अध्याय ५३ वा - श्लोक ५१ ते ५५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


शुचिस्मितां बिंबफलाधरद्युतिशोणायमानद्विजकुंदकुड्मलाम् ।
पदा चलंतीं कलहंसगामिनीं । सिंजत्कलानूपुरधामशोभिना ।
विलोक्य वीरा मुमुहुः समागता यशस्विनस्तत्कृतहृच्छयार्दिताः ॥५१॥

अधर दोन्ही झाले सदह्र । बिंबफळें रंगाकार । ते तव परिपाकें नश्वर । हे अनश्वर हरिरंगें ॥२६०॥
भीमकीअधरामृतगोडी । एक कृष्णाचि जाणे धडफुडी । एकाएकीं घालूनि उडी । नेईल रोकडी प्रत्यक्ष ॥६१॥
मुखामाजि दंतपंक्ति । जैशा ॐकारामाजि श्रुति । चौकीचे चार्‍ही झळकती । सोहमस्मि सोलींव ॥६२॥
अधरातळीं हनुवटी । गोरेपणें दिसे गोमटी । तेथेंहि श्यामप्रभा उठी । कृष्णवर्ण गोंदिलें ॥६३॥
वनिताअधरीं सुवर्णफांसा । पडोनि मुक्त आलें नासा । भुलवावया कृष्णपरेशा । उपावो कैसा देखिला ॥६४॥
भीमकीनाकींचें सुपाणी । सहज देखेल शार्ङ्गपाणि । अधोमुख अनुष्ठानीं । वोलकंबत हरिलागीं ॥२६५॥
हळदी मिनली हेमकळा । तेणें उटिलें मुखकमळा । तेज झळकत गंडस्थळा । सूर्यकाळा लाजिल्या ॥६६॥
भीमकीमुखकमळ अहेवतंतु । कंठीं धरिला नटुतटु । दिसोनि नेदी लोकांआंतु । केला एकांत निजकंठीं ॥६७॥
कृष्णमणि अहेवतंतु । कंठीं धरिला नटुतटु । दिसोनि नेदी लोकांआंतु । केला एकांत निजकंठीं ॥६८॥
फिटला चिंतेचा अभिलाख । म्हणोनि न घलीच चिंताक । कृष्णपदींचा पदाङ्क । तेंचि पदक हृदयींचें ॥६९॥
पृथ्वी नवखंडें खंडली । जड जाड्यत्वा उगवली । भीमकीचे आंगीं घाली । सुनीळ झाली कांचोळी ॥२७०॥
पावावया कृष्णदेवो । सांडिला सवतीमत्सरभावो । आलिंगावय कृष्णरावो । धरा पाहें धांविन्नले ॥७१॥
एकें आंगीं भिन्नपणीं । जीव शिव वाढले दोन्ही स्थानीं । तेणें झाली व्यंजनस्तनीं । कुचकामिनी कुचभारें ॥७२॥
विद्या अविद्या पाखें दोन्ही । आच्छादिले दोन्ही स्थानी । दाटले त्रिगुणाचे कसणी । कृष्णावांचूनि कोण सोडी ॥७३॥
भीमकीकृष्णांसि आलिंगन । तेणें जीवशिवसमाधान । यालागिं दोन्ही उचलले जाण । कृष्णस्पर्शन वांच्छिती ॥७४॥
मुक्तानाम मुक्ताफळा । नेणती मुक्तीचा जिव्हाळा । म्हणोनि पडिली भीमकीगळां । भेटी गोपाळा माळ झाली ॥२७५॥
पूर्वीं क्षीरसिंधूची बाळा । नेसली क्षीरोदक पाटोळा । ना तो पहावया कृष्णसोहळा । कांसे लागला क्षीराब्धि ॥७६॥
माझी कन्या हे गोरटी झणें कोण्हाची लागेल दृष्टि । म्हणोनि घातलीसे कंठीं । रत्नमाळा क्षीराब्धि ॥७७॥
प्रकृतिपुरुषां पडली मिठी । तैसें बिरडें कांचोळिये दाटी । कृष्ण सोडील जगजेठी । आयाबायांतें न सुटे ॥७८॥
शमदमादि सुघटें । हस्तकटकें बाहुवटें । करीं कंकनें उद्भटें । कृष्णनिष्ठे रुणझुणती ॥७९॥
क्षणक्षणा दशा उजळे । तैसीं चढतीं दशाङ्गुळें । दशावतारांचिये लीले । जडित माणिक्य मुद्रिका ॥२८०॥
पहतां तळहातांचिया रंगा । उणें आणिलें संध्यारागा । करी चरणसेवा श्रीरंगा । तळवा तळहातीं सदा ॥८१॥
आटूनियां हेमकळा । आटणी घातल्या बारासोळा । वोतींव केली कटीमेखळा । मध्यें घननीळा जडियलें ॥८२॥
दोहींकडे मोतीलग । तेणें शोभतसे मध्यभाग । भीमकी भाग्याची सभाग्य । तेणें श्रीरंग वेधिला ॥८३॥
चरणीं गर्जती नूपुरें । वांकी अंदुवांचेनि गजरें । झालें कामासि चेइरें । धनुष्य पुरें वाइलें ॥८४॥
कृष्ण धरूनियां चित्तीं । चालतसे हंसगती । चैद्य मागध पाहती । मदनें ख्याति थोर केली ॥२८५॥

यां वीक्ष्य ते नृपतयस्तदुदारहासव्रीडावलोकहृतचेतस उज्झितास्त्राः ।
पेतुः क्षितौ गजरथाश्वगता विमूढा यात्राच्छलेन हरयेऽर्पयतीं स्वशोभाम् ॥५२॥

जीतें देखोनि सर्व नृपति । सलज्ज मंदस्मित इंगितीं । स्मरमोहित पडिले क्षितीं । ते स्वशोभा अच्युतीं अर्पितसे ॥८६॥
माझी अभिलाषिती जननी । म्हणोनि विंधिले कामबाणी । वीर पडिन्नले धरणी । मदनबाणीं मूर्च्छित ॥८७॥
कामें हिरतिल्या दृष्टि । धैर्य धनुष्यें गळालीं मुष्टी । भीमकी राखावी गोरटी । हेंचि पोटीं विसरले ॥८८॥
स्थींचे उलथले थोर थोर । अश्वाहूनि पडिले वीर । गजींचे कलथले महाशूर । रिते कुंजर गळदंडीं ॥८९॥
भीमकी पाहतसे सभोंवते । तंव वीर भेदिले मन्मथें । कृष्ण त्रिशुद्धी नाहें येथें । तेणें कामातें जिंकिलें ॥२९०॥
रमारमण एकांतीं । मिनल्या कामा नुपजे चित्तीं । त्यालागिं नामें तो श्रीपति । भाव निश्चिती भीमकीचा ॥९१॥

सैवं शनैश्चलयती चलपद्मकोशौः प्राप्तिं तदा भगवतः प्रसमीक्षमाणा ।
उत्सार्य वामकरजैरलाकानपागैः प्रपतान्ह्रियैक्षत नृपान्ददृशे‍च्युतं सा ॥५३॥

कामबाणीं नव्हे च्युत । यालागिं नामें तो अच्युत । भोग भोगूनि भोगातीत । कृष्णनाथ निर्धारें ॥९२॥
कृष्ण पहावया लोभें उठी । सलोभ केश आडवे दृष्टि । धरूनि ऐक्याचिये मुष्टि । सुमनें वीरगुंठी बांधिली ॥९३॥
कृष्ण पहावया भाव एक । तो तंव अर्काचाही अर्क । नयनीं नयना प्रकाशक । यदुनायक केंवि दिसे ॥९४॥
निजभावें पाहे गोरटी । तंव घनश्याम देखे दृष्टि । लाजा वृत्ति झाली उफराटी । तंव जगजेठी धांविन्नला ॥२९५॥

तां राजकन्यां रथमारुरुक्षतीं जहार कृष्णो द्विषतां समीक्षताम् ।
रथं समारोप्य सुपर्णलक्षणं राजन्यचक्रं परिभूय माधवः ।

उपरमोनि पाहे सुंदरी । तंव आंगीं आदळला श्रीहरी । प्रेमें सप्रेम घाबरी । करीं धरीं निजमाळा ॥९६॥
वीरां अभिमान झाला अस्त । मध्याह्नीं आला गभस्त । मुहूर्तीं सुमुहूर्त अभिजित । समयो वर्तत लग्नाचा ॥९७॥
काळ सावधान सांगत । सूर्य लग्नघटिका पाहत । वियोग अंतःपट सोडित । भावार्थ म्हणत ॐपुण्य ॥९८॥
भीमकी पाहे कृष्णवदन । नयनीं विगुंतले नयन । दोहींचा एक झाला प्राण । पाणिग्रहण । जीवशिवां ॥९९॥
ऐसिया भावाचेनि निवाडें । माळ घातली वाडेंकोडें । वीर मूर्च्छा व्यापिले गाढें । आडवा पुढें कोणी न ये ॥३००॥
यापरी शार्ङ्गपाणि । रुक्मिणी रथीं वाहूनि । निघता झाला तत्क्षणीं । प्रकट परी कोण्ही न देखे ॥१॥
एकाएकीं वनमाळी । रथीं वाहूनि भीमकबाळी । आला यादवांजवळी । पिटिली टाळी सकळिकीं ॥२॥
त्राहाटिल्या निशाणभेरी । गगन गर्जे मंगळतुरीं । देव वर्षती अंबरीं । जयजयकार प्रवर्तला ॥३॥
यादव गर्जती महावीर । सिंहनाद करिती थोर । भीमकी आनंदें निर्भर । वरिला वर श्रीकृष्णा ॥४॥
हरिखें नाचत नारद । आतां होईल दारुण युद्ध । यादव आणि मागध । झोंटधरणी भिडतील ॥३०५॥
रथ लोटती रथावरी । असिवार असिवारीं । कुंजर आदळती कुंजरीं । महावीरीं महावीर ॥६॥
शस्त्रें सुटतील गाढीं । वीर भिडतील कडोविकडी । डोळेभरी पाहेन गोडी । शेंडी तडतडी नारदाची ॥७॥
थोर हरिखें पिटिली टाळी । साल्या मेहुण्या होईल कळी । कृष्ण करील रांडोळी । तेही नव्हाळी देखेन ॥८॥
एका जनार्दन म्हणे । रुक्मिणीहरण केलें कृष्णें । वीरवर वाळती धांवणें । युद्ध सत्राणें होईल ॥९॥
रसाळ कथा आहे पुढां । रणीं नाचेल रणधेंडा । वोवाळणी बाणप्रचंडा । परस्परें पडतील ॥३१०॥
ऐका युद्धाची कुसरी । युद्ध मांडेल कवणेपरी । क्रोधें झुंजती झुंझारी । मुक्ति चार्‍ही कामार्‍या ॥११॥

इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां भीमकीहरणं नाम सप्तमप्रसंगः ॥७॥ श्रीकृष्णाय० ॥

ततो ययौ रामपुरोगमैः शनैः श्रृगालमध्यादिव भागहॄद्धरिः ॥५४॥
तं मानिनः स्वाभिभवं यशःक्षयं परे जरासंधवशा न सेहिरे ।
अहो धिगस्मान्यश आत्तधन्वनां गोपैर्हृतं केसरिणां मृगैरिव ॥५५॥

रिघोनि जंबुकांभीतरी । आपुला भाग ने केसरी । तैसी वेढिली महावीरीं । नेली नोवरी श्रीकृष्णें ॥१२॥
सांगातिणी जिवें भावें । जडल्या होत्या भीमकीसवें । त्या त्यजूनि कृष्णदेवें । नेली निजभावें भीमकी ॥१३॥
आंदण्या अविद्येच्या दासी । मोहममतेच्या सखियांसी । सांडूनि नेलें भामकीसी । उकसाबुकसीं स्फुंदती त्या ॥१४॥
सुडावीत नेली ते वधू । लाजिला अभिमानिया बंधू । अपूर्ण कामें उपजे क्रोधु । तैसा मागधु धांविन्नला ॥३१५॥
कोणें नेलें नोवरीसी । येरी म्हणती लाज नाहें तुम्हांसी । राखों आलेति भीमकीसी । सेखीं आम्हांसी पूसतां ॥१६॥
जळो तुमचें दादुलपण । नपुंसकाहूनि हीन । वृथा गेली आंगवण । काळें वदन दावितां ॥१७॥
ऐशा धिक्करिती वनिता । मागधपमुखां वीरां समस्ता । आवेश न संवरतां चित्ता । क्षोभे अहंता धिक्करिती ॥१८॥
परम अभिमानी वीरपाठ । श्मश्रु पिळूनि चाविती ओंठ । दांतीं तोडिती मनगट । म्हणती कटकट यश गेलें ॥१९॥
यावरी आमुचें जिणें काय । धनुर्धारी हें नामधेय । उच्चारणीं लज्जा होय । मृतप्राय वाचलिया ॥३२०॥
श्रीकृष्णातें न साहोनी । यशःक्षयाची लज्जा मानीं । विवाहभंगाऐसी हानि । मानूनि ग्लानि रसरसिती ॥२१॥
अहो शतसहस्रसिंहसमाजा । माजि मृगीं रिघोनि पैजा । विजय साधूनि वोपिजे लज्जा । तेंवि सहजा आजि घडलें ॥२२॥
धिग्धिग् निर्भर्त्सिती वनिता । परतोनि मुख न दाविजे आतां । चिह्नें पुसतां कामिनीयूथा । कथिती संकेता तें ऐका ॥२३॥
पुढें अध्यायीं निरूपण । गरुडध्वज हे ऐकोनि खुण । वीर धांवोनि करिती रण । तें व्याख्यान अतिरसिक ॥२४॥
शुक निरूपी कुरुपुंगवा । रसाळ वीररसहेलावा । श्रीएकनाथवरणोद्भवा । दयार्णवा पूर्णत्वें ॥३२५॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्‍यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां रुक्मिणीहरणं नाम त्रिपंचाशत्तमोऽध्यायः ॥५३॥
श्लोक ॥५५॥ ओव्या ॥३२५॥ एवं संख्या ॥३८०॥ ( त्रेपन्नावा अध्याय मिळून ओवी संख्या २४९४० )

त्रेपन्नावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP