स्कंध ७ वा - अध्याय १४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१०७
धर्म म्हणे मुने, गृहदारासक्त । होईल विमुक्त केंवी गृही ॥१॥
मुनि म्हणे धर्मा, निजाश्रमधर्म । पाळूनि अनन्य ईशपदीं - ॥२॥
होऊनि, सत्संगनिरत असावें । श्रवणीं रंगावें स्मरुनि ईशा ॥३॥
गृह, धन, दारा, पुत्रांचा वियोग । पडे हेंचि नित्य धान्यीं घ्यावें ॥४॥
स्वप्नमय सृष्टि ऐसा हा संसार । व्हावा हा विचार संतसंगें ॥५॥
अधिक संबंध नसावा प्रपंचीं । अंतरीं विरक्ति असो सदा ॥६॥
अनासक्तचित्तें आसक्तासमान । द्यावें अनुमोदन आप्तजनां ॥७॥
वासुदेव म्हणे अभिमानशून्य । आप्तजनप्रेम संपादावें ॥८॥

१०८
दैव आंतरिक्ष भौम ईशदत्त । स्वीकारुनि वित्त कर्म व्हावें ॥१॥
जीविकायोग्य जें तेंचि निजवित्त । अपेक्षी समस्त तस्कर तो ॥२॥
दैवयोगें धन लाभतां बहुत । तेथ जो आसक्त दंडार्ह तो ॥३॥
मूषक सर्पहि पुत्रचि गणावे । समान करावें प्रेम तेथें ॥४॥
त्रिवर्गार्थ धन न जोडावें कष्टें । यदृच्छासंतोषें कर्म घडो ॥५॥
श्वान चांडालांही अन्नादि अर्पावें । चित्त न गुंतावें कामिनींत ॥६॥
प्रेमपाशबद्ध वधी गुरुतेंही स्त्रीतें । जोडावें पुण्य़ तें श्रेयस्कर ॥७॥
वासुदेव म्हणे ऐशामार्गे ईश । लाभे गृहस्थास सहजपणें ॥८॥

१०९
कीटक,विष्ठा वा रक्षाचि हा देह । क्षणिक सौख्यद तया कांता ॥१॥
विश्वव्यापी सर्व सुखाचें आगर । कोठें जगदीश्वर कोठें कांता ॥२॥
यास्तव तियेचा सोडूनियां संग । इशप्राप्तिमार्ग स्वीकारावा ॥३॥
पंचमहायज्ञ करुनियां अन्न । सेवील तो धन्य अनासक्त ॥४॥
आनुकूल्य तरी आचरावे यज्ञ । अंतरीं आभिमान न ठेवितां ॥५॥
यज्ञाहुतिहूनि ब्राह्मणभोजन । आवडे तें जाण ईश्वरासी ॥६॥
वासुदेव म्हणे विप्रांचें पूजन । चुकूं नये जाण कदाकाळीं ॥७॥

११०
द्रव्यानुकूलता जयाप्रति तेणें । महालयादि ते आचरावे ॥१॥
संक्रांत व्यतिपात ग्रहणादि पर्वे । पाहूनि करावें श्राद्ध प्रेमें ॥२॥
देव ऋषि तेंवी पितरांचें कार्य । घडे तदा आर्य दान करी ॥३॥
ईशमूर्ति, ज्ञाता, विप्र जया ठाईं । तीर्थक्षेत्रें तेंवी कुलगिरी ॥४॥
धर्मकृत्यासी हीं स्थानें अतियोग्य । सहस्त्रगुणित फल तेथें ॥५॥
सर्वव्यापी ईश एक तो सत्पात्र । जेथ त्याचा अंश सत्पात्र तो ॥६॥
भक्तिज्ञानें विप्रा येतसे पात्रता । सत्पात्रीं अच्युता अवलोकावें ॥७॥
वासुदेव म्हणे अंतरीं ईश्वर । जाणावा सत्पात्र तोचि भक्त ॥८॥

१११
सत्पात्र ब्राह्मण असतां कां मूर्ति । जनीं पूजिताती म्हणसी जरी ॥१॥
ऐकें तरी धर्मा, त्रेतायुगामाजी । जनांच्या अंतरीं भरला द्वेष ॥२॥
खंडित न व्हावा उपासनामार्ग । निर्मिली यास्तव मूर्तिपूजा ॥३॥
भूतमात्रीं द्वेष करुनि हे पूजा । उद्धार नराचा केंवी करी ॥४॥
द्वेषहीन नरा, तारी मूर्तिपूजा । वेदाभ्यासी ज्ञाता विप्र पात्र ॥५॥
प्रत्यक्ष कृष्णही वंदी ऐशा विप्रां । पुनीत ते जगा करिती विप्र ॥६॥
वासुदेव म्हणे विप्रपादपात्र । करिती पुनीत पतितांतेंही ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP