श्री किसनगिरी विजय - अध्याय अकरावा

देवगडचे श्री किसनगिरी महाराज यांचा जन्म सन १९०७ साली झाला आणि त्यांनी १९८३ साली समाधी घेतली.


श्री गणेशाय नम: ॥
तुझिया कृपेच्या लहरी । उठताती मम अंतरी । देउनी लेखणी मम करी । संत चरित्र कथियेले ॥१॥
तरी किसनगिरीचा अवतार । केला जगाचा उध्दार । दाउनी नाना चमत्कार । भक्तिमार्ग वाढविला ॥२॥
तरी आता श्रोतेजन । मूळ कथेचे घ्या अनुसंधान । प्रथमोध्यायी गणेशस्तवन । गुरुकृपा जाहली ॥३॥
तरी या आध्यायी जाण । बाळ किसनचा होऊनी जन्म । गायी गुरांचे पालन करुन । तप केले अचाट ॥४॥
आणिक गांवोगांव जाऊन । जनाचे दु:ख दूर करुन । तैसेचि माधुकरी जमवून । दत्तमंदीर उभारिले ॥५॥
पंधरा दिवसाचा नेम करुन । चार धामास आले जाउन । औदुंबरासी सजीव करुन । द्वादश वर्षे तप केले ॥६॥
याचे करिता पठण । पुत्र होईल गुणसंपन्न । मातापित्याची सेवा करुन । सात्विक कर्म आचरील ॥७॥
आणिक दत्तकृपा होईल । इच्छिले ते प्राप्त होईल । दुष्ट बुध्दी नाश पावेल । श्रवणे पठणी करिता ॥८॥
अध्याय दोन आणि तीन । मंत्र असती संजीवन । सकलांसी बोधवचन । अवघडरुपे सांगतसे ॥९॥
एक एक शब्दाअचे बोल । अर्थ दाविला सखोल । शब्द महिमा अमोल । बोध देई भक्तांसी ॥१०॥
तरी याचे करिता पठण । दु:ख दारिद्र जाये पळून । रामप्रभू कृपा करुन । सुख देईल सर्वांसी ॥११॥
ऐकता हे बोधवचन । शुध्द सात्विक होईल मन । सहज येईल भक्ति घडून । मार्ग सुखाचा मिळेल ॥१२॥
पूर्वी जरी घडेल दोष । तत्काळ होतॊल निर्दोष । करावे न लगे सायास । प्रभुकृपा होण्यासी ॥१३॥
आता चौथ्या अध्यायाची खूण । मुकीस बोलके करुन । भक्तांघरी गुप्त प्रगटून । भेट दिली तयासी ॥१४॥
आणिक महापुराचे कथन । ऐकविले श्रोत्याकारण । प्रवरामायीची पूजा करुन । वाचविले जनासी ॥१५॥
याचे करिता पठण । सहज प्रवरामायीचे दर्शन । महासंकटे जाती पळून । श्री किसनगिरीच्या कृपेने ॥१६॥
पुढे पांचव्या अध्यायात । भारत पाक युध्दाची हकीगत । नाव बुडता समुद्रात ॥ बाबा तेथ प्रगटले ॥१७॥
पावतीच्या रुपानं । शहाणेस भेट देउन । मोर्वेकरास दु:खातून । वाचविले सद्‍गुरुने ॥१८॥
जेऊर येथील बाईचे । प्राण वाचविले साचे । चुकलेल्या नियमाचे । चमत्कार सांगितले ॥१९॥
या अध्यायाचे करिता पठण । महाविघ्ने जाती निरसून । दु:ख हाती महादारुण । सोडवी सद्‍गुरु यातुनी ॥२०॥
प्राण्या पासुनि भिती । होणार नाही निश्चिती । ऐसी येईल प्रचिती । अध्याय पठण करिता ॥२१॥
आता अध्याय सहावा । याचा अनुभव घ्यावा । बाबांची कृपा झाली तेव्हा । डोळे बाजीरावास आले ॥२२॥
आंधळेपण गेले निघून । दृढ धरिले बाबांचे चरण । आजवरी गुरु आज्ञेने । वागतसे तो सात्विक ॥२३॥
आणिक ज्ञानदेवाचे प्राण । वाचविले किसनगिरीनं । संकट येती बहु कठीण । बाबा जामीन होताती ॥२४॥
पुढे माया ब्रह्माची खूण । सांगितली भगिनी कारण । विजयादशमी मुहूर्त पाहून । समान अधिकार देवविले ॥२५॥
स्त्री पुरुष दोघेजण । सर्वास सारिखाची मान । वर्तवावे बंधुभावाने । पुण्यक्षेत्री तयाने ॥२६॥
या अध्यायाचे करिता पठण । जाईल भ्रांती निरसून । येईल गुरुमाहिमा कळून । बंधुभगिनी जनांस ॥२७॥
अकस्मात संकट येती । ध्यान करावे एकचित्ता । दूर होईल तत्वता । शंका काही नसेची ॥२८॥
सातवे अध्यायी किसनगिर । करविला सोहळा अपार । गुरुदास भास्करगिर । तेथे उत्तराधिकारी नेमले ॥२९॥
गुरुदासाचे कार्य थोर । वसविले तेथ पंढरपूर । सोय भक्तांची केली अपार गडावरी । त्याने ॥३०॥
या अध्यायाचे करिता पठण । कळेल गुरुशिष्यांचे थोरपण । गुरुदासाच्या कृपेने । परमार्थमार्ग सापडेल ॥३१॥
करिता दहा कलमांचे पठण । तैसेची होईल आचरण । तरी एकभावे करुन । पठण करावे तयाचे ॥३२॥
श्री देवगडक्षेत्री जाउन । पहावी ती कलमे वाचून । तेणी चित्तशुध्दी होऊन । मन रमेल त्या ठाया ॥३३॥
विचार बहु प्रगटती । त्यामागे धावे मनाची गती । जे नर हे कलमे वाचती । मन स्थिर होईल ॥३४॥
आठव्या अध्यायाची खूण । पंचक्रोशीचे महिमान । आणि गंगामायीचे दर्शन । गंगागिर साधूस जाहले ॥३५॥
गुरुदासाच्या अधिकाराने । दत्तयाग जाहला संपन्न । काशी मथुरेचे ब्राह्मण । समाधानी मिरविले ॥३६॥
पंचमुखी सिध्देश्वर । प्रगट जाहले गडावर । तेथे तयाचे मंदिर । भक्तदर्शना उभारिले ॥३७॥
याचे करिता पठण । गंगामायीचे घडेल दर्शन । शिवराणा प्रसन्न होऊन । सुखी करिल तयासी ॥३८॥
हरीभजनी मन लागेल । संसाएरी सुख पावेल । धार्मिकपणे बुध्दी आचरेल । सार्थक होईल जन्माचे ॥३९॥
नववा अध्याय बहु थोर । गुरुपुत्र भास्करगिर । तीर्थे दाखविली सुंदर । भक्तजनांसी आपुल्या ॥४०॥
चारधामाचे महिमान । कैसे चमत्कार आले घडून । हा अध्याय करिता श्रवण । तीर्थमहिमा कळेल ॥४१॥
शबरीची रामभक्ति थोर । यात वदविली साचार । ऋषीशिष्यांचा अहंकार । शबरीकृपे निमाला ॥४२॥
नवविधा भक्तिची कथन । तियेस कथिले श्रीरामाने । याचे करिता पठण । नि:सीम भक्ति घडेल ॥४३॥
आणिक घडेल तीर्थदर्शन । कानी पडेल मधूर भाषण । प्रसन्न राहील सदा मन । कार्यसिध्दी होईल ॥४४॥
अंजनीसूत कृपा करील । सुंदर कांती मिरवील । शरीर निरोगी होईल । पठण याचे करिता ॥४५॥
दहावा अध्याय बहु गोड । पत्र बाबांचे अवघड । श्रवण करण्यासी सवड । इंद्रियांस द्यावी हो ॥४६॥
याचे करिता पठण । कळल आत्म्याची खूण । अज्ञानपण जाईल निरसून । ज्ञान प्रगट होईल ॥४७॥
अध्यात्मगुरुंशी शरण जावे । तरच ते पत्र वाचावे । नुसतेच काय बोलावे । अर्थ कळो येईना ॥४८॥
हा कळस अध्याय नेमाचा । सारांश द्श अध्यायाचा । श्री किसनदगिरींच्या नियमाचा । ध्यास मनी धरावा ॥४९॥
याचे करिता श्रवण । सुखी होतील श्रोतेजन । आणिक दुसरे साधन । भक्ति साधण्या नसे हो ॥५०॥
चिरंजीव असो श्रोतेजन । बाबांचा आशिर्वाद जाण । व्हावे सर्वांचे कल्याण । दु:खी कोणी असू नये ॥५१॥
इति श्री नासिकेतरचित । श्री किसनगिरी बाबांचे चरित्र ॥ गंगेसमान असे पवित्र । एकादशोऽध्याय गोड: ॥५२॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 30, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP