एकादशी महात्म्य - मोक्षदा एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.


धर्मराजाने विचारले,
‘मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील एकादशी कोणती ? त्या दिवशी कोणत्या देवांची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कोणता आहे ? लोकांच्या हितासाठी व त्यांची पापे नष्ट व्हावीत म्हणून मी विचारित आहे. माझी ही शंका दूर कर आणि विस्ताराने सर्व सांग.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘राजा तू योग्यच विचारलेस. तुझी बुध्दी निर्मळ आहे, हे फारच चांगले आहे. भगवंताला आवडणार्‍या या दिवसाचा महिमा मी सांगतो, तो ऐक. राजा, ही एकादशी माझ्या देहापासून कशी उत्पन्न झाली हे तुला सांगितलेच आहे. माझी आवडती ही एकादशी मुरु राक्षसाच्या वधासाठी प्रसिध्द झाली आहे. आता मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील मोक्षदा या एकादशीविषयी मी तुला सांगतो. ही एकादशी सर्व पापांचे हरण करणारी म्हणून प्रसिध्द आहे. या एकादशीच्या दिवशी गंध, फुले अर्पण करुन भगवान विष्णूची पूजा करावी. त्याच्यासमोर भक्तिगीते गावी व नृत्य करावे. हे राजेंद्रा, आता या एकादशीविषयी मी शुभ व कल्याणप्रद अशी जुनी पुराणकथा सांगतो, ती ऐक. ही कथा ऐकल्यानेच केव वाजपेय यज्ञाचे फल मिळते. या कथेच्या श्रवणाच्या पुण्यामुळे अधोगतीला गेलेले आई-बाप किंवा पुत्र हे सर्व स्वर्गाला जातात यात संशय नाही. म्हणून या एकादशीचा महिमा ऐक.
पूर्वी गोकुल नावाच्या रम्य नगरात वैखानस नावाचा राजा राहत होता. तो आपल्या प्रजेचे पालन पुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राजधानीत चारही वेदांत पारंगत असलेले ब्राह्मण राहत असत. तो राजा अशाप्रकारे राज्य करीत असता एका रात्री त्याला स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्याने पाहिले की आपला पिता अधोयोनीत-नरकात-गेला आहे. हे पाहून त्याला मनातल्या मनात फार आश्चर्य वाटले. सकाळी ब्राह्मणांसमोर स्वप्नाचा वृत्तांत सांगताना राजा म्हणाला, ‘ब्राह्मणांनो, मी काल स्वप्नात पाहिले की माझा पिता नरकात पडला आहे. तो मला म्हणत होता, ‘बाळा, मी या अधोयोनीत येऊन पडलो आहे. यातून माझा उध्दार कर व मला वाचव.’ ब्राह्मणांनो, तेव्हापासून माझ्या मनाला शांतता नाही. माझे हे प्रचंड राज्य मला दु:खदायक वाटत आहे ! माझे घोडे, हत्ती, रथ, हे मला आता सुख देत नाहीत. माझा धनपूर्ण कोशही मला सुख देत नाही. माझ्या बायका, गुणी पुत्र, यांपासूनही मला कसलेही सुख होत नाही. मी आता काय करु ? कोठे जाऊ ? माझे सर्व शरीर नुसते जळत आहे. श्रेष्ठ ब्राह्मणांनो, ज्यामुळे माझे पूर्वज मोक्ष मिळवतील, जसे दान, व्रत, तप किंवा योगसाधना असेल तर मला सांगा. ज्याचा पिता नरकात गेला आहे, अशा सामर्थ्यवान पुत्राने या लोकी जिवंत कशाला राहायचे ? ज्याचा पिता नरकात पडलेला आहे, त्याचे जिणे व्यर्थच झाले असे म्हटले पाहिजे !’
ब्राह्मण म्हणाले,
‘राजा, येथून जवळच पर्वत नावाच्या ऋषीचा आश्रम आहे. तो ऋषी भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणतो. हे राजशार्दूला, तू या मुनीकडे जा.’ ब्राह्मणांचे हे बोलणे ऐकून तो श्रेष्ठ राजा खिन्न मनाने पर्वत ऋषीच्या आश्रमात गेला. तो आश्रम शांत ब्राह्मणांनी व प्रजाजनांनी वेढलेला होता. त्या विस्तीर्ण आश्रमात अनेक ऋषी राहत होते. त्या पर्वतऋषीच्या भोवती चारी वेदांत पारंगत असलेले ऋषी होते. त्यामुळे तो दुसरा ब्रह्मदेव आहे की काय असे वाटत होते. त्या श्रेष्ठ मुनीला पाहून राजाने त्याला जमिनीवर पडून दंडवत-साष्टांग नमस्कार- घातला. त्या वेळी पर्वत ऋषीने राजाला कुशल विचारले. सेना, भांडार, दुर्ग वगैरे राज्यांची जी सात अंगे असतात त्याविषयी प्रश्न विचारले. ‘तुला राजसौख्य मिळते ना ? व तुझे राज्य निष्कंटक आहे ना ? असेही विचारले.
राजा म्हणाला,
‘ऋषिश्रेष्ठा, आपल्या कृपेने राज्याच्या सात अंगांसह मी कुशल आहे. पण सर्व वैभव असतानाही एक विघ्न उपस्थित झाले आहे हे प्रभो, मी स्वप्नामध्ये माझा पिता नरकात पडला आहे असे पाहिले. स्वप्नातच तो मला म्हणाला, की ‘या नरकातून माझा उध्दार कर.’ हे स्वप्न पाहून मी फार दु:खी झालो आहे. या दु:खरुपी नदीतून तरुन जाण्याचा उपाय कृपेने सांगा. आपल्याला हेच विचारण्यासाठी मी येथे आलो आहे.’ राजाचे हे बोलणे हे ऐकून त्या श्रेष्ठ पर्वतमुनीने नेत्र मिटून भूतकाळाचे आणि भविष्यकाळाचे क्षणभर ध्यान केले. नंतर तो राजाला म्हणाला, ‘राजा, तुझ्या पित्याचे पूर्वजन्मीचे पाप मला माहीत झाले आहे. एका पूर्वजन्मात तुझ्या पित्याला दोन बायका होत्या. त्यातील एक पत्नी, मला ऋतुदान दे व वाचव’ अशी विनवणी करीत असतानाही त्याने ती ऐकली नाही. व दुसर्‍याच स्त्रीवर तो कामासक्त झाला. त्यामुळेच तो आजपर्यंत नरकात पडला आहे.’
राजाने विचारले,
‘कोणत्या व्रताने किंवा दानाने त्या पापयुक्त नरकातून माझ्या पित्याचा मोक्ष होईल ?’
ऋषी म्हणाला,
‘राजा, मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील मोक्षा नावाची एकादशी विष्णूला प्रिय आहे. त्या तिथीला तुम्ही सर्वजण उपोषण करा व ते पुण्य पित्याला अर्पण करा. त्या पुण्याच्या प्रभावाने तुझ्या पित्याला नरकातून मोक्ष मिळेल.’ पर्वतऋषीचे हे बोलणे ऐकून राजा घरी आला. मार्गशीर्ष शुक्ल एकादशीचा दिवस आल्यावर अंत:पुरातील सर्व स्त्रिया व मुले यांच्यासह त्याने एकादशीचे व्रत केल व उपास केला. व ते सर्व पुण्य आपल्या पित्याला दिले. त्याबरोबर स्वर्गातून राजावर पुष्पवृष्टी झाली. वैखानस राजाचा पिता त्याच वेळी स्वर्गाला जाऊ लागला. सर्वजण त्याची स्तुती करीत होते. अंतरिक्षातून जाताना तो आपल्या पुत्राला स्पष्ट वाणीने म्हणाला, ‘बाळा, तुझे निरंतर कल्याण असो.’ नंतर तो स्वर्गाला गेला.
‘राजा, जो ही मोक्षदा एकादशी करतो, त्याचे सर्व पाप नाश पावते आणि अंती तो मोक्ष मिळवतो. या मोक्षदा एकादशीसारखी निर्मळ व शुभ असलेली दुसरी एकादशी नाही. या एकादशीचे व्रत केल्यामुळे जे पुष्प मिळते, त्याचे मोजमाप करणे मलाही शक्य नाही.
या एकादशीचे माहात्म्य वाचल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे वाजपेय यज्ञाचे फल मिळते. ही एकादशी चिंतामणीप्रमाणे मनाची इच्छा पुरवते आणि स्वर्ग व मोक्ष मिळवून देते.

॥ याप्रमाणे श्री ब्रह्मांड पुराणातील मोक्षदा नावाच्या एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले. ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP