अध्याय ५२ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


गिरौ निलीनावाज्ञाय नाधिगम्य पदं नृप ।
ददाह गिरिमेदोभिः समंतादग्निमुत्सृजन् ॥११॥

कोणे स्थळीं जाले लीन । तें निश्चयात्मक न कळे स्थान । नाहें पळाले गिरिपासून । रक्षकगण हें कथिती ॥४४॥
प्राणधाकें परम गुप्त । लपोनि राहिले इत्थंभूत । जेणें होती हस्तगत । तो उपाय येथ कवण कीजे ॥१४५॥
सतरा वेळां पावलों हारी । आजि फावले येकट वैरी । येथ उपेक्षा केलियावरी । करिती बोहरी यशविभवा ॥४६॥
यवनाभेणें यादवां पळणी । मुख्यचि सांपडले अडचणी । पर्वतीं राहिलें लपोनि । घेतां हुडकणी नातुडती ॥४७॥
यांचिये हननीं कवण यत्न । तो मज सांगा सर्व प्रधान । हें ऐकोनि मंत्रिगण । करिती कथन मगधेशा ॥४८॥
सचिवीं जुहारूनि नृपवरा । म्हणती ऐका जी मगधेश्वरा । वधावया वसुदेवकुमरां । वृथा विचारा विवरितसां ॥४९॥
भेणें पळतां उरीं फुटलीं । धाके काळिजें उलोनि गेलीं । रक्तें वमूनि बापुडीं मेलीं । असती पडिलीं गिरिकुहरी ॥१५०॥
मागध म्हणे हुडता प्रेतें । तंव अमात्य बोलती परम ज्ञाते । पर्वतीं श्वापदें क्रूरें क्षुधितें । तिहीं तत्प्रेतें भक्षिलीं ॥५१॥
आतां कोठूनि सांपडती । पुन्हा हुडकितां सैन्यें शिणती । सार्वभौमविजयकीर्ति । भर्ता निश्चिती तूं आतां ॥५२॥
ऐसीं ऐकोनि प्रधानवचनें । मागध म्हणे ये संभावने । ऐकोनि तोष न मनिजे मनें । शत्रुविंदानें न तर्कती ॥५३॥
आतां एक विचार कीजे । पर्वत इन्धनीं आच्छादिजे । भवंता अग्नि चेतविजे । शत्रु सहजे संहरती ॥५४॥
ऐसा विचार विवंचून । अवघे वाहती इंधन । यथाविभागें पर्वत पूर्ण । आच्छादून टाकिला ॥१५५॥
समंतात् म्हणिजे सर्वांकडूनी । एकसराचि लाविला अग्नि । प्रबळ ज्वाळा लागल्या गगनीं । गिरिकाननीं महाप्रळय ॥५६॥
वृक्ष गुल्म लता तृणें । भस्म झालीं इन्धनाग्नीनें । मूळें वांचलीं सजळपणें । भगवत्करुणामृतलेशें ॥५७॥
विविध श्वापदें पक्षिनिचय । देखोनि दावाग्नीचा पळय । करूनि अचळमौळाश्रय । सजल ठाय ते धरिती ॥५८॥
सामान्य ज्म्तु पर्वतीं लीन । पर्वताआंगींचे आर्द्रतेकरून । जाळूं न शके हुताशन । त्राता भगवान त्यां तेथ ॥५९॥
वृक्ष जळती कडकडाटें । पाषाण फुटती तडतडाटें । शिळा लोटती घडघडाटें । प्रदीप्त इन्धनें कोसळती ॥१६०॥
सेनापरिधि पर्वतातळीं । तो त्रासल संतप्त शिळीं । जळत इंधनाची कोसळी । तेणें होळी सैन्याची ॥६१॥
देखोनि अग्नि अनावर । पर्वतापासूनि कांहीं दूर । माघारला शत्रुभार । रामश्रीधर विलोकिती ॥६२॥
सतरा वेळा साधिला जय । आजि मागधा दीजे विजय । भीमहस्तें याचा लय । होतां समय पुढें असे ॥६३॥
ऐसें परस्परें विवरून । काय करिती रामकृष्ण । तें तूं राया करीं श्रवण । म्हणे नंदन व्यासाचा ॥६४॥

तत उत्पत्य तरसा दह्यमानतटादुभौ । दशैकयोजनोत्तुंगान्निपेततुरदो भुवि ॥१२॥

त्यानंतरें राममुरारि । अकरा योजनें उच्च गिरि । उभे ठाकूनि त्याच्या शिखरीं । खगेंद्रापरी उडाले ॥१६५॥
अग्निभयें व्याकुळ कटकें । प्रदीप्तपर्वतीं दृष्टि न टिके । सभय सर्वही ऐसिये घटिके । माजि नेटके झगटले ॥६६॥
तरसा म्हणिजे मारुतगती । गगनगर्भीं प्रवेशती । जळत पर्वताचिये प्रांतीं । हूनि यदुपति ते दोघे ॥६७॥
उच्च एकादश योजनें । तेथूनि तिर्यक उत्पवनें । करूनि भूंईवरी उत्पतनें । केलीं सैन्यें न लक्षितां ॥६८॥
पर्वताभोंवतें सेनावलय । दुश्चित मानूनि अग्निभय । त्यापासूनि दुरी जो ठाय । तेथ यदुवर्य उतरले ॥६९॥

अलक्ष्यमाणौ रिपुणा सानुगेन यदूत्तमौ ।
स्वपुरं पुनरायातौ समुद्रपरिखां नृप ॥१३॥

सेना सैनिक समागध । पाहत असतांही सावध । कोण्हा विदित न होतां भेद । गेले अगाध चापल्यें ॥१७०॥
रत्नाकराचा ज्यासि अगड । ऐसा द्वारकागड अवघड । तया स्वपुरामाजि सुघड । गेले उघड न लक्षितां ॥७१॥
दुरी नेऊनि ससैन्य शत्रु । रामकृष्ण वसुदेवपुत्र । पुढती प्रवेशलं स्वक्षेत्र । आप्त स्वगोत्र तोषविले ॥७२॥
समुद्रपारिखा द्वारकापुरी । ऐसी वदली शुकवैखरी । राया या वाक्यामाझारी । हा अर्थ चतुरी जाणावा ॥७३॥
रामकृष्ण जाळिले असतां । यदुकुळदळणीं मागधा आस्था । तो कां स्वपुरा जाला जाता । हें नृपनाथा सुचविलें ॥७४॥
रामकृष्णांचें केलें दहन । ऐसी लाधली कीर्ति गहन । ते द्वारका न लक्षतां भग्न । होईल म्हणोन परतला ॥१७५॥
समुद्राचा जयेसि अगड । स्वर्णमृत्तिका रत्नें दगड । त्वाष्ट्रनिर्मित गड अवघड । जाणोनि सुघड हांव त्यजी ॥७६॥

सोऽपि दग्धाविति मृषा मन्वानो बलकेशवौ ।
बलमाक्रम्य सुमहन्मगधान्मागधो ययौ ॥१४॥

तोही मागध महाबळी । बळकेशव जळाले अचळीं । मृषा वार्ता हे तये वेळीं । साच मानूनि निघाला ॥७७॥
प्रवर्षणगिरीचा काढिला वेढा । पुरस्सर यूथप करूनि पुढां । पार्ष्णिग्राह मागिलीकडां । सेना चहूंकडा सांभाळी ॥७८॥
ठोकिल्या विजयकुंजरभेरी । पताका झळकती विविधाम्बरी । नृत्यगीतवादित्रगजरीं । चालिला भारीं स्वपुरातें ॥७९॥
रामकृष्ण भस्म केले । कंसनिष्कृतिशल्य फेडिलें । सपत्रवार्तिक पाठविले । आप्त पूजिले तच्छ्रवणें ॥१८०॥
देशोदेशींचे नृपवर । मार्गी जरासंधासमीर । भेटोनि अर्पिती सर्वोपचार । सांगे सादर त्यां वार्ता ॥८१॥
विजयलक्ष्मी वरूनि भाजा । स्वपुरा गेला मागधराजा । अस्ति प्राप्ति उभयात्मजा । आनंद वोजा पावविल्या ॥८२॥
कुमरी कुढाविल्या स्वतातें । सूड घेतला प्रतापर्वतें । ऐकोनि तोष पावल्या चित्तें । जेंवि इंद्रातें वृत्रजयीं ॥८३॥
असो ऐसें मागधाख्यान । कुरुनरेशा केलें कथन । पुढती सिंहावलोकन । बळभगवानचरिताचें ॥८४॥
भेटले उद्धवाक्रूरादिकां । नृपबांधवां देवकप्रमुखां । येरां करूनि नतमस्तकां । सभानायकां गौरविलें ॥१८५॥
बळकेशव द्वारकापुरीं । आळंगिले मातापितरीं । उग्रसेनादवभारीं । सभेमाझारी जुहारिलें ॥८६॥
मग सभास्थानीं बैसले स्थित । रामकृष्ण सहोदर । कृष्णदयार्नवानुचर । येर समग्र पर नमिती ॥८७॥
शुक म्हणे गा कौरवधुर्या । रामकष्णांची विवाहवर्या । त्यामाजी रामाची पूर्वींच राया । नवमस्कंधीं तुज कतिली ॥८८॥
तिये कथेची आठवण । देऊनि कीजेल निरूपण । श्लोकत्रयें तें व्याख्यान । सावध होऊन अवधारीं ॥८९॥

आनर्ताधिपतिः श्रीमान्रैवतो रेवतीं सुताम् ।
ब्रह्मणा चोदितां प्रादाद्बलायेति पुरोदितम् ॥१५॥

आनर्तदेशींचा जो भूपति । ऐकोनि ब्रह्मयाची वचनोक्ति । रैवत स्वकन्या रेवती । करी युवति बलरामा ॥१९०॥
ऐसें नवमस्कंधीं कथिलें । सूत्रप्राय तें सूचविलें । तंव श्रोत्यांहीं आक्षेपिलें । आम्हां परिसविलें पाहिजे ॥९१॥
आनर्तदेशनाम कोण । रैवत कोणाचें अभिधान । त्यासि ब्रमा कां करी प्रेरण । जे कन्यार्पण बलरामा ॥९२॥
इतुका श्र्लोकोक्तपदविस्तार । देखोनि श्रोतयांचा आदर । जाला निरूपणीं सादर । गोविंदकिंकर दयार्णव ॥९३॥
तरी ऐका जी सावधान । अशेषभूतां अधिष्ठान । जो कल्पान्तीं श्रीभगवान । उरे आपण विश्वलयीं ॥९४॥
जो कां निर्गुण निराकार । क्रियातीत निर्विकार । तो विश्वात्मा विश्वंभर । प्रकृतिपर जे होय ॥१९५॥
चिच्छक्तीच्या अंगीकारें । शुद्धसत्वात्मकता स्फुरे । माहविष्णुत्वें आविष्कारे । सत्तामात्रें जगज्जनक ॥९६॥
तयाचिया नाभिपद्मा । रजात्मकत्वें सृजनकर्मा । जन्म पावला स्वयंभू ब्रह्मा । नारायणनामा समष्टि जो ॥९७॥
तयाचा मानसपुत्र मरीचि । कश्यप महर्षि संतती त्याची । कश्यपापासूनी भास्कराची । उत्पत्ति जाली हें जाणा ॥९८॥
भास्करापासूनि श्राद्धदेव । संज्ञेपोटीं ज्याचा प्रभव । मनु ऐसें त्याचेंचि नांव । श्रद्धा स्वमेव मनुपत्नी ॥९९॥
श्रद्धेपोटीं दहा पुत्र । इक्ष्वाकुप्रमुख परम पवित्र । मनुऔरस धर्मतत्पर । परम शूर भूचक्रीं ॥२००॥
त्यांमाजी शर्याति नामा तिसरा । परिसा तयाचिया चरित्रा । जेणें जाऊनि अंगिरससत्रा । द्वितीयाह्नतंत्रा निरूपिलें ॥१॥
सुकन्यानामें शर्यातिसुता । कमललोचना सद्गुणभरिता । तयेचा वियोग न साहे पिता । वसे सर्वथा जनकापें ॥२॥
अपूर्व कोणे एके दिवसीं । सवें घेऊनि सुकन्येसी । मृगयाव्याजें काननासी । च्यवनाश्रमासि नृप गेला ॥३॥
च्यवनाश्रमीं च्यवनमुनि । परम तपस्वी बैसला ध्यानीं । वल्मीकरंध्रीं नयन दोन्ही । खद्योतप्राय झळकती ॥४॥
तंव राजा निरत मृगयाच्छंदीं । सुकन्या वेष्टित सखींची मांदी । वल्मीकरंध्रीं कंटकें भेदी । तन्नेत्रज्योती आश्चर्यें ॥२०५॥
पूर्वदैवें प्रेरिली असतां । बालभावें मुग्धावस्था । आश्चर्य मानूनि कंटकघाता । करी ते तत्वता मुनिनयनां ॥६॥
नयन फोडितां कंटकघातें । बहुत रुधिर स्रवलें तेथें । देखोनि सुकन्या शंकितचित्तें । निघती जाली तेथूनी ॥७॥
च्यवनभार्गव परमधीर । तपस्तेजाचा भास्कर । न दंडळितां अणुमात्र । केलें चरित्र तें ऐका ॥८॥
राजा अमात्य सैनिक सैन्य । मूत्रपुरीषनिरोधन । होतां जाले परम दीन । म्हणती कोण अनय हा ॥९॥
च्यवनभार्गवमुनीचें कांहीं । आम्हीं अनर्थ केलें नाहीं । मंत्रियां म्हणे पाडा ठायीं । मुनीचा अन्यायी कोण असे ॥२१०॥
कोण्ही वृक्षासि दुखविलें । किंवा जंतूतें दुःख दिधलें । कोण्ही जळचरां त्रासिलें । कीं डहुळिलें स्वच्छांभ ॥११॥
कोण्ही वेंचिलीं असती सुमनें । कीं फळपल्लवां केलीं लवनें । कीं आश्रमींचीं श्वापदें सुलीनें । आमुच्या भेणें पळालीं ॥१२॥
भार्गवाचा अपराध कोण । घडला असे आम्हांपासून । तोविचारा धुंडूनि सैन्य । किमर्थ रोधन मळमूत्रा ॥१३॥
ऐसी ऐकोनि नृपाची गोठी । मंत्रिप्रधानीं देऊनि घरटी । शोधितां अन्याय न पडे दृष्टि । होती कष्टी मळरोधें ॥१४॥
गजाश्वक्रमेळनरखरवृष । मळमूत्ररोधें पावले क्लेश । तेव्हां सुकन्या स्वजनकास । कथी अशेष वृत्तांत ॥२१५॥
सुकन्या म्हणे अहो जी ताता । अपूर्व ऐका जी वृत्तांता । वल्मीकरंध्रीं द्वय खद्योतां । कंटकघाता म्यां केलें ॥१६॥
तेथें स्रवलें रुधिर बहु । देखोनि धाकला माझा जीवु । मनीं मानूनि परम भेंवु । आलें स्वमेव तुम्हां जवळीं ॥१७॥
ऐसी सुकन्या वदतां पितरा । राजा म्हणे हा अपराध खरा । कैसी मुनीच्या अभ्यंतरा । क्शमा उपजेल या उपरी ॥१८॥
सुकन्या नेणती अज्ञान । नेणोनि फोडिले मुनीचे नयन । अपराध नोहे कीं हा सान । केंवि प्रसन्न मुनि होय ॥१९॥
मग जाऊनि वल्मिकानिकटीं । मुनिपादुका धरूनि मुकुटीं । म्लानवदनें अधोदृष्टि । सभय पोटीं विनवीतसे ॥२२०॥
मंदंदवचनें बोले । मद्दुहितेनें अनार्य केलें । बालबुद्धीनें अयुक्त घडलें । पाहिजे क्षमिलें स्वामींहीं ॥२१॥
स्वामी सर्वज्ञ अंतरसाक्षी । मी निष्कपट कृपापेक्षी । अज्ञानकुमरीच्या अपराधाविषीं । उचित तुम्हांसि सोढव्य ॥२२॥
जिव्हा वोष्ठ आपुल्या दंतें । रगडल्या अपराध तो कवणातें । किंवा स्वनेत्र अंगुलिघातें । खोंचतां ज्ञाते क्षमिती कीं ॥२३॥
स्वामी अभेद आत्मज्ञानीं । विश्वात्मकत्वें तनुवर्तनीं । असतां बालिश अनार्य ग्लानि । अंतःकरणीं न धरावी ॥२४॥
ऐसी ऐकोनि नृपाची विनति । च्यवनभार्गव द्रवला चित्तीं । म्हणे तव तनया नेणती । प्रणीता किंवा अप्रणीता ॥२२५॥
इनें नेणतां अनार्थ केलें । परंतु आमुचे नेत्र गेले । पुढें वर्तन कैसें चाले । हें विवरिलें पाहिजे ॥२६॥
ऐसें मुनीचें अभिप्रेत । ऐकोनि राजा विचारवंत । म्हणे सुकन्या वरूनि गृहस्थ । मम जामात होइजे ॥२७॥
ऐकोनि शर्यातीचें वचन । च्यवनभार्गवें केलें मान्य । सुकन्येसिं पाणिग्रहण । औपासन चालविलें ॥२८॥
सुकन्या वरितां च्यवनऋषि । मुक्तता झाली मळमूत्रासी । आज्ञा मागूनि वधूवरांसी । निजनगरासी नृप गेला ॥२९॥
सुकन्या लाधली कोपिष्ठ भर्ता । अपरसृष्टीचा सृजनकर्ता । तथापि लक्षूनि निजहितार्था । वर्त्ते चित्तानुरूप ॥२३०॥
जेंवि रसरंगीं जीवन । कट्वम्लतिक्तामाजि लवण । पाचक रोचक गुणवर्धन । वर्त्ते मिळोन ते तैसी ॥३१॥
देखोनि तिची सरळ वृत्ति । स्नेहं द्रवला कृपामूर्ति । म्हणे शर्यातिकन्या हे मम युवति । क्लेश पावती मत्संगें ॥३२॥
पतिव्रता हे सद्गुणखाणी । कमनीय सुशीळा सुभगा तरुणी । अंध जरठ मी ईलागूनी । भर्त्ता होऊनि जाचितसें ॥३३॥
वय लावण्य ईचें निपाडें । आपुले शरीरीं जेणें जोडे । ईश्वरकृपेनें हें जरी घडे । तरी हे न पीडे मत्संगें ॥३४॥
ऐसा संकल्प मुनीचे मनीं । उठतां अश्विनीकुमार दोन्ही । आले आश्रमालागूनी । च्यवनें आसनीं बैसविले ॥२३५॥
स्वागतप्रश्नें संतोषविले । आर्घ्यपाद्यादि आतिथ्य केलें । प्रेमें लब्धोपचार अर्पिले । मग प्रार्थिले तोषवुनी ॥३६॥
तुम्ही अमरवर्य ईश्वर । आयुर्वेदविदांवर । मज करूनि दिव्योपचार । दिव्यशरीर करा माझें ॥३७॥
जरठ अंध वयातीत । तो मी तरुण लावण्ययुक्त । प्रमदा देखतां धरिती हेत । मम सुरतार्थ मनोरथीं ॥३८॥
दिव्यचक्षु दिव्यतनु । मज अर्पाल नवयौवन । तरी मी करीन प्रत्युपकरण । तें संपूर्ण अवधारा ॥३९॥
भिषक म्हणोनि सोमाधिकारीं । तुम्हां वर्जिलें असे अमरीं । ऐसियातेंही सोमाध्वरीं । भागाधिकारी करीन ॥२४०॥
शक्रप्रमुख देवतापंक्ति । तुम्हांसि नाहीं अवदानप्राप्ति । ऐसियांतेंहे सोमाहुतीं । मी निजशक्ति प्रवर्तवीन ॥४१॥
ऐसें ऐकोनि च्यवनवचन । नासत्यांचें तोषलें मन । वाढ म्हणोनि अंगीकरण । मुनि आज्ञेचें तिहीं केलें ॥४२॥
अंध जरठ धरूनि दोघीं । अमृतहृदीं रिघतां तिघीं । मजनमात्रें तनु अनंगीं । तुळितां गमती यवागळिया ॥४३॥
तिघां समान कमनीयता । दिव्य अवयव समसाम्यता । देखोनि सुकन्येचिया चित्ता । विस्मय चिंता झळंबली ॥४४॥
सुस्नात ह्रदाबाहीर आले । समान दिव्यतनु तिघेही जाले । सुकन्यामानस विस्मयें भरलें । परी व्यापिलें चिंतेनें ॥२४५॥
तिघांमाजि भर्ता कोण । नोहे पूर्वील परिज्ञान । मग नासत्यां अनन्यशरण । जाले संपूर्ण सद्भावें ॥४६॥
तुम्ही माझे जननीजनक । स्वर्गभूषण अमरभिषक । कन्या तुमची मी निष्टंक । भर्ता सम्यक मज दावा ॥४७॥
माझें पतिव्रत न भंगे । सप्तगोत्रां कळंक न लगे । तुमची कीर्ति त्रिजगीं जागे । ऐसें सवेगें तुष्टावें ॥४८॥
हें ऐकोनि सुकन्यावचन । अमरवैद्यांचें द्ववलें मन । म्हणती पतिव्रतांमाजि तूं रत्न । त्रिजगीं धन्य तूं एकी ॥४९॥
म्हणती सुकन्ये शुभानने । तनुसाम्यत्व ह्रदमज्जनें । परंतु न तुळों मुनीच्या ज्ञानें । हें निजमनें निर्धारीं ॥२५०॥
वेदवेदाङ्गपारंगत । च्यवनभार्गव मुनिवरनाथ । आमुसीं तुळिसी तो समर्थ । यदर्थीं भ्रांत कां होसी ॥५१॥
तनुसादृश्यें नयना भ्रम । अगाध मुनीचा तपोविक्रम । तुझा कांत हा भार्गवोत्तम । घेऊनि स्वधर्म संरक्षीं ॥५२॥
सुकन्या नमूनि अश्विनीकुमरां । मग वंदिलें निजभर्तारा । देखोनि यथोक्त सदाचारा । मग अंतरा दृढ केलें ॥५३॥
देखोनि पातिव्रत्यसुनेमा । आह्लाद जाला भिषकोत्तमां । सुकन्येहस्तीं मुनिसत्तमा । देऊनि स्वधामा निघाले ॥५४॥
उभयतांची घेऊनि आज्ञा । आरूढोनिया दिव्यविमाना । नासत्य गेले अमरभुवना । सुकन्याच्यवना बहुहर्ष ॥२५५॥
स्नान संध्या औपासन । ब्रह्मयज्ञ पितृतर्पण । देवमनुष्यभूतयज्ञ । अतिथिपूजन नित्यत्वें ॥५६॥
ऐसीं संपन्न सदाचारीं । आश्रमीं वसती प्रेमादरीं । तंव कोणे एके काळान्तरीं । शर्याति करी आगमन ॥५७॥
स्मरोनि मुनीचा पूर्वापराद । सेना ठेवूनि समर्याद । आश्रमें प्रवेशे सावध । तंव मानी विरुद्ध दुहितेचें ॥५८॥
सूर्यवर्चस्वी पुरुष तरुण । स्कन्येनिकटीं देखिला दुरून । सुकन्या जनकातें देखोन । वंदी चरण आह्लादें ॥५९॥
सुकन्येनें नमितां चरण । आह्लाद न वटे नृपाच्या मना । कांहीं नेदूनि आशीर्वचना । आलिंगना उपेक्षी ॥२६०॥
वदे कन्येसि निर्भर्त्सून । तुझे कैसें हें दुष्टाचरण । जगद्वंद्य जो मुनि च्यवन । जरठ म्हणून त्यजिला तां ॥६१॥
स्वैरिणी असतीस संमता । जारअध्वग जोडिला भर्ता । त्यातें भजसी लंघूनि व्रता । केंवि दुष्पथा आचरसी ॥६२॥
सत्कुळीं जन्मोनि ऐसी मति । उभयकुळांतें अधोगति । जार स्वीकेला उपपति । ओयीं परती निर्लज्जे ॥६३॥
माझिये जठरीं तां जन्मोन । लाविलें द्वयवंशा लांछन । ऐसें ऐकोनि जनकवचन । प्रसन्नवदनें हास्य करी ॥६४॥
तैसाचि प्रसन्न सस्मित मुनि । विस्मित शर्याति देखोनी । तंव सुकन्या कथी वचनीं । जनकालागूनि वृत्तांत ॥२६५॥
भो भो जनका ऐकें मात । च्यवनभार्गव हा तव जामात । अश्विनीकुमारवरें प्राप्त । सम मन्मथलावण्ये ॥६६॥
नासत्यवृत्तान्त सविस्तर । ऐकोनि शर्याति नृपवर । परमाह्लादें मुनीश्वर । नमूनि सादर आळंगी ॥६७॥
सुकन्येसि देऊनि क्षेम । त्यजिला मनींचा विकल्पभ्रम । स्वस्थ लाहूनि मुनिसंगम । सांगें स्वनेम मुनिपासीं ॥६८॥
मुनीतें म्हणे नृपोत्तम । यज्ञ करावयाचा मज काम । म्हणोनि स्वामेंचा आश्रम । ठाकूनि सप्रेम पातलों ॥६९॥
ऐकोनि आह्लादला च्यवन । म्हणे तूं शर्यातिराया धन्य । करविता जाला सोमयजन । ऋत्विजगण मेळवुनी ॥२७०॥
कुंडें मंडप वेदी शुद्ध । समित्कुशाज्य द्रव्यें विविध । मंत्र तंत्रोपकरणें सिद्ध । करवी प्रबुद्ध च्यवनऋषि ॥७१॥
अध्वर्यु जाला स्वयें च्यवन । सोमाधिकारी नसतां पूर्ण । तयां नासत्यां सोमावदान । देता झाला स्वतेजें ॥७२॥
तें देखोनि क्षोभला इंद्र । च्यवनहनना उचलिला वज्र । वज्रेंसहित अमरेंद्रकर । स्तंभी मुनिवर प्रतापें ॥७३॥
जैसा अचंचळ शिळास्तंभ । तैसा सवज्र हस्त उत्तंभ । देखोनि म्हणती सुर मुनि सभ्य । सोमींचा लाभ सुरवैद्यां ॥७४॥
वैद्य म्हणोनि अनर्ह सोमीं । बहिष्कृत केले होते आम्हीं । ते आजि च्यवनमुनीच्या विक्रमीं । लाधले सोमीं हविर्भाग ॥२७५॥
इंद्रें जाणोनि मुनिप्रताप । शान्त केला स्वकृत कोप । क्रतुसुकृतें शर्यातिभूप । फळअर्पणें गौरविला ॥७६॥
तया शर्यातीचे जठरीं । पुत्र तिघे जन्मले क्षेत्रीं । तयांचीं नामें श्रोतीं श्रोत्रीं । सुकृत पात्रीं परिसावीं ॥७७॥
उत्तानबर्हि ज्येष्ठ कुमर । आनर्तनामा त्याहूनि अवर । कनिष्ठ भूरिषेण नृपवर । जाले भूधर भूपाळ ॥७८॥
तया आनर्तें वसविला देश । आनर्त ऐसें नाम त्यास । कळावया हें श्रोतयांस । हा इतिहास निरूपिला ॥७९॥
गोमतीरत्नाकराच्या मेळीं । कुशदैत्यानें कुशस्थळीं । निर्मूनि वसवीत होता बळी । त्या निर्दाळी त्रिविक्रम ॥२८०॥
त्यावरी तैसेंचि रिक्त स्थान । बसवीत होते दस्युगण । पुढें आनर्तनंदन । करितां शासन भूचक्रा ॥८१॥
तो रेवतनामा आनर्तस्त । रेवताचळींचा जो नृपनाथ । तेणें मर्दूनि दस्यु दुष्कृत । रत्नाकरांत प्रवेशला ॥८२॥
रत्नाकराचा भवंता अगड । देखोनि कुशस्थळी अवघड । दुर्ग निर्मूनियां सुघड । राहिला प्रौढ प्रतापी ॥८३॥
आनर्तप्रमुख देश सकळ । स्वशासनें स्वधर्मशीळ । पाळी रेवत अवनिपाळ । आनर्तबाळ तेजस्वी ॥८४॥
तया रेवतापासून । जाले शतपुत्र उत्पन्न । ककुद्मिकन्या रेवत अवनिपाळ । जीचें लावण्य अद्वितीय ॥२८५॥
ककुद्मीं ज्येष्ठ रेवतसुत । रैवत ऐसा ज्या संकेत । झाला कुशस्थळीचा नाथ । रेवतीवृत्तान्त अवधारा ॥८६॥
रेवतीसौंदर्यपडिपाडें । शोधितां त्रिजगीं वर न जोडे । रेवत ती घेनि कोडें । गेला निवाडें विधिसदना ॥८७॥
रेवतीलावण्यपंकजभ्रमर । निर्मिला असेल जो भूवर । तो ब्रह्मया पुसोन वर । व्हावें सादर तदर्पणीं ॥८८॥
तंव ते ब्रह्मसभेमाझारीं । गंधर्वगायन सप्तस्वरीं । ब्रह्मा तन्मय त्यामाझारीं । न फवे अवसरीं नृपप्रश्ना ॥८९॥
तया गंधर्वगायनाअंतीं । विधीतें नमोनि रेवतनृपति । कन्या द्यावी कवणाप्रति । केली विनति विधातया ॥२९०॥
ऐसें ऐकोनि रेवतवचन । हांसोनि बोले चतुरानन । म्हणे राया त्वत्कालीन । भूपसंतान संहरलें ॥९१॥
तां जे हृदयीं धरिले भूप । तत्पुत्रपौत्रसंतति अमूप । परंपाअ गणितां न लगे माप । जाला लोप तद्गोत्रा ॥९२॥
येथ जो गायनीं लोटला क्षण । त्यामाजि युगचौकडिया पूर्ण । सप्तविंशति जाल्या जान । गेले नृपगण बहुकोटि ॥९३॥
अठ्ठाविसावी चौकडी । उदैली वर्तमान रोकडी । येथ देवदेवांश अवतार प्रौढी । दुष्कृतकोडीसंहरणा ॥९४॥
तो संकर्षण पुरुषरत्न । त्यासि तुझें हें कन्यारत्न । अर्पीं करूनि पाणिग्रहण । सफळप्रयत्न तैं अवघा ॥२९५॥
ऐसा विधीनें आज्ञापिला । ब्रह्मया वंदूनि स्वपुरा आला । तंव राक्षसीं विध्वंस केला । स्ववंश लाविला दिगंतीं ॥९६॥
आपुले वंशज गोत्रवर्ग । कुशस्थळीचा करूनि त्याग । राक्षसभयें विपत्तियोग । अष्ट दिग्भाग वसविती ॥९७॥
ऐसें देखोनि विटला मनीं । म्हणे अश्लाघ्य राहणें मर्त्यभुवनीं । मग रेवतीकन्या सवें घेऊनी । पातला वृष्णिप्रवरापें ॥९८॥
आनकदुंदुभि वृष्णिप्रवर । तत्सुत विष्णूचा अवतार । स्वकन्येसि तो केला वर । मानूनि यंत्र स्रष्ट्याचा ॥९९॥
आर्षमार्गें पाणिग्रहण । करविलें अर्पूनि कन्यारत्न । वंदूनि वृष्णि यादवगण । बदरिकारण्य प्रवेशला ॥३००॥
परम विरक्त भूप ककुद्मीं । जाऊनि नारायणाश्रमीं । तपश्चर्या नित्य नेमीं । मुनिसंत्तमीं मिरवला ॥१॥
श्रोतीं केला होतां प्रश्न । आनर्तदेश नाम कोण । रेवत कोणाचा नंदन । विध्याज्ञापन तें कैसें ॥२॥
तरी शर्यातीचा आनर्त तनय । आनर्तदेश तद्राष्ट्रीय । रेवत आनर्ताचा तनय । कथिला अन्वय प्रश्नाचा ॥३॥
ऐसा पूर्वींच नवमस्कंधीं । संकर्षणाचा विवाहविधि । कथिला असतां इयेसंधी । पुन्हा बोधी सिंहदशा ॥४॥
तैसेंच समासें वक्षमाण । रुक्मिणीचें पाणिग्रहण । करिता जाला श्रीभगवान् । तें निरूपण अवधारा ॥३०५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP