एकादशी महात्म्य - अजा एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.  


युधिष्ठिराने विचारले,
‘हे जनार्दना, श्रावण वद्य पक्षात येणार्‍या एकादशीचे नाव काय ? व माहात्म्य काय ? ते ऐकण्याची माझी इच्छा आहे, तरी सांगावे.’
श्रीकृष्ण म्हणाले, ‘मी ती संपूर्ण कथा सांगतो, एकाग्र चित्ताने ऐक. ही पापाचा नाश करणारी एकादशी अजा या नावाने प्रसिध्द आहे. जो मनुष्य हृषिकेश भगवंतांची पूजा करुन हे व्रत करतो त्याचे पापे नष्ट होतात. या व्रताचे माहात्म्य ऐकूनही पातके नाहीशी होतात. धर्मराजा, या एकादशीसारखी इहलोकी व परलोकी हित साधणारी दुसरी एकादशी नाही, हे मी तुला सत्य सांगत आहे. पूर्वी हरिश्चंद्र नावाचा प्रख्यात राजा होऊन गेला. तो सत्यप्रतिज्ञ व चक्रवर्ती होता. तो सर्व पृथ्वीचा राजा होता. तो कोणत्यातरी कर्मामुळे राज्यावरुन भ्रष्ट झाला. त्याने आपला मुलगा व बायको यांना विकले व स्वत:ही एका डोंबाचा दास झाला. तरी तो पुण्यवान राजा आपली सत्यप्रतिज्ञा सांभाळून होता व त्यापासून ढळला नाही. त्याला स्मशानातील वस्त्रे गोळा करावी लागत असत. तो राजा अशा स्थितीत असता पुष्कळ वर्षे लोटली. आता तो फार दु:खी झाला. काय करावे ? कोठे जावे ? या स्थितीतून माझी सुटका कशी होईल ? याविषयी चिंता करु लागला. तो अशी चिंता करीत असता दु:खसमुद्रात बुडालेल्या त्या राजाजवळ गौतम नावाचा ऋषी येऊन पोचला. राजा संकटात आहे, हे त्या ऋषीला आधीच समजले होते. तो ऋषी दुसर्‍यांवर उपकार करण्याकरताच जणू ब्रह्मदेवाने निर्माण केला होता. अशा त्या श्रेष्ठ ऋषीला पाहताच हरिश्चंद्र राजाने त्याला नमस्कार केला आणि त्याच्या समोर तो राजा हात जोडून उभा राहिला. त्याने आपला सर्व दु:खमय वृत्तांत त्या ऋषीला सांगितला. ते ऐकून ऋषीला फार आश्चर्य वाटले. त्याने राजाला या एकादशी व्रताचा उपदेश केला. त्यावेळी तो गौतमऋषी हरिश्चंद्र राजाला म्हणाला, ‘हे राजा, श्रावण वद्य पक्षातील अजा नावाची एकादशी मंगलकारक व पुण्यदायक म्हणून प्रसिध्द आहे. या एकादशीचे तू व्रत कर. म्हणजे तुझे पाप नष्ट होईल. तुझ्या भाग्याने ही एकादशी आजपासून सातव्या दिवशी येत आहे. त्या दिवशी तू उपवास कर व रात्री जागरण कर. तू याप्रमाणे एकादशीचे व्रत केलेस म्हणजे तुझी पापे नाहीशी होतील. हे श्रेष्ठ राजा, तुझ्या या पुण्यप्रभावामुळेच मी आज येथे आलो.’ राजाला असे सांगून तो ऋषी अंतर्धान पावला.
ऋषीच्या म्हणण्यानुसार हरिश्चंद्र राजाने अजा एकादशीचे व्रत उत्तम प्रकारे केले. त्याबरोबर त्या राजाच्या सर्व पातकांचा लगेच नाश झाला. हे धर्मराजा, त्या एकादशी व्रताचा प्रभाव ऐक. जे पाप अनेक वर्षे भोगायचे होते, ते या व्रताने एका क्षणात नष्ट झाले. या व्रताच्या प्रभावाने हरिश्चंद्र राजा दु:खरहित झाला. त्याचे व पत्नीचे पुनर्मीलन झाले. त्याचा मेलेला पुत्रही जिवंत झाला. त्यावेळी देवांनी दुंदुभी वाजवल्या व आकाशातून पुष्पवृष्टी केली. एकादशीच्या प्रभावाने त्याला निष्कंटक राज्य परत मिळाले आणि आपल्या नगरातील प्रजेसह व परिजनांसह तो स्वर्गलोकाला गेला. हे धर्मराजा, जे लोक अशा प्रभावशाली एकादशीचे व्रत करतात ते सर्व पापांतून मुक्त होतात व निश्चितपणे स्वर्गलोकी जातात. राजा, हे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते.

॥ याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील अजा नावाच्या एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP