अध्याय ५२ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - राजाऽऽसीद् भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान् ।
तस्य पंचाभवन्पुत्राः कन्यैका च वरानना ॥२१॥

ऐकें बापा परीक्षिति । तूं तंव सुखाची सुखमूर्ति । भीमकीपाणिग्रहणस्थिति । यथानिगुती सांगेन ॥७७॥
अगा वसुदेवाचिये तपःफळप्राप्ति । श्रीकृष्ण देवकीउदरा येती । श्रीकृष्णाची कृष्णशक्ति । जाले उतरती भूतळीं ॥७८॥
कनकासवें जैसी कान्ति । कीं सूर्यासवें जैसी दीप्ति । तैसी अवतरली कृष्णशक्ति । वैदर्भदेशीं रुक्मिणी ॥७९॥
जैसा मूर्तिमंत विवेक । तैसा जाणा राजा भीमक । सत्वाथिला अतिसात्विक । निष्कंटक शोभतसे ॥३८०॥
श्रद्धापत्नी शुद्धमति । जाली गर्भातें धरिती । तेथ जन्मली कृष्णशक्ति । ते चिच्छक्ति रुक्मिणी ॥८१॥
नवविधा तेचि नव मास । गर्भा भरले पूर्ण दिवस । साङ्ग जन्मली रूपस । नव निधान रुक्मिणी ॥८२॥

रुक्म्यग्रजो रुक्मरहो रुक्मबाहुरनंतरः ।
रुक्मकेशो रुक्ममाली रुक्मिण्येषा स्वसा सती ॥२२॥

रुक्मिणीचे सहोदर । पांच रायासि होते कुमर । पांचांहूनि रुक्मिणी आवर । प्रीतिपात्र रायासी ॥८३॥
रुक्मि रुक्मरथ रुक्मबाहु । चौथारुक्मकेशप्रियतम बहु । रुक्ममाली सद्गुणसमूह । परी नृपाचा स्नेह रुक्मिणीपें ॥८४॥
पांचां विषयांच्या शेवटीं । सद्बुद्धि उपजे जेंवि गोमटी । तैसी पांचाही धाकुटी । जाली गोरटी रुक्मिणी ॥३८५॥
जैंपासूनि जन्मली कुसी । तैंहूनि आवडे रायासी । अमान्य करूनि पांचासी । तेचि एकी पढियंती ॥८६॥
स्वरूपरोपें अतिसुंदर । लावण्यगुणें गुणगंभीर । दिवसेंदिवस जाली थोर । वरविचार रायासी ॥८७॥

सोपश्रुत्य मुकुंदस्य रूपवीर्यगुणश्रियः ।
गृहागतैर्गीयमानस्तं मेने सदृशं पतिम् ॥२३॥

रुक्मिणीवरी नृपाची प्रीति । तिणें ऐकोनि मुकुंदकीर्ति । रूपवीर्यगुणसंपत्ति । नित्य गृहागतीं गीयमाना ॥८८॥
तेणें मुकुंद रुचला मनीं । तन्मय कृष्णवेधें रुक्मिणी । ऐसाचि कृष्णही द्वारकाभुवनीं । ऐकोनि रुक्मिणी वेधला ॥८९॥
असो तेथें कीर्तिनामा ब्राह्मण । रायापासीं आला जाण । तेणें केलें कृष्णकीर्तन । तेथ तनुमन वेधलें ॥३९०॥
बैसली होती रायापासीं । सादर देखोनि भीमकीसी । मग वर्णिलें कृष्णरूपासी । चित्स्वरूपेंसीं साकार ॥९१॥
जो निर्गुण निर्विकारं । जो निष्कर्म निरुपचार । तोचि जाला जी साकार । लीलाविग्रही श्रीकृष्ण ॥९२॥
अतिसुरंग चरणतळें । उपमे कठिन रातोत्पळें । बालसूर्याचेनि उजाळें । तैसीं कवळें टांचाचीं ॥९३॥
ध्वजवज्राङ्कुशरेखा । चरणींचीं सामुद्रिकें देखा । न वर्णवती सहस्रमुखा । ब्रह्मादिकां अलक्ष ॥९४॥
पिळूनि इंद्रनीळकिळी । वोतिली कृष्णतनु सांवळी । पावुलें सुकुमार कोंवळीं । घोंटी निळी दोहीं भागीं ॥३९५॥
सुनीळ नभाचिया कळिका । तैशा आंगोळिया देखा । वरी नखें त्या चंद्ररेखा । चरणपीयूषा लुब्धल्या ॥९६॥
सांडूनि कठिनत्वाचें डिंब । जैसे सचेतन मरकतस्तंभ । तैसे चरण जी स्वयंभ । कृष्णशरीरीं शोभती ॥९७॥
कृष्णआंगा जडलेपणें । विजूसि पुट जालें चौगुणें । विसरली अस्तमाना जाणें । पीताम्बरपणें कासेसी ॥९८॥
कृष्णचरणांचेनि भूषणें । वांकीनें वेदां आणिलें उणें । तें तंव धरूनि ठेले मौनें । कृष्णकीर्तनें हें गर्जें ॥९९॥
सोहंभावाचेनि गजरें । चरणीं गर्जतीं नूपुरें । मुमुक्षूंचें मन निदसुरें । त्यांतें चेयिरें करिताती ॥४००॥
तोडर गर्जे कवणे मानीं । जन्ममरण हरिचरणीं । नाहीं उपासकां लागूनी । संकल्पविकल्प गेलिया ॥१॥
अनंतरूप नाकळे वेदीं । तें आकळीजे जेंवि सद्बुद्धी । तैसी मेखळा माजामधीं । चिद्रत्नसंधीं जडतसे ॥२॥
स्वपद पावलियापाठीं । जेंवि कां वृत्ति होय उफराटी । तैशा किंकिणी क्षुद्रघंटी । अधोमुख मेखळे ॥३॥
अतिशयेंसिं माजु साना । होता अभिमान पंचाननां । देखोनि कृष्णमध्यरचना । लाजा राना ते गेले ॥४॥
पहावया कृष्णमध्यरचना । चित्रींचीं लेपें जालीं जाणां । सांडूनि देहीं ज्या अभिमाना । मेखळे खेवणा स्वयें जदले ॥४०५॥
नाभिसि नाभिनाभिता । देऊनि राखिला तो विधाता । तेथींचा पार पाहतां । तै विधाता नेणेची ॥६॥
म्हणोनि पद्मनाभिनांवा । उदरीं त्रैलोक्यसांठोवा । जेंवि सागरामाजि ठेवा । तरंगाचा पैं केला ॥७॥
सागरीं लहरींची नव्हाळी । तैसी उदरीं त्रिगुण त्रिवळी । कर्माकर्म रोमावळी । बहिर्मुखें वाढलिया ॥८॥
न कळे हृदयींचें महिमान । जेथ उपनिषदां पडिलें मौन । तेथही संचरले सज्जन । देहाभिमान सांडूनी ॥९॥
शून्य सांडूनि निरवकाश । तेंचि कृष्णहृदय सावकाश । संतीं केला रहिवास । वृत्तिशून्य होऊनी ॥४१०॥
तिये पदीं जेसुलीन । तेचि पदक जडित जाण । मुक्तमोतीलग संपूर्ण । गुणेंवीण लेयिलासे ॥११॥
ज्ञानवैराग्यशुक्तिसंपुटीं । निपजलीं मुक्तमोतियें गोमटीं । तेचि एकावळी कंठीं । श्रीकृष्णाचे शोभत ॥१२॥
जन विजन समान कळा । तेचि आपादवनमाळा । शांति निजशांति निर्मळा । रुळे गळां वैजयंती ॥१३॥
ॐ कारमातृकांसगट । तोचि जाणा कंबुकंठ । वेदांचें जें मूळ पीठ । तेथूनि प्रकट त्रिकाण्डीं ॥१४॥
खणोनि उपनिषदांची खाणी । अर्थकाढिला मथूनी । तोचि कंठीं कौस्तुभमणि । निजकिरणीं झळकत ॥४१५॥
गगनगजांचे शुंडादंड । तैसे सरळ बाहुदंड । पराक्रमें अतिप्रचंड । अभयदाना उद्यत ॥१६॥
पंचभूतें भिन्न भिन्न । तैशा अंगुळिया जाण । तळहात तो अधिष्ठान । पांचही मिळती एकमुष्टी ॥१७॥
चहूं खाणीं क्रियाशक्ति । त्याचि चार्‍ही भुजा शोभती । आयुधें बसविलीं हातीं । कवणिये स्थिती पहा पां ॥१८॥
अत्यंततेजें तेजाकार । द्वैतदळणीं सतेजधार । तेंचि धगधगीत चक्र । अरिमर्दनीं उद्भट ॥१९॥
घायें अभिमान करी चेंदा । तेचि झळकत पैं गदा । निःशब्दीं उठवित शब्दा । वेदानुवादा पाञ्चजन्य ॥४२०॥
अभेदभक्त मज भेटती । तेव्हां सुमनें कैंचीं मिळतीं । तयांचे पूजेलागीं हातीं । हृदयकमळ वाहतसे ॥२१॥
वाह्यवटां कीर्तिमुखें । चार्‍ही वेद जाले सुखें । करीं कंकणें जडितमाणिकें । वार्तिकांत वेदांत ॥२२॥
यंत्रउभवणी उपासकां । त्याचि अंगोळिया मुद्रिका । त्रिकोण षट्कोण कर्णिका । जडितमाणिका आगमोक्त ॥२३॥
पूर्व उत्तर मीमांसा दोन्ही । कुंडलें जालीं कृष्णश्रवणीं । उपनिषदर्थकिरणीं । झळकताती सतेज ॥२४॥
एक म्हणती साकार । एक म्हणती मकराकार । परी तें साचार निर्विकार । श्रवणें विकार मावळती ॥४२५॥
गाळूनियां मोक्षमुख । तेथींचा मुसावला जो हरिख । तेंचि कृष्णाचें श्रीमुख । नित्य निर्दोष मिरवतसे ॥२६॥
उपमे चंद्र निलाग हीन । तो तंव कृष्णपक्षीं क्षीण । उदोअस्तवीण संपूर्ण । वदनेन्दु कृष्णाचा ॥२७॥
जेव शिव एकाकार । तैसे मीनले दोन्हे अधर । माजि दंतपंक्ति तेजाकार । चिदानंदें झळकती ॥२८॥
नास्तिका देऊनि नास्तिक । उंचवलें एं नासिक । पवन हिंडतां पावना दुःख । कृष्णश्वासें सुखी जाला ॥२९॥
विशाळ डोळे चैतन्यपणें । जेथ विसावों आलें पहा तें पाहणें । आपआपणा देखणें । सबाह्याभ्यंतर समदृष्टी ॥४३०॥
ज्ञानाज्ञानाचीं पातीं । मिथ्यापणें लवत होतीं । तींही सारूनि मागुतीं । सहजस्थिती पाहतसे ॥३१॥
अधिष्ठान विशाळ भाळीं । तैसी शोभा कृष्णकपाळीं । सच्चिदानंदें एक मेळीं । तेचि त्रिवळी ललाटीं ॥३२॥
उगाळूनि अहंपण । सोहं काढिलें शुद्धचंदन । तोंही केलें कृष्णार्पण । निजभाळीं मववटु ॥३३॥
सपुर गगनाङ्कुर । सरळ तैसे मस्तकीं केश कुरळ । कृष्णमुखेंसीं विमुख सबळ । अधोमुख धांविन्नले ॥३४॥
म्हणोनि एक्याचिये मुष्टि । आणूनि बांधले वीरगुंठी । सहजभावाच्या मुकुटीं । मग दाटिले सुबद्ध ॥४३५॥
तया मुकुटा जी तळवटीं । मुक्त मयूरपत्रांची वेंठी । कैसी शोभताहे गोमटी । दृश्य दृष्टी अतीत ॥३६॥
सलोकसमीपसरूपता । हें तव पिसें सांडीं सर्वथा । देखणेपणेवीण डोळसता । तोचि माथां पैं स्तबक ॥३७॥
अळंकारामाजि आवडी । जेथ श्रीकृष्णासि अधिक गोडी । तेचि सांगों विसरलों कुडी । चुकी गाढी पडतसे ॥३८॥
सकळ भूषणां भूषण । ब्राह्मणाचा दक्षिण चरण । हृदयीं वाहे नारायण । श्रीवत्सलांछन गोविंद ॥३९॥
कृष्णाचिया श्रीमूर्ति । लावण्य आलें त्रिजगतीं । बरवया बरवा श्रीपति । वाचा किती अनुवादों ॥४४०॥
जें जें अत्यंत सुंदर दिसे । तें तें कृष्णाचेनि लेशें । डोळ्यां तेणें लाविलें पिसें । जालीं मोरपिसें हरि आंगीं ॥४१॥
सौंदर्याचा अभिमान । मदना आंगीं होता संपूर्ण । तेणें देखोनियां श्रीकृष्ण । स्वदेहासि वीटला ॥४२॥
मदनें श्रीकृष्ण देखिला साङ्ग । अंग जाळूनि जाला अनंग । पोटा येऊनियां चांग । उत्तमाङ्ग पावला ॥४३॥
बरवेपणें मी मोटी । होतें लक्ष्मीचिये पोटीं । कृष्ण देखोनियां दृष्टी । तेही उफराटी लाजिली ॥४४॥
रूपा भाळोनियां कैसी । रमा जाली परम पिसी । लक्ष्मी नावडे कृष्णासी । जाली दासी पायांची ॥४४५॥
कृष्ण देखिला जिये दिठी । ते परतोनि मागुतीं नुठी । अधिकाधिक घाली मिठी । होय सुलीन हरिरूपीं ॥४६॥
कृष्ण पहावयाच्या लोभा । नयनीं नयना निघती निभा । श्रवणें श्रवणांसि वालभा । अभिन्न शोभा कृष्णाची ॥४७॥
कृष्णरस जे सेवित । तयांसि फिकें होय अमृत । अमर अमृतपान करित । तेही चरफडित हरिरसा ॥४८॥
श्रिया वाखाणिते अमरेंद्र । कृष्ण इंद्राचाही इंद्र । क्षयो पावती इंद्र चंद्र । हरि नरेंद्र अक्षय ॥४९॥
असुर सुरांतें उत्थापिती । तें गार्‍हाणें हरिसी देती । इंद्र चंद्र प्रजापति । ते चरफडिती निजपदा ॥४५०॥
ते वेळीं उठे श्रीक्रुष्णनातु । कंसकेशियां करी घातु । देवां निजपदीं स्थापितु । अमरनाथ श्रीकृष्ण ॥५१॥
कृष्णाऐसा त्रिशुद्धि । उदार न देखों स्वात्मबुद्धि । सेवकां बैसवी निजपदीं । अक्षय सिद्धि देऊनी ॥५२॥
नेदीच देवकीयशोदेसी । ते गति दिधली पूतनेसी । समान देणें अरिमित्रांसीं । उदारतेसि काय वाणूं ॥५३॥
निजपदेंसी कृष्णनाथ । भक्तांसि आपणिया देत । आपण होय भक्ताङ्कित । राहे तिष्ठत त्यांपासीं ॥५४॥
भक्ताज्ञा मानी मोठी । सिंह सूकर होय जगजेठी । प्रगटला कोरडेकाष्ठीं । वचनासाठीं भक्ताच्या ॥४५५॥
ऐसा धीरवीर उदार शूर । गुणागुणीं गुणगंभीर । पृथ्वीवरी यदुवीर । दुजा नाहीं सर्वथा ॥५६॥
कृष्णाचरणींचा आराम । पाहतां विसरे क्रियाकर्म । समाधीसि तेथ विश्राम । मनोरम हरिपद ॥५७॥
श्रीकृष्णस्वरूपप्रीति । भीमकी सादर श्रवणार्थी । हृदयीं आविर्भवली मूर्ति । बाह्य स्फूर्ति मावळली ॥५८॥
आंग जालें रोमाञ्चित । कंठीं बाष्प पै दाटत । शरीर चळचळां कांपत । पडे मूर्च्छित धरणीये ॥५९॥
एक म्हणती धरा धरा । एक पालवें घालिती वारा । एक म्हणती हे सुंदरा । कृष्णकीर्तनें झडपली ॥४६०॥
भक्तीपासीं भावना जाये । तैसी धांविन्नली धाये । झणीं दिठी लागेओ माये । म्हणोनि कडिये घेतली ॥६१॥
तंव रायासि कळलें चिह्न । इसी जालें कृष्णश्रवण । तेथेंचि वेधलें इचें मन । कृष्णार्पण हे करावी ॥६२॥
हाचि धरूनिया भावो । अंतःपुरा आला रावो । रुक्मिणीसि कृष्ण नाहो । राणिये रावो पुसतसे ॥६३॥
मग बोलिली शुद्धमति । हेंचि होतें माझ्या चित्तीं । कन्या अर्पावी श्रीपति । पुण्य त्रिजगतीं न समाये ॥६४॥
वरु मानला आम्हांसी । कन्यादान श्रीकृष्णासी । तरीच सार्थकता जन्मासी । दोहीं पक्षासि उद्धारु ॥४६५॥
तैसाचि सर्वज्ञही श्रीपति । रुक्मिणी लावण्यगुणाची कीर्ति । नित्य वर्णितां गृहागतीं । चित्तीं चिंती तें ऐका ॥६६॥

तां बुद्धिलक्षणौदार्यां रूपशीलगुणाश्रयाम् ।
कृष्णश्च्सदृशीं भार्यां समुद्बोढुं मनोदधे ॥२४॥

त्रैलोक्यींच्या शुभलक्षणीं । रुक्मिणी मिरवे लावण्यखाणी । बुद्दिऔदार्यशीळसद्गुणीं । जेथ वसोनि प्रकाशिजे ॥६७॥
एवं पूर्ण गुणांची मूर्ति । चिद्रूप साजे चिच्छक्ति । तीतें ऐकोनि स्वयें श्रीपति । चित्तीं युवति करूं इच्छी ॥६८॥
सम्यक म्हणिजे बरव्या परी । पाणिग्रहण विहिताचारीं । उद्युक्त करावया मुरारि । परि विघ्न माझारी तें ऐका ॥६९॥

बंधूनामिच्छतां दातुं कृष्णाय भगिनीं नृप ।
ततो निर्वाय कृष्णद्विड्रुक्मिश्चैद्यममन्यत ॥२५॥

ऐसीं परस्परें वधूवरें । गुणलावण्यश्रवणादरें । वेधलीं असतां मातापितरें । तदनुसारें अनुकूळ ॥४७०॥
रुक्मिणीचे बंधु चार्‍ही । संमत वर्तती मातापितरीं । परंतु ज्येष्ठाचे अंतरीं । विरुद्धलहरी दुर्दैवें ॥७१॥
विकल्प रुक्मिया कृष्णद्वेषी । वचन न मनेचि तयासी । काय म्हणावें वडिलांसी । गोवळियासीं सोयरिक ॥७२॥
कृष्ण अवगुणाचा अरूप । कन्या सगुण स्वरूप । दोहींशीं घटिताचा विकल्प । शून्यसंकल्प सोयरिके ॥७३॥
रुक्मिया कृष्णनिंदा करित । वाग्देवता स्तुति वदत । निंदेसि वागीश्वरी भीत । पाप अद्भुत निंदेचें ॥७४॥
एका जनार्दना विनवित । निंदेमाजि स्तुति होत । श्रोतीं तेथ ठेवूनियां चित्त । कथा निश्चित परिसावी ॥४७५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP