श्री किसनगिरी विजय - अध्याय दुसरा

देवगडचे श्री किसनगिरी महाराज यांचा जन्म सन १९०७ साली झाला आणि त्यांनी १९८३ साली समाधी घेतली.


श्रीगणेशायनम: ॥ सद‍गुरु शंकराय नम: ॥ जयजयाजी सद्‍गुरुराया ॥ अपार दाखविसी माया ॥ आपुल्या दासावरी ॥१॥
सात समुद्राची करुनी शाई ॥ कलम करु बनराई ॥ धरणी एवढा कागद तोही ॥ अपुराच पडेल की ॥२॥
ऐसे तुझे गुणवर्णन ॥ गात असे बहुजन ॥ तयासी प्रभु प्रसन्न ॥ मनोकामना पुरवितसे ॥३॥
ऐसी श्रीगुरुमाऊली ॥ वृक्षासम देई साउली ॥ भक्तांसाठी शक्ती आपुली ॥ वेचित असे कृपाळू ॥४॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ तोच गुरु परमेश्वर ॥ तयाच्याचि कृपेवर ॥ ओळखिला जगजेठी ॥५॥
तरी मागिलेअध्यायी कथन ॥ बाळ किसनचा होऊनी जन्म ॥ बाळलीईला अगाध दावून ॥ तप केले अचाट ॥६॥
शिवपिंडीची सेवा करुन ॥ चार धाम आले पाहून ॥ सुखी करण्या भक्तजन ॥ दत्तमंदीर बांधियले ॥७॥
आता पहा श्रोतेजन ॥ बाबा देखती भक्तसदन ॥ भाविक भक्तांघरी जाऊन ॥ बोध तयासी सांगती ॥८॥
तरी ते भक्त असती कोण ॥ सांगितले पाहिजे नामाभिधान ॥ कोण गांव कोण ठिकाण ॥ गमन करीतसे योगी हा ॥९॥
गोधे गांवीचे मोहन पाटील ॥ आणिक भागोजी सुतार ॥ गंगाधर शेळ्दके याचे घर ॥ लक्षून बाबा जातसे ॥१०॥
भालगांवचे नानाभाऊ भक्त ॥ आणिक मुक्ताबाई भागवत ॥ बाबुराव तनपुरेच्या घरात ॥ वास्तव्य असे बाबांचे ॥११॥
भाऊराव दिघे उस्थळचे ॥ कान्हु पवार त्याच गांविचें ॥ सदाशिव सखाहरी धामोरीचे ॥ आणिक भिमाबाईए पठाडे ॥१२॥
या मंडळीच्या घरी जाऊन ॥ बाबा करितसे बोध वचन ॥ श्रोते होऊनी सावधान ॥ कथारस परिसावा ॥१३॥
जैसी ज्याची वर्तने ॥ बाबा बोलती क्रोध्दाने ॥ म्हने दादा ऐसे केल्याने ॥ कैसे सुख भोगशील ॥१४॥
भ्रतार कामिनी दोघेजन ॥ जोशा रामसीतेसमान ॥ परि दादा आपुले आपण ॥ घर बूडवितो अविचारे ॥१५॥
रामा निघून गेल्यावरी ॥ मग पडे अग्नी सुखावरी ॥ याचे त्यांचे जाउनी घरी ॥ जेवत कैसा बसतोस ॥१६॥
बांध ना ठेवा शेतास ॥ घास ना घाली धानास ॥ सोयरे आलिया घरास ॥ भोजन घालिती आग्रहे ॥१७॥
भोजन जरी म्हणाल कैसे ॥ जैसे आवडेल तैसे ॥ आग्रहाने वाढीतसे ॥ घ्याहो घ्याहो म्हणोनि ॥१८॥
तरी तो सोयराही म्हणाल कोण ॥ जर असेल स्ववैभवाप्रमाणे ॥ इतरांची काय कारणे ॥ पुढे पुढे करण्याचे ॥१९॥
गांवीचे जन पुढे बैसोनी ॥ बाबांचे शब्द घेती ऐकोनी ॥ सांगती बाबा तळमळूनी ॥ दु:खाचे मूळ जनांसी ॥२०॥
तसेच बहिरवाडी गांवात ॥ बाबांचे भक्त बहुत ॥ रघुनाथ बाबांचे घरात ॥ राहे वास्तव्य तयांचे ॥२१॥
भागवत पाटील एक सेवक ॥ पुंजा कोलते मोहन थोटे ॥ सोना-वेणुबाई भगिनी अनेक ॥ असती त्या गांवात ॥२२॥
तयांच्या घरी जाऊन ॥ मानेल तोवरी तेथे राहून ॥ स्वहस्ते स्वयंपाक करुन ॥ अलोट गोडी आणीतसे ॥२३॥
दादा देई पाणी आणून ॥ माई शिदा कोरडा देई भरुन ॥ भांडीकुंडी स्वच्छ करुन ॥ बाबासमोर ठेवीतसे ॥२४॥
मग स्वयंपाक सुरु करुन ॥ बोले माई दादास लक्षून ॥ दादांनी आम्हांस लिहीने ॥ नाही शिकविले काहीच ॥२५॥
खालून असे पाटा ॥ वरुन असे वरवंटा ॥ चाले वाटण्याचा सपाटा ॥ विचार शुध्द नसेची ॥२६॥
वरवंटाच नसल्यावरी ॥ तुमचा पाटा काय करी ॥ जाशील जरी शेजारघरी ॥ तेथेही असे एकची ॥२७॥
अहो दादा मनुष्यप्राणी ॥ भोगितो कर्माची दु:खणी ॥ परि येत नाही कळूनी ॥ जन्म आपुला कासया ॥२८॥
बारीकपणे कातणे ॥ संसारास पडते म्हणे उणे ॥ परि ऐसा लोभ धरल्याने ॥ सार्थक कैसे होणार ॥२९॥
देवास कोंबदॆ बकरे कापिती ॥ आपुले बाळ कां न बळी देती ॥ गायीस कसाबा हाती देती ॥ ऐसी रीत जगाची ॥३०॥
ज्या घरी जाय योगीश्वर ॥ हे विश्वची माझे घर ॥ ऐसे मानुनी मुनीश्वर ॥ बोध तयांसी सांगतसे ॥३१॥
नसे भोजनाची वासना ॥ चित्त शुध्दी शुभ कल्पना ॥ तेणे अवघ्या भक्तजना ॥ बहू सुख वाटतसे ॥३२॥
जया घरी रमले ॥ तेथे तीन मुक्काम केले ॥ परि निराहारची राहिले ॥ भक्ता बोध सांगतसे ॥३३॥
चवथे दिनी निघोन जाई ॥ पुन्हा परतोनी येई ॥ जैसी वत्सालागी गाई ॥ दुरावल्यासम होतसे ॥३४॥
मग पिंप्री गांव लक्षून ॥ भामाबाईच्या सदनी जाऊन ॥ आणिक हौसाबाई चव्हाण ॥ भगिनी असती त्या गांवी ॥३५॥
तया सदनी जाऊनी ॥ सिदा माझेकडून घेउनी ॥ निवांतपणे स्वयंपाक करुनी ॥ प्रसादरुपे देत असे ॥३६॥
त्या स्वयंपाकाची गोडी ॥ प्रथमाध्यायी वर्णिली थोडी ॥ जिव्हेवरी राहिली गोडी ॥ म्हणोनि पुन्हा आठवली ॥३७॥
बाबांसी माधुकरी देवऊन ॥ आनंद बोळविती जन ॥ पुन्हा यावेहो परतून ॥ ऐसे बाबांस विनविती ॥३८॥
बाबांचे आशिर्वाद ॥ बालबच्चे रहे आबाद ॥ बाबा सुखे राहा बोलत ॥ प्रेमभरे जनांसी ॥३९॥
पुढे मडाकीचे सजन वर्कड ॥ मुरमेचे बाबु भास्कर ॥ हरी सावळे लक्ष्मण पाटील ॥ याचे घरी जात असे ॥४०॥
प्रत्येक आत्म्यात शोधोनी ॥ ब्रम्हवाक्याची वाणी ॥ दादा माझे म्हणोनि ॥ सकळांस बोलातसे ॥४१॥
भक्त बोलती बाबांसी ॥ जातो आम्ही घरासी ॥ बाबा सांगती तयांसी ॥ येथो ऐसे म्हणावे ॥४२॥
जातो ऐसे म्हणता ॥ मग पुन्हा कैसे येता ॥ कोणत्याही कार्याकरिता जाता ॥ येतो ऐसे म्हणावे ॥४३॥
दादा ! आकाशाचे लिंग ॥ पृथ्वीची असे पिंड ॥ अवघे हे ब्रह्मांड ॥ एका आत्म्यावरी असे ॥४४॥
आकाशातून पडे पाणी ॥ रक्षण करी माताधरणी ॥ मग तयापासोनि ॥ अन्न तयार होत असे ॥४५॥
त्याची अन्नावर ॥ सकल जीव पोसती साचार ॥ म्हणोनी बीजाचे माहेर ॥ आकाशी लिंग असे ॥४६॥
पृथ्वी माता अन्न देई ॥ ते सकळ जीव खाई ॥ तयाचेची रुधिर होई ॥ तयापासोनी मूळबीज ॥४७॥
म्हणुनी आकाशाचे लिंग ॥ पृथ्वीची असे पिंड ॥ हेचि उघडे ब्रह्मांड ॥ आणिक काही नसेची ॥४८॥
तोबा तोबा महादेव बाबा ॥ अन्यायासी पदरी घेईबा ॥ ऐसे बोलती बाबा ॥ सकल जनाकारणें ॥४९॥
महादेव पिता ॥ पार्वती असे माता ॥ तयासीच बहु ममता ॥ बालकाची आपुल्या ॥५०॥
नातरी मनुष्यप्राणी ॥ करी अपराधाची जोडणी ॥ संकट समयी मग कोणी ॥ सोडवेना तयांसी ॥५१॥
माता-पिता दयाळू ॥ तयासीच येइ कनवाळू ॥ आश्रय देता कृपाळु ॥ बाळ खेळे आनंदे ॥५२॥
मुल कितीही रडले ॥ पितयाने क्रोधे मारिले ॥ आईने तयासी धरिले ॥ ह्रदयासी आपुल्या ॥५३॥
म्हणून तोबातोबा म्हणणे ॥ महादेवा शरण जावे ॥ लीनातेणे सदा रहाणे ॥ दृढभाव धरोनिया ॥५४॥
भाव आणि भावना ॥ दोहोंच्या दोन खुणा ॥ क्षणिक राहे भावना ॥ भाव अखंड राहतो ॥५५॥
ज्यावेळी दु:ख लागले ॥ मग देवाकडे धावले ॥ सुखापुरते नवस केले ॥ भावना म्हणती तियेसी ॥५६॥
परी भाव तो नित्य राहे ॥ तयासीच प्रभु पाहे ॥ सुखदु:ख समान आहे ॥ ऐसे मानिले भावाने ॥५७॥
भाव ठेवूनी काम करणे ॥ सदा गुरूंसी नाते जोडणे ॥ मग संसारी काय उणे ॥ पडणार आहे तयासी ॥५८॥
ऐसें बाबांचे बोलणी ॥ कोणासी काय समजणे ॥ परी तयांच्याचि कृपेने ॥ आणिक बहु सांगेन ॥५९॥
नेवासे नगरीचा मार्ग धरून ॥ जपे बाईच्या सदनी जाऊन ॥ तेथे बाबा आले म्हणून ॥ भक्त दर्शनास धांवती ॥६०॥
ऐसी जमली भक्तमंडळी ॥ बाबा बैसलए तयांच्या मेळी ॥ बोलु लागले भाषा आगळी ॥ चकित होती भक्तगण ॥६१॥
कहां मकान कहां झोपडी ॥ कहां कुबडी फावडी ॥ शैसी शिंगीची आवडी ॥ कंथा झोळी मनी असे ॥६२॥
मनमे काशी मनमे गंगा ॥ काय भुलले वरलिया सोंगा ॥ रेडयामुखी वेद सांगा ॥ कैसे बोलविला असेल ॥६३॥
दादा गहू असे एक ॥ प्रकार तयाचे अनेक ॥ ऐशा रीती कोण सात्विक ॥ ओळखील तयांसी ॥६४॥
प्राणमित्रांच्या ह्रदयी ॥ आत्मा एकची असे पाही ॥ तयासी कधी नाही ॥ जन्ममरणाचा फेरा ॥६५॥
मन भटके वायुसमान ॥ तया आवरणे कठीण ॥ कुबुध्दी महा डाकीन ॥ स्पर्श तिचा करु नये ॥६६॥
तुहा विठठल बरवा ॥ तुहा माधव बरवा ॥ मनी ध्यास हा धरावा ॥ तेणे होय मनशुध्दी ॥६७॥
मनुष्य जन्माचे सार्थक ॥ दवडू नये निरर्थक ॥ प्रपंच सागरी बहू अनेक ॥ जीव बुडाले अज्ञाने ॥६८॥
बहुत धन जमवूनी ॥ ठेवली साठवण करुनी ॥ परी परमार्थ लागुनी ॥ हात पुढे करावा ॥६९॥
न केल्यास परिणाम काय ॥ घरातची झगडे होय ॥ संपत्ती आसुनी काय ॥ सुख म्हणावे तियेसी ॥७०॥
भक्त मंडळीतून उठून ॥ एक स्त्री सांगे गार्‍याणे ॥ म्हणे संसारात राहून ॥ परमार्थ कैसा करावा ॥७१॥
संसारात बहु दु:खचि होते ॥ क्षणिक सुख जाणवते ॥ नाना शोधून उपायाते ॥ परी फळ काही नसेची ॥७२॥
तियेकडे पाहूनी बाबा ॥ मुखे म्हणती तोबा तोबा ॥ आता म्हणे महादेव बाबा ॥ आठवला कां माई ॥७३॥
बोलु लागले क्रोधानी ॥ धड आहे कां तुमची करणी ॥ सात दिवस विटाळ धरुनी ॥ राहीले कां बाजूला ॥७४॥
दिवसा पितरांच खाउनी ॥ वाटेल तेंव्हा जेवण करुनी ॥ आणिक पिठल्यावानी करुनी ॥ क्लेश देता रामास ॥७५॥
म्हणून तुमचा भ्ररता ॥ क्रोधावतो तुम्हावर ॥ राम समजुनी साचार ॥ सेवा तयाची करावी ॥७६॥
भाव ठेवा देवावर ॥ भक्तीसाठी नेम धर ॥ चित्त सदा निरंतर ॥ हरी भजनी लावावे ॥७७॥
माई धर्माचे रक्षण ॥ करावे आपुले आपण ॥ तेणे देवाचे मन ॥ प्रसन्न राहे सर्वदा ॥७८॥
अरे माई सुख बहु असते ॥ परि भोगता येत नसते ॥ तेणीचि सर्व नासत ॥ जगी अपकीर्ती होय ॥७९॥
रामाची सेवा करावी ॥ लोभाची आस नसावी ॥ मुले बाळे सुखी राहावी ॥ म्हणोनि धर्म पाळावा ॥८०॥
जरी रस्त्याने चालता ॥ बोटासी ठेच लागता ॥ काही दोष दगडाला ॥ ठेवू नये कधीच ॥८१॥
रस्त्याने नीट चालावे ॥ वक्रदृष्टीने न पाहावे ॥ सन्मार्गासी लावावे ॥ दशेंद्रिय आपुले ॥८२॥
कंठापासूण वरती ॥ पंच ज्ञानेंद्रिय असती ॥ तेथोनि पुढे खालती ॥ कर्मेद्रिय पांच ती ॥८३॥
शरीर रोगे पीडीला ॥ मग वैद्याकडे धावला ॥ मागितले ते दाम तयाला ॥ देउनि येतो माघारी ॥८४॥
परि वैद्यांचा वैद्य ॥ एकचि तो ईश्वर ॥ जयाचा भाअ बरोबर ॥ तयांसी सुख देत असे ॥८५॥
ऐसे बाबांचे बोधवचन ॥ भक्तजण करिती श्रवण ॥ तात्कालरात्री येती निघून ॥ देवगडावरी तेथोनि ॥८६॥
तरी सज्जन श्रोतेजन ॥ बाबांनी सांगितले परमार्थ निरुपण ॥ याची खूणगाठ बांधून ॥ ठेवा आपुलिया हदयी ॥८७॥
गुरुवार नेम धरुन ॥ भक्त येती दर्शना लागून ॥ श्री बाबांसमोर बैसोन ॥ बोधवचने ऐकती ॥८८॥
तुम्ही श्रोते भाविकजन ॥ आणिक पुढे घ्यावे जाणून ॥ मज पामराकारण ॥ सेवा आपुली घडावी ॥८९॥
इती श्री नासिकेतरचित ॥ श्री किसनगिरी बाबांचे चरित्र ॥ गंगेसमान असे पवित्र ॥  द्वितियोऽध्याय: गोड: ॥९०॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP