चतुःश्लोकी भागवत - श्लोक ३३

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं ॥ पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽम्यहम् ॥३३॥

॥ टीका ॥
सृष्टिपूर्वीं मी निजरूप ॥ शुद्धब्रह्म निर्विकल्प ॥ स्वानंदकंद स्वरूप ॥ पूर्णत्वें पूर्ण अमूप मीचि स्वयें ॥४२॥
न पेरितां उंसाचीं कांडीं ॥ रस नचाखतांही तोडीं ॥ जैशी आहे उंसाची गोडी ॥ तेवीं स्वानंदस्थिती चोखडी पूर्वीं माझी ॥४३॥
बोल नयेतां वाचे आंतू ॥ बोलें न बोलतां ते मातू ॥ ते काळींचा जैसा शब्दार्थू ॥ तेवीं मी अच्युतू सृष्टिपूर्वीं ॥४४॥
दृष्टी नरिघतां दृष्टीसी ॥ भेटी न होतां दृश्यासी ॥ ते देखणी स्थिती जैसी ॥ तेवीं मी अच्युत सृष्टिपूर्वीं ॥४४५॥
न निफजतां निशाणासी ॥ घावो नघलितां तयासी ॥ तैं त्या नादाची स्थिती जैसी ॥ तेवीं मी ऋषीकेशी सृष्टिपूर्वीं ॥४६॥
रसीं नयेतां रसत्वासी ॥ रसनेनें नचाखतां त्यासी ॥ तैंच्या स्वादाची स्थिती जैशी ॥ तेवीं मी हृषीकेशी सृष्टिपूर्वीं ॥४७॥
स्त्रीपुरुषयोग जो बोधू ॥ न होतां रतीरमनसंबंधू ॥ ते काळी जैसा असे आनंदू ॥ तेंवीं मी परमानंदू सृष्टिपूर्वीं ॥४८॥
न निपजतां चराचर ॥ न होतां घटमठादि आकार ॥ गगन जैसें निर्विकार ॥ तेंवीं मी चिदंबर सृष्टिपूर्वीं ॥४९॥
पूर्वीं ह्मणावयाचें लक्षण ॥ नसतां सत्असत् कारण ॥ मी परमानंदें परिपूर्ण ॥ या नांव जाण सृष्टिपूर्वीं ॥४५०॥
सत् ह्मणिजे सूक्ष्ममूळ ॥ असत् ह्मणिजे नश्वरस्थूळ ॥ या अतीत मी निर्मळ ॥ यानांव केवळ सृष्टिपूर्वीं ॥५१॥
सूक्ष्म स्थूळ माया घटी ॥ माझ्या निजांगें जगत्वें उठी ॥ माझे पूर्णत्वाचे पोटीं ॥ भासली सृष्टी तेही मीचि ॥५२॥
सांजवेळें पडिला दोर ॥ त्यातें ह्मणती सर्प थोर ॥ तेवीं पूर्णब्रह्म परमेश्वर ॥ त्या मातें संसार मानवी ह्मणवी ॥५३॥
भिंतीवेगळें चित्र नुठी ॥ तेवीं मजवेगळी नदिसे सृष्टी ॥ मी जगद्रूप जगजेठी ॥ माझिया निजपुष्टी जगत्व जगा ॥५४॥   
जगाचें जें नांवरूप ॥ तो मी परमात्मा चित्स्वरूप ॥ माझ्या निजांगाचें स्वरूप ॥ तें विश्वरूप स्वयें भासे ॥४५५॥
जेवीं, सुवर्णाचें केलें लेणें ॥ तें सोन्यावेगळें होऊंनेणे ॥ तेवीं माझेनि पूर्णपणें ॥ जगाचें नांदणें मद्रूपें नांदे ॥५६॥
गोडी तेचि साखर देख ॥ तेवीं चिदात्मा मी तेचि हे लोक ॥ जयासी मज वेगळिक ॥ अणुमात्र देख असेना ॥५७॥
जेवीं सोनेंचि अलंकार ॥ तेवीं संसार मी सर्वेश्वर ॥ मजवेगळा वेव्हार ॥ नाहीं अणुमात्र भवभावा ॥५८॥
जेवीं तंतूवेगळा नव्हे पट ॥ मृत्तिकेवेगळा नव्हे घट ॥ अक्षरावेगळा नव्हे पाठ ॥ तेवीं मी चिद्रूपें प्रगट संसार भासे ॥५९॥
जो मी सृष्टिपूर्वीं एकला ॥ एकपणेंचि असें संचला ॥ तो मी सृष्टी आकारें आकारला ॥ परी दुजा नाहीं आला वटीं बीज जेवीं ॥४६०॥
जैसा वटाचिया पारंबिया ॥ वटीं वटरूप निघालिया ॥ तैसा मी संसारा यया ॥ स्थूलसूक्ष्ममायाकारणरूपें ॥६१॥
पारंबिया नांवाच्या भिन्नता ॥ हरवीचिना स्वस्वरूपता ॥ तेवीं स्थूलसूक्ष्म माया ह्मणतां ॥ माझी चित्सत्ता मोडेना ॥६२॥
तेवीं जगमस्थावरादि आकारें ॥ अंडजस्वेदजादिसाकारें ॥ सृष्टी भासली सृष्ट्याकारें ॥ जाण साचारें मद्रूप जग ॥६३॥
कूर्म आपुल्या स्वभावा ॥ लपवी इंद्रियें अवयवां ॥ प्रकट करीतसे तेव्हां ॥ दुजयाचा यावा स्पर्शला नाहीं ॥६४॥
तेवीं जगदाकारें होता ॥ कां आकारलोपें अलोपता ॥ माझी नमोडे अद्वैतता ॥ ऐशी चित्सत्ता संचली ॥४६५॥
कां सूक्ष्मतंतू एकवटू ॥ सहस्रसंख्या होय पटू ॥ तेवीं सृष्ट्याकारें स्पष्टू ॥ भासे मी प्रकटू परमात्मा स्वयें ॥६६॥
एवं मीचि मी सृष्ट्याकारा ॥ भूतभौतिकांदिपसारा ॥ विषमआकाराविकारा ॥ नाना कल्लोळ सागरामाजीं जैसे ॥६७॥
जे अद्वितीय अत्यंतिक ॥ निर्विकल्प वस्तु एक ॥ तेंचि केवीं जालें अनेक ॥ तदर्थींचा देख दृष्टांत दाखवूं ॥६८॥
पहातां जे गोडी उंसीं ॥ तेचि गोडी ओसंडे रसीं ॥ ते गोडी बांधयासी ॥ गूळीं गूळरूपें मुळासि झाली ॥६९॥
त्या स्वादाची साखर केली ॥ तेचि गोडी नाबद झाली ॥ ऐशी नानाकारें रूपा आली ॥ परी गोडी ते संचली जैशी तशी ॥४७०॥
तेंवी मी चिद्रूपें प्रबळ ॥ स्वयें जालों सूक्ष्मस्थूळ ॥ मायागुणें सृष्टी सकळ ॥ चित्सत्ता केवळ मीचि भासें ॥७१॥
कां मृत्तिकेचीं गोकुळें केलीं ॥ नानानामाकारें पूजिलीं ॥ परी मृत्तिकेपणा नाहीं मुकलीं ॥ तेवीं सृष्टी जाली मद्रूपें सकळ ॥७२॥
यापरी गा सृष्ट्याकारें ॥ असिजे मीया श्रीधरें ॥ तेचि सृष्टीनंतरें उरे ॥ स्वरूप साचोकारें चिन्मात्र माझें ॥७३॥
जेवीं कां कुलालाचें चक्र ॥ गरगरा भोंवें चक्राकार ॥ भंवोनि रहातां स्थिर ॥ उरे पैं चक्र चक्ररूपें ॥७४॥
तेवीं नामरूप संबंध ॥ जाऊनि भूतभौतिकभेद ॥ अंतीं उरे मी परमानंद ॥ स्वानंदकंद निजरूपें ॥४७५॥
दोर भासला सर्पाकारू ॥ सर्परूपें भासे दोरू ॥ दोरी लोपल्या अजगरूं ॥ अंतीं उरे दोरू दोररूपें ॥७६॥
जळींचिया जळगारा ॥ भासती नानाकार अपारा ॥ अंतीं विरोनियां साचारा ॥ उरती त्या नीरा नीररूपें ॥७७॥
तेवीं सृष्टीआदिमध्य अंतीं ॥ मीच एक भासे चैतन्यमूर्तीं ॥ हें सत्य जाण प्रजापती ॥ इतर उपपत्ती ते वावो ॥७८॥
जेवीं सुताचिये सुतगुंजे ॥ आदिमध्यअंतीं नाहीं दुजें ॥ तेवीं म्यां एकले अधोक्षजें ॥ सृष्टीचा होइजे आदिमध्यअंतू ॥७९॥
होकां ज्याचें नांवं ह्मणती लुगडें ॥ तें पाहों जातां सूतचि उघडें ॥ तेवीं जग पहातां धडफूडें ॥ आद्यंतीं चोखडें निजरूप माझें ॥४८०॥
यालागीं सृष्टिआदी मीचि असें ॥ सृष्टिरूपें मीचि भासें ॥ अंतीं सृष्टीचेनि नाशें ॥ म्यां उरिजे अविनाशें अच्युतानंतें ॥८१॥
हे माझिया स्वरूपाची स्थिती ॥ सत्य सत्य यथानिगुती ॥ तुवां माया पुशिली प्रजापती ॥ तेही उपपत्ती ऐक सांगेन ॥८२॥
यथाऽऽत्ममायायोगेन ॥ हा माया विषयिंक प्रश्न ॥ ब्रह्मेंन पुशिला आपण ॥ तें मायेचें लक्षण सांगतां नये ॥८३॥
माया सत् ना असत् ॥ शेखीं नव्हे सदसत् ॥ माया मिथ्यत्वाचें मथित ॥ जाण निश्चित विधातया ॥८४॥
सत् ह्मणों तरी जीव नसे ॥ असत् ह्मणों तरी शस्त्रें ननासे ॥ आधीं असे पाठीं नसे ॥ ऐसे मढेंही नदिसे मायेचें डोळां ॥४८५॥
माझे मायेचें निरूपण ॥ वेद बोलों नशके आपण ॥ लक्षितां मायेचें लक्षण ॥ राहिलें सज्ञान आरोगूनि मुग ॥८६॥
माया वांझेचें लाडिकें बाळ ॥ माया गगनसुमनाची माळ ॥ माया मृगजळाचें शीतळ जळ ॥ माया तें केवळ गंधर्वनगर ॥८७॥
माया रज्जुसर्पाचें मृदु अंग ॥ माया शुक्तिकारजताची सांग ॥ माया आकाशींचें मर्गजलिंग ॥ माया मत्त मातंग वोडंबरीचा ॥८८॥
माया स्वप्नींची सोनकेळी ॥ माया आरशाची चाफेकळी ॥ माया कमठघृताची पुतळी ॥ माया मृगजळींची सोंवळी स्वयंपाकिण ॥८९॥
माया असत्याची निजमाये ॥ माया बागुला प्रतिपाळी धाये ॥ माया चित्रींची दीपद्राक्ष खाये ॥ माया मुख्यत्वें राहे मिथ्यत्वापाशीं ॥४९०॥
ऐशिये मायेचें निरूपण ॥ मी निरोपूं नशकें आपण ॥ तरी तुझ्या प्रश्नालागीं जाण ॥ कांहीं उपलक्षण सांगेन ॥९१॥


References : N/A
Last Updated : July 30, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP