अध्याय ५१ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स उत्थाय चिरं सुप्तः शनैरुन्मील्य लोचने ।
दिशो विलोकयन्पार्श्वे तमद्राक्षीदवस्थितम् ॥११॥

चिरकाळ निद्रिस्त गुहान्तरीं । निश्चळ होता गिरिकंदरीं । तो यवनाच्या लत्ताप्रहारीं । उठता जाला संक्षुब्ध ॥६५॥
हळूच नेत्र उघडूनि पाहे । कोण आपण कोठें आहें । भवंत्या दिशा निरखिता होय । तंव निकटीं पाहे यवनातें ॥६६॥
सुप्त फणींद्र मारिला लातें । कीं कुंजरे रगडिलें मृगेंद्रा दुचितें । तैसा क्षोभोनि तो यवनातें । स्वदृक्पातें भस्म करी ॥६७॥

स तावत्तस्य रुष्टस्य दृष्टिपातेन भारत । देहजेनाग्निना दग्धो भस्मसादभवत्क्षणात् ॥१२॥

त्याच्या क्षोभाचा दृक्पात । सक्रोध पावक तनुसंभूत । तेणें यवन भस्मीभूत । जाला न भरत क्षणमात्रें ॥६८॥
राया भरतान्वयसंभवा । ब्रह्मादि नेणती हरिलाघवा । तेथ यवनाचा कोण केवा । चढला हांव हरवरदें ॥६९॥
कृष्णें नेऊनि गिरिकंदरीं । भस्म केला ऐसिया परी । हें ऐकोनि मुनिवैक्खरी । पुसे आदरीं कुरुराव ॥७०॥

राजोवाच - को नाम स पुमान्ब्रह्मन्कस्य किं वीर्य एव च ।
कस्माद्गुउहां गतः शिश्ये किं तेजो यवनार्दनः ॥१३॥

राजा म्हणे जी योगींद्रतिलका । ब्रह्मनिष्ठाग्रगणी देशिका । मज हा कथान्वय ठावुका । कीजे शंका परिहरुनी ॥७१॥
गुहेमाजील निद्रिस्त पुरुष । किं नाम तो कोण वंश । यवनदहनीं सामर्थ्य त्यास । कोणा योगें मज सांगा ॥७२॥
काय वीर्य त्याचे आंगीं । कैसा प्रभाव कोणे लिंगीं । पुत्र कोणाचा तो मजलागीं । कथाप्रसंगीं सांगावें ॥७३॥
कायनिमित्त गुहान्तरीं । निद्रा केली चिरकाळवरी । यवनार्दनाग्नि कोणे परी । त्याचे शरीरीं उद्भवला ॥७४॥
ऐसा नृपाचा ऐकोनि प्रश्न । वक्ता योगींद्र त्रिकाळज्ञ । करिता जाला इतिहासकथन । तें सज्जन परिसतु ॥७५॥

श्रीशुक उवाच - स इक्श्वाकुकुले जातो मांधातृतनयो महान् ।
मुचुकुंद इति ख्यातो ब्रह्मण्यः सत्यसंगरः ॥१४॥

वशिष्ठान्वयद्योतकतरणि । वक्ता योगींद्र बार्रायणि । रायासि म्हणे सादर श्रवणीं । ऐकें कुळकणी प्रश्नाची ॥७६॥
इक्ष्वाकुवंशीं युवनाश्वरावो । प्रतापमार्तंड महाबाहो । अनपत्यदोषें पावोनि भेवो । विरागें देहो तापविला ॥७७॥
राज्यधुर्रंधर करूनि मंत्री । निर्विण्ण कानना गेला क्षत्री । विराजमान शतकलत्रीं । परमश्रोत्री आहिताग्नि ॥७८॥
विश्रामतां मुनिआश्रमीं । भेटले तपोधन संयमी । संवाद करितां संतानकामीं । राजा सुनेमी त्यां कळला ॥७९॥
मग म हणती युवनाश्वराया । विरागें कोरडी न करीं काया । ऐंद्री पुत्रेष्टि यजूनियां । करूं अन्वया अभिवृद्धि ॥८०॥
ऐसी ऐकोनि मुनींची वाणी । सभार्य राजा लागला चरणीं । कृपाळु होऊनियां ऋषिगणीं । घेऊनि वरणी मख केला ॥८१॥
परम तपस्वी ऋषीश्वर । समाहित नियतेंद्रिय एकाग्र । तपःप्रतापे शुभ अध्वर । करूनि शक्र तोषविला ॥८२॥
पुंसवनोदक शक्रप्रहित । वेदीमाझारी कलशसंस्थ । ऋत्विज देखोनियां निद्रिस्त । राजा तृषित तें प्याला ॥८३॥
जागृत होऊनि ऋत्विज पाहती । रिक्त कलश देखोनि पुसती । पुंसवनोदकाची गति । सांग म्हणती सर्वांतें ॥८४॥
राजा म्हणे तृषेच्या हरणा । कलशोदक म्यां प्राशिलें जाणा । ऐकोनि विस्मय ऋषींच्या मना । ईश्वरभावना म्हणती हे ॥८५॥
ईश्वराची अलोट करणी । मानूनि अवघे नमिती मूर्ध्नीं । दैवरेखा बळिष्ठ म्हणोनी । वंध्यापत्नी शतसंख्या ॥८६॥
पुंसवनोदकप्रादुर्भाव । गुरूदर जाला युवनाश्वराव । पूर्ण दिवसीं अघटित प्रसव । मुनिपुंगव त्या कथिती ॥८७॥
भेदूनि नृपकुक्षि दक्षिण । जन्मला युवनाश्वनंदन । स्तन्यालागिं करितां रुदन । मुनि सर्वज्ञ कळवळिले ॥८८॥
कंधास्यति म्हणती मुनि । तैं इंद्र इष्टीचा अभिमानी । बाळका पाजी स्वदेशिनी । मांधास्यति म्हणोनियां ॥८९॥
म्हणोनि मांधाता हें नांव । पावला युवनाश्वकुक्षिप्रसव । प्रसन्न होऊनि मुनिवर देव । नृपाचा देह जीवविला ॥९०॥
राज्थीं स्थापूनि मान्धातया । युवनाश्वराय तपश्चर्या । चिरकाळ करूनि सोडीली काया । सम योगियां योगगति ॥९१॥
पुढें मान्धाता चक्रवर्तीं । सप्तद्वीपवती जगती । दस्यु त्रासिले म्हणोनि गाती । त्रसदस्यु या अभिधानें ॥९२॥
रावणादिक जे उग्रकर्मे । ज्याचें शासन वाहती नियमें । पादपूजेसि हेमललामें । अर्पूनि प्रेमें जुहारिती ॥९३॥
तो मान्धाता यौवनाश्व । प्रतापतरणि नर पार्थिव । ज्याचें अच्युत तेज गौरव । त्रिजगीं सर्व यश गाती ॥९४॥
विष्णुमयचि पदार्थमात्र । विष्णुमयाचि भावूनि गात्र । विष्णुमयचि ब्रह्मसूत्र । यजी सर्वत्र हरि यज्ञीं ॥९५॥
सांगोपांग विधिविधानें । यथासंपन्न दक्षिणादानें । एकात्मबोधें केलीं यजनें । निष्कामपुण्यें नभ भरिलें ॥९६॥
सूर्यप्रकाश जेथवरी । अहोरात्रें भ्रमतां पसरी । तितुकी यौवनाश्वधरित्रीं । वेदीं शास्त्रीं वाखाणे ॥९७॥
शशबिंदूची तनया सती । नामें ख्यात जे इंदुमती । तिच्या ठायीं पुत्रोत्पत्ति । करी भूपती मान्धाता ॥९८॥
पुरुकुत्सनामा ज्येष्ठपुत्र । मध्यम अंबरीषाख्य कुमर । त्याहूनि कनिष्ठ सहोदर । मुचुकुंद तो हा योगीश ॥९९॥
तो हा इक्ष्वाकुकुलसंभव । मान्धातृतनय मुचुकुंदराव । ब्रह्मण्य म्हणिजे श्रुतिगौरव । पाळक स्वमेव विष्ण्वंश ॥१००॥
ज्याची प्रतिज्ञा न भंगे कदा । मानवदनावनिर्जरवृंदा । अभंग समरंगीं सर्वदा । सत्यसंवादा अलोट ॥१॥
व्यसनीं दानीं समरांगणीं । वदान्य धैर्य न पवे ग्लानि । सत्पथ न चळे विषयाचरणीं । सर्वीं करणीं शिक्षित जो ॥२॥
सुरभूसुराराधनपर । दयादाक्षिण्यें ईश्वर । कृपाप्यायक भूतमात्र । सर्वीं सर्वत्र सुकृतात्मा ॥३॥
अमर पामर तुळितां सुकृती । ऐसा मुचुकुंद भूचक्रवर्तीं । असुरसामरसमरीं शक्ति । धरूं न शकती जेणेंसीं ॥४॥

स याचितः सुरगणैरिंद्राद्यैरात्मरक्षणे । असुरेभ्यः परित्रस्तैस्तद्रक्षां सोऽकरोच्चिरम् ॥१५॥

कोणे एके समयीं राया । तारकासुरें तपश्चर्या । कठोर करितां विधीनें तया । वर देऊनियां गौरविला ॥१०५॥
अमर समरीं न पवती जय । मरणापासूनि तनु निर्भय । इतुकें याचितां ब्रह्मा क आय बदता होय तयाप्रति ॥६॥
निर्जर जर्जर होती समरीं । त्रिजगीं कोण्ही तुजला न मरीं । पर्वत प्रसवे जेव्हां कुमरी । ते त्रिपुरारि जैं परणी ॥७॥
तिचे जठरीं शंकरतनय । होईल तुज तैं त्याचें भय । त्याचेनि हस्तें पावसी क्षय । येर्‍हवीं निर्भय त्रिजगीं तूं ॥८॥
ऐकोनि तारकें केलें हास्य । पर्वतीं जन्म कैं कुमरीस । तीतें पर्णील जैं तत्पुरुष । मग ते कुमरास प्रसवेल ॥९॥
अवघें मानूनि हें अघटित । दैत्य निर्भय हृदयाआंत । भावें नमिला भारतीकांत । झाला विख्यात तद्वरदें ॥११०॥
काळखंज काळकेय । निवातवचसादिक मंदेह । दैत्यदानवराक्षसनिचय । देऊनि अभय मेळविला ॥११॥
ऐसी सेना सज्जूनि आसुरी । प्रतापें वेढिली अमरपुरी । निर्जर जर्जर केले समरीं । शक्र शस्त्रास्त्रीं त्रासिला ॥१२॥
पुढें समरा सुपर्वाण । कोण्ही न धरिती आंगीं त्राण । सांडूनि वीरश्री आंगवण । पलायन विवंचिती ॥१३॥
ग्लानि पावले देखोनि देव । अमराचार्य जो कां जीव । तेणें प्रबोधिला वासव । उपायगौरव कथूनियां ॥१४॥
देवीं सांडितां अमरपुरी । तारक मिरवेल त्रलोक्यभद्रीं । तेव्हां दैत्य तुमच्या छिद्रीं । जाचती क्षुद्रीं क्षुद्रत्वें ॥११५॥
यालागिं ऐका एक मंत्र । मुचुकुंद मान्धातयाचा पुत्र । अयोध्येमाजि परम पवित्र । एकातपत्र भूचक्रीं ॥१६॥
सुकृतें शक्राहूनि वरिष्ठ । सत्यप्रतिज्ञ भगवन्निष्ठ । ज्याचे समरीं न थरे दुष्ट । तुह्मीं त्या स्पष्ट प्रार्थावें ॥१७॥
त्यासि निरवूनि अमरभुवन । तुम्ही आराधा चतुरानन । प्रसन्न करूनि तारकहनन । जेणें करून तें प्रार्था ॥१८॥
अमरीं मानूनि मंत्रिमंत्र । प्रार्थिला मुचुकुंद मान्धातृपुत्र । तारकसमरीं करूनि क्षेत्र । रक्षिजे गोत्रभित् शरण ॥१९॥
सूर्यवंशींचा प्रतापतरणि । याचिला असतां निजर्रगणीं । अमरांनिमित्त समरांगणीं । यशश्रीवव्रणीं प्रवर्तला ॥१२०॥
असुरांपासोनि त्रासले सुर । मुख्य करूनि पुरंदर । आत्मरक्षणार्थ हा नृपवर । याचितां सत्वर उठावला ॥२१॥
भूसुरसुरसुरभिपालना । स्वधर्मसेतूसंस्थापना । शरणागतजनसंरक्षणा । बिरुदें जाणा रविवंशीं ॥२२॥
कुढावूनियां अमरवृंद । तारकसमरंगीं कुचुकुंद । होऊनि शस्त्रास्त्रीं संन्नद्ध । प्रतापें युद्ध आदरिलें ॥२३॥
कालखंजादि असुरश्रेणी । प्रतापें बिभांडूंनियां बाणीं । तार्रक जर्जर समराङ्गणीं । स्मरे निर्वाणीं विधिवरदा ॥२४॥
विधिवरदानें तारक अमर । येर्‍हवीं न करवे नृपासिं समर । युद्धीं होय पलायनपर । बाणीं जर्जर होऊनी ॥१२५॥
परंतु न सोडी आयोधना । प्रतापी असुर पावती निधना । पुडती पुडती दैत्यसेना सज्जूनि रणा हांव धरीं ॥२६॥
मुचुकुंद रक्षी अमरपुरी । तारक हांव न संडी समरीं । दैत्यसेनेची सामग्री । माया आसुरी करूनिया ॥२७॥
बहुधा अस्त्रांचीं प्रेरणें । नानापरीच्या कृत्यासृजनें । मोहभ्रांति प्रक्षोभणें । ज्वरगरदानें कापट्यें ॥२८॥
ऐसे आसुरी उपाय घोर । करिती दानव महाक्रूर । मुचुकुंद योद्धा रनरंगधीर । करी संहार असुरांचा ॥२९॥
जितेंद्रिय जितप्राण । निर्जितकामादिशत्रुगण । नीतिन्याय सत्यप्रतिज्ञ । प्रतापी पूर्ण मुचुकुंद ॥१३०॥
युद्ध करितां अहोरात्र । विश्रांति अल्प न लभे गात्र । नेणे आहार निद्रा अणुमात्र । अनिमेषनेत्र समरंगीं ॥३१॥
समरीं दैत्य भंगती एक । सवेंचि उठवती आणिक । बळिष्ठ यूथप पृथक् पृथक् । विभागपूर्वक भीडती ॥३२॥
राजा एकाकी सर्वदा । साह्य दुसर्रा नाहीं योद्धा । ऐसें करितां निर्वाणयुद्धा । युगमर्यादा लोटलिया ॥३३॥
कोण्ही कोण्हासि न भंगे । लोटलीं दोन महर्युगें । तंव येरीकडे अमर अवघे । तपःप्रसंगें फल लाहती ॥३४॥
ब्रह्मवरें हिमाद्रीजठरीं । उमा जाली ते शंकर वरी । प्रकट तीपोटीं तारकारि । त्यातें अमरीं लाहोनी ॥१३५॥
अमरपुरीसि पातले अमर । षण्मुख करूनि सेनाधर । समर्मीं मारूनि तारकासुर । स्तविती निर्जर मुचुकुंदा ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP