अध्याय ४७ वा - श्लोक ६१ ते ६५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


आसामहो चरणरेणुजुषामहं स्यां वृंदावने किमपि गुल्मलतौषधीनाम् ।
या दुस्त्यजं स्वजनमार्यपथं च हित्वा भेजुर्मुकुंदपदवीं श्रुतिभिर्विमृग्याम् ॥६१॥

यावरी उद्धव वांछी मनीं । मजवरी तुष्टेल चक्रपाणि । तरी मी होईन वृंदावनीं । व्रजपदघसणी तृणवल्ली ॥७२०॥
या गोपींचें पदरजरेणु । सेविती जे जे उद्भिज्जगणु । त्यांमाजि कोण्हीएक सामान्य । होईन आपण तल्लाभा ॥२१॥
पतिपुत्रादि सदन धन । इष्टमित्र सुहृद स्वजन । कर्म लौकिक परम गहन । दुस्त्यज पूर्ण सर्वांसी ॥२२॥
वेदाविहित श्रेष्ठमार्ग । अनादिसिद्ध आचारओघ । इहीं त्यागूनि तो सवेग । भजल्या श्रीरंग सुखपदवी ॥२३॥
निगमशिरोभागींच्या श्रुति । अद्यापि जे पदवी शोभती । भवसुखत्यागें गोपींप्रति । ते हरिरति फावली ॥२४॥
यास्तव यांचे पदरजरेणु । ज्यांवरी पदती ते तरु तृण । होईन ऐसें वांछी मन । श्रीभगवानप्रसादें ॥७२५॥
उद्धव ऐसें वांछी मनीं । पुन्हा स्तवी त्या व्रजकामिनी । तें तूं सादर ऐकें श्रवणीं । कौरव अवनीअवनेंद्रा ॥२६॥

या वै श्रियार्चितमजादिभिराप्तकामैर्योगेश्वरैरपि यदात्मनि रासगोष्ठ्याम् ।
कृष्णस्य तद्भगवतश्चरणारविंदं न्यस्तं स्तनेषु विजहुः परिरभ्य तापम् ॥६२॥

उद्धव विवरी अभ्यंतरीं । केवढ्या सभाग्य व्रजसुंदरी । लक्ष्मी अर्ची जें पद स्वकरीं । अत्यादरीं दृढनिष्ठा ॥२७॥
ब्रह्मादिक जे आप्तकाम । आणि योगेश्वर नित्य निष्काम । तेही हृदयीं श्रीपादपद्म । ध्याती सनेम सप्रेमें ॥२८॥
परंतु नोहे अपरोक्षभेटी । ते या पशुपांगना रानटी । रासस्थानीं यमुनातटीं । धरिती कुचतटीं प्रत्यक्ष ॥२९॥
श्रीकृष्णचरण कुचांच्या ठायीं । रासस्थानीं गोपिकांहीं । दृढालिंगनें कवळूनि पाहीं । त्रितापखाई निवविली ॥७३०॥
विरहरूपी त्रितापदहन । जिहीं कुचतटीं पद कवळून । निःशेष निरसूनि समाधान । पावल्या पूर्ण हरिप्रेमें ॥३१॥
लक्ष्मीब्रह्मादि योगेश्वर । हरिपद ध्याती निरंतर । गोपी प्रत्यक्ष तें कुचाग्र । स्पर्शें संसारश्रम हरिती ॥३२॥
यालागीं यांहूनि वरिष्ठ कोण्ही । न दिसे अखिलब्रह्मांडभुवनीं । धन्य धन्य या व्रजमानिनी । पंकजपाणि ज्या भजल्या ॥३३॥
शुक म्हणे गा कुरुकुळभूपा । सप्रेमभजनें श्रुतिपथलोपा । जालिया प्रियातम कंदर्पबापा । तरि मग कां पां न भजावें ॥३४॥
म्हणसी किमर्थ वर्णाश्रम । किमर्थ वेदाध्ययनीं श्रम । कैसेनि ब्राह्मण वर्णोत्तम । ऐकें निर्भ्रम यदर्थीम ॥७३५॥
श्रुतिपथप्रणीत व्रताचरणें । ज्यांचे पदरीं अच्छिद्र पुण्यें । भगवत्प्राप्ति तेणें गुणें । तुजकारणें कथिली कीं ॥३६॥
भूधननिक्षेप जो पूर्वींचा । अवचट लाभ जालिया त्याचा । इतरीं प्रयत्न जोडावयाचा । काया वाचा न त्यजिजे ॥३७॥
भगवच्चरणीं प्रेम ज्यांचें । आभिजात्यादि उत्तम त्यांचें । वर्णिलें रहस्य या वाक्याचें । ऐकें साचें श्रवणज्ञा ॥३८॥
मलयागराच्या सान्निध्यें । मलयाचळीं काष्ठें विविधें । पालटलिया सौरभ्यवेधें । चंदनबोधें बोधिजती ॥३९॥
ज्यांसि जालें सन्निधान । तितुकींच म्हणविती चंदन । तद्वीज देशांतरीं आणून । पेरितां द्रुमषण पहिलेंचि ॥७४०॥
चलदलतुलसी चंदनतरु । इतर पादप ते लघुतरु । मलयागरवेधें अधिकारु । सुरभूसुरतिलकत्वा ॥४१॥
एवं अन्यज्ञातीमाजी । जे अनुसरती गरुडध्वजीं । पावन्न तितुकेचि पुढें वंशजीं । वर्तिजे सहजीं जातिपथें ॥४२॥
एवं अनन्य प्रेमा प्रिय । आभिजात्याचें नाहीं कार्य । येर संतति यथान्वय । न्याय अन्याय विधिप्रणीत ॥४३॥
ऐसा महिमा वरिष्ठ त्यांचा । उद्धवें वर्णूनियां स्ववाचा । दोष निरसूनि तारतम्याचा । केला नमनाचा अधिकार ॥४४॥

वंदे नंदव्रजस्त्रीणां पादरेणुमभीष्णशः । यासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम् ॥६३।

व्रजस्त्रियांचे पादरेणु । सर्वदा वंदी प्रेमें करून । ज्यांचें हरिसंगींचें आचरण । गातां त्रिभुवन पूत करी ॥७४५॥

श्रीशुक उवाच - अथ गोपीरनुज्ञाप्य यशोदां नंदमेव च ।
गोपानामंत्र्य दाशार्हो यास्यन्नारुरुहे रथम् ॥६४॥

शुक म्हणे गा कुरुकंजार्का । ऐसी उद्धवें नमनशंका । निरसूनि नमिल्या व्रजवायका । हृदयीं विवेका विवरूनी ॥४६॥
त्यानंतरें गोपिकांप्रति । आज्ञा मागोनि सप्रेमवृत्ति । पुसोनि नंद यशोदा सती । बैसला रथीं संतोषें ॥४७॥
समस्त गोपाळां पुसोन । उद्धवें आदरिलें प्रयाण । नंदप्रमुख बल्लवगण । आले घेऊन उपायनें ॥४८॥

तं निर्गतं समासाद्य नानोपायनपाणयः । नंदादयोऽनुरागेण प्रावोचन्नश्रुलोचनाः ॥६५॥

मथुरे निघतां उद्धवातें । नंदादि बल्लव मिनले भवंते । स्नेहानुरागें प्रेमभरितें । उपायनातें समर्पिती ॥४९॥
कोण्ही उष्णीष बांधिती शिरीं । एक अवतंस खोंविती वरी । एक कंचुक अत्यादरीं । उद्धवाशरीरीं लेवविती ॥७५०॥
एक बांधिती कटिबंधनें । एक पीतांबरपरिधानें । एक अर्पिती कंठाभरणें । अमूल्यवसनें प्रावरणा ॥५१॥
एक कुंडलें घालिती श्रवणीं । एक कंकणें घालिती पाणी । दशांगुळियें जडितरत्नीं । गोधात्राणें रत्नांची ॥५२॥
एकीं अर्पिली मेखळा । रुक्मांगदें बाहुयुगळा । आपाद रत्नमणींच्या माळा । वैजयंती समसाम्य ॥५३॥
कौस्तुभातुल्य पदकमणि । वांकी तोडर अंदु चरणीं । कनकाभरणीं रत्नीं वसनीं । अर्पिलीं व्रजजनीं उपायनें ॥५४॥
नंदप्रमुख बल्लवगण । उद्धवप्रयाणीं करिती रुदन । म्हणती वियोग अर्धक्षण । कृष्णासमान तव विरह ॥७५५॥
श्रमतां कृष्णविरहखेदें । क्षण एक विसरलों तव सान्निध्यें । आतां वियोगें विरहभेदें । दुःख समुद्रें दुणवटलें ॥५६॥
तेणें श्वास घालूनि वदनीं । बाष्पोदकें परिमार्जूनी । उद्धवाप्रति दीनवाणी । करिती विनवणी ते ऐका ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP