एकादशी महात्म्य - मोहिनी एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.


युधिष्ठिराने विचारले, ‘जनार्दना, वैशाख शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय ? त्या एकादशीच्या व्रताचा विधी कोणता व त्या व्रताचे काय फळ मिळते ते मला सांग.’
श्रीकृष्ण म्हणाले, ‘धर्मराजा, पूर्वी रामाने वसिष्ठ ऋषींना हाच प्रश्न विचारला होता, त्यावेळी वसिष्ठ ऋषींनी रामाला जी कथा सांगितली तीच मी तुला सांगतो. ऐक तर.’
रामचंद्र म्हणाला, ‘हे भगवंता, सर्व व्रतात उत्तम व्रत कोणते आहे ? हे ऐकण्याची माझी इच्छा आहे. ते व्रत सर्व पापांचा क्षय करणारे व सर्व दु:खांचे निर्मूलन करणारे असावे. हे महामुनी, सीताविरहातून उत्पन्न झालेली अनेक दु:खे मी भोगली आहेत. त्या दु:खाच्या भीतीनेच मी तुला हे विचारीत आहे.’
वसिष्ठ ऋषी म्हणाले,
‘रामचंद्रा, तू चांगले विचारलेस. तुझी बुध्दी निष्ठावान आहे. रामचंद्रा, तुझ्या केवळ नामस्मरणानेही मनुष्य पवित्र होतो. तरीपण सर्व लोकांच्या हितासाठी पावन करणारे, सर्व व्रतांत पवित्र आणि सर्वोत्तम असे व्रत मी तुला सांगतो. वैशाख महिन्याच्या शुध्द पक्षातील एकादशीचे नाव मोहिनी असे आहे. ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे. या एकादशीच्या व्रतप्रभावाने मनुष्य मोहजालातून आणि पातकांच्या समुदायातून मुक्त होतो. हे मी तुला अगदी खरे खरे सांगतो. म्हणून रामा, तुझ्यासारख्यांनी ही एकादशी अवश्य केली पाहिजे. रामचंद्रा, या एकादशीची कल्याणकारक व पुण्यप्रद कथा मी सांगतो ती ऐक. केवळ ही कथा ऐकल्यानेही महापातकांचा नाश होतो. सरस्वती नदीच्या रम्य किनार्‍यावर भद्रावती नावाची एक उत्तम नगरी होती. तेथे ध्युतिमान नावाचा राजा राज्य करीत होता. तो चंद्रवंशात उत्पन्न झालेला असून धैर्यवान होता. तो युध्दही न्यायानेच करीत असे. त्याच नगरात धनपाल नावाचा वाणी राहत होता. तो धनधान्यांनी समृध्द होता. आणि पुण्यकर्म करणारा होता. त्या वाण्याने पाणपोई, अन्नसत्रे, देवालये, धर्मशाळा, सरोवरे वगैरे बांधली होती. तो शांत स्वभावाचा असून विष्णुभक्तीत तत्पर होता. त्याला पाच पुत्र होते. सुमना, ध्युतिमान, मेधावी, सुकृती व धृष्टबुध्दी अशी त्यांची नावे होती. यापैकी पाचवा धृष्टबुध्दी नित्य महापतके करण्यात मग्न असे. तो नेहमी वेश्येच्या संगतीत असे. विटाच्या गप्पागोष्टीत तो चतुर होता. ध्यूत वगैरे व्यसनात तो बुडालेला होता. व परस्त्रियांशी विलास करण्याची त्याला लालसा होती. त्याने देव, अतिथी, पितर, ब्राह्मण यांची कधीही सेवा केली नाही. तो नित्य अन्याय करीत असे. तो दुष्टबुध्दीचा होता व पित्याचे द्रव्य उधळणारा होता. तो पापी अभक्ष्यभक्षण करी आणि नित्य मध्यपानात मग्न असे. वेश्येच्या गळ्यात हात घालून डोळे फिरवीत तो भरचौकात उभा राही. यामुळे त्याला त्याच्या पित्याने घरातून बाहेर काढले. नातेवाइकांनीही त्याचा त्याग केला. स्वत:च्या देहाखेरीज त्याचे सर्व अलंकार नष्ट झाले. त्याच्याजवळचे द्रव्य संपल्यावर वेश्यांनी त्याचा त्याग केला व निंदा केली. त्यानंतर पुढे त्याच्या अंगावर वस्त्रही राहिले नाही. भुकेने तो व्याकुळ झाला. आता मी काय करु ? कोठे जाऊ ? कोणत्या उपायाने उपजीविका चालवू ? अशी चिंता तो करु लागला.
पुढे त्याने त्या नगरातच चोर्‍या करणे सुरु केले. तेव्हा त्याला राजपुरुषांनी पकडले. पण त्याच्या पित्याच्या कीर्तीमुळे सोडून दिले. नंतर पुन्हा पकडले व सोडले. असे अनेकदा झाले. पण शेवटी राजसेवकांनी त्या दुराचारी धृष्टबुध्दीला बळकट बेडया घातल्या, चाबकाचे फटके पुन्हा पुन्हा मारले. शेवटी राजाने त्याला आज्ञा केली की, ‘अरे मूर्खा, तू आता माझ्या राज्यात राहू नकोस !’ असे सांगून राजाने त्याला कारागृहातून मुक्त करुन हाकलून दिले. राजाच्या भीतीने तो गहनवनात निघून गेला. तेथे तो भुकेने व तहानेने व्याकुळ होऊन भक्ष्य मिळवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागला. तेथे एखाद्या सिंहाप्रमाणे तो हरिण, डुक्कर व चितळ यांची शिकार करु लागला. मांसाहार मिळवण्याकरता पाठीवर भाता बांधून व धनुष्यावर बाण चढवून तो सर्व वनात फिरत असे तो अरण्यातील पशुपक्षी मारु लागला. चकोर, मयूर, कंक, तितिर वगैरे पक्षी व उंदीर यांची हत्या तो अरण्यात फिरुन करीत असे. याप्रमाणे पूर्वजन्मी केलेल्या पापांचे फळ म्हणून तो तेथे दु:खरुपी चिखलात बुडून गेला. त्याचे मन नेहमी दु:खाने व शोकाने भरुन गेलेले असे. रात्रंदिवस त्याला चिंता जाळीत असे. परंतु त्याचे पूर्वजन्मीचे थोडेसे पुण्य शिल्लक राहिले होते ! त्या पुण्यामुळेच की काय एकदा तो कौंडिण्य ऋषीच्या आश्रमात येऊन पोचला. तेथे तपोधन कौंडिण्य ऋषी वैशाख मासानिमित्त भागीरथीत स्नान करुन नुकताच आला होता. शोभभावनेने भरुन गेलेला धृष्टबुध्दी त्या ऋषीसमोर गेला. इतक्यात कौंडिण्याच्या अंगावरील स्नानाने भिजलेल्या वस्त्रामधून गंगाजलाचा एक बिंदू धृष्टबुध्दीच्या अंगावर पडला. त्या बिंदूचा स्पर्श होताच त्याची सर्व पातके नष्ट झाली व दुर्भाग्य संपले.
धृष्टबुध्दी हात जोडून कौंडिण्य ऋषीसमोर उभा राहिला आणि म्हणाला, ‘हे ब्राह्मणश्रेष्ठा, मी जन्मापासून पापच करीत आलो आहे ! द्रव्य खर्च केल्याशिवाय या पापाचे प्रायश्चित्त करता येत असल्यास मला सांग. कारण सध्या माझ्याजवळ द्रव्य नाही.’
ऋषी म्हणाला, ‘तुझ्या पापाचा क्षय होण्यासाठी मी तुला गंगानदीत पिंडदान केल्याचे पुण्य, व्रत सांगतो, ते एकाग्र चित्ताने ऐक. वैशाख महिन्याच्या शुध्द पक्षात मोहिनी नावाची एकादशी आहे. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू या एकादशीचे व्रत कर. या एकादशीला उपवास केल्यास ती एकादशी उपवास करणाराची, अनेक जन्मात संपादन केलेली मेरुपर्वताएवढी पापेही नष्ट करते.’
ऋषीचे हे बोलणे ऐकून धृष्टबुध्दी प्रसन्न झाला. रामचंद्रा त्याने कौंडिण्याच्या उपदेशाप्रमाणे विधिपूर्वक व्रत केले. व्रत केल्याबरोबर त्याची पापे संपली. त्याला दिव्य देह प्राप्त झाला. आणि तो गरुडावर बसून जेथे कसलेच उपद्रव होत नाहीत, अशा वैकुंठ लोकाला गेला.
रामचंद्रा, अज्ञान व दु:ख नाहीसे करणारे असे हे मोहिनी एकादशीचे व्रत आहे. या त्रैलोक्यातील चराचर सृष्टीत या व्रताहून श्रेष्ठ असलेले दुसरे व्रत नाही. या व्रतापुढे यज्ञकर्म, दाने किंवा तीर्थे यांचे पुण्य सोळावा हिस्सा सुध्दा भरत नाही. या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने हजार गाई दान केल्याचे पुण्य मिळते.
॥ श्रीकूर्मपुराणातील मोहिनी एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP