मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री किसनगिरी विजय| अध्याय पांचवा श्री किसनगिरी विजय चरित्र अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा ॥ श्री सद्गुरु बाबांची आरती ॥ श्रीसमर्थ सद्गुरु पादुकास्तोत्र श्री किसनगिरी विजय - अध्याय पांचवा देवगडचे श्री किसनगिरी महाराज यांचा जन्म सन १९०७ साली झाला आणि त्यांनी १९८३ साली समाधी घेतली. Tags : kisangirisantकिसनगिरीसंत श्री किसनगिरी विजय - अध्याय पांचवा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नम: ॥ श्रीगुरु दत्तात्रयाय नम: ॥ श्री नवनाथाय नम: ॥ श्री उमामहेश्वराय नम: ॥१॥ॐ नमोजी ज्ञानेश्वरा ॥ अध्यातम ज्ञानसागरा ॥ योगीजनांच्या ईश्वरा ॥ साष्टांग चरणी दंडवत ॥२॥एकोणीसशे बासष्ट सालात ॥ कथा घडली अदभूत ॥ किसनगिरीचे महात्म्य ॥ वर्णावे ते थोडेची ॥३॥तीच कथा आता सांगेन ॥ ऐकावे एक चित्त करुन ॥ संकट पडता भक्ताकारण ॥ बाबा तेथे प्रगटती ॥४॥युध्दाची ठिणगी पड्ली ॥ परकायांनी स्वारी केली ॥ भारतीय फौज तयार झाली ॥ मातृभूमीच्या रक्षणा ॥५॥उल्हास मोर्वेकर ॥ आणि शहाणे शामसुंदर ॥ फौजेच्या अधिकारावर ॥ नेमणूक होती तयांची ॥६॥अंदमान निकोबार ॥ तंबु असे त्या बेटावर ॥ तेथून सर्व व्यवहार ॥ चाले भारतीय फौजेचा ॥७॥काळ कैशारुपे येई ॥ ते कोणांही कळत नाही ॥ अखेरचा क्षण तोही ॥ काळाहातीचि असे हो ॥८॥काय घडला चमत्कार ॥ आजारी पडला मोर्वेकर ॥ जडला त्यासी ह्रदयविकार ॥ उपाय काही चालेना ॥९॥येथे कोण मायबहीण ॥ मित्र असे ते दोघेजन ॥ कैसा प्रसंग आला दारुण ॥ म्हणे कोण सोडवी आता ॥१०॥श्रीरामपूर निवासी ॥ शामसुंदर शहाणे तये वेळेसी ॥ दत्ताची भक्ती तयासी परंपरागत असे ॥११॥दत्तप्रभूंच्या सेवेने ॥ किसनगिरींच्या आशिर्वादाने ॥ तयासी नोकरी म्हणे ॥ मिळाली होती ते वेळी ॥१२॥आता प्रसंग महादारुण ॥ वैद्याचा न येता गुण ॥ म्हणे आता घडी भरुन ॥ आली आपुल्या देहाची ॥१३॥वैद्याने सल्ला दिला ॥ चार दिवसात मोर्वेकराला ॥ पोहोचवावे घराला ॥ भारतामध्ये हलवावे ॥१४॥अवघ्या चार दिवसांमधी ॥ नेणे शक्य न भारतामधी ॥ ऐसे संकट तया कधी ॥ आले नव्हते अचानक ॥१५॥शामसुंदर होय कष्टी ॥ बाबांकडे लावी ध्यान दृष्टी ॥ म्हणे गुरुराया संकटी ॥ धाव घेई बा वेगेसी ॥१६॥तूं दयाळू किसनगिर ॥ तुजविण कोण येथे आधार ॥ सकळ विश्वाचा कारभार ॥ योगियांच्या हाती असे ॥१७॥तूं मुक्यांशी बोलती केले ॥ भक्तां संकटी रक्षिले ॥ काशीसम क्षेत्र वसविले ॥ दत्त देवगड म्हणउनि ॥१८॥आता धाव वेगेसी ॥ आम्ही खिळलो संकटासी ॥ तुजवीण राहे उदासी ॥ जीव माझा दयाळा ॥१९॥ऐसी करोनी विनवणी ॥ मन लाविले सद्गुरु ध्यानी ॥ किसनगिरी तुजवीण कोणी ॥ तारण नाही या ठाया ॥२०॥मग सहज पेटी उघडिता ॥ पावती लागली हाता ॥ ध्यान मनी आठव करता ॥ मार्ग मिळाला तयासी ॥२१॥महिन्याच्या पगारातूनि ॥ पन्नास रुपये पाठवूनी ॥ पावती ठेवितसे जपुनी ॥ अंगठयाच्या ठशाची ॥२२॥म्हणे आता हीच पावती ॥ वाचवी आपुल्या मित्राप्रती ॥ गुरुश्रध्देची महती ॥ जाणवली तयासी ॥२३॥मग ती पावती घेऊन ॥ दिली मित्राच्या उशासी ठेवून ॥ अंगठयाच्या ठशारून ॥ जैसे बाबा भासती ॥२४॥बैसला भाव बरोबर ॥ चार दिवसात मोर्वेकर झाले ॥ दु:खातून दूर ॥ ह्रदयविकार पळाला ॥२५॥धन्य धन्य किसनगिरी ॥ मात केली संकटावरी ॥ तेथील सर्व अधिकारी ॥ करिती आश्चर्य तेधवा ॥२६॥पुढे हीच पावती ॥ नेहमी ठेवी खिशामधी ॥ जाणवेना दु:ख व्याधी ॥ कदाकाळी तयासी ॥२७॥शहाणेंची नेमणूक जहाजावर ॥ जहाज आफ्रिका किनार्यावर ॥ हाकतांना समुद्रावर ॥ अफाट लाट उसळली ॥२८॥त्यात लष्करी अधिकारी ॥ सर्व झाली घाबरी ॥ आता म्हणी काळदोरी ॥ तुटली आपुली सर्वांची ॥२९॥आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष ॥ जहाजात होते प्रत्यक्ष ॥ तयाचे सारे लक्ष ॥ चालकावरी लागले ॥३०॥शहाणे बोले मनात ॥ श्री किसनगिरी यावे धावत ॥ तुझी लेकरे संकटात ॥ पडली असे देवराया ॥३१॥प्रचंड लाटेवरुनी ॥ क्षणात बोर वर येउनी ॥ सुटकेचा निश्वास सोडुनी ॥ आनंदले सर्वही ॥३२॥शहाणे बोले तये वेळा ॥ बाबा दिसले समुद्रजळी ॥ धन्य महा प्रताप बळी ॥ वाचविले आम्हासी ॥३३॥एकाच ठाय़ी बैसोनी ॥ भाव तेथे प्रगटोनी ॥ वायुरुप हा मुनी ॥ भासतसे आम्हासी ॥३४॥सजीव आणि निर्जीव ॥ तसे काही भेदभाव ॥ ऐसा भक्तांसी अनुभव ॥ नानारुपे होत असे ॥३५॥बाबांचे भक्त एक ॥ बाबुराव पाटील सात्विक ॥ तयासी अनुभव अनेक ॥ आले असती बाबांचे ॥३६॥म्हणे मी आसता निद्राधीन ॥ अचानक बाबा येऊन ॥ खडावांचा आवाज ऐकून ॥ खळखळ चावी बाजतसे ॥३७॥ऐसा आवाज ऐकोनि ॥ बाहेर पाहे डोकावूनी ॥ परि नच दिसे कोणी ॥ ऐसा भा़स होत असे ॥३८॥ऐसे बाबा दयाळू ॥ भक्तजनांचे कृपाळू ॥ गवळ्यांचा गोपाळू ॥ आधार संतजनांचा ॥३९॥एकदा दत्तजन्माचा सोहळा ॥ जमला भक्तजनांचा मेळा ॥ किसनगिरी तये वेळा ॥ भक्तजनांत भोभतसे ॥४०॥तयेवेळी पांच गृहस्थ ॥ उत्सवास आले नेमस्त ॥ ते जनांसी पुसत ॥ बाबा येथे कैसे आले ॥४१॥तव लोक बोलती ॥ बाबा येथेच राहती ॥ सकाळपासोन बाबाभोवती ॥ आम्ही आहोत या ठाया ॥४२॥तव ते गृहस्थ बोलले ॥ आम्ही दत्तशिंगव्यात देखिले॥ आमुचे तेथे दर्शन झाले ॥ हे तर सत्य असे हो ॥४३॥ऐसा चमत्कार आला घडून ॥ भक्तजन घेती जाणून ॥ वायुरुपी बाबा किसन ॥ इच्छारुपी प्रगटतसे ॥४४॥मृतात्म्यांसी जिवंत केले ॥ शस्त्रक्रियेसी टाळिले ॥ बाबांचे बहू झाले ॥ उपकार जगावरी ॥४५॥असेच बायजाबाईचे जेऊर ॥ येथील एका बाईवर ॥ नेम चुकता साचार ॥ पछाडिले काळाने ॥४६॥दर गुरुवार नेमाने ॥ देवगडी येऊन ॥ नित्यनेमे खेटी करुन ॥ जात असे माघारी ॥४७॥एक गुरुवार ऐसा आला ॥ बाईचा नेमधर्म चुकला ॥ दिवसाचे खाऊन दर्शनाला ॥ आली होती गडावरी ॥४८॥चुकलिया वर्म पडला फेर ॥ वात चढला अंगावर ॥ हस्तपाद उपटोनि बेजार ॥ झाली असे ती गृहिणी ॥४९॥इडा पिंगलेचा वायू खुंटला ॥ फेस आला तोंडाला ॥ परलोकीचा रस्ता धरला ॥ क्षणात त्या बाईने ॥५०॥नवरा आणि मुले दोन ॥ तान्हे एक लहान ॥ रडे हंबरडा फोडून ॥ समीप तिच्या बैसोनी ॥५१॥तव बाबांसी वार्ता कळली ॥ तेथे बहू मंडळी जमली ॥ मग बाबांनी उदी फेकली ॥ लिंबपाला उतरिला ॥५२॥माई म्हणुनी हाक मारिली ॥ भगिनी तत्काळ उठोन बैसली ॥ काळापासून सोडविली ॥ सामर्थ्य बहु बाबांचे ॥५३॥नवरा मुले आनंदी झाली ॥ श्री किसनगिरी चरणी लागली ॥ वृक्षासम देतसे साउली ॥ दिन दयालू सद्गुरु ॥५४॥येथे श्रोते कल्पना घेती ॥ दोष दिधला भोजनाप्रती ॥ अचानक बाईची स्थिती ॥ पालटली कैसी येथे ॥५५॥तरी आपुल्या गुणाकरणे ॥ पथ्य हे महाऔषधा जाण ॥ मध्येचि पथ्य दिले सोडून ॥ ऐसी स्थिती होईल ॥५६॥सव्वा महिन्याच्या नियमाने ॥ संकल्प केला मनाने ॥ तोवरी वागणे नियमाने ॥ हे कर्तवय असे आपुले ॥५७॥थंडी ताप आला अंगाला ॥ परि तेलकट पदार्थ खाऊ लागला ॥ आणखी आजार वाढविला ॥ म्हणे काय झाले कळेना ॥५८॥पोट लागले दुखायला ॥ कच्चे रोठ दिले खायला ॥ अधिक लागला ओरडायला ॥ कच्चे रोठ खावूनी ॥५९॥खाज सुटली अंगाला ॥ वांगी मागितली खायला ॥ मग आणकी खाजवू लागला ॥ सर्वागासी जोराने ॥६०॥जखम झाली पायाला ॥ परि पाण्यात पाय घातला ॥ मग आणखी ठणका लागला ॥ जखमेत पाणी गेल्याने ॥६१॥जयाचे पथ्य तयासी ॥ लाविले एक उद्देशी ॥ पाळणे ते ते आपणापासी ॥ हे तो खरे आहे ना ! ॥६२॥देवाच्या खेटी करता ॥ देवा जे वर्ज्य ते सेविता ॥ आणिक दु:खे वाढविता ॥ आपुलियाचि कर्माने ॥६३॥परि देव दयाळू म्हणून ॥ किती अपराध घेई सोसून ॥ हे तंव घेतले पाहिजे जाणून ॥ विवेक बुध्दीने आपुलिया ॥६४॥कर्मयोगाच्या सहाय्याने ॥ ईश्वरी प्रसाद मिळतो म्हणे ॥ परी आपुलियाचि अहंकारे ॥ नाश त्याचा करवितो ॥६५॥सर्व भूतांच्या ह्रदयांत ॥ ईश्वर जे पाहतात ॥ त्यांसी जावे शरण त्वरीत ॥ सार्थक होईल देहाचे ॥६६॥आता पुढील अध्यायी ॥ आणिक ऐका नवलाई ॥ आपुल्या सत्ते करील काही ॥ हे गुप्त गुज कोण ओळखी ॥६७॥इती श्री नासिकेतरचित ॥ श्री किसनगिरी बाबांचे चरित्र ॥ गंगेसम असे पवित्र ॥ पंचमोऽध्याय गोड: ॥६८॥॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 25, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP