श्री किसनगिरी विजय - अध्याय तिसरा

देवगडचे श्री किसनगिरी महाराज यांचा जन्म सन १९०७ साली झाला आणि त्यांनी १९८३ साली समाधी घेतली.


श्रीगणेशाय नम: ॥ ॐ जय सूर्याय नम: ॥ सच्चिदानंदा शामसुंदरा ॥ नमन माझे साष्टांगी ॥१॥
मागीले अध्यायी कथन ॥ एकविले बोधवचन ॥ आणि परमार्थलक्षण ॥ भाविकांस निरुपिले ॥२॥
चैतन्यरुपी बाबांची स्वारी ॥ वणवण फिरे या भुवरी ॥ नेमीक भक्तांच्या जावूनी घरी ॥ पुण्यपावन करीतसे ॥३॥
कडू जाधव बगडीचे ॥ दादा पाटील माळेवाडीचे ॥ किसन मते पिंपळगांवचे ॥ सात्विक भक्त बाबांचे ॥४॥
आठवडयातून एक फेरी ॥ मारीत होते तयांचे घरी ॥ तेथील गांवीचे नरनारी ॥ आशिर्वाद घेती तयांचे ॥५॥
घोंगडीच्या आसनावरी बसत असे किसनगिरी ॥ भक्त बैसून तया शेजारी ॥ बोध बाबांचा ऐकती ॥६॥
अरे दादा वरुनी साफ राहता ॥ अतील गबाळ तैसेचि ठेविता ॥ काटयाकुठयातून फिरता ॥ सुख कैसे मिळेल ॥७॥
स्वार्थ साधण्याकरण ॥ बोलबोलता पोपटासमान ॥ समय गेल्यावर निघून ॥ कोण कोणा ओळखी ॥८॥
आपुले सार्थक ना करती ॥ परी दुसर्‍यास निंदिती ॥ तेणे भ्रष्ट होय मती ॥ दोष येती अंगावरी ॥९॥
कामक्रोध मदमत्सर ॥ शत्रु आहेत महाथोर ॥ आशा वासनेच्या फांटीवर ॥ गुंतूण राहे सदा पाणी ॥१०॥
आतील गबाळ साफ करावे ॥ स्वकष्टावरी जगावे ॥ फुकटाचे न खावे ॥ कदाकाळी जनहो ! ॥११॥
वंगण डाय लागल्यावरी ॥ मरा साबण काय करी ॥ भय निंदेच्या खोलदरी ॥ जाउनी पडसी कर्माने ॥१२॥
मग जगी होय अपकीर्ती ॥ सगे सोयरे बहु निंदिती ॥ रावणास फसवी गणपती ॥ सर्व कार्य नासते ॥१३॥
रावणास गणपतीने ॥ फसविले कोण्या कारणे ॥ शिवलीलामृत ग्रंथ पाहणे ॥ विचारवंत श्रोत्यांनी ॥१४॥
तरी सारांश थोडक्यात ॥ वदला आहे येथ ॥ गोकर्ण महाबळेश्वरी गायी रक्षित ॥ होता गणाचा गणपती ॥१५॥
बाळरुप गणपती ॥ गायी वत्सांची अतिप्रीति ॥ एक काठी घेउनी हाती ॥ तयांच्या मेळी उभा असे ॥१६॥
तितुक्यात रावणाची स्वारी ॥ आली गजाननावरी सामोरी ॥ पिंडा होती डोक्यावरी ॥ परी लघुशंका लागली ॥१७॥
तरी ते लिंग घेउन चालला होता लंकेकारण ॥ मध्ये थांबू नको म्हणून ॥ सदाशिव त्यासी वदलासे ॥१८॥
म्हणून गजाननासमोर जावून ॥ म्हणे एवढे लिंग ठेवा रक्षूण ॥ ऐसी प्रार्थना करुन ॥ लिंग दिले तया जवळी ॥१९॥
गजानन वदे तयासी ॥ वेळ नाही आम्हासी ॥ लवकर यावे वेगेसी अंक मोजि तिनाचे ॥२०॥
एवढया वेळात जरी न आले ॥ मग आमुचे काम संपले ॥ ऐसे तया वचन बोलिले ॥ कार्य आपुले साधाया ॥२१॥
मग एक दोन तीन ॥ अंक गणले गणपतीनं ॥ रावण नाही आला म्हणून ॥ लिंग ठेविले धरणीवरी ॥२२॥
गायीगुरे गुप्त झाली ॥ गजानन मूर्ती अदृश्य झाली ॥ मर रावणे अंतरी जाणीली ॥ गणपतीची हुशारी ॥२३॥
ऐशा रिती अचूक खूण ॥ सांगती श्रीबाबा किसन ॥ लिंगाचे रक्षण केले म्हणून ॥ प्रसन्न झाला शिवभोळा ॥२४॥
शिवशक्ती असल्यावाचूनी ॥ महाकार्य नाही येत घडूनी ॥ दत्तवतार हा जाणोनि ॥ सेवा करिती जनलोक ॥२५॥
एक गृहस्थ बोलो उठून ॥ बाबांसमोर हात जोडून ॥ म्हणे क्षुल्लक कारणाहून ॥ कलह होती घरात ॥२६॥
पत्नी सदा आजारी ॥ मुले धनिकांच्या कामावरी ॥ दु:ख दारिद्य सदा घरी ॥ सुख कोठे मिळेना ॥२७॥
मग बाबा बोलती तयाला ॥ वाईट संगतीने राहिला ॥ बोरीच्या सावलीला ॥ जावून कैसा बसतोस ॥२८॥
माझं म्यां दिलं ॥ आणि माझ म्य़ां नेलं ॥ ऐसी वागण्याची चाल ॥ घडामोड जगाची ॥२९॥
संगती सज्जनांची करावी ॥ प्रीति संतचरणी धरावी ॥ आपुली आपण धरावी ॥ सोय आपुल्या हिताची ॥३०॥
करणी करता न वाटे भीति ॥ केल्यावरी पश्चाताप करिती ॥ बाभळीची बीज लाविती ॥ मग आंबे कैसे येणार ॥३१॥
घागर फुटल्यावर ॥ पाणी कैसे राहणार ॥ काळ्या निळ्या कापडावर ॥ वापर कैसा चालतो ॥३२॥
लावू बाबा देवाला ॥ देवू बाबा गुणाला ॥ भाव जयाचा नासला ॥ काय उपयोग तयाचा ॥३३॥
तुमचे घरकारण ॥ अथवा असो राजकारण ॥ आमुच्या झोळीत लपून ॥ बसले आहे जनहो ॥३४॥
म्हणे आम्ही विठठलाचे गडी ॥ बोकडाची मुंडके मोडी ॥ भक्तीची पथ असे गाढी ॥ गमवू नका तियेसी ॥३५॥
म्हणे मी केली काशी ॥ काशीच्या भांडयात जेवू कशी ॥ संतती वाढविण्यासी ॥ कशी बुध्दी सूचते ॥३६॥
गृहस्थ गेला भांबावून ॥ बाबांचे बोलणे ऐकून ॥ दर्शन होवोनि दुरुन ॥ चुकलो बाबा म्हणतसे ॥३७॥
सदगुरु अति दयाळू ॥ शरणांगताचा कनवाळू ॥ ऐसा किसनगिरी कृपाळू ॥ दया करी भक्तांवरी ॥३८॥
जन सांगती गार्‍याणे ॥ पिडीलो शरीर दु:खाने किती खेटी केल्याने ॥ गुण येईल म्हणतसे ॥३९॥
बाबा बोले त्या कारण ॥ खेटी घेता विचारुन ॥ जेवणाचे घास मोजून ॥ सांगा कधी खाता कां ॥४०॥
अगोदर श्री मग काना ॥ मात्रा वेलांटीच्या खुणा ॥ पत्र लिहू नये जाणा ॥ श्री घातल्यावाचून ॥४१॥
मनमाळ पाहिजे अंतरी ॥ चित्त शुध्द करी ॥ बाहेरी ॥ दुखण्यापासोनि पथ्य भारी ॥ असते गुणा कारणे ॥४२॥
भाव नाही तर देव नाही ॥ भटकत हिंडता कशापायी ॥ मेथीच्या काडीची मने काही ॥ ठिकाणावरी आहे कां ? ॥४३॥
दत्त शनीची माधुकरी ॥ आमुची हीच भाकरी ॥ ह्याची आमुच्या झोळीवरी ॥ वैकुंठ उभे राहिले ॥४४॥
बोलाना दादा ऐसे म्हणती ॥ परी जन गप्पच राहती ॥ कुणी नुसतेच ऐकती ॥ खरे आहे म्हणताती ॥४५॥
नाना दु:खाच्या सागरी ॥ बुडाली जनता सारी ॥ तरी यावे गडावरी ॥ मार्ग सापडेल सुखाचा ॥४६॥
एक एक बोल बाबांचा ॥ ठाव घेतसे ह्र्दयाचा ॥ भाव पूर्ण असे जयाचा ॥ न्यून काही नसेची ॥४७॥
कुणी गाडी तांगा घेऊन ॥ बाबास गांवी नेऊन ॥ प्रेमभावेसेवा करुन ॥ सार्थक आपुले करिती ॥४८॥
बोल बाबांचे अमृतासमान ॥ समाज सुधारण्याचे लक्षण ॥ जो करील ह्याचे पठण ॥ साक्षात्कार त्या होईल ॥४९॥
बाबा सांगती वारंवार ॥ विकार शत्रु भयंकर ॥ त्यासी सदा ठेवूनी दूर ॥ प्रभुभजनी लागावे ॥५०॥
असो कोणी सुशिक्षित ॥ त्यासी बाबा बोलत ॥ परी तयासी ना उमगत ॥ बोल रांगडे बाबांचे ॥५१॥
सारे प्रवासी घडीचे ॥ कोणीच नसे कोणाचे ॥ घर आहे भाडयाचे ॥ हुकूम होता करा खाली ॥५२॥
अनंतरुपी परमेश्वर ॥ निर्गुणात नटला ईश्वर ॥ सगुणाचा साक्षात्कार ॥ कोण घेई या जगा ॥५३॥
मायाजाळ भासे संसार ॥ भव दु:खाचे उंच डोंगर ॥ वाहतो मायानदीचा पूर ॥ तयामध्ये बुडती हे ॥५४॥
पाहा हो प्रगटली एक वेडी ॥ तरी मायामोहासी सोडी ॥ तिने भुलविले पाहा गडी ॥ आत्माराम पंतांचे ॥५५॥
भ्रांतीने झाली वेडी ॥ कल्पनेची सोडली गाठोडी ॥ आत निघाली तमाची गोधडी ॥ मळकट झाली असे बहु ॥५६॥
गोधडी धुण्यास गेली ॥ मायानदीत उतरली ॥ पाय घसरून वाहू लागली ॥ महामोहाच्या लाटेवरी ॥५७॥
अंत आठविला श्रीराम ॥ निमाला अंतरीचा काम ॥ दिसू लागले निजधाम ॥ परि क्रोधसर्प प्रगटला ॥५८॥
देखताचि वेडी किंचाळली ॥ आरोळी बोधवेड्याने ऐकिली ॥ सत्व सांगड पक्की केली ॥ उडी घेतली प्रवाही ॥५९॥
आणिले तिजला मूळकिनारी ॥ तंव ती वेड्यास विचारी ॥ कोठे आत्म्याची नगरी ॥ सांग मज बा दयाळा ॥६०॥
तंव तो वेडा बोले ॥ सहस्त्रदळी पाकळी खुले ॥ आत्मारामची तेथे बोले ॥ पंचरंगी पिंजर्‍यात ॥६१॥
एकमेकांकडे पाहूनी ॥ शोधी विवेकाच्या खाणी ॥ वेडा गेला मोहूनी ॥ वेडी झाली चैतन्य ॥६२॥
कृष्णाचा अवतार ॥ तोचि शेषाचा अवतार ॥ डोके वर काढल्यावर ॥ बोधासी आठवावे ॥६३॥
रामा सुटका करील सीतेची ॥ सीता करील रामाची ॥ याच बाबांच्या बोलांची ॥ वेडी भक्ति कथियेली ॥६४॥
रामा सिता कृष्णा म्हणुनी ॥ ऐसे जनांसी बोलुनी ॥ वरुनी रामा आहे म्हणुनी ॥ खाली कृष्णा नांदतो ॥६५॥
रामकृष्णाचे अवतार ॥ अनंत झाले या पृथ्वीवर ॥ तयाचे भक्त महाथोर ॥ युगानुयुगे अवतरती ॥६६॥
धर्माची होई अधोगती ॥ जगी प्रगटे दुष्टबुध्दि ॥ साधुसंत अवतार होती ॥ ऐसे चक्र चालतसे ॥६७॥
जैसे कलियुगाच्या प्रारंभी ॥ नरनारायण अवतार धरी ॥ निर्मूनी विद्या सांबरी ॥ उध्दार केला जनांचा ॥६८॥
कुणी झाले संत ॥ कुणी झाले साधु प्रसिध्द ॥ आणिक चौर्‍यांशी सिध्द ॥ प्रगटले त्या समयासी ॥६९॥
ऐसाचि साधु किसनगिरी ॥ प्रगटला या भुवरी ॥ हेचि योगी दत्तावतारी ॥ प्रसिध्द झाले या जगती ॥७०॥
तरी तयांच्या बोलाचा अभ्यास ॥ अखंड धरावा ध्यास ॥ मग आपुल्या हितास ॥ सदगुरु समर्थ आहे ॥७१॥
मराठी मांग महार ॥ ऐशा जाती व्यवहार ॥ सगळेचि एक ईश्वर ॥ जातपात नसेची ॥७२॥
शेष घेवोनि जाये ॥ वाट प्रसादाची पाहे ॥ अवघड ऽऽ अवघड आहे ॥ काम मोठे अवघड ॥७३॥
म्हणूनी प्रेमळ श्रोतेजन ॥ ओळखावी बोधखूण ॥ ह्र्दयी साठवण करुन ॥ ठेव श्रीगुरु बोलांची ॥७४॥
आता पुढी अध्यायी ॥ बाबांची ऐका नवलाई ॥ चमत्कार कैसा होई ॥ भाविक जनहो परिसावे ॥७५॥
दोन अध्यायीचे बोधवचन ॥ प्रत्यक्ष बोलले बाबा किसन ॥ तयांचे सामर्थ्य संजीवन ॥ यंत्र निर्माण झाले हे ॥७६॥
इती श्री नासिकेतरचित ॥ श्री किसनगिरी बाबांचे चरित्र ॥ गंगेसमान असे पवित्र ॥  तृतियोऽध्याय: गोड: ॥७७॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP