशी भगवंताची पूजा केली असता परमात्मा धुऊन टाकतो. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाचे वेळी स्नान वगैरे केल्याने जे पुण्य मिळते, त्याच्या हजारपट पुण्य प्रबोधिनी एकादशीचे रात्री जागरण केल्याने मिळते. मनुष्याने जन्मापासून खूप पुण्य संपादन केले असेल; पण कार्तिक एकादशीचे व्रत केले नसेल तर ते पुण्य व्यर्थ ठरते.
हे नारदा, जो विष्णुप्रीत्यर्थ कार्तिक महिन्यात कोणताच नियम करीत नाही, त्याला जन्मापासून केलेल्या पुण्याचे फळ प्राप्त होत नाही. म्हणून हे मुनिश्रेष्ठा नारदा, सर्व इच्छा पूर्ण करणार्‍या देवाधिदेवाची-जनार्दनाची-तू प्रयत्नपूर्वक उपासना कर. हे वत्सा, नारदा जो विष्णुभक्त मनुष्य कार्तिक महिन्यात परान्न वर्ज्य करतो, त्याला चांद्रायण व्रताचे फळ खात्रीने मिळत असते. हे मुनिश्रेष्ठा नारदा, कार्तिक महिन्यात भगवंताची कथा ऐकली किंवा सांगितली असता मधुसूदन विष्णु जसा तृप्त होतो, तसा यज्ञाने किंवा दानानेही तृप्त होत नाही. जे कोणी कार्तिक महिन्यात भगवंताच्या कथा सांगतात आणि जे शांतचित्ताने ते ऐकतात त्या सर्वांना शंभर गाई दान केल्याचे फळ मिळते. मग ती कथा एका श्लोकाची किंवा अर्ध्या श्लोकाची असो. हे मुनिश्रेष्ठा, जो कार्तिक महिन्यामध्ये स्वत:च्या कल्याणाकरता किंवा लोभबुध्दीने हरिकथेचे निरुपण करतो, तो आपल्या शंभर कुळांचा उध्दार करतो. जो मनुष्य नेहमीच नित्य नियमाने आणि विशेष करुन कार्तिक महिन्यात हरिकथा ऐकतो, त्याला हजार गाई दान केल्याचे पुण्य मिळते.
मुनिश्रेष्ठा, प्रबोधिनी एकादशीचे दिवशी जो हरिकथा करतो, त्याला सात द्वीपांसह पृथ्वी दान दिल्याचे पुण्य लाभते. हे मुनिश्रेष्ठा, दिव्य विष्णुकथा ऐकून जे आपल्या शक्तीप्रमाणे कथा सांगणार्‍याचे पूजन करतात, त्यांना सनातन लोक प्राप्त होतात. हे सर्व ऐकून नारदाने विचारले, ‘देवांत श्रेष्ठ असलेल्या हे ब्रह्मदेवा, ज्या विधीने या एकादशीचे व्रत केले असता व्रताचे संपूर्ण फळ मिळेल असा व्रतविधी मला सांगा.’
ब्रह्मदेव म्हणाला, ‘हे ब्राह्मणश्रेष्ठा नारदा, एकादशीच्या दिवशी चार घटका रात्र शिल्लक असतानाच ब्राह्य मुहूर्तावर पहाटे उठावे. मुखप्रक्षालन व स्नान करावे. हे स्नान नदी, तलाव, विहीर वगैरे ठिकाणी करावे किंवा घरी करावे. नारदा, त्यानंतर व्रत ग्रहण करण्यासाठी पुढील संकल्प मंत्र उच्चारावा. ‘हे पुंडरीकाक्षा, या एकादशीचे दिवशी मी निराहारी राहीन व दुसर्‍या दिवशी पारणे करीन. म्हणून हे अच्युता, तू माझे रक्षण कर.’ याप्रमाणे व्रत ग्रहण केल्यावर देवाधिदेव असलेल्या चक्रधारी विष्णूची भक्तिभावाने पूजा करावी व मन संतुष्ट ठेवून त्या दिवशी उपोषण करावे. नारदा, त्या दिवशी रात्री देवाधिदेव विष्णूजवळ गीत, नृत्य, वाद्य वगैरेंच्या साथीसह कृष्णकथेचे गायन करुन जागरण करावे या एकादशीच्या दिवशी अनेक प्रकारची फुले, फळे, कापूर, अगरु, केशर वगैरे साहित्य वापरुन भगवंताची पूजा करावी. या पूजेकरता द्रव्य खर्च करण्यात कद्रूपणा करु नये. भक्तिभावपूर्वक नाना प्रकारची फळे अर्पण करावी आणि शंखात पाणी घालून अर्घ्य द्यावा. या एकादशीच्या दिवशी अशा प्रकारे अर्घ्य दिल्यास सर्व तीर्थयात्रांपासून किंवा सर्व दाने दिल्यामुळे जे पुण्यफळ मिळाले असते त्याच्या कोटीपट पुण्यफळ प्राप्त होते. या कार्तिकातल्या एकादशीच्या दिवशी जो मनुष्य अगस्तीच्या फुलांनी जनार्दनाची पूजा करतो त्याच्यापुढे इंद्रही हात जोडतो. हे मुनिश्रेष्ठा नारदा, अगस्तीच्या फुलांनी विष्णूची पूजा केली असता भगवान जे फळ देतो, तसे फळ तपश्चर्येने संतुष्ट होऊनही तो देत नाही. कलियुग प्रिय असलेल्या हे नारदा, या कार्तिक महिन्यात जे लोक बेलाची पाने वाहून भक्तिभावाने श्रीकृष्णाची पूजा करतात, ते मुक्तच आहेत, असे मी खात्रीने सांगतो.
कार्तिक महिन्यात जे लोक तुळशीपत्रांनी किंवा तुळशीच्या मंजिर्‍यांनी भगवंताची पूजा करतात, त्यांचे दहा हजार जन्मांतील पातक जळून जाते. तुळशीची पूजा नऊ प्रकारे करता येते. तुळशीचे दर्शन, तुळशीला स्पर्श करणे, तुळशीचे ध्यान करणे, तुळशीचे नामस्मरन करणे, तुळशीला नमस्कार करणे, तुळशीची स्तुती करणे, तुळशीची रोपे लावणे, तुळशीला पाणी घालणे आणि नित्य तुळशीची पूजा करणे; असे हे नऊ प्रकार आहेत कार्तिक महिन्यात या नऊ प्रकारांनी जे लोक तुळशीची सेवा करतात, त्यांना पुढे एक हजार कोटी वर्षे वैकुंठलोकात राहता येते. ज्यांनी लावलेले तुळशीचे झाड पृथ्वीवर वाढत आहे, त्यांच्या कुळात पूर्वी उत्पन्न झालेले व पुढे उत्पन्न होणारे सर्वजण कल्पसहस्त्र युगापर्यंत वैकुंठ लोकात राहतात.
कार्तिक महिन्यात जे लोक कदंबाच्या फुलांनी विष्णूची पूजा करतात, त्यांना चक्रपाणीच्या प्रसादाने कधीही यमलोकात जावे लागत नाही. हे ब्राह्मणश्रेष्ठा नारदा, कदंबाचे फूल पाहिल्याबरोबरच भगवान विष्णू संतुष्ट होतात. मग सर्व इच्छा पूर्ण करणारा तो हरी कदंब फुलांनी पूजन केले असता संतुष्ट होतो, हे निराळे सांगायला कशाला हवे ? जो मनुष्य कार्तिक महिन्यात गरुडध्वज भगवंतांची पूजा गुलाबाच्या फुलांनी करतो, त्याला मुक्तीचा अधिकार प्राप्त होतो. जे लोक कार्तिक महिन्यात बकुल व अशोक यांच्या फुलांनी जगत् पती विष्णूची पूजा करतात, ते चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत शोकरहित होतात.
‘नारदा, जे लोक कार्तिक महिन्यात पांढर्‍या व तांबडया कण्हेराच्या फुलांनी जगन्नाथाची पूजा करतात, त्यांच्यावर भगवान विष्णू नित्य संतुष्ट असतात. जो मनुष्य विष्णूला आंब्याचा मोहोर वाहतो, त्या महाभाग्यवानाला कोटी गोदानाचे फळ मिळते. जो मनुष्य दूर्वांकुरांनी विष्णूची पूजा करतो, त्याला या उत्तम पूजेचे फळ शंभर पट मिळते. नारदा, जे लोक सुख मिळवून देणार्‍या भगवान विष्णूची पूजा शमी पत्रांनी करतात, ते महाभयंकर यममार्ग सहज तरुन जातात. जे लोक चातुर्मासात देवाधिदेव विष्णूची पूजा चाफ्याच्या फुलांनी करतात, ते या जन्ममृत्युमय संसारात पुन्हा येत नाहीत. जो मनुष्य कार्तिक महिन्यात पिवळ्या केवडयाचे फूल जनार्दनाला अर्पण करतो, त्याचे मागच्या कोटीजन्मात साठलेले पाप गरुडध्वज विष्णू जाळून टाकतो. तांबूस अरुणवर्णाच्या व कुंकवासारख्या लाल वर्णाच्या सुवासिक कमळांनी जो भगवंताची पूजा करतो, त्याला पुढे श्वेतद्वीपात राहायला मिळते.
‘नारदा, याप्रमाणे प्रबोधिनी एकादशीचे रात्री भगवान विष्णूची पूजा करावी, कारण तोच भोग व ऐश्वर्य देत असतो. नंतर सकाळी उठून नदीवर स्नानासाठी जावे. तेथे स्नान करुन संध्या, जप, वगैरे प्रात:कालची कर्तव्ये करावी. नंतर घरी येऊन विष्णूची पूजा विधिपूर्वक करावी. त्यानंतर व्रताची समाप्ती करण्याकरता श्रेष्ठ ब्राह्मणांना भोजन घालावे. भक्तियुक्त अंत:करणाने गोड शब्दांत चुकल्या-माकल्याची क्षमा मागावी. नंतर भोजन, वस्त्र इत्यादी अर्पण करुन गुरुची पूजा करावी. चक्रपाणी विष्णू संतुष्ट व्हावा म्हणून गुरुला गाय व दक्षिणा द्यावी. इतर सर्व ब्राह्मणांनाही पुष्कळ दक्षिणा द्यावी. नंतर आपण जो नियम केला असेल तोच निवेदन करुन ब्राह्मणांसमोर त्याचे विसर्जन करावे व नंतर ब्राह्मणांना शक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी.
ज्याने नक्त भोजनाचा नियम केला असेल, त्याने ब्राह्मणभोजन घालावे. ज्याने अयाचिताचा नियम केला असेल, त्याने उत्तम बैल सुवर्णासह दान द्यावा. ज्याने मांसाचा त्याग केल असेल, त्याने दक्षिणेसह गाईचे दान करावे. ज्याने आवळकाठीचे चूर्ण अंगास लावून स्नान करण्याचा नियम केला असेल, त्याने दही व मध यांचे दान द्यावे. ज्याने फळासंबंधी नियम केला असेल त्याने फळाचे दान द्यावे. ज्याने तेलाचा नियम केला असेल, त्याने तूप दान द्यावे. आणि ज्याने तुपाचा नियम केला असेल, त्याने उत्तम साळीचे तांदूळ दान द्यावे. ज्याने जमिनीवर झोपण्याचा नियम केला असेल, त्याने रजई वगैरे सर्व साहित्यासह बिछाना दान द्यावा. ज्याने केळीच्या पानावर जेवायचा नियम केला असेल, त्याने तूप भरुन भांडे दान द्यावे. ज्याने मौनव्रत धारण करण्याचा नियम केला असेल, त्याने आरसा दान द्यावा. ज्याने अनवाणी चालण्याचा नियम केला असेल, त्याने जोडा किंवा पादत्राण दान द्यावे. ज्याने मीठ सोडले असेल, त्याने खडीसाखर दान द्यावी. ज्याने विष्णुमंदिरात किंवा ब्राह्मणाच्या घरी नंदादीप लावण्याचा नियम केला असेल, त्याने व्रतसमाप्तीला सोन्याचा किंवा तांब्याचा दिवा करुन त्यात सोन्याच्या वाती घालाव्या आणि तो तुपाने भरुन विष्णुभक्ती करणार्‍या ब्राह्मणाला दान द्यावा, म्हणजे त्याचे व्रत संपूर्ण होते. ज्याने धारणा-पारणा नियम, म्हणजेच एक दिवस उपास व एक दिवस भोजन करण्याचा नियम केला असेल त्याने वस्त्र, सोने व अलंकार यांसह उत्तम प्रकारचे आठ कुंभ ब्राह्मणाला दान द्यावेत. वर सांगितलेली व्रतसमाप्तीची सर्व दाने संपूर्णपणे करणे शक्य नसेल, तर शक्तीप्रमाणे दान द्यावे आणि ब्राह्मणाला ‘तुझे व्रत संपूर्ण सिध्द झाले, असे म्हणावयास सांगून त्याचा आशीर्वाद घ्यावा. नंतर ब्राह्मणांना नमस्कार घालून त्यांना निरोप द्यावा. नंतर आपण भोजन करावे. चातुर्मासात ज्याचा त्याग केला असेल त्याची समाप्ती वर सांगितल्याप्रमाणे करावी. राजा, याप्रमाणे जो जो व्रत पाळतो, त्याला त्याला त्या व्रताचे मोजता येणार नाही इतके फळ मिळते व शेवटी तो वैकुंठलोकाला जातो. चातुर्मासाचे व्रत जो अडथळा व विघ्ने न येता पार पाडतो, तो कृतकृत्य होऊन पुन्हा जन्माला येत नाही. याप्रमाणे उद्यापानासह व्रत केल्यास ते परिपूर्ण होते; पण व्रताचा नियम करुन मध्येच नियम मोडल्यास आणि सामर्थ्य असतानाही ते पार न पाडल्यास, व्रत करणारा पुढच्या जन्मी आंधळा व कुष्ठी होतो.
‘धर्मराजा, तू विचारल्यावरुन प्रबोधिनी एकादशीचे व्रत मी तुला सांगितले आहे. हे माहात्म्य वाचले किंवा ऐकले तर हजार गाई दान दिल्याचे फळ मिळते.

॥ याप्रमाणे स्कंदपुराणातील प्रबोधिनी एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP