TransLiteral Foundation

स्कंध ७ वा - अध्याय ७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


स्कंध ७ वा - अध्याय ७ वा
४६
प्रल्हाद निवेदी तपालागीं पिता । गेला यदा माझा गिरीवरी ॥१॥
सर्पासी भक्षिती जेंवी पिपीलिका । म्हणती करुं याचा तेंवी नाश ॥२॥
बोलूनियां ऐसें आनंदें विबुध । आरंभिती युद्ध दैत्यांसवें ॥३॥
दशदिशांप्रति पळाल तैं दैत्य । लुटिती तैं देव प्रासादादि ॥४॥
माता कयाधूसी नेऊं लागे इंद्र । नारद प्रतिकार करी तदा ॥५॥
इंद्र म्हणे गर्भवती दैत्यपत्नी । कैसी हे सोडूनि देऊं मुने ॥६॥
प्रसूति पावतां वधीन पुत्रांतें । स्वस्थानीं ते सुखें जावो मग ॥७॥
वासुदेव म्हणे वैर तें कठीण । परस्पर प्राण घेऊं पाहे ॥८॥

४७
गडेहो, इंद्रातें बोलले नारद । उदरीं हिच्या गर्भ ईशभक्त ॥१॥
पापरहित तो सामर्थ्यसंपन्न । अवघ्य तो जाण देवश्रेष्ठा ॥२॥
प्रदक्षिणा तदा घालूनि मातेसी । सोडितां तियेसी नेती मुनि ॥३॥
तपश्चर्याकाल केलें बहु तप । सेवूनि मुनींस कयाधूनें ॥५॥
भक्तिरुप धर्म तदा नारदांनीं । मजसाठीं वनीं कथिला तिज ॥६॥
स्त्रीस्वभावें तो विसरली माता । कृपेनें मुनींच्या स्मरण मज ॥७॥
मुलांनो, विश्वास ठेवितां तो बोध । होईल तारक तुम्हांतेंही ॥८॥
वासुदेव म्हणे नारदोक्त तोचि । प्रल्हाद निवेदी बोध बाळां ॥९॥

४८
उत्पत्त्यादि भाव फलासी, न वृक्षा । देहफल आत्मा निर्विकार ॥१॥
नित्य, शुद्ध, एक, अव्यय, क्षेत्रज्ञ । अविक्रिय जाण सर्वाधार ॥२॥
स्वयंप्रभ, सर्वव्यापी तो अलिप्त । तेंवी अनावृत्त जगद्धेतु ॥३॥
द्वादश हीं चिन्हें जाणूनि आत्म्याचीं । देहाभिमानासी धरुं नये ॥४॥
हेमकार क्षेत्रीं जाणूनि सुवर्ण । उपाय करुन संपादी जैं ॥५॥
तैसा देहक्षेत्रीं घडे आत्मबोध । प्रयत्नें आत्म्यास उपायांनीं ॥६॥
अष्टधा प्रकृति त्रिगुण तैं भूतें । आत्मा सकलांतें व्यापीतसे ॥७॥
विकारसंघात देह तो द्विविध । जंगम स्थावर ऐशारुपें ॥८॥
वासुदेव म्हणे वेदां नेति नेति । अन्वयी व्यतिरेकी जाणती तो ॥९॥

मण्यांमाजी सूत्र तैसा हा व्यापक । अन्वय विबुध म्हणती हाचि ॥१॥
सर्वत्र असूनि अलिप्त तो असे । व्यतिरेक ऐसें म्हणती तया ॥२॥
चिंतूनियां ऐसें चित्त होई शुद्ध । होऊनि एकाग्र पुढती शोधा ॥३॥
जागृत्स्वप्नादिक अवस्थांचा साक्षी । शोध घेतां चित्तीं तोचि आत्मा ॥४॥
गुणकर्मयोगें बुद्धीचे हे खेळ । घालिती गोंधळ संसाराचा ॥५॥
ज्ञानेंचि बुद्धीचे प्रवाह हे नष्ट । उपाय ज्ञानास एक भक्ति ॥६॥
वासुदेव म्हणे सर्वसमर्पण । सेवावे सज्जन सर्वभावें ॥७॥

५०
ईशपदीं जडे प्रेम । तोचि जाणावा सद्धर्म ॥१॥
सर्वांभूतीं भगवद्भाव । व्हावें निर्मळस्वभाव ॥२॥
ऐसा भक्त ईश्वराचा । करी सप्रेम हरिकथा ॥३॥
कथागानें देहभान । जाई तयाचें हरपून ॥४॥
कंठ सद्गदित होई । स्वयें तन्मयता येई ॥५॥
नाचे बागडे ओरडे । वेडा म्हणती तया वेडे ॥६॥
एक ईश्वर त्या दिसे । नावलोकी जनाकडे ॥७॥
होईअ सर्वबंधछेद । सकळ अज्ञाननिरास ॥८॥
चुके जन्म-मरणचक्र । स्वस्वरुपीं होई स्थिर ॥९॥
वासुदेव म्हणे ऐसा । भक्त जाणावा भाग्याचा ॥१०॥

५१
यास्तव गड्यानों, हृदयस्थ देवा । चिंतावें सर्वदा सर्वभावें ॥१॥
उपासना त्याची अत्यंत सुलभ । चित्त मात्र एक अर्पा तया ॥२॥
तेणें सर्व विश्वासमर्पण पुण्य । द्रव्य दारा धन नाशिवंत ॥३॥
क्षणभंगुर या आयुष्यांत भोग । भोगाल कितीक ध्यानीं आणा ॥४॥
स्वर्गसौख्य तेंही नश्वरचि असे । यास्तव मोक्षाचे यत्न व्हावे ॥५॥
सुखार्थ प्रयत्नें लाभे जनीं दु:ख । ऐसाचि अनुभव सकलां येई ॥६॥
निरिच्छेंत सौख्य ऐसा अनुभव । देह चिरंजीव नसेचि हा ॥७॥
यास्तव लाभही घडतां सौख्याचा । काय येई हाता किती काळ ॥८॥
वासुदेव म्हणे देहचि नश्वर । ऐश्वर्य स्त्री-पुत्र काय तेथें ॥९॥

५२
उत्कर्षापकर्ष एकाचि जन्मांत । होती जाती नित्य अनुभव हा ॥१॥
मित्रहो, चिंतावें काय लाभ एथ । रमूनि विषयांत काय सौख्य ॥२॥
तेणें पुनर्जन्म, पुनरपि कर्म । ऐसें हें भ्रमण न टळे कदा ॥३॥
निष्काम भजन एकचि या मार्ग । होईल निर्बीज कर्म तेणें ॥४॥
देव दैत्यादिक ईश्वरा न भेद । उद्धरी भक्तांस भक्तप्रिय ॥५॥
आजवरी बहु तरले यापरी । चिंतूनि अंतरीं हित साधा ॥६॥
जन्मासी येऊनि एकचि साधावें । सर्वत्र पहावें हरिरुप ॥३॥
नि:सीम करावी भक्ति ईश्वराची । प्रल्हादोक्ति कथी वासुदेव ॥८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-11-19T18:24:02.7330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

fire fighting

  • न. अग्निशमन 
RANDOM WORD

Did you know?

देवक म्हणजे काय ? त्याचे महत्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.