श्री किसनगिरी विजय - अध्याय पहिला

देवगडचे श्री किसनगिरी महाराज यांचा जन्म सन १९०७ साली झाला आणि त्यांनी १९८३ साली समाधी घेतली.


श्रीगणेशाय नम: ॥ जयजयाजी गजानना ॥ सकळ विद्येच्या भूषणा ॥ लंबोदरा गणराया ॥१॥
मुषकावरी होऊन स्वार ॥ सारजामाता बरोबर ॥ संत चरित्र चमत्कार ॥ आपुल्या कृपे सांगेन ॥२॥
आता नमितो सरस्वती ॥ कविजनांची वरदाती ॥ करुनिया चित्तशुध्दी ॥ ग्रंथालागी वदवावे ॥३॥
जगी जे झाले संत ॥ तयांचे तूंच केले कौतुक ॥ निर्माण झाले नाना ग्रंथ ॥ तुझ्याचे कृपे जननिये ॥४॥
शिर्डीचे साईनाथ ॥ गोमाजी साधु महाभक्त ॥ नागझरी महात्म्य ॥ वाढविले तयानें ॥५॥
शेगांवाचे गजानन ॥ नृसिंह सरस्वती दत्त जाण ॥ त्याच अवतारालागून ॥ किसनगिरी प्रगटले ॥६॥
सातवे अवतारी रघुनंदन शबरीच्या आश्रमी जाऊन ॥ अलोट तियेची भक्ति पाहून ॥ बोरे उच्छिष्ट भक्षिले ॥७॥
तियेचेचि कुळी जाण ॥ किसन नामे अवतार घेऊन ॥ जग उद्धराया कारण ॥ रामभक्ति सांगतसे ॥८॥
गोधेगांव पवित्र ग्राम ॥ तेथे प्रगटला तपोधन ॥ राहिबाईच्या उदरातून ॥ अवतार घेतला योग्याने ॥९॥
जैसे बंदीशाळेमाजी ॥ देवकी मातेच्या उदरी ॥ बाळकृष्ण अवतार धरी ॥ लीला अगाध दाविली ॥१०॥
कृष्णवर्णी बाळ लहान ॥ वाढू लागले आईच्या मायेने ॥ किसन नाम आवडीने ॥ ठेविले मातापित्याने ॥११॥
काय वर्णू तयाचे गुण ॥ शीतल वृत्ति स्थिर मन ॥ पाहाता किशोराचे नयन ॥ तेज अपार झळके ॥१२॥
माय-बहिणी शेजारिणी ॥ बाळाचे कौतुक पाहुनी ॥ विस्मय करिती आपुले मनी ॥ म्हणे अवतारीक हा असावा ॥१३॥
पंचवर्षे वयापासून ॥ चारी गावीचे गोधन ॥ भूरदया अपरि जाण ॥ तान्हेल्या जीवन देतसे ॥१४॥
परि एक नेम विलक्षण ॥ जन्मदात्या आईवाचून ॥ नच सेवा अन्नकण ॥ इतरांच्या हातीचे ॥१५॥
तयाचे बंधू दोन ॥ प्रवरेत धरीत होतें मीन ॥ किसन तेथें जाऊन ॥ पुन्हा प्रवाही सोडितसे ॥१६॥
ऐसे करण्यास्तव जाण ॥ पूर्वी मच्छोदरी कविनारायण ॥ कलियुगी अवतार धरुन ॥ नाथपंथ वाढविला ॥१७॥
वयाच्या आठव्या वर्षात ॥ मन रमले शिवभक्तीस ॥ चमत्कार अति अदभूत ॥ करु लागे तो कुमार ॥१८॥
शेतामध्ये कष्ट करुन ॥ संध्यासमयी येतसे शिणून ॥ प्रवरेच्या प्रवाही जाऊन ॥ रात्रभरी बसतसे ॥१९॥
बसतसे म्हणाल कैसा ॥ महातेजस्वी योगी जैसा ॥ जळी आसन घालुनी कैसा बहुकाळ बसतसे ॥२०॥
वाळूची करुनी पिंड ॥ आत्म्यांत शोधी ब्रह्मांड ॥ ओंजळीने पाणी अखंड ॥ पिंडीवरी घालीतसे ॥२१॥
त्या पिंडीशेजारी जाण ॥ वाळली काडी देतसे खोवून ॥ तीच अगरबत्ती म्हणून ॥ सेवा चाले निरंतर ॥२२॥
त्या काडीचा निघे धूर ॥ सुवास पसरे दूरवर ॥ चंदनासमान अति मधूर ॥ वाटतसे जनासी ॥२३॥
कुणी म्हणती वेड लागले ॥ कुणी म्हणती विशेषचि घडले ॥ कुणी मांत्रिक म्हणू लागले ॥ अज्ञान जन गांवीचे ॥२४॥
द्वादशवर्षे नित्य नेमाने ॥ शिवपिंडीची सेवा करुन ॥ चित्तचैतन्य प्रगट करुन ॥ आत्मरंगी रंगले ॥२५॥
पुढे कथा वर्तली कैसी ॥ औदुंबर वृक्ष एक उदासी ॥ पालवी नव्हती तयासी ॥ जुनाट वृक्ष उभा असे ॥२६॥
मग नित्य गंगेवरी जाऊनी ॥ भोपळ्यामध्ये गंगाजळ आणुनी ॥ त्या वृक्षासी घालुनी ॥ सजीव केले तयासी ॥२७॥
पुढे त्याच वृक्षापासी ॥ रात्रदीन राहे बाल-संन्यासी ॥ वृक्षावरि बैसुनी तपस्वी कष्टवितसे देहासी ॥२८॥
गावीचे जन विलक्षण ॥ बोलती तयांसी लक्षून ॥ म्हणती निंबपाला भक्षून ॥ एकमास राहसी कां ॥२९॥
तैसेचि योग्याने केले ॥ एक मास निराहार राहिले ॥ पार अघटित घडले ॥ तेज लागले झळकू ॥३०॥
अपार तेजस्वी दिसे मुनी ॥ पाहाताचि जन गेले मोहुनी ॥ म्हणती निंबपाला भक्षूनी ॥ मारुती जैसा जती दिसे ॥३१॥
तेव्हा पासून जन वदती ॥ अवतारिक हा कोणी ॥ मग तयालागुनी ॥ ज्ञानदृष्टीने देखती ॥३२॥
गावच्या पाटलाघरी ॥ बाळ किसन काम करी ॥ करुनी तयाची चाकरी ॥ सांगितले तें नेटके करी ॥३३॥
तिये समय़ीची हकिगत ॥ घडली असे अद‍भूत ॥ साक्षात पंचमहाभूत काम करी तयाचे ॥३४॥
पाटील बोले किसनाम ॥ जावे तू झोडेगांवास ॥ तेथे आमुच्या सोय‍र्‍यास ॥ चिठठि एवढे पोहोचवावी ॥३५॥
मग ती चिठठी घेऊन ॥ निघाले येतो म्हणून ॥ पुन्हा अर्ध्या घटकाने ॥ पाटलासी भेटले ॥३६॥
पाटील बोले असे किसन ॥ तूं येथेची कां अजुन ॥ तंव कुमाराने हातातून ॥ चिठ्ठी काढूनी दिली असे ॥३७॥
चिठठी हातात घेउनी ॥ पाटील पाहतसे वाचुनी ॥ हा तो सोयिर्‍याकडूनी ॥ मजकूर लिहूनी आला असे ॥३८॥
मग किसनाकडे पाहून ॥ दिसे योगियाची खूण ॥ मग तेव्हापासूनी ॥ शरण शरण म्हणताती ॥३९॥
अवघ्या तीस मिनिटांत ॥ जाउनी पन्नास मैलापर्यंत ऐसी शक्ती अदभूत ॥ कोणाजवळी असे हो ॥४०॥
एका हनुमंतावाचुनी ॥ पवनास आकळेना कोणी ॥ आणिक सिध्द मच्छिंद्रमुनी ॥ दत्तकृपे जाणतसे ॥४१॥
पुढे एकदिनी गांवकरी ॥ किसनास बोले पैजेवरी ॥ अंकाईच्या डोंगरावरी ॥ म्हणे जायचे आपणांस ॥४२॥
गोदामाईत जावूनी ॥ कावडी घ्यायच्या भरूनी ॥ पाय़ी गंगापुरास जावूनी ॥ पुढे गाडी धरावी ॥४३॥
मग सर्वामिळून ॥ गोदामाईचे पाणी भरुन ॥ गंगापुराप्रत पायी जावूनी ॥ पुढे निघाले गाडीने ॥४४॥
ठिकाणाप्रत जावूनी ॥ मंडळी तेथे उतरूनी ॥ बाबा नारायण म्हणोनि ॥ पुढे उभे ठाकले ॥४५॥
पाहताच दचकले जन ॥ कैसे आले बाबा किसन ॥ साक्षात्कार हा  अवध्यान ॥ ओळखुनी घेतला ॥४६॥
अवघ्या जनांच्या मेळी ॥ किसन शोभे गोपाळी ॥ द्वारकेचा वनमाळी ॥ म्हणाल तैसा शोभतो ॥४७॥
ऐसे बहू चमत्कार ॥ घडू लावले वारंवार ॥ मग कोणी कामावर ॥ ठेवीत नसे तयासी ॥४८॥
पुढे एके दिवशी ॥ किसन बोले पितयासी ॥ मज जाणे आहे काशी ॥ आज्ञ आपुली असावी ॥४९॥
तयाचे शब्द एकोनी पितयाने घेतले जाणुनी ॥ दिसतो हा दैवगुणी ॥ ऐसे जन बोलती ॥५०॥
आज्ञा दिली वडिलांनी ॥ चार रुपये हाती देऊनी ॥ वंदन पितयासी करुनी ॥ चारधामासी निघाले ॥५१॥
लोटता पंचदशदिन ॥ आलो म्हणे काशी करुन ॥ जनास बोले लक्षून ॥ चारीधाम देखिले ॥५२॥
परी जन संशय घेती ॥ ऐसा कोन महाजती ॥ आला जावूनी काशीप्रती ॥ पंधरादिनामाझारी ॥५३॥
परी गांवीचे जाणकार ॥ तयासी पुसती सत्वर ॥ खूण आम्हा बरोबर ॥ सांगा म्हणती काशीची ॥५४॥
जे खूण विचारीती जन ॥ बरोबर सांगे बाळ किसन ॥ जे स्थळ पाहिले लोकांनी ॥ तैसीच खूण सांगतसे ॥५५॥
मग लज्जीत होउनी जन ॥ करिती तयांचे दर्शन ॥ म्हणी उगाचि आपण ॥ परिक्षीले तयांसी ॥५६॥
चारधामाची खूण ॥ सकळांसी सांगे बाल किसन ॥ चार रुपयाचे नाणे काढून ॥ पितयाजवळी दिधले हो ॥५७॥
मग किसन म्हणायचे सोडून ॥ बाबा म्हणू लागले जन ॥ ऐसा हा योगी महान ॥ प्रवरातीरी वसतसे ॥५८॥
नेवासे पवित्रनगरी ॥ नाथ बाबांच्या आश्रमावरी ॥ तेथे जाऊनी किसनगिरी ॥ अनुग्रह तयाचा घेतला ॥५९॥
सिध्द पुरुष हे जाण ॥ मागितले ते कुणा देऊन ॥ हात घालिता खिशांतून ॥ तेचि निघे तात्काळ ॥६०॥
ऐशा नाथासी गुरु करुन ॥ शंकरपुरीचा आशिर्वाद घेऊन गंगागीर साधु महान ॥ त्रिमूर्ती दत्तगुरु मानिले ॥६१॥
दत्तात्रयांसी गुरु मानून ॥ कक्षेमध्ये झोळी घेऊन ॥ फिरु लागले वणवण ॥ गावोवांव योगी हा ॥६२॥
जन कल्याणासाठी ॥ स्वदेहासी बहु कष्टी ॥ तयाने जगजेठी ॥ घेतला अंकित करोनी ॥६३॥
गावोगांव फिरोन ॥ माधुकरी आणी मागून ॥ चारा देतो कुणी जन ॥ गायीगुरांस सोडीतसे ॥६४॥
ज्या गांवी बाबा जाय ॥ त्या गांवीचे शुभ होय ॥ दु:ख दारिद्य पळोनि जाय ॥ आगमने बाबांच्या ॥६५॥
तव त्या गांवीचे जन ॥ बाबास बहू देती मान ॥ माधुकरी देवूनी ॥ बोलाविती बाबांसी ॥६६॥
कुणी दु:खाने झाले बेजार ॥ त्यास आणिती बाबांसमोर ॥ उदी चौकी योगेश्वर ॥ देत असे तयांसी ॥६७॥
कुणा लागले भूत जबर ॥ कुणा शरीराचा आजार ॥ बाबावरी ठेवूनी भार ॥ निर्दोष तात्काळ होती ते ॥६८॥
ऐशा रीती रहाटी ॥ फिरू लागले तपोजेठी ॥ पुढे प्रवरेच्या काठी ॥ ठिकाण एक शोधिले ॥६९॥
जयकाठी चंद्राकृती ॥ दिसे प्रवरेची महती ॥ श्री ज्ञानेश्वरे ख्याती ॥ असे हीची गायिली ॥७०॥
प्रवरा अमृतवाहिणी ॥ वाहे राहुच्या कंठातुनी ॥ महातेजस्वी अगस्ती मुनी ॥ तेज तयाचे झळकतसे ॥७१॥
असे हे पवित्र ठिकाण ॥ बाबांचे घेई मन लक्षून ॥ तये ठायी सद्‍गुरुंनी ॥ आश्रम तयार केलासे ॥७२॥
टेकडी सुंदर मनोहर ॥ तया ठायी हरिहर ॥ भेट दिली असे सत्वर ॥ श्री किसनगिरीसी देवाने ॥७३॥
प्रवरा मात्र मनोहर तेथ प्रगटले शनैश्वर ॥ मार्कंडेय आणि राजपीर ॥ दत्तकिशोर नवनाथ ॥७४॥
तैसाचि रमला सिध्देश्वर ॥ उमापति महेश्वर ॥ नंदीवरती होऊनी स्वार ॥ येते झाले त्या स्थळी ॥७५॥
सर्व देव बोलती ह्यावर ॥ तयासी बोले किसनगीर ॥ करा भक्तांचे दु:ख दूर ॥ हेचि एक मागणे ॥७६॥
गावोगांव भिक्षा मागून ॥ गुरुवार शनिवार नेम धरुन ॥ देण्याभक्तांसी दर्शन ॥ नित्य राहे त्या ठायी ॥७७॥
दत्तगुरुंची कृपा झाली ॥ मनी एक कल्पना सुचली ॥ भक्तगणांसी सांगितली ॥ इच्छ आपुल्या मनीची ॥७८॥
मंदीर बांधायचे सुंदर ॥ भक्तजनांसी आधार ॥ तीर्थ होईल हे सुंदर ॥ जगी कीर्ती वाढेल ॥७९॥
बाबांचे शब्द ऐकुनी ॥ मानवले सकळांच्या मनी ॥ लागेल ते सहकार्य करुनी ॥ जागा मुक्रर करविली ॥८०॥
त्यावेळेचे तहसीलदार ॥ नाम अवचट अधिकारावर ॥ नित्य येऊनी गडावर ॥ बहुत हातभार लाविती ॥८१॥
ओढे नाले नदीकिनारी ॥ खाचखळगी खोलदरी ॥ सुंदर अशा टेकडीवरी ॥ आखणी केली मंदिराची ॥८२॥
पंचदश वर्षे कष्ट घेऊन ॥ सर्व जागेची सपाटी करुन ॥ मंदिराचा पाया खोदुन ॥ सुरुवात केली कामांसी ॥८३॥
तंव आसपास गांवींचे जन ॥ होईल तेव्हढी मदत करुन ॥ आणिक करुनि श्रमदान ॥ कामास गती वाढविली ॥८४॥
वैभवशाली मंदिर बांधणे आहे मधुकरीवर ॥ कष्ट घेऊ लागले अपार ॥ किसनगिरी तयासाठी ॥८५॥
गांवोगांव जाऊन ॥ माधुकरी आणितसे मागून ॥ जनांचे दु:ख दूर करुन ॥ सुखबोध सांगतसे ॥८६॥
कुणासी विहीर खोदणे ॥ तयाने बाबांसी पुसणे ॥ मग काम सुरु करणे ॥ सद‍गुरुंच्या कृपेने ॥८७॥
मग कासया संशय ॥ पाणी लागे नि:संशय ॥ बागायती बहू होय ॥ त्या भक्तांचिया घरी ॥८८॥
ह्या महाराष्ट्र भुवनी ॥ कित्येक विहीरीस पाणी लागुनि ॥ आजपावे तये ठिकाणी ॥ न्यून काही नसेची ॥८९॥
तव ते भाविक भक्तगण ॥ बाबास नेती घराकारण ॥ तयांचे हस्ते स्वयंपाक करुन ॥ सर्वजन सेवितसे ॥९०॥
काय वर्णावी पक्वान्नाची गोडी ॥ भासे अमृतासम गोडी ॥ कितीही खावे तरी थोडी ॥ वाटतसे जनहो ॥९१॥
साधी भाकरी आमटी ॥ करित असे तपोजेटी ॥ तरी गोडी तयाची मोठी ॥ जिव्हेवरी येत असे ॥९२॥
असो ऐशारीती कष्ट घेऊनी ॥ भ्रमू लागले अवनी ॥ कधी निराहार राहोनी ॥ कष्टवितसे देहासी ॥९३॥
म्हणे जनास लक्षून ॥ काम द्यावे पाहून ॥ देवावरी भाव ठेवून ॥ माधुकरी द्यावी हो ॥९४॥
आमुचे यात काही नसे ॥ यात जगाचे हीत असे ॥ तुमच्यासाठी नित्य वसे ॥ दत्तप्रभू साक्षात ॥९५॥
पै पैसा जमवूनी ॥ तयाने दगड आणूनी पाषाण ॥ कुशल कामगिराची करनी ॥ काम गतीने चालले ॥९६॥
आम्हा दत्ताची आवड ॥ काम चालले अवघड ॥ हेच ते देवगड ॥ श्री दत्तप्रभूंची वस्ती ॥९७॥
येथे दत्तप्रभूंनी ॥ आम्हास भेट देवूनी ॥ म्हणे द्यावे वस्ती करुनी ॥ राहण्यास्तव आम्हासी ॥९८॥
आम्ही गांवोगांव फिरोन ॥ आणितो माधुकरी मागून ॥ कारागिरांचे मोल देवून ॥ पुन्हा वणवण भटकतो ॥९९॥
गुरुवार आणि शनिवार ॥ बाबा भेटती गडावर भक्तगण येती अपार ॥ दोन्ही वार लक्षूनी ॥१००॥
अशा निर्जन ओसाड जागी ॥ सदा वसे बालयोगी ॥ तया ठायी दत्तयोगी ॥ सदा राहे चैतन्य ॥१०१॥
अपार कष्ट सोसून ॥ मंदिर घेतले बांधून ॥ दत्तप्रभूंची स्थापना करुन ॥ सेवा चाले निरंतर ॥१०२॥
भाव ठेवून देवावर ॥ होत असे दु:ख नित्यनेमे वारंवार ॥ येऊ लागले भक्तजन ॥१०३॥
पहा बाबांची अघटीत करणी ॥ मृतात्म्यास जिवंत करुनी ॥ अघोरी पिशाच्च काढूनी ॥ परोपकारी कष्टले ॥१०४॥
सर्व जिवांसी समान ॥ मानीत असे योगी जाण ॥ सजीव निर्जीव समसमान ॥ अभेदरुपे जाणीतसे ॥१०५॥
जयासी नसे संतती ॥ बाबा तयांसी बोलती ॥ उदी प्रसाद देऊनी हाती ॥ भाव ठेवा म्हणतसे ॥१०६॥
जे जे बाबांनी सांगितले ॥ ते पथ्थ ज्यांनी पाळिले ॥ तयांसी पुत्रलाभ झाले ॥ आशिर्वादे बाबांच्या ॥१०७॥
ज्या गांवीचे येती जन ॥ त्या गांवीची सांगे खूण ॥ म्हणे आम्ही आलो जाऊन ॥ आपुलिया गांवाहुनी ॥१०८॥
बाबा सांगतसे जनासी ॥ यापुढे या जागेसी ॥ जैसे क्षेत्र पवित्र काशी ॥ त्याचि परी होईल ॥१०९॥
अपार भक्तजण येतील ॥ बहु अन्नदाने होतील ॥ भक्ति महात्म्य वाढवितील ॥ दत्तगुरुंच्या कृपेने ॥११०॥
हा ग्रंथ लिहिण्याकारण ॥ सद्‍गुरुंची आज्ञा घेऊन ॥ नाना तीर्थे भटकत फिरुन ॥ आलो मूळ ठिकाणी ॥१११॥
दत्त देवगड क्षेत्र जाण ॥ तेथे सद्‍गुरुंचे आसन ॥ आणि शनी हनुमान ॥ तया ठायी वसतसे ॥११२॥
श्री शुध्द एकादशीस ॥ भक्तजन येती भजनास ॥ उठती पंगती द्वादशीस ॥ अन्नदान होत असे ॥११३॥
श्री बाबांच्या आशिर्वादे ॥ सुखी होती जन अवधे ॥ पिसाटपणी शब्द बोधे ॥ कळत नसे अज्ञाना ॥११४॥
बाबा एकच शब्द बोलती ॥ पंडित उत्तर ना देती ॥ ते बाबांसी म्हणती ॥ आम्ही अज्ञान बालके ॥११५॥
एकच बोल पाळिला ॥ तो भावार्थ समजला ॥ ऐसा शब्दमहिमा मला ॥ पुढील अध्यायी कथीन ॥११६॥
शब्द अमृताचा घडा देई अज्ञानासी धडा ॥ तयाचा देह गाडा ॥ सत्वगुणी होईल ॥११७॥
ऐशा संतांचे चरित्र ॥ जगी व्हावे प्रसिध्द ॥ तेणे होतसे पवित्र ॥ अंत:करण भक्तांचे ॥११८॥
कैसे शब्द पिसाट ॥ अति बोलणे रागीट ॥ पुढील अध्यायी सुभट ॥ गुरुकृपे सांगेन ॥११९॥
क्रोधाचे बोलणे ॥ ते आशिर्वादचि जाणणे ॥ ऐसे बाबांचे बोलणे ॥ मायारुपी भासते ॥१२०॥
इती श्री नासिकेतरचित ॥ श्री किसनगिरी बाबांचे चरित्र ॥ गंगेसमान असे पवित्र ॥ इत्येतद प्रथमोऽध्याय: ॥१२१॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP