अध्याय ५२ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


इति श्रीरुक्मिणीस्वयंवर एकाकार टीकायां
रुक्मिणीलावण्यवर्णनं नाम प्रथमप्रसंगः ॥१॥

कृष्णेंसिं शरीरसंबंधु । हा बोलचि तंव असंबंद्धु । वडिलपणें घेतला छंदु । बुमिद्धंदु म्हातारा ॥७६॥
कृष्णसोयरीक नये कामा । हें काय कळलें नाहीं तुम्हां । सखा मारिला अहंमामा । तो काय आम्हां धड होईल ॥७७॥
एक म्हणती नंदाचा । एक म्हणती वसुदेवाचा । ठाव नाहें बापाचा । अकुळी साचा श्रीकृष्ण ॥७८॥
मुळींच नाहीं जन्मपत्र । कवण जाणे कुळगोत्र । कृष्ण नव्हे जी स्वतंत्र । भक्तपरतंत्र सदाचा ॥७९॥
कृष्ण कृष्णपणें बहुकाळा । गोगोरक्षक गोवळा । तो तंव माणुसपणावेगळा । नामरूप त्या नाहें ॥४८०॥
कर्में पाहतां तो परद्वारीं । गोगोरसांची चोरी करी । धरितां न धरवे निर्धारीं । चोरटा हरि चित्ताचा ॥८१॥
गायींपाठीं धांवतां । पळों शिकला तो तत्त्वता । काळयवनापुढें पळतां । जाला रक्षिता मुचुकुंद ॥८२॥
कृष्ण वीर नव्हे गाढा । पळाला जरासंधापुढां । भेणें समुद्राचिया अगडा । माजिले दुर्गीं वसतसे ॥८३॥
केशिया मारिलें तट्टु । बैल मारिला अरिष्टु । इतुकियासाठीं वीरघाटु । केंवि सुभटु म्हणावा ॥८४॥
मारिलें वत्सासुर वांसरूं । बकासुर तें पांखरूं । किरडूं मारिलें अघासुरु । इतुकेन बीर केंवि होय ॥४८५॥
कृष्णासि उघड नाहीं वर्तणें । सदा संसारीं लपणें । त्याचीं जाणें मी विंदानें । लपतीं स्थानें ऐक पां ॥८६॥
चढे वैकुंठीचिये पहाडीं । क्षीरसागरीं देतसे बुडी । शेषाचिये फडेबुडीं । मिसें निद्रेचेनि राहे ॥८७॥
विघ्ने देखोनियां थोर । होय मत्स्य कां सूकर । नातरी पाठी करूनियां निवर । रूप धरी कमठाचें ॥८८॥
दैत्य देखोनियां भारी । खांबामाजि तो गुरगुरी । बळें काढिल्या बाहेरी । नर ना सिंह होऊनि ठेला ॥८९॥
दैत्य देखोनियां सबळ । जाला भिकारी केवळ । बळीनें केला द्वारपाळ । गळां बाधोनि द्वारेंसीं ॥४९०॥
सवेंचि खुजटपण सांडिलें । रूप आणिकचि मांडिलें । दैत्य फळकट कांडिले । मजूर जाले मायेचे ॥९१॥
राखतां इंद्राची गाय । दैत्यीं मारियली माय । रडे ये माये ये माये । सांगों काय तयाचें ॥९२॥
थोर मांडलें सांकडें । तैं मेळविलीं मांकडें । आतांचि पाहा पां रोकडें । गोवळांपुढें नाचतसे ॥९३॥
कृष्णाची आणीक काहणी । तो स्त्री जाला पैं मोहिनी । सुरासुरांतें ठकोनी । महादेवो मोहिला ॥९४॥
सेखीं जाला तो म्हाळसा । वासु केला त्या नेवासा । त्याचेनि धर्में राहो कैसा । रविचंद्रांसि लागला ॥४९५॥
कृष्णासि नाहीं रूपगुण । न देखों एकदेशीं स्थान । तयाचे गांठीं कैचें धन । भाजीचें पान खातसे ॥९६॥
कृष्णासि नाहीं देहाभिमान । नेणे मान कीं अपमान । त्यासि कैचें सिंहासन । वृत्तिशून्य वर्तत ॥९७॥
कृष्णाचा भाव एक । नव्हे स्त्री पुरुष ना नपुंसक । पाहतां निश्चयो नव्हे एक । निष्टंक निर्धारु ॥९८॥
तयासि माया दोने पाहीं । दोघी वर्तती दोहे ठायें । एक देही एक विदेही । देवकी आणि यशोदा ॥९९॥
एकी स्वबोध उपजविती । दुजी वाढवी विषयप्रीति । दोघी सांडूनि तळमळिती । धर्माप्रति धांविन्नला ॥५००॥
उच्छिष्टें काढी धर्माघरीं । ब्राह्मणाची भीड थोरी । लाता घाणिल्या उरावरी । तें पद मिरवी निलाजिरा ॥१॥
त्या कृष्णासीं सोयरीक करणें । तेंचि आम्हां विटंबवाणें । संसारीं मुख केंवि दाखविणें । लाजिरवाणें लोकांत ॥२॥
त्यासि द्यावें जी भावंड । तैंचि आमुचें काळें तोंड । या बोला म्हणाल पाखंड । ज्ञाते उदंड तुम्हांपासीं ॥३॥
कृष्ण अतीत चहूं वाचां । तेथ वाग्निश्रयो घडे कैंचा । शब्दें निश्चयो नव्हे साचा । सत्य वाचा हे माझी ॥४॥
बोला भाके जो सांपडे । त्यासीच वाग्निश्रयो घडे । हें तंव तेथ अवघेंचि कुडें । जाणत वेडे कां होतां ॥५०५॥
कुलकर्माचा अंत । आपणासंकट सकळांचा घात । करणें आहे जीवाआंत । तरीच कृपनाथ वरावा ॥६॥
जैसे निजतत्व निर्मळ । तैसा राया राहें तूं निश्चळ । कुलाभिमाने मी सबळ । देहसंबंध मी जाणें ॥७॥
जन्म कर्म कुल गोत्र । उंच नीच वर्ण विचित्र । कामाचें जें कर्ममंत्र । जाणता स्वतंत्र मी एक ॥८॥
शरीरसंबंधाचें कारण । घटित आहे मजअधीन । प्रकृतिपुरुषां पाणिग्रहण । माझेनि जाण होतसे ॥९॥
वचन ऐका जी प्रबळ । चैद्यदेशींचा भूपाळ । महाभिमानिया शिशुपाळ । सोयिरा केवळ तो आम्हां ॥५१०॥
शरेरसंबंधाचें घटित । तयासीच आहे निश्चित । तुम्ही बैसलेति पंडित । उचितानुचित विचारा ॥११॥
कर्मकाण्डींचे वेदपाठक । बोलावूनि ज्योतिषी गणक । वाग्निश्चयाचें वाग्जालिक । शब्दशास्त्र सोडिलें ॥१२॥
मेळ पांचां पंचकांचा । शब्दनिश्चयो तेणेंचि साचा । साभिमानें गर्जे वाचा । सोयिरा अमुचा शिशुपाळ ॥१३॥

तदवेत्यासितापाम्गी वैदर्भी दुर्मना भृशम् ।
विचिंत्याप्तं द्विजं कंचित्कृष्णाय प्राहिणोद् द्रुतम् ॥२६॥

रुक्मिणीनें काया मनें वाचा । निश्चयो केला श्रीकृष्णाचा । बाहेरी निश्चयो शब्दींचा । शिशुपाळेंसीं रुक्मिया ॥१४॥
लग्नपत्रिका पाहतां डोळां । एक नाडी शिशुपाळा । कृष्ण नेईल भीमकबाळा । त्यासि अवकळा वरील ॥५१५॥
वर शिशुपाळ ऐकतां । दचकले ते राजदुहिता । जैसा सिद्धासि सिद्धिलाभ होतां । उठी अवचिता अंतराय ॥१६॥
कवण उपासूं गे देवता । कवण कवण्या जाऊं तीर्था । कवण नवस नवसूं आतां । कृष्णनाथप्राप्तीसी ॥१७॥
जैसा सद्बुद्धिआड काम क्रोधु । कां विनेतते आड गर्व मदु । स्वधर्माआड आलस सिद्धु । तैसा बंधु रुक्मिया ॥१८॥
जैसा विवेक विरागी । विघ्नें जिणोनि जाय वेगीं । तैसा प्रयत्न कृष्णालागीं । करीन स्वाङ्गीं मी देखा ॥१९॥
कृष्णप्राप्तीचा विचार । तेथें करूं नये दुजयाचा संचार । वृत्ति करावी तदाकार । धैर्यें बळें आपुलेनी ॥५२०॥
हें गुज सांगों मायेपासीं । परि हें साध्य नव्हे तियेसी । रडों निघेल मोहें कैसी । मिठी लोभेंसीं घालूनि ॥२१॥
माझिये आशेच्या साजणी । दीनतृष्णेच्या साजणी । मिळतील सवासना सुवासिनी । मज वेढूनि घेतील ॥२२॥
तेणें होईल थोर शब्दु । ऐकेल अभिमानिया बंधु । कृष्णप्राप्तीसि अवरोधु । सबळ क्रोध उपजेल ॥२३॥
ऐसें विचारूनि जाण । निज भावाचा ब्राह्मण । आप्त पाचारिला सज्ञान । अतिगहन विवेकी ॥२४॥
कृष्णप्राप्तीचा सद्भावो । यालागिं नामें तो सुदेवो । कृष्णाप्रति धाडिला पहावो । निज पत्रिका देऊनी ॥५२५॥
सातां श्लोकांची व्युत्पत्ति । उपचार भाव आर्ति कीर्ति । विवेकनिश्चयो निजभक्ति । कृष्णासि विनति पाठविली ॥२६॥
एका जनार्दनीं मन । श्रोतीं द्यावें अवधान । प्रेमपत्रिकेचें लेखन । अनुसंधान भीमकीचें ॥२७॥

इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवर एकाकार टीकायां
रुक्मिणीकृत स्तुत्यात्मकनिंदावर्णनं नाम द्वितीयप्रसंगः ॥२॥

आपुलिये अर्तीचें अंजन । शुद्धसत्वाचें पत्र जाण । बुद्धिबोधें केलें लेखन । वर्णाक्षरीं अक्षर ॥२८॥
मनोवेगाचा पैं वारु । त्यावरी बैसविला द्विजवरु । कृष्णापासीं जी सत्वर । समूळ मूळ पाठविला ॥२९॥
माझें पूर्वपूण्य द्विजवरु । कृष्णप्राप्तीसि तूं मज गुरु । म्हणोनि केला नमस्कारू । तेंवि यदुवीर आणावा ॥५३०॥

द्वारकां स समभ्येत्य प्रतीहारैः प्रवेशितः ।
अपश्यदाद्यं पुरुषमासीनं कांचनासने ॥२७॥

द्विज पावला द्वारका । वैकुंठकैलासाहूनि अधिका । जेथ निवास जगन्नायका । विश्वव्यापका श्रीकृष्णा ॥३१॥
द्वारकाबाह्यप्रदेशीं । आराम रमवी जीवशिवांसी । वसंत निववी सदा सुमनेंसीं । संताप कोण्हासि असेना ॥३२॥
प्रेमें विकाशलीं कमलें शुद्ध । गुंजारवती कृष्णषट्पद । ऐकोनि गंधर्व जाले स्तब्ध । सामवेद मौनावे ॥३३॥
प्रबोधपारापतें घुमती । तेणें वागीश्वरी चबंके चित्तीं । विस्मित जाला बृहस्पति । आश्चर्ये मानिती सुरवर ॥३४॥
डोलत द्राक्षींचे पैं घड । मुक्त परिपाकें अतिगोड । सकळ कामांचे पुरे कोड । गोडांही गोड ते गोडी ॥५३५॥
कोकिला कृष्णवर्ण कूजती । शब्दीं निःशब्द मधुरवृत्ति । तेणें सनकादिक सुखावती । प्रजापति तटस्थ ॥३६॥
मयूर आनंदें नाचत । अप्सरानृत्य तेणें तटस्थ । ताण्डव विसरला उमाकान्त । अति अद्भुत हरिलीला ॥३७॥
शुद्ध हंस द्वारकावासे । मुक्तमोतियें चारा त्यांसी । तें देखोनि परम हंसीं । निजमानसीं लाळ घोंटिजे ॥३८॥
शुक पिंगळे अनुवादत । तेणें वेदान्त दचकत । अतिगुह्याचे निजगुह्यार्थ । पक्षी बोलत द्वरकेचे ॥३९॥
इतर नगरांची उभवणी । तिंखणांवरी पांचखणीं । त्याही माजि असती दुखणीं । द्वारकपाटणीं तें नाहीं ॥५४०॥
द्वारका पाहतां वाडेंकोडें । विजु पिळूनि घातले सडे । मुक्तपताका चहूंकडे । मशक आरी त्यापुधें सत्यलोक ॥४१॥
द्वारकेची नवलपरी । चिंतामणीची चिंताहरी । कल्पतरूची कल्पना वारी । परिसाची निवारी जडत्वकाळिमा ॥४२॥
दशेचें दैन्य दवडी । अमृताची साल काढी । स्वानंदाची निज गोडी । नांदे उघडी द्वारकेमाजी ॥४३॥
द्वारकेमाजी शुद्ध केणें । अक्षरांचें खरें नाणें । जैसें घेणें तैसें देणें । कोण्हाही उणें असेना ॥४४॥
वैकुंठींच्या वैभवासी । कृष्णें आणिलें द्वारकेसी । देखतां ठक पडिलें द्विजासी । ते द्वारका कैसी वर्णावी ॥५४५॥
द्विजासि सत्वर त्वरा मोठी । नगर न पाहेचि दिठी । भीतरीं पातला उठाउठीं । जेथ जगजेठी श्रीकृष्ण ॥४६॥
म्हणोनि द्वारकावर्णन । रहावया हेंचि कारण । द्विजें देखिला श्रीकृष्ण । विस्मित मन तयाचें ॥४७॥
हेमसिंहासनीं आदिमूर्ति । बैसला असे सहजस्थिति । द्विजासि देखोनि श्रीपति । भाव चित्तीं जाणीतला ॥४८॥
याचिया आगमनविधि । थोर होईल कार्यसिद्धि । फावली एकान्ताची संधि । होय सुबुद्धि ब्राह्मणा ॥४९॥

दृष्ट्वा ब्रह्मण्यदेवस्तमवरुह्य निजासनात् ।
उपवेश्यार्हयांचक्रे यथाऽऽत्मानं दिवौकसः ॥२८॥

सिंहासनाखालती उडी । घालूनि दोन्ही हात जोडी । नमन साष्टाङ्गपरवडी । पूजी आवडी द्विजातें ॥५५०॥
अमर करिती कृष्णपूजा । ऐसिया वोजा पूजी द्विजा । ब्रह्मण्यदेव कृष्णराजा । ब्राह्मणपूजा तो जाणे ॥५१॥
ब्राह्मणासि मंगलस्नान । देऊनि पीताम्बर चंदन सुमन । सन्निध बैसोनियां आपण । दीधलें भोजन यथारुचि ॥५२॥

तं भुक्तवंतं विश्रान्तमुपगम्य सतां गतिः । पाणिनाऽभिमृशन्पादावण्यग्रस्तमपृच्छत ॥२९॥

शय्या घालूनि एकान्तीं । अरळसुमनांची निगुती । हातीं धरूनियां श्रीपति । शयन करवी द्विजातें ॥५३॥
कृष्ण बैसोनि शेजारीं । ब्राह्मणाचे चरण चुरी । येरें म्हणोनि नरहरि । करीं धरी कृष्णातें ॥५४॥
ऐकें स्वामी देवाधिदेवा । म्यां करावी तुझी सेवा । तूं पूजितोसि भूदेवा । ब्राह्मण्यदेव म्हणोनी ॥५५५॥
निजात्मभावें उचितें । हृदयीं साहिलें लतितें । तें हित नव्हेचि आमुतें । विपरीतार्थें फळलेंसे ॥५६॥
तुझिया पूजा पूज्य जालों । तेणेंचि गर्वासि चढलों । कृष्णसेवेसि नाडलों । थोरावलों अभिमानें ॥५७॥
तूं यज्ञपुरुष नारायण । तुज याज्ञिक नेदिती अन्न । वृथा गेलें त्यांचें हवन । कर्मठपण कर्माचें ॥५८॥
सर्वभूतीं भगवद्भावो । नुपजे तंव न भेटे दवो । तैसा मी ब्राह्मण नव्हे पहावो । जाणसी भावो हृदयींचा ॥५९॥
कृष्णें पुशिलें स्वागत । वृत्ति आहे कीं निश्चित । चित्तीं चिंता ज्या वर्तत । ते दुश्चित सर्वदा ॥५६०॥

कच्चिद्विजवर श्रेष्ठ धर्मस्ते वृद्धसंमतः । वर्तते नातिकृच्छ्रेण संतुष्टमनसः सदा ॥३०॥

कृष्ण म्हणेगा द्विजवर श्रेष्ठा । वृद्धसंमत स्वधर्मनिष्ठा । एकाग्रमनोवृत्तितुष्टा । फलदा अभीष्टा असती कीं ॥६१॥
ज्याची चिंता निवर्त्तली । त्याचीच वृत्ति निश्चित जाली । त्यासींच स्वकर्में फळलीं । निजात्मफळाचेनि फळें ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP