चतुःश्लोकी भागवत - श्लोक ६

एकनाथमहाराज कृत - चतुःश्लोकी भागवत


॥ श्लोक ॥
स चिंतयत् व्द्यक्षरमेकदांभस्युपाश्रृणोत् द्विर्गदितं वचो विभुः ॥ स्पर्शेषु यत्षोडशमेकविंशं निष्किंचनानां नृपयद्धनं विदुः ॥६॥

N/A॥ टीका ॥
एवं कमलासनीं ब्रह्मा आपण ॥ बैसलासे अनुतापें पूर्ण ॥ तंव एकार्णवीं निकट जाण ॥ द्व्यक्षर वचन द्विवार ऐके ॥८५॥
कोण रूप कोण वर्ण ॥ कैसेपरीचें उच्चारण ॥ त्या अक्षरांचा अर्थ कोण ॥ तेंही लक्षण ऐक राया ॥८६॥
तकारापासुनी पकारावरी ॥ ऐसें ब्रह्मा साक्षात्कारी ॥ त्याची ऐक्यता झडकरी ॥ हो लवकरी विधात्या तुज ॥८७॥
ऐसीं तपहीं अक्षरें दोन्ही ॥ परमेष्टी ऐके कानीं ॥ तेचि दोन्ही वेळा करूनी ॥ तपतप हे ध्वनी परिसत ॥८८॥
जैसा परमआप्त येऊनी ॥ हितोपदेश सांगे कानीं ॥ तेवीं आईकोनी दोन्ही ॥ विधाता मनी चमत्कारला ॥८९॥
हें परस्वियांचें निजधन ॥ यालागीं ते तपोधन ॥ तपोबळें ऋषिजन ॥ प्रतिसृष्टि जाण करूं शकती ॥९०॥
नवल तपाचें कौतुक ॥ तापसां भिती ब्रह्मादिक ॥ तपस्वियाचें नवल देख ॥ दशावतारादिक विष्णूसी ॥९१॥
तपाचेनि नेटपाटीं ॥ सूर्यमंडळ तपे सृष्टी ॥ तपाच्या बळें निजनेटीं ॥ दर्भाग्रीं सृष्टी धरिती ऋषि ॥९२॥
तपोबळें समुद्रा क्षारं केलें ॥ यादवकुळ निर्दाळिलें ॥ शिवाचें लिंगपतन झालें ॥ क्षोभलेनी बोलें तपोधनी ॥९३॥
जे सत्यवादी संतसज्जन ॥ जे वासरात्यागी अकिंचन ॥ तप हें त्याचें निजधन ॥ सत्य जाण नृपनाथा ॥९४॥
तप तें परम निधान ॥ साधकाचें निजसाधन ॥ ब्रह्मप्राप्तीचें दिव्यांजन ॥ ऐकोनी चतुरानन विचारी ॥९५॥


References : N/A
Last Updated : July 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP