स्कंध ७ वा - अध्याय ६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४२
कुमारपणींच प्राज्ञ प्रयत्नानें । भागवतधर्मे वागताती ॥१॥
नरजन्म दुर्लभ हा मोक्षप्रद । परी अशाश्वत निश्चयानें ॥२॥
सर्वांचें कल्याण करी जो सर्वात्मा । धरावें चरणां त्याचा दृढ ॥३॥
दैवयोगें जेंवी यत्नाविण दु:ख । घडे, तेंवी सौख्यलाभ होई ॥४॥
यास्तव सुखार्थ प्रयास ते व्यर्थ । शीण निरर्थक वय जाई ॥५॥
मुकुंदपादाब्ज दुरावती तेणें । क्षेम संपादणें अरुज तोंचि ॥६॥
वासुदेव कथी प्रल्हादवचन । व्यर्थचि संपून जाई वय ॥७॥

४३
शत वर्षे वय अजितात्मा अर्ध । घालवी तें व्यर्थ निद्रेमाजी ॥१॥
बाल्य कौमार्याचीं विंशति क्रीडेंत । जराजर्जरित विंशति तीं ॥२॥
दुष्पूर कामासी दशचि राहतां । तारुण्यांत त्याचा पाड काय ॥३॥
गृह धन दारासक्त जो मोहित । घालवी तीं व्यर्थ न कळतांचि ॥४॥
असंयमी आसक्त तो कोण कैसा । स्नेहपाशच्छेदा प्रवर्तेल ॥५॥
अर्थतृष्णा प्राणार्पणें जे पोशिली । त्यागी ऐसा बळी धनिक कोण ॥६॥
सेवक तस्कर वणिजही तुच्छ । लेखिती प्राणांस धनास्तव ॥७॥
वासुदेव म्हणे द्रव्य, द्रव्य, द्रव्य । करीत मानव मरुनि जाई ॥८॥

४४
गुजगोष्टी, संगसौख्य आठवून । त्यागी जनीं कोण प्रियेप्रति ॥१॥
पुत्र-मित्र-शिशु-आप्तपाशबद्ध । होईल विमुक्त कोण कैसा ॥२॥
मनोज्ञ विषय सांठविले जेथें । सोडवेल कैसें गृह कोणा ॥३॥
शेती-वाडी पशु-पक्षी तैं सेवक । करवेल त्याग कैसा त्यांचा ॥४॥
पेशस्कृत जैसा स्वयेंचि आपणा । अभेद्य बंधनामाजी पाडी ॥५॥
जिव्होपस्थ सौख्य तोचि जया मोक्ष । कैसें त्या वैराग्य मोहांधासी ॥६॥
कुटुंबपोषणीं वेंचितो जो वय । पुरुषार्थ काय अन्य तया ॥७॥
तापत्रयतप्ताही न त्या वैराग्य । करी अपहार जाणूनिही ॥८॥
वासुदेव म्हणे ज्ञाताही मोहांत । पडे या, आसक्त कैसा सुटे ॥९॥

४५
मित्रहो, स्त्रियांच्या कटाक्षीं तो काम । वास करी जाण नरकरुप ॥१॥
संगतीनें त्याच्या अपत्यबंधनीं । पडतां, कदा, कोणी न सुटे कोठें ॥२॥
यास्तव विषयलंपट दैत्यांचा । सोडूनि, हरीचा ध्यास घ्यावा ॥३॥
गड्यानों, तो तुम्हां पावेल सहज । जळीं स्थळीं एक भरला तोचि ॥४॥
व्यापक तो सदा आनंदस्वरुप । घेई दिव्यरुप भक्तांस्तव ॥५॥
गुणमयी माया भासवी त्या भेद । त्यजूनियां दैत्य भजा त्यासी ॥६॥
भूतदयेनेंचि संतुष्ट तो होई । पुरुषार्था नाहीं चाड एथें ॥७॥
सर्वसमर्पणा साह्य न जयाचें । सर्वही त्या एथें विद्या व्यर्थ ॥८॥
नारायणोक्त जें नारदें मजसी । निवेदिलें तेंचि कथिलें तुम्हां ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP