एकादशी महात्म्य - इंदिरा एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.  


युधिष्ठिराने विचारले,
‘हे मधूसूदना, भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘धर्मराजा, या एकादशीए नाव इंदिरा आहे. या एकादशीच्या व्रतप्रभावाने महापातकांचा नाश होतो. या एकादशीच्या पुण्यामुळे अधोगतीस गेलेल्या पितरांनाही मुक्ती मिळते. या एकादशीचे पाप नष्ट करणारी कथा मी तुला सांगतो. ती लक्ष देऊन ऐक. ही कथा ऐकल्याने सुध्दा वाजपेय यज्ञाचे फळ मिळते.
पूर्वी कृत युगात माहिष्मती नगरीत शत्रूंचा नाश करणारा इंद्रसेन नावाचा प्रसिध्द राजा होता. तो राजा राज्याचे प्रतिपालन धर्माने व यशस्वीपणे करीत होता. तो धनधान्याने समृध्द असून त्याचा परिवार मुलानातवांनी भरलेला होता. माहिष्मतीचा तो राजा विष्णुभक्तीत तत्पर होता. तो मुक्ती देणारी गोविंदाची नामावळी नित्य जपत असे. आणि अध्यात्मचिंतनामध्ये आपला काळ घालवत असे. तो राजा एकदा आपल्या राजसभेत सुखाने बसला होता. त्या वेळी नारदऋषी आकाशातून उतरले व राजसभेत आले. ऋषीला पाहताच इंद्रसेन राजा जोडून उभा राहिला. त्याने नारदाला चांगल्या आसनावर बसवले. आणि अर्ध्य देऊन त्याची विधिपूर्वक पूजा केली. नारदमुनी आसनावर सुखाने बसल्यानंतर राजाला विचारु लागला, ‘राजा, तुझ्या राज्याची स्वामी, अमात्य, मित्र, भांडार, देश, किल्ले आणि सैन्य ही सात अंगे खुशाल आहेत ना ? तुझी बुध्दी धर्मात स्थिर आहे ना ? तुला विष्णुभक्तीचे प्रेम वाटते ना ?’
इंद्रसेन राजा त्याला म्हणाला,
‘मुनिश्रेष्ठा नारदा, तुझ्या कृपाप्रसादाने माझ्या राज्यात सर्वत्र कुशल आहे. आज आपल्या दर्शनाने माझे सर्व यज्ञ सफल झाले आहेत. हे ऋषिश्रेष्ठा, माझ्या वर कृपा करुन आपल्या आगमनाचे कारण सांगा.’
राजाचे हे बोलणे ऐकून नारद म्हणाला,
‘हे राजश्रेष्ठा, माझे बोलणे ऐकून तुला फार आश्चर्य आटेल. नुकताच मी ब्रह्मलोकातून निघालो आणि सहजच यमलोकात गेलो होतो. तेथे यमाने माझी पूजा केल्यावर मी उत्तम आसनावर बसलो होतो. तेथे तुझा धर्मपरायण असलेला सत्यवान नावाचा पिता यमाची सेवा करताना मला दिसला. पुष्कळ पुण्य करणारा तुझा पिता एका व्रताच्या वैगुण्यामुळेच यमराजाच्या सभेत राहत आहे. राजा, त्याने तुला एक निरोप सांगितला आहे. तो सत्यवान राजा मला म्हणाला, ‘नारदा, माहिष्मती नगरात इंद्रसेन नावाचा राजा प्रसिध्द आहे. तू त्याला जाऊन सांग की, पूर्वजन्मी घडलेल्या काही व्रत-वैगुण्यामुळे मी यमलोकात राहिलो आहे. म्हणून बाळा, तू इंदिरा एकादशीचे व्रत कर. त्या व्रताचे पुण्य मला दे. आणि त्याद्वारे मला स्वर्गलोकाला पाठव.’ राजा, तुझ्या पित्याचा असा निरोप घेऊन मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्या पित्याला स्वर्गलोक मिळावा म्हणून तू इंदिरा एकादशीचे व्रत कर. त्या व्रताच्या प्रभावाने तुझा पिता स्वर्गलोकाला जाईल.’
राजाने विचारले,
‘नारदा, इंदिरा एकादशीचे व्रत मला सांग. ते व्रत कोणत्या महिन्यात, कोणत्या पक्षात, कोणत्या विधीने करावे, ते सविस्तर सांग.’
नारद म्हणाला,
‘राजा, इंदिरा एकादशीचा व्रतविधी मी सांगतो तो ऐक. भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातील दशमीच्या दिवशी सकाळी श्रध्दायुक्त अंत:करणाने स्नान करावे. संध्या वगैरे नित्य कर्मे आटोपल्यावर दुपारच्या वेळी नदी-तलाव-विहीर वगैरे बाहेरच्या जलात स्नान करावे. आणि रात्री भूमीवर झोपावे. दुसर्‍या दिवशी एकादशीची प्रभातकाळ झाल्यावर दंतधावन व मुखप्रक्षालन करावे. नंतर भक्तिभावानी उपवासाचा संकल्प करावा, तो असा :
‘हे पुंडरीकाक्षा, मी आज सर्व भोगापासून अलिप्त राहीन व आहार घेणार नाही. उद्या मी व्रताची पारणा करीन. हे अच्युता, तुम्ही माझे रक्षणकर्ते व्हा. असा संकल्प करुन मध्यान्हीला शालिग्रामच्या शिळेपुढे यथाविधि श्राध्द करावे. नंतर दक्षिणा वगैरे देऊन ब्राह्मणाची पूजा करावी व त्याला भोजन घालावे. नंतर व्रत करणार्‍याने विष्णूची गंध, फुले, धूप, दीप वगैरेंनी पूजा करावी, रात्री देवाजवळ जागरण करावे. सकाळ झाल्यावर द्वादशीच्या दिवशी विष्णुची भक्तिभावाने पूजा करुन ब्राह्मणांना भोजन घालावे. नंतर आपली मुले-बाळे, बंधूवर्ग व इतर नातेवाईक यांच्यासह भोजन करावे. भोजन करताना स्वत: मौन पाळावे. राजा, तू या विधीप्रमाणे आळस न करता इंदिरा एकादशीचे व्रत कर म्हणजे तुझे पितर यमलोकातून स्वर्गलोकात जातील.’
नारद ऋषीने इंद्रसेन राजाला हे व्रत सांगितले आणि नारद तेथेच अंतर्धान पावला. नारदाने सांगितलेल्या विधीप्रमाणे इंद्रसेन राजाने इंदिरा एकादशीचे हे व्रत आपल्या बायका, पुत्र व सेवक यांच्यासह केले. धर्मराजा, त्या राजाने हे व्रत करताच स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. त्याचा पिता गरुडावर बसून वैकुंठलोकाला गेला. तो राजर्षी इंद्रसेनही निष्कंटक राज्याचा उपभोग घेऊन व आपल्या पुत्राला राज्यावर बसवून स्वत: स्वर्गाला गेला. धर्मराजा, इंदिरा एकादशीचे माहात्म्य मी तुला सांगितले आहे. जो मनुष्य हे माहात्म्य वाचतो किंवा ऐकतो, त्याची सर्व पापांतून मुक्तता होते. तो या भूलोकावर सर्व प्रकारचे भोग भोगतो व नंतर विष्णुलोकात चिरकाल राहतो.

॥ याप्रमाणे ब्रह्मवैवर्त पुराणातील इंदिरा नावाच्या एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP