स्कंध ७ वा - अध्याय ४ था

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२५
ब्रह्मा होऊनि संतुष्ट । अर्पी वर त्या दुर्लभ ॥१॥
म्हणे दुर्देयही वर । देतों, तुझें तप घोर ॥२॥
पूजा स्वीकारुनि ब्रह्मा । क्षणीं गेला निसस्थाना ॥३॥
वरलाभें कनकदेह । पावूनियां चिंती दैत्य ॥४॥
आतां निर्भय मी जनीं । सकल जिंकावी अवनी ॥५॥
सकल त्रैलोक्य जिंकिलें । वैर विष्णूसी मांडिलें ॥६॥
विश्वकर्माविनिर्मित । इंद्रभुवनीं करी वास ॥७॥
वासुदेव म्हणे शोभा । अपूर्वचि तया लोका ॥८॥

२६
प्रवालसोपानें चौथरे पाचूचे । स्फटिकभित्तींतें शोभा बहु ॥१॥
मनोरम चित्रें बहु तयांवरी । मोत्यांच्या झालरी शोभताती ॥२॥
स्तंभ, तुळ्यादि वैडूर्यमय ते । पद्मराग साजे आसनातें ॥३॥
विस्तीर्ण नंदनवन सभोंवार । स्त्रिया मनोहर करिती क्रीडा ॥४॥
मणिमय भूमीवरी प्रतिबिंब । अवलोकिती, नाद नुपुरांचा ॥५॥
नारदवचन कथी वासुदेव । भोगी तें वैभव सकळ दैत्य ॥६॥

२७
ब्रह्मा, विष्णु शिवावांचूनि सकळ । देव होती नम्र दैत्यपदीं ॥१॥
धर्मा, गंधर्वादि परिवारासवें । स्वर आळविले मीही तेथें ॥२॥
विद्याधर अप्सरांचा होई नाच । स्तविती तयास ऋषि मुनि ॥३॥
भूलोकीं तयासी देती हविर्भाग । श्रमाविण चांग धान्य पिके ॥४॥
योग्यवेळीं वृष्टि, सिंधु अर्पी रत्नें । गिरिगुहा स्थानें रम्य त्याचीं ॥५॥
बहुयुगें ऐसें सौख्य भोगी दैत्य । प्रार्थिती विष्णूस देव मुनि ॥६॥
वासुदेव म्हणे होई नभोवाणी । ऐकिली देवांनीं स्पष्टपणें ॥७॥

२८
देवहो, तुमचें असावें कल्याण । भिऊं नका ध्यान वचनीं द्यावें ॥१॥
ऐकेल ही वाणी त्याचें हरे दु:ख । निश्चय हा साच समजा तुम्हीं ॥२॥
देव-वेद-धेनू विप्रांसवें माझा । द्वेष त्या दैत्याचा जाणतों मी ॥३॥
समीप पावला नाश तेणें त्याचा । अल्पकाल सोसा दु:ख ऐसें ॥४॥
प्रल्हादनामक पुत्र या दैत्वाचा । महाभक्त माझा पुण्यवंत ॥५॥
द्वेष त्याचा बहु करील दैत्येंद्र । तेणें त्याचा वध करीन मी ॥६॥
वासुदेव म्हणे देव हे ऐकती । वाणी ईश्वराची अभयप्रद ॥७॥

२९
ऐकूनियां देववाणी । देव तोषले स्वमनीं ॥१॥
हर्षे गेले स्वस्थानासी । दैत्य नष्टचि मानिती ॥२॥
पुत्र चतुर्थ दैत्याचा । भक्त ‘प्रल्हाद’ विष्णूचा ॥३॥
सत्यवचनी सुशील । विप्रपादांबुजीं नम्र ॥४॥
विद्या कुल ऐश्वर्याचा । गर्व तयासी नव्हता ॥५॥
सर्वांभूतीं परमेश्वर । पाही ऐसी बुद्धि स्थिर ॥६॥
दीनावरी दया करी । समानाशीं दृढ मैत्री ॥७॥
गुरुजन त्या ईश्वर । संकटींही वृत्ति स्थिर ॥८॥
वासुदेव म्हणे भक्त । पाही ईश्वर सर्वत्र ॥९॥

३०
प्राणेंद्रियें देह बुद्धीचा संयम । त्यागिला संपूर्ण दैत्यभाव ॥१॥
विषय तो मानी सर्वकाळ तुच्छ । देवही तयास स्तविती बहु ॥२॥
आबाल्यचि तुया ईश्वराचें प्रेम । रुचती कदा न बालक्रीडा ॥३॥
भगवत्स्वरुपीं लीन त्याचें चित्त । ध्यास अहर्निश तोचि तया ॥४॥
ईश्वरचिंतनीं सर्वकाल मग्न । व्यवहारभान नसे कांहीं ॥५॥
प्रेमार्द्र तो कदा रुदनचि करी । हर्षोत्फुल्ल करी कदा हास्य ॥६॥
कदा गीत कदा आरोळ्य़ा फोडणें । नृत्यांत रंगणें वेडयासम ॥७॥
वासुदेव म्हणे भक्तीच्या अवस्था । लाभोत या सदा भक्तांप्रति ॥८॥

३१
ईशभाव कदा प्रगटतो जनीं । सिद्ध कदा मनीं आलिंगना ॥१॥
रोमांचित देह होई त्या कारणें । वाहती प्रेमानें नेत्र कदा ॥२॥
निस्तब्ध होऊनि बैसे कदा काळीं । स्थिति हे लाभली सत्संगानें ॥३॥
संतुष्ट त्यायोगें राहूनि आपण । इतरांचें मन शांत करी ॥४॥
हिरण्यकशिपु पुत्राचें तें कृत्य । पाहूनियां क्रुद्ध होई बहु ॥५॥
छळूनि पुत्रासी विनाश पावला । अतिरेक झाला दुष्कर्माचा ॥६॥
धर्म म्हणे पुत्रछळें दैत्यनाश । जाहला तें वृत्त सकळ कथा ॥७॥
वासुदेव म्हणे अधार्मिक जन । भोगिती दारुण दु:ख अंतीं ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP