अध्याय ५१ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स्वापं यातं यस्तु मध्ये बोधयेत्त्वामचेतनः ।
स त्वया दृष्टमात्रस्तु भस्मीभवतु तत्क्षणात् ॥२१॥

गुहानिगूढपर्वतकुहरीं । तेथ स्वेच्छा निद्रा करीं । चिरकाळींचे क्लेश हरीं । वर अवधारी आन कांहीं ॥६९॥
गुहास्थानीं निद्रिता तूतें । जागृत करील जो अवचितें । तो तुझेनि दृष्टिपातें । भस्म हो कां तत्काळ ॥१७०॥
निद्रा संपलियाउपरी । जागृति येतां स्थूळशरीरीं । कैवल्यदानी जी श्रीहरी । कृपा तुजवरी करील ॥७१॥

एवमुक्तः स वै देवानभिवंद्य महायशाः । अशयिष्ट गुहाविष्टो निद्रया देवदत्तया ॥२२॥

राजा मुचुकुंद तये क्षणीं । देवीं गौरविला ऐसिया वचनीं । तेणें सुरवर अभिवंदूनी । मर्त्यभुवनीं प्रवेशला ॥७२॥
असपत्न सप्तद्वीपवती । एकातपत्र चक्रवर्ती । अमर रक्षिले तारकावर्तीं । महायशकीर्ति यास्तव तो ॥७३॥
निर्जरवरें आनंदभरित । गुहा प्रवेशला तो त्वरित । निद्रा लाहूनि देवदत्त । पहुडतां जाला चिरकाळ ॥७४॥
जितुके दिवस तारकसमरीं । भिडतां सक्लेश प्रजागरीं । तावत्काळ निद्रित विवरीं । होता शरीरीं स्मृतिरहित ॥१७५॥
कृष्णें जाणोनि यवननिधन । समरीं करूनि पलायन । तेथ आणूनि कालयवन । जाला लीन गुहागर्भीं ॥७६॥
कालयवन पाठीं लागे । गुहागर्हीं ये रिघोनि वेगें । कृष्ण मानूनि लागवेगें । करी जागें मुचुकुंदा ॥७७॥
लत्ताप्रहार हाणितां क्रूर । जाला मुचुकुंदा जागर । अमरवरें भस्म असुर । उघडितां नेत्र मुचुकुंदें ॥७८॥
कार्य साधलें जाणोनि हरि । मग आपणातें प्रकट करी । मुचुकुंद देखे कवणेपरी । तें अवधारीं कुरुनाथा ॥७९॥

यवने भस्मसानीते भगवान्सात्वतर्षभः । आत्मानं दर्शयामास मुचुकुंदाय धीमते ॥२३॥

कालयवन जाळिला असतां । मुचुकुंदराया बुद्धिमंता । आपणा दाखवी तत्वता । प्रकट होऊनि भगवान ॥१८०॥
सात्वतर्षभ भक्तपति । प्रकट करोनि सगुणमूर्ति । दाविली ते तूं परीक्षिति । ऐकोनि चित्तीं वसो दे ॥८१॥

तमालोक्य घनश्यामं पीतकौशेयवाससम् । श्रीवत्सवक्षसं भ्राजत्कौस्त्भेन विराजितम् ॥२४॥

तया सगुण श्रीकृष्णातें । मुचुकुंद भयभीत होऊन चित्तें । पुसता जाला त्या अन्वयातें । चौथे श्लोकीं संबंध ॥८२॥
तोचि सगुण घनश्याम । पीतकौशेयवसनोत्तम । कृतपरिधान प्रभा रुक्म । इंद्रललाम खेवणिये ॥८३॥
श्रीवत्सलक्ष्म वक्षस्थळीं । भासुर कौस्त्भ तया जवळी । मुक्तादाम एकावळी । विराजमान सौंदर्यें ॥८४॥

चतुर्भुजं रोचमानं वैजयंत्या च मालया । चारुप्रसन्नवदनं स्फुरन्मकरकुंडलम् ॥२५॥

सुपीन सरळ चार्‍ही भुज । आपाद वैजयंतीची ओज । सुप्रसन्न वदनाम्भोज । कुंडलें सुतेज मकराकृति ॥१८५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP