अध्याय ५३ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तमागतं समाज्ञाय वैदर्भी हृष्टमानसा ।
न पश्यंती ब्राह्मणाय प्रियमन्यन्ननाम सा ॥३१॥

याचिया उपकारा उत्तीर्णता । पाहतां न देखें सर्वथा । जेणें आणिलें कृष्णनाथा । त्यासि आतां म्यां काय द्यावें ॥१७॥
याचिलागिं सद्गुरूसी । उत्तीर्णता नाहीं शिष्यासी । कोण कोणा द्यावें पदार्थासी । हें वेदांसि न बोलवे ॥१८॥
चिंतामणि दे चिंतिल्या अर्था । कल्पतरु कल्पिलें देता । सद्गुरु दे निर्विकल्पता । त्यासि उत्तीर्णता कैसेनि ॥१९॥
जो चुकवी देहाचें जन्ममरण । त्यासि नव्हिजे पैं उत्तीर्ण । कोटिजन्मांचें जन्ममरण । येणें चुकविलें गुरुनाथें ॥१२०॥
देहें उतराई होऊं गुरूसी । तंव नश्वरपण त्या देहासी । नश्वर अनश्वरासी । उत्तीर्णत्वासि कदा न घडे ॥२१॥
जीवें व्हावें उतराई । तंव तो समूळ मिथ्या पाहीं । जीवासि जीवपणाचि नाहीं । होईल काई उत्तीर्ण ॥२२॥
सद्गुरूसी उत्तीर्ण होतां । न देखों कवणाही पदार्था । यालागिं चरणीं ठेविला माथा । मौनें करूनि रुक्मिणी ॥२३॥
मनीं देखोनि साचारभावो । अति संतोषला सुदेवो । म्हणे तुझेनि धर्में आम्हांसि पहा हो । कृष्णप्राप्ति साचार ॥२४॥
श्रीकृष्ण आला परिसोन । भीमकी पावली समाधान । उह्लासयुक्त जालें मन । हर्षें त्रिभुवन कोंदलें ॥१२५॥
करितां अंबिकापूजन । कृष्ण करील भीमकीहरण । एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥२६॥

इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां कृष्णविदर्भपुरागमनं नाम पंचमप्रसंगः ॥५॥

प्राप्तौ श्रुत्वा स्वदुहितुरुद्वाहप्रेक्षणोत्सुकौ ।
अभ्ययात्तूर्यघोषेण रामकृष्णौ समर्हणैः ॥३२॥

भीमकी विवाहसंभ्रम । पाहों आले कृष्णराम । हें परिसोनि भीमकोत्तम । दर्शना सकाम ऊठिला ॥२७॥
भेरी निशाण मृदंग । नाना वाजंत्रें अनेग । पूजासामग्री घेऊनि साङ्ग । समारंभेंसिं पैं आला ॥२८॥
कृष्ण देखोनि सावधान । केलें साष्टाङ्गनमन । कृष्णें दिधलें आलिंगन । विस्मित मन रायाचें ॥२९॥
मूळेंवीण तूं आलासी । परम सुख हेंचि आम्हांसी । शब्देंविण सोइरा होसी । तूं जाणसी ब्रह्मसूत्र ॥१३०॥

मधुपर्कमुपानीय वासांसि विरजासि सः ।
उपायनान्यभीष्टानि विधिवत्समपूजयत ॥३३॥

वरवरिष्ठ कृष्णरावो । मनीं धरूनि हाचि भावो । मधुपर्कविधि पहा हो । पूजाविधान करीतसे ॥३१॥
नानापरीचीं उपायनें । वस्त्रें अळंकार भूषणें । अंगीकारिलीं श्रीकृष्णें । जिवींचे खुणे जाणोनी ॥३२॥
बलभद्राचि प्रमुख । जे जे आले यादवादिक । त्यांची पूजा केली देख । यथोचित विधानें ॥३३॥

तयोर्निवेशनं श्रीमदुपकल्प्य महामतिः ।
ससैन्ययोः सानुगयोरातिथ्यं विदधे यथा ॥३४॥

जानवसा नगरा आंत । देतां बोलिला कृष्णनाथ । विरोध आम्हां मागधांत । निकट वास करूं नये ॥३४॥
जवळी असतां बोलावोली । शोभनामाजी वाढेल कळी । निकुरा जाईल रांडोळी । आम्हां आणि रुक्मिया ॥१३५॥
याहूनि पाउलें दोनी दुरी । राहों नगराबाहेरी । ठाव द्यावा अंबिकापुरीं । ऐसें श्रीहरि बोलिला ॥३६॥
राजा हासिन्नला मनीं । होय बुद्धिमंत शार्ङ्गपाणि । ठाव दिधला अंबिकास्थानीं । घाव निशाणीं घातला ॥३७॥
राजा म्हणे चक्रपाणि । मार्ग नगरा जीमधूनी । कृष्णदर्शना उदित राणी । यालागूनि बुद्धि केली ॥३८॥
जाणोनियां तोचि भावो । रथीं चढिन्नला कृष्णदेवो । आपणा जवळी बैसविला रावो । थोर उत्साह वो मांडिला ॥३९॥
लागली वाजंत्रांची घाई । चामरें ढळती दोहीं बाहीं । बंदिजन गर्जती पाहीं । कृष्णकीर्तकीर्तनें ॥१४०॥
छेदावया हृदयबंध । साधकांमाजि रिघे बोध । तैसा प्रवेशला गोविंद । नगरामाजि निजबळें ॥४१॥

कृष्णमागतमाकर्ण्य विदर्भपुरवासिनः ।
आगत्य नेत्रांजलिभिः पपुस्तन्मुखपंकजम् ॥३५॥

नगरा आला जी श्रीकृष्ण । नगरनागरिकजन । उताविळ कृष्णदर्शन । करावया धाविन्नले ॥४२॥
कृष्ण पहावया नरनारी । मुंडमघसणी होतसे भारी । एक चढलीं माडिया गोपुरीं । पहावया हरि स्वानंदें ॥४३॥
कृष्णमुखकमल सुंदर । जननयन तेचि भ्रमर । तेथेंचि गुंतले साचार । कृष्णआमोद सेविती ॥४४॥
नयनद्वारें जी प्राशन । करूनि हृदयीं आणिती कृष्ण । सबाह्य देखती समसमान । समदृष्टी कृष्णातें ॥१४५॥
ऐसा देखोनि श्रीपति । कृष्णमय झाली वृत्ति । लवों विसरलीं नेत्रपातीं । कृष्णमूर्ति पाहतां ॥४६॥
घेऊनि बोधाची वेताटी । विवेकदृश्याची मांदी लोटी । तैसा सात्विक जगजेठी । जनसंकुलिता वारित ॥४७॥
मागें परात्मा कृष्णवीर । करूनि निजबोधाचा भार । चालतसे स्थिर स्थिर । आत्मस्थितीच्या पाउलीं ॥४८॥
बोलती नरनारी सकळा । कालीं मिरविलें गे शिशुपाळा । न देखों नोवरपणाची कळा । नाहीं जिव्हाळा लग्नाचा ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP