स्कंध ७ वा - अध्याय ५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३२
नारद बोलले धर्मराजाप्रति । शुक्राचार्यांलागीं पुत्र दोन ॥१॥
शंडा-प्रल्हादा सन्निध वसती । गुरु प्रल्हादासी योजी पिता ॥२॥
पूर्वींच प्रल्हादा राजधर्मज्ञान । न रुचे कथन गुरुंचें त्या ॥३॥
द्वैताधिष्ठित तें, यास्तव न रुचे । देहाहंभावातें दृढ करी ॥४॥
लाडिवाळपणें घेऊनियां अंकीं । पिता प्रल्हादासी एकावेळीं ॥५॥
पुशी काय बाळा, आवडे तुजसी । ऐका काय त्यासी वदला पुत्र ॥६॥
अहं-ममभावें भवार्णवीं जीव । बुडती यास्तव वनीं जावें ॥७॥
एकांतीं त्या ध्यास श्रीहरीचा । रुचे दैत्यराजा, मज बहु ॥८॥
वासुदेव म्हणे सकल जनांतें । रुचे तेंचि ज्ञाते अव्हेरिती ॥९॥

३३
ऐकूनि तें दैत्यराज । वदे हांसूनि गुरुस ॥१॥
ऐशा उपदेशें बाल - । बुद्धि, पावते भुरळ ॥२॥
दक्ष असा सर्वकाळ । शत्रु पाडितील भूल ॥३॥
गुप्तरुपें बालकासी । ऐसें न घडो कदापि ॥४॥
पुढती गुरुगृहीं जातां । गुरु पुशिती प्रल्हादा ॥५॥
बाळा, ऐसा बुद्धिभेद । केला कोणीं कथीं मज ॥६॥
स्वत:सिद्ध तव ज्ञान । अथवा अन्याचें कथन ॥७॥
स्पष्ट निवेदीं तें मज । बाळा, असेल जें सत्य ॥८॥
वासुदेव म्हणे भक्त । ऐका वदला जें प्रल्हाद ॥९॥

३४
मायाकृत मी तूं भेद मायाबद्ध - । जीवांसीच, मज बाधेना तो ॥१॥
मजवरी ऐसी कृपा ज्या ईशाची । वंदन तयासी सर्वकाळ ॥२॥
जयाच्या कृपेनें भेदभाव नासे । भेदभावें ज्यातें बघती अज्ञ ॥३॥
ब्रह्मादिकांतेंही अंत नसे ज्याचा । बुद्धिभेद माझा करी तोचि ॥४॥
चुंबकाभोंवतीं लोह भ्रमे जैसें । होई अवस्था ते सहज माझी ॥५॥
कारण तयाचें कळेना मजसी । वंदी बालकासी वासुदेव ॥६॥

३५
ऐकूनि तें गुरु होई बहु क्रुद्ध । आण पाहूं वेत्र गर्जे ऐसें ॥१॥
कुलांगार आम्हां देई हा अयश । ताडनचि यास योग्य असे ॥२॥
दैतेयचंदनवनीं हा बाभुळ । संहाराया कुळ सिद्ध झाला ॥३॥
वेळींच शासनाविण न उपाय । दावूनियां भय ऐसें बहु ॥४॥
त्रिवर्गसाधन पढविलें ऐसें । तैसे उपाय ते सामादिक ॥५॥
धाडितां मंदिरीं शृंगारी त्या माता । पाठवी पित्याच्या भेटीस्तव ॥६॥
वंदितां त्या दैत्य देई आशीर्वाद । निवेदितो वृत्त वासुदेव ॥७॥

३६
अंकीं घेऊनियां धरी हृदयासी । हुंगूनि मस्तकीं प्रेमें न्हाणी ॥१॥
होईं चिरंजीव बाळा, म्हणे राव । अध्ययन काय कथीं झालें ॥२॥
उत्कृष्ट जें तुज येई तें निवेदीं । प्रल्हाद पित्यासी वदला तदा ॥३॥
श्रवण, कीर्तन, विष्णूचें स्मरण । तत्पादसेवन, पूजनही ॥४॥
वंदन, दास्य तैं आत्मनिवेदन । श्रेष्ठ अध्ययन ताता, हेंचि ॥५॥
वासुदेव म्हणे ऐकूनि तें दैत्य । बोलला विप्रांस क्रोधावेशें ॥६॥

३७
अनादर माझा करुनियां नीच । पढविती काय बालकासी ॥१॥
सहाय्यक तुम्ही दुष्टहो, शत्रूचे । योग्य वेळीं पापें प्रगट होती ॥२॥
शंडामर्क तदा बोलले दैत्यासी । स्वयमेव बुद्धि पुत्राची हे ॥३॥
कोणीही न ऐसें पढविलें तया । क्रोध हा कासया आम्हांवरी ॥४॥
ऐकूनि तें दैत्य क्रोधें म्हणे पोरा । बुद्धि हे तुजला कसी सांगें ॥५॥
वासुदेव म्हणे प्रल्हाद विनम्र । देतसे उत्तर काय ऐका ॥६॥

३८
संसारनिमग्न विषयी जनांसी । कदाही न भक्ति हृदयीं ठसे ॥१॥
स्वयें, उपदेशें, सज्जनसंगें वा । संसार हा मिथ्या न कळे त्यांसी ॥२॥
संसारमिथ्यात्व बिंबे जयांप्रति । तयांसीच भक्तिसौख्य लाभे ॥३॥
बाह्य विषयचि जयाचे पुरुषार्थ । ज्ञान त्याचें व्यर्थ असूनि गुरु ॥४॥
अंधचि तो गुरु अंधचि तो शिष्य । अंधाप्रति अंध मार्गदर्शी ॥५॥
अर्थवादवाक्यदावणीनें बद्ध । कदाही न मुक्त होती जन ॥६॥
महापुरुषाचा चरणधूलिस्पर्श । घडेल तरीच मुक्ति तयां ॥७॥
वासुदेव म्हणे बोलूनि प्रल्हाद । होई स्वस्थ शांत आत्मानंदें ॥८॥

३९
ऐकूनियां दैत्यराज । खवळला जैसा व्याघ्र ॥१॥
अंकावरुनि खालतीं । लोटी क्रोधें बालकासी ॥२॥
गर्जे दैत्यहो, हा वध्य । करा सत्त्वरी विनष्ट ॥३॥
बंधुपातक्याच्या पाई । मूढ लोळण हा घेई ॥४॥
पुत्र नव्हेचि हा माझा । शत्रुहूनि शत्रू साचा ॥५॥
प्रेम माता-पितरांचें । बाळपणींच ज्या नसे ॥६॥
ऐसा अधम, विष्णूचें । हित काय करुं शके ॥७॥
परकाही हितकारी । पुत्र जाणावा अंतरीं ॥८॥
पुत्रही जो विनाशक । जाणा शत्रूचि प्रत्यक्ष ॥९॥
अवयवही तो छेद्य । जरी नाशील सर्वांग ॥१०॥
यत्न करुनियां सर्व । वधा नीचातें सत्वर ॥११॥
वासुदेव म्हणे नाश । करी नराचा अविवेक ॥१२॥

४०
ऐकूनियां दैत्यराजाची ते आज्ञा । भान न दैत्यांना उरलें कांहीं ॥१॥
मारा, तोडा, कापा, ऐसें ओरडती । त्रिशूळ हाणिती मर्मस्थानीं ॥२॥
जगन्नियंता तो अंतरी जयाच्या । प्रहार शस्त्राचा काय तया ॥३॥
पाहूनि तें भय वाटलें दैत्यासी । भयंकर योजी मरणोपाय ॥४॥
उन्मत्त गजांच्या पायीं तुडविलें । बहु चावविले काळसर्प ॥५॥
पर्वतीं नेऊनि दरींत लोटिलें । क्रूरत्वें पुरिलें भूमीमाजी ॥६॥
घोर उपवास, पाजियेलें विष । टाकिलें अग्नींत महाक्रौर्ये ॥७॥
बुडविलें डोहीं, काय थंडीवारा । करील विचारा महाभक्ता ॥८॥
जारण-मारण तेंही झालें व्यर्थ । घाबरला दैत्य पाहूनियां ॥९॥
वासुदेव म्हणे मानूनि स्वनाश । सज्जनासी दुष्ट छळी बहु ॥१०॥

४१
शंडामर्क, दैत्या पाहूनि सचिंत । म्हणती त्रैलोक्य जिंकिलें त्वां ॥१॥
काय या पोराचें भय तुजप्रति । वरूणपाशेंसी बांधावें या ॥२॥
जोंवरी न शुक्र पातले आश्रमीं । ठेवावें बंधनीं ऐसें तया ॥३॥
वयोमान तेंवी सज्जनसंगति । घडतां सन्मति लाभे नरा ॥४॥
ऐकूनियां दैत्य, गुरुंच्या स्वाधीन - । करी, म्हणे ज्ञान शिकवा यातें ॥५॥
पुढती एकदां गुरु अन्य काजीं । असतां क्रीडेची संधि बाळां ॥६॥
प्रल्हादासी यदा पाचारिती बाळें । चित्त तैं द्रवलें सद्‍भक्ताचें ॥७॥
कनवाळूपणें करी तयां बोध । ऐकाया बालक जमले सर्व ॥८॥
वासुदेव म्हणे विकारविहीन । मानवाचें मन बोधक्षम ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP