अध्याय ५० वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


बध्यमानं हतारातिं पपशैर्वारुणमानुषैः । वारयामास गोविंदस्तेन कार्यचिकीर्षया ॥३१॥

वरुणपाशें बांधोनी समरीं । रामें मागध धरिल्यावरी । दोर्दंड बांधोनि पाठिमोरी । कार्पासदोरीं करकरूनी ॥९४॥
त्याचा जंव करूं पाहे वध । त्वरें वारिता होय गोविंद । मागधहस्तें कार्य विशद । साधणें प्रसिद्ध जाणोनि ॥२९५॥
सहस्रें सहस्र अराति समर्रीं । पूर्वीं मागधें मारिले शस्त्रीं । ऐसियाचे दोर्दंड दोरीं । बांधोनि निकरीं वधों पाहे ॥९६॥
मागधहस्तें कार्य आन । साधावयाचे इच्छेकरून । कृष्णें वारिला संकर्षण । दिधलें जीवदान मागधा ॥९७॥
सोडिला मुक्त करूनि पाश । समरीं पावला महाअपयश । मार्गीं भूपति भेटती त्यास । करिती उपदेश तो ऐका ॥९८॥

स मुक्तो लोकनाथाभ्यां व्रीडितो वीरसंमतः ।
तपसे कृतसंकल्पो वारित्तः पथि राजभिः ॥३२॥

रामकृष्ण त्रैलोक्यनाथ । तिहीं विपाश केला मुक्त । मागध भूतळीं वीरसंमत । तो लज्जा प्राप्त हरिसमरीं ॥९९॥
वीरश्री उतरोनि काळें मुख । सैन्यभंगाचें हृदयीं दुःख । शत्रुवधार्थ्ह धरूनि तवंक । धडके पावक क्रोधाचा ॥३००॥
चैद्यादिक सुहृद आप्त । शाल्व पौंड्रक वक्रदंत । त्यांतें रहस्य सांगे गुप्त । संकल्पकृत सक्रोधेदं ॥१॥
म्हणे मी न वचें राजभुवना । मुख न दाखवीं आप्तां स्वजनां । भूमंडळीं लाजिरवाणा । जालों जाणा ये काळीं ॥२॥
यादवीं मारिलीं जितुकीं दळें । त्यांची कुटुंबें लेंकुरें बाळें । मज म्हणती कां तोंड काळें । घेऊनि आला निलाजिरा ॥३॥
भेदला सशोक शब्दवाण । हृदय फुटोनि जाती प्राण । यास्तव न दाखवीं त्यां वदन । सेवीन तपोवन वैराग्यें ॥४॥
चंडकौशिक महामुनि । प्रसन्न करीन आराधूनी । त्याच्या प्रतापें शत्रु दोन्ही । वरीन वधूनि विजयश्री ॥३०५॥
अथवा करितां कर्कश तप । प्राण जातील आपेंआप । किंवा ईश्वर कृतसंकल्प । सिद्धि प्रताप पाववील ॥६॥
मागधवृत्तांत हा सलज्ज । ऐकोनि राजे कथिती गुज । म्हणती पराभवाचें बीज । अद्यापि तुज कां न कळे ॥७॥
कैसें पराभवकारण । कथूनि करिती जें सांत्वन । नृपासि सांगे शुक सर्वज्ञ । श्रोतीं श्रवण तें कीजे ॥८॥

वाक्यैः पवित्रार्थपदैर्नयनैः प्राकृतैरपि । स्वकर्मबंधप्राप्तोऽयं यदुभिस्ते पराभवः ॥३३॥

ज्यामाजि पवित्र अर्थवाद । धर्मोपदेशाचे अनुवाद । ऐसिया पदीं करिती बोध । वाक्यें विशद बोधोनी ॥९॥
नीतिशास्त्रीं ज्या शास्त्रोक्ति । आणि प्राकृता लौकिका युक्ति । त्या त्या विवरूनि मागधाप्रति । राजे कथिती स्नेहवादें ॥३१०॥
यादवीं तुझा पराभव करणें । हें तूं आपुलें स्वकर्म जाणें । म्हणसी कोणतें कर्म उनें । तें निजकर्णें अवधारीं ॥११॥
राजे जिंकिती समरांगणीं । पुन्हा सोडिली गौरवूनी । बंदीं ठेविल्या तां नृपश्रेणी । हे तव करणी विपरीत ॥१२॥
धर्मशास्त्रोक्ति या सिद्ध । नीतिशास्त्रही ऐकें विशद । अबळांसमरीं बळिष्ठां युद्ध । मानिजे अबद्ध नयनिपुणीं ॥१३॥
आतां लौकिका प्राकृता युक्ति । गोवत्सावरी घालिजे हस्ती । कीं मशका मारिजे शस्त्रघातीं । हे अपकीर्ति दुर्यशदा ॥१४॥
एवं यादवें अत्यल्पकें । तथापि बलकृष्ण द्वय बालकें । तेवीस अक्षौहिणी कतकें । त्यांवरी तवकें गेलासी ॥३१५॥
लघुतर सैन्यें लेंकुरें समरा । येतां अनयें चढलासि निकुरा । अबळां बळिष्ठीं करितां प्रहारा । अधर्म ईश्वरा तो न मने ॥१६॥
यास्तव यादवीं पराभव । केला तो हा अभिप्राव । कर्मफळभोग कथिला सर्व । यावरी हांव न संडीं ॥१७॥
तूं जरी जाऊनि वनांतरीं । तपश्चर्या करिसी भारी । अकीर्ति वाजेल लोकान्तरीं । जाला भिकारी मागध हा ॥१८॥
यादवीं मारूनि बळिष्ट सैन्य । सोडिला देऊनियां जीवदान । पुन्हा न करवे आंगवण । प्राण रक्षूनि वन वसवी ॥१९॥
ऐसी अकीर्ति लोकोत्तर । होतां तव शत्रु नृपवर । आणि उठती यादवभार । घेती तव पुर क्षणमात्रें ॥३२०॥
ऐसें न करीं मागधनाथा । कायसी दुर्यशाची कथा । घालूं भूगोळ हा पालथा । मेळवी चळथा सैन्याच्या ॥२१॥
पूर्वीं घडलें तें अनुचित । आतां प्रतिकार यथोचित । साभिमानें धैर्यवंत । होईं समर्थ समरंगा ॥२२॥
ऐसा बोधितां राजयांनीं । ऐकोनि मागध खोंचला मनीं । अहंता धरिली परंतु ग्लानि । विजयहानि विसरेना ॥२३॥

हतेषु सर्वानीकेषु नृपो बार्हद्रथस्तदा । उपेक्षितो भगवता मगधान्दुर्मना यथौ ॥३४॥

मारिलें असतां सर्व सैन्य । दिधला भगवतें दवडून । जातां जाला अतिदुर्मन । स्वदेशालागून बार्हद्रथ ॥२४॥

मुकुंदोऽप्यक्षतबलो निस्तीर्णारिबलार्णवः । विकीर्यमाणः कुसुमैस्त्रिदशैरनुमोदितः ॥३५॥

गजाश्वरथी पदाति समरीं । किंचित् क्षतें ज्या शरीरीं । कृष्णें अमृतापांगान्याहारीं । पूर्विलापरी चमू केली ॥३२५॥
मागध रडत गेला गांवा । कथिला वृत्तांत तो आघवा । आतां मुकुंदप्रवेश बरवा । तो परिसावा सत्पुरुषीं ॥२६॥
अक्षत यदुबळपरिवेष्टित । शत्रुसैन्याब्धि निस्तृत । विमानीं त्रिदशीं अनुमोदित । पुष्पजीमूत वर्षोनी ॥२७॥
महावाद्यांचिया गजरीं । विजयश्रियेच्या अळंकारीं । बंधुस्वजनयादवभारीं । प्रवेशे स्वपुरीं तें ऐका ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP