एकादशी महात्म्य - जया एकादशी

एकादशी व्रताचे नुसते श्रवण केल्यासही श्रोत्याला या जगात अनेक सुखोपभोग मिळतात व शेवटी त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त होते.


N/Aयुधिष्ठिर म्हणाला, ‘हे श्रीकृष्णा, तू आदिदेव आहेस. तुला जाणून घेणे कठीण आहे. स्वेदज, अंडज, जमिनीतून उत्पन्न होणार्‍य़ा वृक्ष-वनस्पती, गर्भापासून उत्पन्न होणारे प्राणी, यांनी भरलेले हे चराचर विश्व तूच उत्पन्न केलेस. या विश्वाचा पालन-कर्ता व क्षय करणारा तूच आहेस. मी षट्तिला-एकादशीचे माहात्म्य ऐकले. आता माघ शुक्ल एकादशीचे माहात्म्य कृपा करुन सांग. या एकादशीचे नाव काय ? हिचा पूजाविधि कोणता आहे व त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी ? सर्व सांग.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘सांगतो. ऐक. या एकादशीचे नाव ‘जया’ आहे ही एकादशी सर्व पाप नष्ट करणारी, पवित्र, इच्छिलेले देणारी, व मानवाला मोक्ष मिळवून देणारी आहे ती ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त करते व पिशाच्चत्वाचा नाश करते. या एकादशीचे व्रत केल्याने, मृत्यूनंतर त्या व्रत करणार्‍याला कधीही पिशाच्चयोनीत जावे लागत नाही. पाप नष्ट करणारी व मोक्ष देणारी अशी दुसरी एकादशी नाही. हे राजा, म्हणून या एकादशीचे व्रत प्रयत्नपूर्वक करावे. हे राजश्रेष्ठा, आता या एकादशीची कल्याणकारक व पौराणिक कथा ऐक. ही कथा पद्मपुराणात मी सांगितली आहे. एकदा मनोरम स्वर्गात इंद्र राज्य करीत होता व सर्व देव तेथे सुखाने सुखाने राहत होते. अप्सरांचे समुदाय त्या देवांची सेवा करीत असत. हे देव नित्य अमृतपान करीत असत. त्या स्वर्गात पारिजातक वृक्षांनी शोभणारे नंदनवन आहे. तेथे देव अप्सरांसह क्रीडा करतात. राजा, एकदा इंद्र त्या नंदनवनात क्रीडा करीत होता. हर्षनिर्भर होऊन त्याने पन्नास कोटी अप्सरांचा नृत्यकार्यक्रम सुरु केला होता. त्यात गंधर्व गायन करीत होते. त्या गंधर्वात चित्रसेन व त्याची प्रिय पत्नी मालिनी आपल्या मुलीसह सहभागी झाले होते. या जोडप्याला पुष्पवान नावाचा पुत्र होता व पुष्पवानाला माल्यवान नावाचा पुत्र होता. त्या समुदायात पुष्पवती नावाची गंधर्वी होती. ती माल्यवान गंधर्वावर मोहीत झाली. ती मदनबाण लागून व्याकुळ झाली. तिने आपल्या हावभावांनी व नेत्रकटाक्षांनी माल्यवानाला वश केले. ती कशी होती ? राजा, तिच्या लावण्यरुपी संपत्तीचे व रुपाचे वर्णन ऐक ! तिचे हात जणू मदनाचे कंठपाश होते. तिचे मुख चंद्रासारखे होते. नेत्र आयताकृती असून कानापर्यंत गेले होते. तिचेन कान कुंडलांनी शोभत होते. हे श्रेष्ठ राजा, तिचा गळा दिव्य अलंकारांनी शोभत होता. तिचे पिवळ्या कांतीचे उभारलेले स्तन सुवर्णकलशाप्रमाणे शोभत होते. तिचे उदर कृश होते व कंबर तर मुठीत मावण्याजोगी होती. तिचे नितंब पुष्ट होते व जघनस्थल विस्तीर्ण होते. तिचे पाय लाल कमळाप्रमाणे चमकत होते. अशी ती पुण्यवती पाहून माल्यवानही मोहीत झाला. पुष्पवती व माल्यवान, इंद्राला संतुष्ट करण्याकरिता नृत्य करायला तेथे आले होते. हे दोघेजण त्या अप्सरांच्या समुदायात गायन करीत होते. पण त्यांचे मन वार्‍यावर नव्हते ! त्यांचे गायन चांगले त्यांचे गायन चांगले होईना. कामदेवाने सोडलेल्या बाणांनी वश होऊन एकमेकांकडे दृष्टी खिळवून ते दोघे पाहत राहिले. त्यांच्या अशा हावभावावरुन त्यांने मन एकमेकांत गुंतले आहे हे इंद्राला समजले. ते दोघे गीताचा आरंभ नीट करीत नव्हते, ताल नीट धरत नव्हते, आणि गाण्यात चुका करुन विरस करीत होते. हे पाहून इंद्राला वाटले की या दोघांनी असे दुर्लक्ष करुन माझा अपमान केला आहे. तो रागावला आणि त्याने पुष्पवती आणि माल्यवान यांना शाप दिला. इंद्र म्हणाला, ‘तुम्ही माझा आज्ञाभंग करणारे व पापात मग्न झालेले आहात. तुमचा धिक्कार असो ! तुम्ही मृत्यूलोकात जाऊनच पतिपत्नी व्हा. तेथे तुम्ही पिशाच्च बनून आपल्या कर्माचे फळ भोगा.’ इंद्राने असा शाप दिल्यानंतर त्या दोघांच्या मनाला फार दु:ख झाले. शापाने मोहीत होऊन ते हिमालयात येऊन पोहोचले. त्या दोघांना आता पिशाच्चयोनी प्राप्त झाली होती. त्यामुळे त्यांना दारुण दु:ख होत होते. शापमोहामुळे त्यांना गंध, रस, स्पर्श समजेनासा झाला, मरणप्राय यातना देणारा अंगाचा दाह होऊ लागला. आपण केलेल्या कर्माचे दु:ख होऊन त्यांना रात्रीचे निद्रासुखही मिळेना. त्यांच्या जवळपास पर्वताच्या गुहांमधून एकमेकांना खाणारी पिशाच्चे फिरत असत. हिमालयातील बर्फाच्या थंडीमुळे व उडणार्‍या तुषारामुळे त्यांना पीडा होत असे. त्याने दात दातावर वाजत आणि अंगावर काटा येत असे. पिशाच्च झालेला व थंडीची बाधा झालेला माल्यवान हडळ झालेल्या आपल्या पत्नीला म्हणाला, ‘ज्या पापामुळे आपल्याला हे पिशाच्चत्व प्राप्त झाले, असे दु:ख देणारे पाप केले तरी कोणते ? हे निंदास्पद पिशाच्चत्व म्हणजे दारूण नरकच आहे, असे मला वाटते ! म्हणून कोणीही सर्व प्रयत्न करुन पाप करणे टाळले पाहिजे.’ अशा तर्‍हेचे विचार करीत ते दोघे आपला काळ तेथे दु:खात घालवीत होते.
इतक्यात त्यांच्या दैवयोगाने माघ शुध्द पक्षातील जया या नावाने प्रसिध्द झालेली एकादशी आली. सर्व तिथींमध्ये ही उत्तम तिथी होती. त्या एकादशीच्या दिवशी या दोघांनी कसलाच आहार घेतला नाही. हे राजा, इतकेच काय, पण त्या दिवशी त्यांनी जलपानहे केले नाही. त्यांनी त्या दिवशी कुठलीही हिंसा केली नाही व फळ किंवा झाडाचे पानही तोडून खाल्ले नाही. दु:खाने व्याकुळ होऊन ते एका पिंपळाच्या झाडाखाली पडून राहिले. ते दोघे त्या स्थितीत असताना रवी अस्ताला गेला. रात्र पडली. त्या रात्री भयंकर थंडी पडली होती. ती रात्र घोर आणि दारुण भासत होती. थंडीने ते थरथर कापत होते. व त्यांची शरीरे आखडली होती. ऊब यावी म्हणून त्या दोघांनी एकमेकांना आपल्या हातांनी मिठी मारली होती. व त्यांचीं अंगे एकत्र मिळाली होती. त्या रात्री त्या दोघांना झोप आली नाही किंवा कसलेच सुखसमाधान लाभले नाही. हे राजशार्दूला, इंद्राच्या शापाने पिडल्यामुळे त्यांनी ती रात्र दु:खातच काढली. पण त्यांना जया एकादशीचा उपवास घडला होता. व रात्री जागरण झाले होते. त्यांनी अजाणताच व्रत केले होते. या व्रताच्या प्रभावाने काय घडले ते आता ऐक. द्वादशीचा दिवस उजाडला. त्यांचे जया एकादशीचे व्रत पूर्ण झाले. राजा, विष्णूच्या प्रसादामुळे त्यांचे पिशाच्चत्व नाहीसे झाले. पुष्पवती आणि माल्यवान यांना पूर्वीचे सुंदर रुप लाभले. त्यांचे एकमेकांवरील प्रेम पुन: उत्पन्न झाले. त्यांचे पूर्वीचे अलंकारही त्यांना प्राप्त झाले. अप्सरांचे समुदाय सेवा करीत असतानाच ते दोघे एका विमानावर आरुढ झाले. तुंबरु प्रमुख असलेले गंधर्व त्यांची स्तुती करीत होते. लवकरच ते सर्वजण मनोहर स्वर्गात पोहोचले. ते अशा तर्‍हेने शापमुक्त होऊन आलेले पाहून इंद्राला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, ‘तुम्ही कोणते पुण्य केले म्हणून पिशाच्चत्व नाहीसे झाले ? माझा शाप असतानाही कोणत्या देवाने तुम्हाला त्या शापातून मुक्त केले ?’
माल्यवान म्हणाला, ‘स्वामी, जया एकादशीच्या उत्तम व्रताने आणि वासुदेवाच्या प्रसादाने व त्याच्या भक्तीच्या प्रभावाने आमचे पिशाच्चत्व नाहीसे झाले.’
त्यांचे हे बोलणे ऐकून राजा इंद्र म्हणाला,
‘तुम्ही दोघे पवित्र व पावन झाला असून मीही वंदन करण्यास योग्य झाला आहात. कारण तुम्ही विष्णुभक्तीत तत्पर आहात आणि एकादशीचे व्रत करणारे आहात. जे मानव विष्णूचे किंवा शंकराचे भक्त असतील, ते आम्हालाही वंदनीय, पूज्य आहेत, हे नि:संशय. तेव्हा हे माल्यवाना, ‘तू पुष्पवतीसह या स्वर्गात विहार कर व सौख्याचा उपभोग घे.’ ‘हे राजा, याकरता ब्रह्महत्येचेही पातक नाहीसे करणारे जया एकादशीचे व्रत सर्वांनी केले पाहिजे. राजा, जो हे जया एकादशीचे व्रत करतो, त्याने सर्व दाने दिली, सर्व यज्ञ केले आणि सर्व तीर्थात स्नान केले, असेच समजले जाईल. व ते सर्व फळ त्याला मिळेल. जया एकादशीचे व्रत जो मनुष्य भक्तीने आणि श्रध्देने करतो, तो वैकुंठात शंभर कोटी कल्प वर्षे आनंदात राहतो. जया एकादशीच्या या माहात्म्याचे वाचन किंवा श्रवण केल्यास अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते.
॥ जया एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP