श्री किसनगिरी विजय - अध्याय सहावा

देवगडचे श्री किसनगिरी महाराज यांचा जन्म सन १९०७ साली झाला आणि त्यांनी १९८३ साली समाधी घेतली.


श्रीगणेशाय नम: ॥ श्री शनिदेवाय नम: ॥ श्री हनुमंताय नम: ॥ श्री सीतापते रामचंद्राय नम: ॥१॥
तुझे चरित्र कथन ॥ गात असे मुनिजन ॥ आणिक संत सज्जन ॥ प्रेमभरे गात असे ॥२॥
काय म्हणू रामा तुजला ॥ कर्माचा हा खेळ भला ॥ लंका दिधली बिभीषणाला ॥ हनुमंतासी तेल दिले ॥३॥
तुझी कृपा झाल्यावरी ॥ तेथे काळ काय करी ॥ बैसुनिया मम वैखरी ॥ संत महिमा वदवाया ॥४॥
आता ऐका श्रोतेजन ॥ द्यावे मागील अनुसंधान ॥ प्रवरातिरी बाबा किसन ॥ कैशारीति वर्तले ॥५॥
बाळपणीची लीला ॥ वर्णिली प्रथमाध्यायाला ॥ अवतार रुपी प्रगटला ॥ पावू लागे भक्तांस ॥६॥
अहो हा संसारसागर ॥ मूल दु:खाचे आगर ॥ त्यातुनी पैलतीर ॥ जाणे आहे आपणांसी ॥७॥
आता ऐका पुढील कथन ॥ आंधळ्यासी दृष्टी ठेवून ॥ तस्करांशी शाप देवून ॥ पुन: मार्गी लाविले ॥८॥
तरी तस्कर म्हणाल कोण ॥ जिने पाटा नेला उचलून ॥ तिच्या डोळयात किडे पडून ॥ भोग भोगीत होती ती ॥९॥
पुन्हा ठेविला गडावर आणून ॥ लीनपणे शरण जाऊन ॥ किसनगिरी दयाघन ॥ तत्काळ दृष्टी दिधली हो ॥१०॥
संसारी प्राणी ॥ शोधी लोभाच्या खाणी ॥ देवदारी चोरी करुनी ॥ पश्चाताप पावती ॥११॥
आता ऐका आंधाळ्याचे कथन ॥ तयास दिधले दृष्टीदान ॥ सोडविले महादु:खापासून ॥ तेचि आता ऐकावे ॥१२॥
पाहा देवगडापासून ॥ मडकी नामे गांव लहान ॥ तये ठायी कोणी साधुने ॥ समाधी घेतली असे ॥१३॥
जुनाट समाधी असे फार ॥ कुणी नाथ हे साचार ॥ कडक ठाणे भयंकर ॥ ऐसे जन बोलती ॥१४॥
कुणा झाले दर्शन ॥ जन म्हणती सर्परुपानं ॥ अद्याप समाधीची खूण ॥ साक्षात असे ते गांवी ॥१५॥
कुणी निंदा केल्यास ॥ अथवा अमंगल असल्यास ॥ समाधी समीप गेल्यास ॥ चमत्कार होतसे ॥१६॥
तेचि गांवाचा हरी पाटील ॥ बाजीराव नामे तयाचे मूळ ॥ त्याचे झाले कोण हाल ॥ वर्णवेना शब्दाने ॥१७॥
आठव्या वर्षी अंध झाला ॥ दु:ख झाले मात्यापित्याला ॥ इलाज सर्व खुंट्ला ॥ ठायीचि बैसुन राहतसे ॥१८॥
जरी कां शरीर सुंदर ॥ भरजरी कपडे अंगावर ॥ परि डोळेचि नसल्यावर ॥ काय वैभव शोभेल ॥१९॥
स्त्री जरी बहु सुंदर ॥ अंगी दागिन्यांचा भार ॥ भ्रतारची नसल्यावर ॥ काय उपयोग तयांचा ॥२०॥
बाजीरावास होई वेदना ॥ ओरडत असे ठणठणा ॥ मग मातापित्याच्या नयना ॥ पाणी आपोआप येतसे ॥२१॥
बहुत उपाय शोधिले ॥ वैद्य हकीम पाहिले ॥ परि अधिकची डोळे सुजले ॥ मुठी एव्हढे तेधवा ॥२२॥
माता पिता बंधुभगिनी ॥ तयाचे दु:ख पाहुनी ॥ आणिक स्त्रिया शेजारिणी ॥ हळहळ करिती मनात ॥२३॥
म्हणती ऐसें दु:ख नसावे ॥ नातरी जन्मासच न घालावे ॥ आयुष्य कैसे घालवावे ॥ आंधळेपणी प्राण्याने ॥२४॥ ऐशारिती बोलती ॥ मनामाजी शोक करिती इलाज ॥ कुणाचिया हाती ॥ बोल बोलती तेव्हढे ॥२५॥
पुढे त्या गावांसी बाबा आले भाक्त सदनासी ॥ भेट देवुनी समाधीसी ॥ परस्पर आदेश घेतले ॥२६॥
तंव त्या गांवात ॥ बाबांचे भक्त बहुत ॥ बाजीरावाची हकिगत ॥ सहज बाबांस बोलिजे ॥२७॥
म्हणे आठ वर्षाचा कुमार ॥ दु:खे झाला बेजार ॥ पाहिले ज्योतिषी वैद्य ॥ गुण काही येईना ॥२८॥
भक्त सांगती गहिवरुन ॥ बाबांनी घेतले ऐकून ॥ मग तेथोनि उठोन ॥ तया सदनी पातले ॥२९॥
शोध घेत अंतरी ॥ बाबा गेले झडकरी ॥ घरातील मंडळी सारी ॥ स्वागत करिती तयांचे ॥३०॥
घोंगडीचे आसन टाकून ॥ तेथे योगीश्वरांस बैसऊन ॥ दोन हात दूर राहून ॥ प्रेमभरे नमीतसे ॥३१॥
आंधळया मुलास देखून ॥ खिन्न झाले गुरुंचे मन ॥ म्हणे यावे गडावर घेऊन ॥ उदी चौकी देऊ की ॥३२॥
दृष्टी फेकता कुमारावर ॥ घुमु लागले ते सत्वर ॥ म्हणी आमुच्या समाधीवर ॥ अन्याय झाला म्हणतसे ॥३३॥
योगी योग्यांची गाठ पडली ॥ समाधीच बोलु लागली ॥ जी बाबांनी ओळखिली ॥ बोलती ती तयापुढे ॥३४॥
घरची मालकीन पारुबाई ॥ बाबा तियेस म्हणे वो माई ॥ समाधीचि सेवा काही ॥ परमार्थरुपे घडली कां ? ॥३५॥
सहा वर्षापासून ॥ मुलास पीडा लागून ॥ मुठी येव्हढे डोळे होऊन ॥ भोग भोगितो बिचारा ॥३६॥
माईस सांगे योगीश्वर ॥ ध्यान ठेवा समाधीवर ॥ भंडारा करावा वारंवार ॥ अन्नदान घालावे ॥३७॥
त्यास गडावर आणून नेमाने शनिवार धरुन ॥ सांगितले ते पथ्य सांभाळून ॥ शरण जावे दत्तासी ॥३८॥
भाव ठेवून दत्तावरी ॥ नित्य द्यावा माधुकरी ॥ आपुल्या या संकटावरी ॥ आम्ही जामीन होऊ की ॥३९॥
मग बाबांचा शब्द पाळून ॥ समाधीचा भंडारा घालून ॥ गुरुवार शनिवार धरुन ॥ येऊ लागले गडावरी ॥४०॥
पूर्ण भाव देवावर ॥ बोजा ठेवूनि भरपूर ॥ कडक नियमाचा साक्षात्कार ॥ गूण आला डोळ्यासी ॥४१॥
गूण म्हणाल कैसा ॥ पूर्वी जैसा होता तैसा ॥ मग अधिक भरवसां ॥ जन लोकांचा बैसला ॥४२॥
आसपास गांवीचे जन ॥ एकमेकां बोले आश्चर्यानं ॥ अशक्य ते शक्य करुन ॥ दाखविले बाबांनी ॥४३॥
बाजीरावास डोळे आले ॥ महादु:खातुनी बाचविले ॥ ऐसे जे शरण आले ॥ सुखी केले तयासी ॥४४॥
जन अवघे भक्तिभावाने ॥ सुखी राहती सद्‍गुरु कृपेने ॥ वजनभारे माधुकरी देवून ॥ सुख समाधान भोगिती ॥४५॥
असो कोणी शेतकरी ॥ माल मोजी खळ्यावरी ॥ गोण्या भरून गडावरी ॥ आणून देती नियमाने ॥४६॥
ज्वारी गहू हरबरा ॥ माल होय भरपूर ॥ त्यामधूनि गुरवर्या ॥ हिस्सा काढूनि ठेविती ॥४७॥
आपुल्या ऐपतीप्रमाणे ॥ एकुण पाच पोते आणने ॥ कुणी गरीब इच्छेप्रमाणे ॥ दोन गोणी आणितसे ॥४८॥
दरवर्षी नित्य नेमाण ॥ माधुकरी दिल्या वाचून ॥ राहात नाही भक्तजन ॥ हा भाव दृष असे ॥४९॥
मग तयांचे घरी ॥ जैसा सदगुरु अधिकारी ॥ उणे काय संसारी ॥ पडणार कधी तयासी ॥५०॥
संसारी प्राण्याचा धर्म ॥ नित्य करावा दानधर्म ॥ आचरावे सात्विक कर्म ॥ तेणे होय देहशुध्दी ॥५१॥
भंडार सदा भरून राहती ॥ त्यातून बाबा अन्नदान करिती ॥ अखंड दत्तप्रभू मंदिरी ॥ नामगजर चालतसे ॥५२॥
सुरेगांव येथील शेतकरी ॥ एकादशीची वारी करी ॥ एकदा त्याच्या मुलावरी ॥ संकट कठीण ओढवले ॥५३॥
असेच एकादशीस ॥ जमऊनी भजन मंडळीस ॥ पायी निघाले देवगदास ॥ मध्ये एक घट्ना घडली ॥५४॥
गोधेगांवापर्यंत मंडळी आली ॥ त्यातून काही पुढे निघाली ॥ परी ज्ञान देवाची राहिली ॥ मित्रभेट गांवात ॥५५॥
म्हणोनि तो मागेच थांबला ॥ आरागडे मित्राच्या घरी गेला ॥ मग भोजना आग्रह केला ॥ त्या मित्राने तयासी ॥५६॥
जाउनी तयाचे घरी ॥ भोजनास बैसले पाटावरी ॥ दोन घास घेतल्यावरी ॥ झाले काय तयासी ॥५७॥
एकाएकी वांती झाली ॥ रक्ताची गुळणी पडली ॥ क्षणात शुध्दी हारपली ॥ देहभान विसरला ॥५८॥
शेजारी पाजारी जमले ॥ बाईमाणसे रडू लागले ॥ म्हणती देवा काय केले ॥ अपयश दिधले आम्हासी ॥५९॥
कुणी म्हणे मूठ आली ॥ कुणी म्हणे गुचकी लागली ॥ तेवढ्यात एकाने वार्ता कळविली ॥ गडावरी येउनी ॥६०॥
बाबांस बोले गडबडून ॥ ज्ञानदेवांस रक्तवांत्या येऊन ॥ राहिला बेशुध्द पडून ॥ म्हणूनि धावत आलो मी ॥६१॥
मग बाबांनी उदी मंत्रुन ॥ चौकी त्याजवळ देवून ॥ मग गोधेगांवी येवून ॥ ज्ञानदेवा उदी दिली ॥६२॥
चौकी बांधिली गळयात ॥ उदी घातली तोंडात ॥ उठोनि बैसला क्षणात ॥ ज्ञानदेव शिंदे तेधवा ॥६३॥
जणू काहीचि घडले नाही ॥ ऐसे तयासी होई ॥ जैसी झोपेतून जाग येई ॥ तैशापरी बैसला ॥६४॥
उदी चौकीचा चमत्कार ॥ सकळे देखिला साचार किसनगिरीचा प्रताप थोर ॥ घन्य म्हण्ती तयासी ॥६५॥
मग मंडळीबरोबर ॥ ज्ञानदेव आला गडावर ॥ रात्रभरी जागर ॥ आनंदाने केला असे ॥६६॥
दुसरे दिनी प्रसाद घेवोनि ॥ सदगुरुचे दर्शन घेउन ॥ मंडळी गेली घराकारण ॥ आनंद सोहळा करताती ॥६७॥
आसपास गावात ॥ समजली सत्य हकीकत ॥ श्रीकिसनगिरीचे सत्यत्व ॥ खरे आहे म्हणतसे ॥६८॥
बाबांची आत्मप्रचीति ॥ आली अनेक भगिनी प्रती ॥ जोडली बहीण भावाची नाती ॥ सेवा करिती प्रेमाणे ॥६९॥
आसपास गांवींच्या गृहीणी ॥ ओळखिती बंधु म्हणूनी ॥ जैसा द्रौपदीलागुनी ॥ कृष्ण बंधू झालासे ॥७०॥
जैसे नाथ जालिंदर ॥ कृपा केली मैनावतीवर ॥ झाला कुळाचा उध्दार ॥ चिरंजीव गोपीचंद केला ॥७१॥
स्त्री चरीत्र अति महान ॥ जाणती बाबा किसन ॥ अवघे विश्व तियेपासून ॥ निर्माण झाले असे हो ॥७२॥
एकदा मायेस गर्व झाला ॥ अहंकारे बोलती ब्राह्माला ॥ सांगा आपुल्या सहवासाला ॥ सोडले कां कधी मी ॥७३॥
जेव्हा आपण राम होता ॥ तेव्हा झाले मी सिता ॥ पित्याचे वचन ऐकिता ॥ वनवास सेविला आपणांसवे ॥७४॥
कृष्ण अवतारी जाण ॥ रुक्मिणी झाले तुजकारण ॥ युध्द करोनी दारूण ॥ पळविलेस मजसी ॥७५॥
शिवाच्या अवतारात ॥ जन्म घेवोनि राजघरात ॥ तुम्हासवे हिंडले वनात ॥ पार्वती ऐसे मज म्हणती ॥७६॥
तंव ब्रह्म बोले मायेस ॥ ओळखले नाही मम स्वरुपास ॥ जये ठायी माझा निवास ॥ तेथे तूं न राहसी ॥७७॥
मग माया बोले ब्रह्मास ॥ दावावे आपुल्या स्वरुपास ॥ तेथे कैसा माझा निवास ॥ नाही ऐसे पाहेन ॥७८॥
माया आणि ब्रह्म निघाले ॥ जुनाट गुहेपासी गेले ॥ ब्रह्मा तियेस काय बोले ॥ आत गुहेत शिरावे ॥७९॥
जे दिसले ते नयनी पहावे ॥ कानाने शब्द ऐकावे ॥ मग  येवोनि मज सांगावे ॥ तोवरी मी येथ असे ॥८०॥
भयान गुहेत माया शिरली ॥ अंधारात चालू लागली ॥ एक योजना पुढे गेली ॥ प्रकाशझोत चमकला ॥८१॥
तेज देखिले कैसे ॥ अनंत सूर्य उगवले जैसे ॥ अग्निज्वाला सम भासे ॥ मायेस रुप ते तेधवा ॥८२॥
त्या प्रकाशामधी ॥ दिसू लागला तपोनिधी ॥ महातेजस्वी बाळमूर्ती ॥ ॐ नमो नारायण म्हणतसे ॥८३॥
मूर्ती हाले ना डोले ॥ पद्मासन घालुनी बैसले ॥ नमो नारायण ऐसे बोले ॥ कानी शब्द ऐकोनी ॥८४॥
मग मायेने रुप पालटोनी ॥ श्रुंगार केला नाजुकपणी ॥ अपार लावण्याची खाणी ॥ माया नट्ली तेधवा ॥८५॥
तया समीप उभी राहून ॥ दाखवी नयनाचे तेजपण ॥ चाळ वाजवी रुणझुण ॥ तपोभंग करु पाहा ॥८६॥
नृत्य करोनि अति दमली ॥ परी व्यर्थची कष्टवली ॥ अतोनात कसोटी पाहिली ॥ आकलेना योगी तो ॥८७॥
मग म्लान वदन होऊनी ॥ आली माया मागे फिरोनी ॥ ब्रह्माजवळ येवोनी ॥ साष्टाग दंडवत घालितसे ॥८८॥
म्हणे तूं दिससी बाहेरी ॥ तुंच होता गुहे भीतरी ॥ एकटपणे तप आचरी ॥ तेथ न आकळे मजसी तूं ॥८९॥
परात्पर परमेश्वर ॥ एकचि तूं ईश्वर ॥ तेथे माझा अधिकार ॥ भक्ति एवढा असे की ॥९०॥
तरी एकोणिसशेब्यांशी सालास ॥ विजयादशमी बुधवारास ॥ जमवुनी सर्व भक्तगणांस ॥ देवगडावरी पाचारिले ॥९१॥
तंव किसनगिरी बाबाने ॥ पूजा माईस स्वहस्ताने ॥ मंदिरात जाणे येणे ॥ मोकळीक दिली सकळांसी ॥९२॥
तंव गुरुदासाने ॥ सकळां विनविले नम्रपणे ॥ सात्विक शुध्द भावनेने ॥ दर्शना जावे मंदिरासी ॥९३॥
 ऐसा सोहळा पार पडला ॥ माई भगिनीस आनंद झाला ॥ धन्य म्हण्ती किसनगिरीला ॥ दयाळू कृपाळु जनांचा ॥९४॥
तरी भाविक श्रोतेजन ॥ निर्मळपणे आपुले आप्ण ॥ मंदिरात प्रवेशून ॥ दर्शन घ्यावे शांतपणे ॥९५॥
हा सारांश घेण्याकरिता ॥ कलियुगी मातले तार्तिकजन ॥ कुणी तीर्थक्षेत्री जाऊन ॥ वाटेल तैसे वागतसे ॥९६॥
जो एकच जाणितो आत्मा ॥ स्त्रिलिंग आत्मी नसे जाणा ॥ परि ऐशा पुण्यध्दामा ॥ प्रकृती दोष लावू नये ॥९७॥
निंदादोष टाळावे ॥ मना सैल न सोडावे ॥ पोपटासम न बोलावे ॥ आत्म ज्ञाना वाचूनी ॥९८॥
ज्याची जशी श्रध्दा असे ॥ तया प्रभु तैसा दिसे ॥ सर्वांच्या ह्र्दयी वसे ॥ आत्माराम सारिखाचि ॥९९॥
जरी मुक्ती मिळविणे ॥ सर्वकाळ तयासी भजने ॥ क्षणभरी विसर ना पाडणे ॥ हाचि संतमार्ग असे ॥१००॥
मुक्ति मिळविण्यास ॥ करावा लागए योगाभ्यास ॥ योगमुक्त असावे नेमास ॥ तरी तो प्राप्त होईल ॥१०१॥
योग नव्हे सोपा मार्ग ॥ हा तो संन्याशाचा धर्म ॥ परि आपुलेच शुध्द कर्म ॥ योगसाधन दाखविती ॥१०२॥
आता भाविक श्रोतेजन ॥ पुढील अध्याय़ीचे कथन ॥ दहा कलमे गुरुदासाने ॥ सांगितले ते परिसावे ॥१०३॥
इती श्री नासिकेतरचित ॥ श्री किसनगिरी बाबांचे चरित्र ॥ गंगेसम असे पवित्र ॥  षष्ठोऽध्याय गोड: ॥१०४॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP