स्कंध ७ वा - अध्याय १३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१००

आरोग्यसंपन्नें संन्यास वरावा । संचार करावा सर्वकाल ॥१॥
नारायणरुपीं ठेवूनियां लक्ष । सर्वसंगत्याग करणें योग्य ॥२॥
भूतमात्रीं ईशभावना धरावी । भूतें अवलोकावीं आत्म्यामाजी ॥३॥
सुप्तिप्रबोधनसंधीमाजी ध्यान । करुनियां ब्रह्मबोध घ्यावा ॥४॥
क्षणभंगुरता जाणूनि देहाची । प्रतीक्षा कालाची करणें सौख्यें ॥५॥
असत्‍शास्त्राभ्यास ज्योतिषजीवन । विवाद तर्क न करणें योग्य ॥६॥
पक्षाभिमानही नसावा यतीस । बहुग्रंथाभ्यास वर्ज्य तया ॥७॥
वासुदेव म्हणे संभार शिष्यांचा । यतीलागीं कदा योग्य नसे ॥८॥

१०१
व्याख्यानोपजीवी न व्हावें यतीनें । मठादि अभिमानें गुंतूं नये ॥१॥
समदृष्टि शांत तोचि यति जाणा । नसे ब्राह्याचिन्हा प्रतिष्ठा त्या ॥२॥
लोकसंग्रहार्थ दंडादि स्वीकार । नसे ज्ञानोत्तर महत्त्व त्या ॥३॥
योगभ्रष्टता ते न यावी म्हणूनि । अप्रगट जनीं व्हावें तेणें ॥४॥
अंतरीं विरक्ति परी न ती व्यक्त । ज्ञाता जनीं मूकभाव धरी ॥५॥
उन्मत्त बालकवृत्ति तो स्वीकारी । ब्रह्मभाव परी स्थिर त्याचा ॥६॥

१०२
अजगरमुनि कावेरीच्या तीरीं । नित्य भूमीवरी करी वास ॥१॥
धूलिव्याप्तदेहें गुप्त त्याचें तेज । एकदां प्रल्हाद येई तेथें ॥२॥
मंत्र्यासवें भक्त राव तो ज्ञानार्थ । हिंडतां मुनीस अवलोकी ॥३॥
अव्यक्तचिन्हा त्या पूजूनि प्रल्हाद । पश्न करी मोद पावूनियां ॥४॥
म्हणे पुष्ट देह भोगें, द्रव्यें भोग । करितां उद्योग द्रव्य लाभे ॥५॥
ऐसें असूनियां केवळ या स्थानीं । स्वस्थचि बैसूनि पुष्टता हे ॥६॥
दुर्बलही करी द्रव्यार्थ प्रयत्न । सामर्थ्यसंपन्न ज्ञाते तुम्ही - ॥७॥
असूनिही, स्वस्थ बैसतां हें काय । करुनियां हास्य वदले मुनि ॥८॥
वासुदेव म्हणे उत्तर मुनीचें । ऐका शांत चित्तें कल्याणार्थ ॥९॥

१०३
मुनि म्हणे भक्ता प्रल्हादा, तूं ज्ञानी । कथितों सुजनीं कथिलें तेंचि ॥१॥
योग्यही विषय सेवनें न तृप्ति । पावूनि मजसी फंसवी तृष्णा ॥२॥
नाना योनींमाजी भ्रमविलें मज । पावलों मनुजदेह भाग्यें ॥३॥
स्वर्ग नरक वा अपवर्गद्वार । मानवशरीर एकमेव ॥४॥
अश्रांत प्रयत्न करुनिही एथें । पावताती दु:खें किती एक ॥५॥
पाहूनि लौकिकसुखाचा तो मार्ग । त्यागूनियां शांत जाहलों मी ॥६॥
निवृत्तिप्राप्त तें स्वस्वरुप सौख्य । शाश्वत तें, तुच्छा विषयोद्भव ॥७॥
प्रारब्धप्राप्त तें भोगितों मी राया । ऐकतां विसावा वासुदेवा ॥८॥

१०४
विसरुनि निजानंद । जीव संसारांत दंग ॥१॥
तृण शैवालाच्छादित । जल सांडूनि प्रत्यक्ष ॥२॥
धांवे मृगजलामागें । तैसी अवस्था हे पाहें ॥३॥
क्षणभंगुर सौख्यार्थ । व्यर्थ घेई मनुज कष्ट ॥४॥
धनवंतही या जगीं । पाहियेले बहु दु:खी ॥५॥
नित्य शंकित ते लोभी । निद्रा भयही न पोटीं ॥६॥
राव, चोर, शत्रु, आप्त । पशुपक्ष्यांचा विरोध ॥७॥
काल, याचक, स्वशंका । ऐसे शत्रु त्या सर्वदा ॥८॥
धनप्राणास्तव ऐसे । कष्ट घ्यावे कासयातें ॥९॥
वासुदेव म्हणे ऐसी । स्थिरबुद्धि विवेक्याची ॥१०॥

१०५
प्रल्हादा, मी गुरु स्वीकारिले दोन । कंठितो जीवन तेणें ऐसें ॥१॥
मधुमक्षिका ते कष्ट करी नित्य । वंचिती तियेस परी अन्य ॥२॥
पाहूनि वैराग्यबोध मज होई । गुरु मज पाहीं यास्तव ते ॥३॥
यदृच्छालाभेंचि संतुष्ट अंतर । पाहूनि अजगर तोषलों मी ॥४॥
निंदो वंदो कोणी कदान्न पक्वान्न । लाभतांही मन तुष्ट माझें ॥५॥
लाभें अलाभेंही सदा मी संतुष्ट । कदा महावस्त्र वाकळ वा ॥६॥
पर्यंक धूळही शय्या मज होई । कस्तूरी पंकही सम मज ॥७॥
कदा अंबारीही अंबर न कदा । देतों आशीर्वादा निंदकांही ॥८॥
वासुदेव म्हणे मुनींचें वर्तन । निवेदी ब्राह्मण प्रल्हादातें ॥९॥

१०६
भेदविनाशार्थ जाति-रुपऐक्य । चिंतन मुनीस हितप्रद ॥१॥
देहात्मभ्रमाचा लय व्हावा चित्तीं । व्हावी अहंवृत्ति मायालीन ॥२॥
आत्मानंदीं लीन करावें मायेतें । निर्व्यापार ऐसें व्हावें सदा ॥३॥
शास्त्रबाह्य माझें विचित्र वर्तन । भक्त तूं म्हणून निवेदिलें ॥४॥
परमहंसाच धर्म ते ऐकूनि । प्रल्हाद स्वमनीं तोष पावे ॥५॥
पूजूनि मुनीसी आनंद पावला । निजस्थळीं गेला मंत्र्यांसवें ॥६॥
वासुदेव म्हणे पुण्यभेटी ऐसी । होतसे पुण्येंचि महाभागां ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP