अध्याय ५२ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नीयमाने धने गोभिर्नृभिश्चाच्युतनोदितैः ।
आजगाम जरासंधस्त्रयोविंशत्यनीकपः ॥६॥

शकटशाकटीवृषभभार । चकारें रथाश्वोष्ट्रकुंजर । भरूनि वेसर खेचर खर । बळिष्ठ नर बहु जाती ॥७०॥
कृष्णप्रेरणेवरूनि ऐसीं । रत्नें भूषणें द्रव्यराशि । देशोदेशींच्या विविधा दासीं । वोझीं शिरसीं वाहिजती ॥७१॥
शस्त्रें वस्त्रें शिबिरें नाना । अस्त्रें यंत्रें साम्राज्यचिना । अनेक वाय्दें ध्वजनिशाणा । आतपत्राणासह शिबिका ॥७२॥
अमूल्य गजरथतुरंगरत्नें । सुबद्ध जडिताचीं पल्याणें । पाठितपक्षीपंजर श्वानें । परमजवीनें मृगयार्थ ॥७३॥
युद्धकौतुकीं मत्त अविक । शकुंतहंते श्येन अनेक । महिष कुरंग व्याघ्र जंबुक । वानरप्रमुख मृगशाळा ॥७४॥
परिमळद्रव्यें नृपोपभोग्यें । धातुपात्रें विचित्ररंगें । परपण्यस्थ वार्धुपवर्गें । पदार्थ अवघे समवेत ॥७५॥
अभेद्य कवचें अभेद्य टोप । अभेद्य गजाश्व सन्नाहकल्प । वेश्या नर्तकी मद्यें अमूप । म्लेच्छयूथपवराङ्गना ॥७६॥
विविध कुशला दासदासी । गायक नर्तन गुणैकराशि । भिषक् सभेषज गणक जोसी । सेना राक्षसी लुंठन जें ॥७७॥
ऐसें द्वारके लुंठन नेतां । तंव येरीकडे वर्तली कथा । मागधा वार्तिकीं कथिली वार्ता । जे यादवघाता म्लेच्छ आले ॥७८॥
गर्गक्षोभें वरदकुमर । कालाग्निरुद्राचा अवतार । कालयवन महाक्रूर । म्लेच्छभार त्रिकोटि ॥७९॥
बळें भंगूनि मथुरापुर । जीत धरावे कृष्णहलधर । करावया यदुकुळसंहार । हा मुख्यमंत्र यवनांचा ॥८०॥
यवन अजिंक रुद्रवरद । ऐकोनि हरिखेला मागध । औषधेंवीण हरला गद । तोचि प्रसिद्ध हा योग ॥८१॥
ऐसें मानूनि उत्साहभरें । वार्तिकां देऊनि हेमाम्बरें । पुढती चार प्रेरूनि मथुरे । प्रहरें प्रहरें वृत्त आणी ॥८२॥
तेवीस अक्षोहिणी दळ । मेळवूनियां मगधपाळ । धांवणी करूनियां तत्काळ । आला यदुकुळनिर्दळणा ॥८३॥
कालयवनेंसीं करावें सख्य । यद्युकुळ मारावें निःशेख । ऐसा पोटीं धरूनि तंवक । जातां वार्तिक भेटले ॥८४॥
तिहीं कथिलें यवनमरण । म्लेच्छसैन्याचें मर्दन । मागधभयें रामकृष्ण । जीव घेऊन पळताती ॥८५॥  
ऐकोनि प्रळयपवनगति । धांवणी करूनि मागधपति । द्वारके नेतां म्लेच्छसंपत्ति । रामयदुपति मेळविले ॥८६॥
अरे कृष्ण कितवपति । आमा अधमा वीरवृत्ति । सांवरोनियां समरक्षिती । सज होऊनि फिरा रे ॥८७॥
सतरा वेळा फावली फटी । ते विसरावी आजि गोठी । मागधरूपें कृतान्त कंठीं । पडला हठी महापाश ॥८८॥
आयुष्याची पुरली घडी । म्हणूनि वरपडलां काळधाडी । येथूनि तुम्हां अक्षत काढी । ऐसी प्रौढी कवणातें ॥८९॥
नोकूनि ऐसी अचागळी । मागध बोले तिये वेळीं । महावीरांची आरोळी । ब्रह्मगोळीं भयजनक ॥९०॥
हें देखोनि रामवीर । मागधमर्दनीं आविष्कार । धरितां संकेतें श्रीधर । वारी सत्वर तयासी ॥९१॥
येकट घेणें नेतां पंथीं । म्हणती पडिलों मागधाहातीं । धरिली जैसी मनुजाकृति । यालागिं भीति मनुजत्वें ॥९२॥

विलोक्य वेगरभसं रिपुसैन्यस्य माधवौ ।
मनुष्यचेष्टामापन्नौ राजन्दुद्रुवतुर्द्रुतम् ॥७॥

षड्गुणैश्वर्यसंपन्न । तथापि मनुष्यनाट्यानुकरण । मागधभयें पलायन । त्वरें करून आदरिलें ॥९३॥
राया कुरुकुलमंडनतिलका । शत्रुसैन्याचा प्रबळ आवांका । रामकृष्णीं देखोनि लोका । भयाची शंका दाखविली ॥९४॥
मधुवंशींचे माधव दोन्ही । शत्रुप्रतापचंपकघाणी । न साहोनि पलायनीं । त्वरें करूनि प्रवर्तलें ॥९५॥
सतरा वेळा वीरश्रिया त्यजिला । अकीर्तिदुर्दशेनें जो वरिला । तो मागधपल्लव डावलिला । समरमाधवीं बलकृष्णीं ॥९६॥
अकीर्तिरजःस्वलासंस्पृष्ट । मागध देखोनि विवेकभ्रष्ट । म्लेच्छलुंठनधन यथेष्ट । रामवैकुंठ उपेक्षिती ॥९७॥
रजःस्पृष्टाची पडेल छाया । म्हणोनि त्यजिली धनयशमाया । पळते जाले तें कुरुराया । परिसावया दृढ होईं ॥९८॥

विहाय वित्तं प्रचुरमभीतौ भीरुभीतवत् । पद्भ्यां पद्मपलाशाभ्यां चेलतुर्बहुयोजनम् ॥८॥

म्लेच्छसेनालुंठनवित्त । रत्नवसनें वस्तुजात । हयगजयानें असंख्यात । त्यागूनि त्वरित पळाले ॥९९॥
ज्याच्या संकल्पमात्रें करून । ब्रह्माण्डाचें स्थितिलयसृजन । ऐसे निर्भय जे रामकृष्ण । पळती भिवोन भीतवत् ॥१००॥
जैसीं लेंकुरें नेणतीं । किंवा वनिता भयाची मूर्ति । त्यांहूनि सहस्रधा सभय चित्तीं । होऊनि पळती भीतवत् ॥१॥
कोमळ कमळगर्भीचीं दळें । त्यांहूनि सुकुमार चरणतळें । सभय चपळ पळतिये वेळे । न सांभाळे पथापथ ॥२॥
गळोनि पडिलीं पादत्राणें । न संवरती आंगवणें । कंटक कंकर तुडविती चरणें । तद्वेदने न स्मरती ॥३॥
व्याघ्र सिंहादि श्वापदश्रेणी । रामकृष्णांच्या पलायनीं । बुजालीं उठती खडखडोनी । चकित होऊनि पाहती ॥४॥
काटे वोरबडती आंगा । गुल्मलंघनें जानुजंघा । आरोहावरोह भूधरभागा । श्वास लगबाअ उसंतिती ॥१०५॥
न पाहती फिरोनि मागें । वनोपवनें लंघिती वेगें । गिरिकंदरें दुर्गममार्गें । गहनें दांगें अतिक्रमिती ॥६॥
ऐसे अनेक ओजनें दुरी । विविध देश लंघिती त्वरीं । मागधभयें राममुरारि । पलायनकारी तुज कथिले ॥७॥

पलायमानौ तौ दृष्ट्वा मागधः प्रहसन्बली । अन्वधावद्रथानीकैरीशयोरप्रमाणवित् ॥९॥

रामकृष्ण पलायनपर । देखोनि मागध महावीर । हास्य करूनियां रहंवर । प्रेरी सत्वर त्यांमागें ॥८॥
मागध प्रेरितां करसंकेतीं । तत्पक्षींचे प्रबळ नृपति । यानें लोटूनि मारुतगती । धरा म्हणती गोरक्षां ॥९॥
अश्वसादी राउत राणे । उच्चैःश्रव्याचे आंगवणे । मनोजवीनें अश्वरत्नें । साट देऊनि लोटिती ॥११०॥
कुंजरयानीं एक नृपति । एक स्यंदनें मनोरथगति । जवीन क्रमेलकांची पंक्ति । जवें प्रेरिती हरिमागें ॥११॥
अनवाहणी पादचारी । कोठें पळती गिरिकंदरीं । धरा मारा भेदा शरीं । तिखटा शस्त्रीं विदारा ॥१२॥
ऐशा वल्गना करिती वीर । सिंहनाद भयंकर । रणवाद्यांचे महागजर । चंड भडिमार यंत्रांचे ॥१३॥
ऐसा बिभीषाजनक ध्वनि । गाजत मागधाच्या सैन्यीं । विजयवार्ताप्रख्यापनीं । वार्तिक धांवडी स्वपुरातें ॥१४॥
नागाधीश संकर्षण । त्रिजगदधीश रमारमण । अतर्क्यमहिम्न हें नेणोन । कृतपलायन रिपु मानी ॥११५॥
चरणस्पर्शें तृणादि जीव । उद्धरावे हा मुख्य भाव । भेणें पळती हें लाघव । दाविती माव मनुजवत् ॥१६॥
तंव एक म्हणती भरूनि हांवा । पाठिलागें घेतां धांवा । अगाध न कळती कृष्णमावा । काय केव्हां करी करवी ॥१७॥
पुढें पळोनि जाती वेगें । किंवा घाला घालिती मागें । न कळे म्हणोनि वाहिनी आंगें । यथाविभागें संरक्षा ॥१८॥
एक म्हणती यवनापरी । वोढूनि नेतसे गिरिकंदरीं । सेनेसहित सगरासरी । करवी बोहरी तपस्तेजें ॥१९॥
एक म्हणती आलीं मरणें । तंव एक बोलती नवे तरणे । मागधमृगपतीच्या भेणें । यादवें हरणें पळताती ॥१२०॥
ईश्वरावतार रामकृष्ण । नेणोनि ऐश्वर्य त्यांचें गहन । मागधसहित यूथपगण । वल्गना करून धांवती ॥२१॥
सेनामुखीं दूर ना निकटीं । मागधासम्मुख दिसती दृष्टी । गमती पळतां जाले कष्टी । पळती संकटीं जीवभयें ॥२२॥
पळतां टणकलीं बापुडीं । वळती पायांच्या वेंगडी । म्हणोनि विंधिती कानाडी । वोढूनि प्रौढी महारथी ॥२३॥
एवं हांवें चढवूनि सकळ । दुरी नेला मागधपाळ । प्रवर्षणनामा उच्च अचळ । वेंघले हरिबळ तें ऐका ॥२४॥

प्रद्रुत्य दूर संश्रांतौ तुंगमारुहतां गिरिम् ।
प्रवर्षणाख्यं भगवान्नित्यदा यत्र वर्षति ॥१०॥

पळतां न पळवे संकटीं । श्रमित पाउलें टाकिती कष्टीं । मागध पाहत असतां दृष्टी । दाटोदाटीं गिरि चढले ॥१२५॥
प्रकर्षें पलायन करून । केलें स्वराष्ट्रसंरक्षण । भाविभूपां युक्तिशंसन । म्लेच्छदमनीं याम्येयां ॥२६॥
पर्वताश्रयें पादचारी । सबळशत्रु आणिजे हारी । ऐसें सुचवूनि राममुरारि । प्रवर्षणगिरि वळघले ॥२७॥
ऐसा मागध नेला दुरी । द्वारके घेणें नेलें कुकुरीं । या विंदानें दोहीं परी । सबळ वैरी आकळिजे ॥२८॥
ऐसा गिरीचें महिमान । त्रैलोक्यरक्षक रामकृष्ण । ते रक्षावया आपुले प्राण । जाले शरण ज्या अचळा ॥२९॥
किंवा गिरीची तपश्चर्या । सफळ जाणोनि वृष्णिधुर्या । कृपा द्रवतां तत्तोषकार्या । कुरुनरवर्या नग चढले ॥१३०॥
मंदर धरिला पृष्ठीवरी । कीं गोवर्धन धरिला करीं । तिसरा प्रवर्षणाख्य गिरि । करी श्रीहरि पदपूत ॥३१॥
गृहस्थ वदान्य श्रीसमर्थ । याचक आश्रयी आर्तभूत । तेंवि तो पर्वत समृद्धिमंत । हरिबळ श्रान्त आश्रयिती ॥३२॥
समृद्धिमंत कैसा गिरि । अकरा योजनें गगनोदरीं । मेघमंडळ ज्याचे शिरीं । मुकुटाकारीं भासतसे ॥३३॥
द्वादश योजनें घनमंडळ । अकरा योजनें अचळमौळ । यालागिं नग तो सर्व्स सजळ । नित्य आखंडळ प्रवर्षे ॥३४॥
जळप्रसंगें समृद्धि । सफळ सुरसा दिव्यौषधि । प्राणिमात्रां आधि व्याधि । कदा न बाधी अमरवत् ॥१३५॥
आपण पर्वतीं होतां गुप्त । शत्रु जाळील तो पर्वत । ऐसा जाणोनि भविष्यार्थ । आला अनंत प्रवर्षणा ॥३६॥
प्रवर्षणाख्य सजळ गिरि । क्षोभोनि जाळील मागध जरी । तथापि तृणवृक्षादि जंतुमात्रीं । पावक न करी पद्रव ॥३७॥
ऐसें विवरूनियां मनीं । रामकृष्ण बंधु दोनी । ससैन्य मागध पाहतां नयनीं । गेले चढोनि गिरिशिरसीं ॥३८॥
देखत देखत वळघले गिरि । सैन्यें वेष्टिला तो चौफेरी । अपार सैनिक चढले वरी । शिखरीं शिखरीं हुडकिती ॥३९॥
जाळी वल्लरी द्रुमकोटरें । दर्‍या दरकुटें विवरें कुहरें । गुल्मलतापिहित दरे । दांगें प्रचुरें शोधिती ॥१४०॥
हातधरणी नरांच्या हारी । सावध करिती परस्परीं । सहस्रधा देऊनि फेरी । दिशा चारी गिरि पाहती ॥४१॥
अश्वकुंजररथादि यानें । गिरितळवटीं टाकूनि सैन्यें । गिरि शोधिती सावधपणें । ठेवूनि रक्षणें गिरिभवंतीं ॥४२॥
यत्नें शोधितां नानाविधि । रामकृष्णाची न लभे शुद्धि । क्षोभे मागध महाक्रोधी । करी दुर्बुद्धि तें ऐका ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP