अध्याय ५३ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तं वै विदर्भाधिपतिः समभ्येत्याभिपूज्य च ।
निवेशयामास मुद्रा कल्पितान्यनिवेशने ॥१६॥

राव सामोरा गेला त्यासी । केलें सीमान्तपूजेसी । सम्मानूनि समस्तांसी । जानवशासी आणिलें ॥४४॥
चैद्यें मूळपत्रसंकेतीं । पाचारिले जे पक्षपाती । तेही पातले मारुतगती । महादुर्मति यदुद्वेष्टे ॥४५॥

तत्र शाल्वो जरासंधो दंतवक्त्रौ विदूरथः । आजग्मुश्चैद्यपक्षीयाः पौण्ड्रकाद्याः सहस्रशः ॥१७॥

शाल्व आणि जरासंध । आले ऐकोनि चैद्य मागध । शस्त्रें अस्त्रेंसिं सन्नद्ध । अतिउन्नद्ध बळियाढे ॥४६॥
सहस्रेंसहस्र ऐसे बळी । चैद्यपक्षप समरशाली । इच्छूनि यदुकुळेंसीं कळी । आले सकळी हरिद्वेष्टि ॥४७॥

कृष्णरामद्विषो यत्ताः कन्यां चैद्याय साधितुम् ।
यद्यागत्य हरेत्कृष्णो रामाद्यैर्यदुभिर्वृतः ॥१८॥

रामकृष्णांचे द्वेष्टे परम । चैद्यविवाहीं कलहकाम । सज्ज होऊनि दुर्मद अधम । स्वमुखें विक्रम बोलती ॥४८॥
रामप्रमुख यादवबळी । वेष्टित येऊनियां वनमाळी । जरी तो हरील भीमकबाळी । भिडों ते काळीं तेणेंसीं ॥४९॥

योत्स्यामः संहतास्तेन इति निश्चितमानसाः ।
आजग्मुर्भूभुजः सर्वे समग्रबलवाहनाः ॥१९॥

ऐसा निश्चय करूनि मनीं । संमत समग्र भूभुजश्रेणी । प्रबळ योद्धे बळवाहिनी । विदर्भपाटणीं मिळाले ॥५०॥
एक सोडूनि अंबिकापुर । कौण्डिन्यपुरींचे दिग्भाग येर । मागधप्रमुख उतरले भार । चैद्या आधार बहु झाला ॥५१॥

श्रुत्वैतद्भगवान्रामो विपक्षीयनृपोद्यमम् । कृष्णं चैकं गतं हर्तुं कन्यां कलहाशंकितः ॥२०॥

परपुरस्थवार्तालेखकीं । उग्रसेनाचिया सेवकीं । चार प्रेरूनि टाकोटाकीं । गोष्ठी ठावुकी हे केली ॥५२॥
ऐकोनि भगवान श्रीबलराम । विपक्षीय जे नृपाधम । तिहीं रचिला कलहोद्यम । मग पुसे यदुत्तम हरि कोठें ॥५३॥
रुक्मिणीहरणासि उद्यत । एकला गेला कृष्णनाथ । यादवसभेसि आली मात । झाला विस्मित बलभद्र ॥५४॥
कालि आला होता ब्राह्मण । भीमकीचें पत्र घेऊन । प्रकट न करीच श्रीकृष्ण । निवारूं म्हणोनि आम्ही कोण्ही ॥५५॥
यालागिं गुप्त केली मात । एकला गेला कृष्णनाथ । आतुर्बळी हा अनंत । नाहीं भीत कळिकाळा ॥५६॥
तो ब्राह्मण नव्हे निश्चित । मुख्य भीमकीचा भावार्थ । भावें नेला कृष्णनाथ । एकाएकीं एकला ॥५७॥
वक्त्रदंत जरासंध । शाल्व पौण्ड्रक उन्नद्ध । चैद्य मनिले पैं सन्नद्ध । होईल युद्ध दारुण ॥५८॥
कृष्ण वरील कार्यसिद्धि । हें तव न चुके त्रिशुद्धी । ठाकोनि जाणें युद्धसंधि । हेचि बुद्धि सर्वथा ॥५९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP