स्कंध ७ वा - अध्याय ८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


५३
प्रल्हादबोधें या दैत्यकुमार ते । जाती भक्तिपंथें शुद्धभावें ॥१॥
गुरुपादिष्ट तो त्यागूनि अभ्यास । श्रीहरीचा ध्यास नित्य घेती ॥२॥
पाहूनि तें शंडामर्क भयातीत । निवेदिती वृत्त दैत्येंद्रातें ॥३॥
ऐकूनि तें वृत्त क्रोधाकुल दैत्य । बालकाचा वध इच्छी मनीं ॥४॥
सुशील संयमी महाभक्ताप्रति । आणवी पुढती क्रूरपणें ॥५॥
ताडित सर्पसा पाही क्रोधें त्यासी । कटु शब्दें ताडी दुष्ट तया ॥६॥
दुर्विनीता, मंदा, कुलघ्ना, अधमा । यमाच्या सदना जाईं दुष्टा ॥७॥
त्रैलोक्य जयातें कांपे त्या मजसी । केंवी अवमानिसी कवणाधारें ॥८॥
वासुदेव म्हणे बद्धांजली बाळ । देई प्रत्युत्तर नम्रभावें ॥९॥

५४
नृपा, आधार मजसी । आधार जो त्रैलोक्यासी ॥१॥
बलिष्ठांचेही बलिष्ठ । मानिताती जया श्रेष्ठ ॥२॥
ब्रह्मादिकांचा आश्रय । स्वरुपें जो शौर्य धैर्य ॥३॥
व्यापक तो गुणाधीश । त्यागीं आसुरभावास ॥४॥
समभाव मनीं ज्याच्या । तोचि काळ स्ववैर्‍यांचा ॥५॥
उपासना अनंताची । एक समत्वचि जगीं ॥६॥
रिपु जिंकिल्यावांचूनि । मानी त्रैलोक्याचा धनी ॥७॥
महामूढचि तो असे । ज्ञानलेश तया नसे ॥८॥
जयालागीं समदृष्टि । जगीं वैरी न तयासी ॥९॥
शत्रूचि न जयाप्रति । तेणें जिंकावें कोणासी ॥१०॥
वासुदेव म्हणे भक्त । निर्भय ते कथिती स्पष्ट ॥११॥

५५
ऐकूनि सुतोक्ति बोलला दैत्येंद्र । दिससी साचार मरणोन्मुख ॥१॥
मुमूर्षूचि ऐसे काढितो प्रलाप । मजहूनि श्रेष्ठ कोण जगीं ॥२॥
व्यापक तो जरी देव तुझा, मूढा । स्तंभांत या कैसा न दिसे मज ॥३॥
बाळ म्हणे मज दिसे स्तंभीं स्पष्ट । न दिसे कां व्यर्थ म्हणसी राया ॥४॥
दैत्य म्हणे व्यर्थ काय हे प्रलाप । पहा शिरच्छेद करितों आतां ॥५॥
मूढा, जयाप्रति नित्य तूं शरण । करील रक्षण कैसें पाहूं ॥६॥
बोलूनियां ऐसें खड्गातें खेंचून । करुनि उड्डाण पुढती धांवे ॥७॥
वासुदेव म्हणे प्रसंग तो बाका । संकटीं स्वभक्तां रक्षी प्रभु ॥८॥

५६
म्हणे मूढा, तुझा हरी । कोठें दाखवीं सत्वरी ॥१॥
वसे काय म्हणे स्तंभीं । म्हणूनि मारा वज्रमुष्टि ॥२॥
तदा झाला घोर शब्द । वाटे कोसळे ब्रह्मांड ॥३॥
ब्रह्मादिकही घाबरे । नकळे काय तयां झालें ॥४॥
दैत्यराज तैं विस्मित । भयाकुल सर्व दैत्य ॥५॥
भक्तवचनपूर्तीस्तव । स्तंभीं प्रकट होई देव ॥६॥
रुप अद्भुभ्त पाहूनि । चिंती दैत्यराज मनीं ॥७॥
म्हणे न कळे हा कोण । पशु, मानव वा अन्य ॥८॥
वासुदेव म्हणे रुप । दिसलें अद्भुत ॥९॥

५७
कोण असावा हें चिंती मनी दैत्य । जवळी भगवंत तोंचि त्याच्या ॥१॥
संतप्तकांचनासम चंड नेत्र । स्फुरज्जटा वक्त्र जृंभायुक्त ॥२॥
दंष्ट्रा त्या कराल, करवाल चंचल । जिव्हा क्षुरधारसम तीक्ष्ण ॥३॥
विशाल भृकुटियुक्त उग्र मुख । गुहा नासापुट स्तब्ध कर्ण ॥४॥
विस्तारिलें मुख उत्तुंग शरीर । ग्रीवा पुष्ट र्‍हस्व, दीर्घ वक्ष ॥५॥
शुभ्ररोम बहुबाहु नखायुध । रुप भीतिप्रद दैत्याप्रति ॥६॥
पळविले दैत्य, पाहूनि दैत्येंद्र । गदापाणी सिद्ध युद्धाप्रति ॥७॥
प्रलयांधकारा ग्रासी ज्याचें तेज । बापुडा त्या दैत्य मशकासम ॥८॥
वासुदेव म्हणे करितां प्रहार । सर्पा विनतापुत्र, धरिलें तेंवी ॥९॥

५८
चपलगतीनें निसटूनि दैत्य । घेई चर्मखड्‍ग महावेगें ॥१॥
क्रीडतां विनतासुतमुक्त सर्प । तैसा मानी दैत्य स्वपराक्रम ॥२॥
पुढती कौशल्यें फिरवी खड्‍ग वेगें । प्रवेशचि कोठें न उरे ऐसें ॥३॥
पाहूनि नृसिंह करी अट्टहास्य । भेदूनि तो नाद नभा गेला ॥४॥
ऐकूनि दैत्याची बसे कानठळी । दृष्टीही भ्रमली अंध:कारें ॥५॥
अंतकाळ त्याचा जाणूनियां सर्प । धरी जैं मूषक धरिलें तेंवी ॥६॥
मुक्तीस्तव दैत्य करी धडपड । परी यत्न व्यर्थ होती त्याचे ॥७॥
वासुदेव म्हणे येतां योग्य वेळ । काळाचेंही बळ न चले कांहीं ॥८॥

५९
अभेद्य जी वज्रा तीच दैत्यत्वचा । हरिनखाग्रांचा विषय झाली ॥१॥
सायंकाळी सभाद्वारीं अंकावरी । आंवळूनि धरी दैत्या देव ॥२॥
फाडूनि उदर घेई त्याचा प्राण । कोण अवलोकन करुं शके ॥३॥
आधींच नृसिंह त्यांत क्रोधाकुल । केंवी पहावेल तयाकडे ॥४॥
केश-वदनही झालें रक्तसिक्त । जबडा चाटीत सिंह जैसा ॥५॥
आंतडयांच्या माळा शोभताती कंठीं । लोटिला खालतीं मृतदेह ॥६॥
दानवाचा वध करी नखाग्रांनीं । धैर्य पावे मनी वासुदेव ॥७॥

६०
आयाळांनीं मेघ जाहले कंपित । ग्रहही निस्तेज नेत्रतेजें ॥१॥
खवळले सिंधु श्वासाच्या वेगानें । दिग्गज भयानें चीत्कारती ॥२॥
आयाळवेगानें विमानें उडालीं । धरणीं कांपली पदाघातें ॥३॥
पर्वतराजही कोसळूं लागले । निस्तेज जाहलें गगनांगण ॥४॥
नृपसिंहासनीं पुढती शोभे देव । सकलांसी भय जवळी जाण्या ॥५॥
वासुदेव म्हणे सत्कर्मनिरत । निर्भयता श्रेष्ठ तयासीचि ॥६॥

६१
हिरण्यकशिपुआदि दैत्यश्रेष्ठ । दु:सह जगास, वंधिले तयां ॥१॥
ऐकूनियां हर्ष जाहला देवांसी । करिती पुष्पवृष्टी अत्यानंदें ॥२॥
विमानावलीनें व्याप्त होई नभ । येती दर्शनार्थ सकळ देव ॥३॥
दुंदुभींचा नाद, गंधर्वांचें गीत । अप्सरांचें नृत्य शोभा देई ॥४॥
देव, ऋषि, सिद्ध, पितर, विद्याधर । अप्सरा, गंधर्व, सर्प, यक्ष ॥५॥
मनु, प्रजापति पार्षदही येती । जोडूनि करासी स्तविती सर्व ॥६॥
वासुदेव म्हणे ब्रह्मा रुद्रादिक । स्तविती जें तेंच परिसा आतां ॥७॥

६२
ब्रह्मा म्हणे देवा, पार न शक्तीचा । त्वद्‍गुण ऐकतां दोष जाती ॥१॥
सकळ ब्रह्मांडोत्पत्तिसंहारादि । करुनि तुजसी लेप नसे ॥२॥
रुद्र म्हणे दैत्य वधिलासी आतां । आंवरीं या क्रोधा भक्तांस्तव ॥३॥
इंद्र म्हणे हविर्द्रव्याचा तूं भोक्ता । यज्ञमार्ग आतां निष्कंटक ॥४॥
जाहलों निर्भय न रुचे ऐश्वर्य । मोक्षश्रीही काय त्वद्भक्तांसी ॥५॥
तप:सामर्थ्य हें आम्हां दाविलेंसी । अत्यानंदें ऋषि म्हणती देवा ॥६॥
निवारिलें विघ्न आमुच्या तपाचें। विश्वचालका, घे नमस्कार ॥७॥
बोललोए पितर धर्माचा उद्धार । झाला, नकस्कार असो तुज ॥८॥
वासुदेव म्हणे सिद्ध, विद्याधर । नागही सकळ वंदिताती ॥९॥

६३
मनु म्हणे धर्माआज्ञाभंजकासी । देवा, वधिलेंसे नमन घेईं ॥१॥
भयातीत आम्हीं वदले प्रजापति । देवा, रक्षिलेंसी नमन घेईं ॥२॥
कल्याण न होई कुमार्गस्थिताचें । गंधर्वही ऐसें वदती प्रेमें ॥३॥
चारण बोलती भवभयभंगा । आश्रय चरणांचा घडो नित्य ॥४॥
निवेदिती यक्ष आम्हांसी वाहक । करुनि बहुत पीडीयेलें ॥६॥
जगताचें दु:ख प्रभो वारिलेंसी । वंदितों तुजसी जगन्नाथा ॥७॥
आम्हीं किंपुरुष बोलूनि वंदिती । किन्नर स्तविती वैतालिक ॥८॥
पार्षद म्हणती पार्षदश्रेष्ठ हा । शापमुक्त केला दिव्यरुपें ॥९॥
वासुदेव म्हणे यापरी स्तवन । करिती अनन्यभक्त सर्व ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP