अध्याय ४७ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - तं वीक्ष्य कृष्णानुचरं व्रजस्त्रियः प्रलंबबाहुं नवकंजलोचनम् ।
पीतांबरं पुष्करमालिनं लसन्मुखारविंदं मणिमृष्टकुंडलम् ॥१॥

अनुचर कृष्णाचा उद्धव । त्यातें व्रजस्त्रिया सर्व । देखोनि मानिति अपूर्व । तूं ते अवयव अवधारीं ॥२९॥
सरळ सलंब बाहुयुगळ । नयन नवकंजदलविशाळ । मणिमंडितें कुंडलें तरळ । फांके झळाळ गंडयुगीं ॥३०॥
तेणें फुल्लारपंकजवदन । दिसे अत्यंत सुप्रसन्न । हेमपीतांबरपरिधान । श्वेतप्रावरण पांघुरला ॥३१॥
कंठीं विचित्र पंकजमाळा । आंगीं सौंदर्यश्रियेची कळा । त्यातें देखोनि बल्लवबाळा । वदती नृपाळा तें ऐका ॥३२॥

शुचिस्मिताः कोऽयमपीच्यदर्शनः कुतश्च कस्याच्युतवेषभूषणः ।
इति स्म सर्वाः परिबव्रुरुत्सुकास्तमुत्तमश्लोकपदांबुजाश्रयम् ॥२॥

अपीच्य म्हणिजे सुंदरतर । ज्याचें दर्शन मनोहर । तिलक भूषणें अलंकार । वेषें अपर हरिसाम्य ॥३३॥
अगे हा कोण कोठोनि आला । येथ कोणाचा प्रेरिला । हरिवेषासम भूषाथिला । नव्हे हा पहिला अक्रूर ॥३४॥
कृष्णपदांबुजाश्रय । उद्धव परमपार्षदवर्य । त्यातें वेष्ठूनि वधूसमुदाय । कृतविस्मय मिळाला ॥३५॥
सर्वदा कृष्णविरह पोटीं । तेचि सर्वत्र अचगमे गोठी । श्रवणीं पदतां शब्दसृष्टि । तद्गूपें उठी अर्थबोधु ॥३६॥
दृष्टी पडे तें तावक । ऐसें तव वेधाचें लावक । तावी विरहाचा पावक । तेणें नावेक गतशंका ॥३७॥
नाममात्र त्या अक्रूर । क्रिया पाहतां परम क्रूर । याचें कोमळ सदयांतर । वाटे अनुचxx कृष्णाचा ॥३८॥
ऐसा करूनि दृढ निश्चय । सादर गोपींचा समुदाय । सांडूनि लौकिकशंकाभय । करिती काय तें ऐका ॥३९॥

तं प्रश्रयेणावनताः सुसत्कृतं सव्रीडहासेक्षणसूनृतादिभिः ।
रहस्यपृच्छन्नुपविष्टमासने विज्ञाय संदेशहरं रमापतेः ॥३॥

हा कृष्णाचा संदेशहर । तेणें धाडिला समाचार । ऐसें जाणोनि वनितानिकर । जाला तत्पर सप्रेमें ॥४०॥
उद्धवाप्रति नम्रपणें । सत्कारपूर्वक केलीं नमनें । सत्कारिला कवण्या गुणें । तियें लक्षणें अवधारा ॥४१॥
सलज्ज मन्दहसित वदनें । व्यंकटकटाक्षनिरीक्षणें । सूनृत म्हणिजे सुललित वचनें । सम्मुखीकरणें पैं केलीं ॥४२॥
इत्यादि संस्कारीं सुसंस्कृत । नम्रभावें नमस्कृत । आसनीं बैसला आनंदभरित । गुह्यवृत्तांत त्या पुसती ॥४३॥
प्रेमोत्सुका आपुले पोटीं । अन्योक्तीच्या वदती गोष्टी । त्या तूं ऐकें श्रवणपुटीं । कुरुवरकोटीरललामा ॥४४॥

जानीमस्त्वां यदुपतेः पार्षदं समुपागतम् । भर्त्रेह प्रेषितः पित्रोर्भवान्प्रियचिकीर्शया ॥४॥

श्रीकृष्णाचा पार्षद ऐसा । निश्चय करूनि दृढमानसा । आम्ही तूंतें उत्तम पुरुषा । आलासि ऐसा जाणतसों ॥४५॥
बरव्या प्रकारें आलासि येथें । किमर्थ ऐसें कल्पितां चित्तें । तुझिया स्वामीनें धाडिलें तूंतें । ज्या कार्यातें तें ऐका ॥४६॥
नंदयशोदा पितरें जाण । त्यांच्या चित्ताचें समाधान । करावयाचें इच्छेंकरून । तुजलागून पाठविलें ॥४७॥
निजपितरांचें प्रियतम करणें । हेतुगर्भित हें बोलणें । उद्धवें जाणावया निजमनें । वदती वचनें तें ऐका ॥४८॥

अन्यथा गोव्रजे तस्य स्मरणीयं न चक्ष्महे । स्नेहानुबंधो बंधूना मुनेरपि सुदुस्त्यजः ॥५॥

मातापितरें बंधु स्वजन । यांचा स्नेह दुस्त्यज जाण । केलियाही संन्यासग्रहण । स्नेहबंधन तुटेना ॥४९॥
माता ठेवूनि बंधूपासीं । आपण जाइला जरी संन्यासी । बंधु पावल्या पंचत्वासी । तैं लागे मातेसि पोसावें ॥५०॥
तस्मात् दुस्त्यज मातापितरें । त्यांप्रति धाडिलें तुउज यदुवीरें । येर्‍हवीं त्याचे सखे सोयरे । व्रजीं दुसरे कोण पां ॥५१॥
इये गाईच्या गोठणी । कैंचे जिवलग त्यालागुनी । ज्या तो स्मरेल अंतःकरणीं । ऐसें कोण्ही न देखों ॥५२॥
जरी तूं म्हणसी व्रज समस्त । गोविंदासि जिवलग आप्त । तरी ते कार्यापुरती मात । सदृष्टांत अवधारीं ॥५३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP