अध्याय ४७ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अन्येष्वथकृता मैत्री यावदर्थविंडबनम् । पुंभिः स्त्रीषु कृता यद्वत्सुमनः स्विव षट्पदैः ॥६॥

अन्यत्र कार्या पुरती जनीं । मैत्री सोंगसंपादनी । अर्थ संपलिया परतोनी । पुन्हा हुंकोनि न पाहती ॥५४॥
तैसीच कां जारपुरुषांहीं । मित्री कीजे स्त्रियांच्या ठाईं । जैसा भ्रमर सुमनसोई । गंधलोभें लुडबुडी ॥५५॥
चटुलचाटुवदनें कपटी । कामप्रलोभ उपजवूनि पोटीं । कार्यापुरत्या मधुर गोठी । त्यजिती शेवटीं हळहळित ॥५६॥
सुमन सुके सुगंध उपखे । तेव्हां पूर्वील प्रेम फिकें परतोनि शब्द न वदे मुखें । स्नेह लटिकें कार्यार्थ ॥५७॥
नवप्रसूनीं आमोदभरें । पूर्विलाहूनि प्रेमादरें । लंपट होतां पहिलें विसर । स्नेह न स्मरे रतिभुक्त ॥५८॥
एवं अर्थसंपादना । पर्यंत मैत्रीलाघव नाना । कार्याअंतीं समान तृणा । मानी ललना जार नर ॥५९॥
सुकल्या सुमनीं न फिरे भ्रमर । तैसाचि भोगूनि जाय जार । रतिपूर्वील स्नेहादूर । विसरे सत्वर कृतघ्नवत ॥६०॥
एवं मातापितरां आप्तांविणें । कार्यापुरती मैत्री करणें । कार्य संपल्या ओसंडणें । कोणा कोणें ज्या परी ॥६१॥

निःस्वं त्यजंति गणिका अकल्पं नृपतिं प्रजाः । अधीतविद्या आचार्यमृत्विजो दत्तदक्षिणम् ॥७॥

स्व म्हणिजे धनाचें नाम । सधन देखोनि नर सकाम । गणिका वाढवी स्नेहसंभ्रम । सुरतप्रेम बहु लावी ॥६२॥
धन देवोनि निःस्व होये । तैं त्या गणिका लोटी पायें । पूर्वस्नेहाची न रखे सोय । रमती होय आणिकेंसीं ॥६३॥
कीं अष्टांगप्रकृतिहीन राजा । अक्षम शासन रक्षणकाजा । देखोनि त्यागिती समस्त प्रजा । प्रतापपुंजा आश्रयिती ॥६४॥
कीं विद्या घेतलिया गुरूतें । छात्र त्यजोनि जाती परौते । कीं पालाश पत्र हातें । भोजनांतीं त्यागिती ॥६५॥
कीं यज्ञसिद्धि सुकृतग्रहणा । ऋत्विजां दिधलिया दक्षिणा । ते मग त्यजिती यजमाना । अन्य याजना क्षण घेती ॥६६॥

खगा वीतफलं वृक्षं भुक्त्वा चातिथयो गृहम् । दग्धं मृगास्तथाऽ‍रण्यं जारो भुक्त्वा रतां स्त्रियम् ॥८॥

कीं जाली देखोनि फळांची झाडी । पक्षिवर्ग द्रुमातें सांडी । कीं जेविल्यानंतरें न धरी गोडी । अतिथि सोडी भुक्तगृहा ॥६७॥
कीं दावानळें जळालें वन । त्यागूनि जाती मृगांचे गण । तैसेचि जारपुरुष निर्घृण । जाती सांडून कुलटांतें ॥६८॥
इत्यादि निरूपणाचा हाचि अर्थ । आपुला जार श्रीकृष्णनाथ । तेणें भोगोनि रतिकार्यार्थ । निष्ठुर चित्त केलें कीं ॥६९॥
शुक म्हणे गा कुरुवैडूर्या । ऐसी गोपींची सप्रेम चर्या । दुर्लभ योगियां जपियां तपियां । मुख्यज्ञानियां आदिकरूनी ॥७०॥

इति गोप्यो हि गोविंदे गतवाक्कायमानसाः । कृष्णदूते व्रजं याते उद्धवे त्यक्तलौकिकाः ॥९॥

उद्धव श्रीकृष्णाचा दूत । व्रजा पातला असतां तेथ । गोपी मिळोनियां समस । वदल्या संकेत तो कथिला ॥७१॥
उद्धव व्रजा आला असतां । गोपी जाल्या लौकिकरहिता । कायवाड्मानसें अनंता । जाल्या निर्रता तन्निष्ठा ॥७२॥
कृष्णीं वेधल्या वाड्मन । लौकिक व्यवहार स्मरे कोण । निःशंक गाती कृष्णाचरण । तें निरूपण अवधारीं ॥७३॥

गायंत्यः प्रियकर्माणि रुदत्यश्च गतह्रियः । तस्य संस्मृत्य संस्मृत्य यानि कैशोरबाल्ययोः ॥१०॥

धन सुत वनिता वृत्ति क्षेत्र । प्रियतम मानिती हें सर्वत्र । ज्या कारणास्तव तें स्वगात्र । प्रेमपात्र सर्वांसी ॥७४॥
तया शरीराचाही उबग । रोग वियोग कां विपत्तियोग । कीं वार्धक्यें करणवर्ग । विकळ व्यंग जालिया ॥७५॥
शरीराचाही उबग धरी । परी क्षुधेतृषेच्या अवसरीं । प्राणवर्गाचें रक्षण करी । प्रीति भारी प्राणांची ॥७६॥
त्या प्राणांचें आकर्षण । करूनि करिती आत्मसाधन । तो आत्माही द्विविध भिन्न । जीव आणि परमात्मा ॥७७॥
जिवाचिये प्रीतीस्तव । इहलोकींचे विषय सर्व । त्यागूनि इच्छिती दिविवैभव । इंद्रादिदेव हुआवया ॥७८॥
पुण्यक्षयीं अधःपतन । होतां वृथाचि दिविसाधन । तेव्हां विरक्त होऊनि पूर्ण । आत्मनिर्वाण संपादि ॥७९॥
परमात्मयाचें अपरोक्ष ज्ञान । आत्मनिष्ठ ते सभाग्ये पूर्ण । निष्काम स्वधर्म विहिताचरण । शमदमसंपन्न विरक्त ॥८०॥
ऐसे निष्काम स्वधर्मशील । सांख्यीं योगीं अभ्यासबळ । लाहोनि सच्चिदानंद केवळ । लाहती निर्मळ आत्मत्व ॥८१॥
तो हा जगत्प्रियतम कृष्ण । सगुण गोपीप्रियकर प्राण । त्या प्रियाचें कर्माचरण । गाती विसरोन जनलज्जा ॥८२॥
कोमलबाल्यलीलाचरणें । रिम्गण निवेश अन्वेषणें । संस्तीभनें आलिंगनें । निरीक्षणें आठविती ॥८३॥
श्रीकृष्णाची राजस गोडी । कृष्ण सविलास डोळे मोडी । कृष्णचुंबनसुखाची घडी । करी बापुडी भवस्वर्गा ॥८४॥
पूतना शकट तृणावर्त । जृंभनमृद्भक्षणवृत्तांत । विश्व दाविलें वदनाआंत । इत्यादि समस्त आठविती ॥८५॥
यमलार्जुनाचें उन्मूलन । कृष्णानिमित्त वृंदावन । सेविलें तेथील लीलाचरण । निःशंक होऊन त्या गाती ॥८६॥
वत्सासुराचें निबर्हण । तैसेंचि बकासुरमर्दन । अघासुरा सायुज्यदान । तें आख्यान आठविती ॥८७॥
धेनुक मर्दिला तालविपिनीं । कालिय नाथिला यमुनाजीवनीं । मुखें प्राशिला दावाग्नि । जळतां वनीं व्रजवासी ॥८८॥
भांडीरवनीं प्रलंब वधिला । मुंजारण्यीं वणवा गिळिला । प्रावृट्शरत्काळलीला । विविध क्रीडला तें स्मरती ॥८९॥
मधुवन तालवन कुमुदवन । बेलभांडीरबहुळवन । ईषिकाविपिन कामवन । क्षुद्रवन नीपादि ॥९०॥
ब्रृहद्वन वृंदावन । एवं द्वादशवनक्रीडन । द्वादशोपवनविहारपूर्ण । गोवर्धनादि आठविती ॥९१॥
धातुगुंजाप्रवालमिश्र । बर्हप्रसूनें अळंकार । रामकृष्णादि गोपभार । विहारपर त्या स्मरती ॥९२॥
वेणुवादनें सप्तस्वरीं । अमृतोपम ते रसमाधुरी । प्राणिमात्रां वेध करी । स्मरोनि अंतरीं झुरताती ॥९३॥
त्रिभंगीं देहुडें ठाण ठकार । नीलोत्पलदलकोमल गात्र । सविलास अपांग व्यंकट नेत्र । ध्यान विचित्र आठविती ॥९४॥
वेणुवादनें वेधिलीं मनें । तैं जियें मिथा केलीं कथनें । मानस मोहिलें मनमोहनें । अंतःकरणें तें स्मरती ॥९५॥
कुरवंडूनियां मन्मथकोटी । कृष्णलावण्य स्मरती पोटीं । त्याची प्राप्ति व्हावयासाठीं । भजती गोरटी कात्यायनी ॥९६॥
तदर्थ व्रतस्था हेमंतीं । प्रातःस्नाना यमुने जाती । कात्यायनी तुष्टली भक्ती । हरि व्रतांतीं भेटला ॥९७॥
वस्त्रें घेऊनि कदंबावरी । गेला कौतुकें मुरारी । सव्रीड बैसोनि जळांतरीं । विनविला हरि तें स्मरती ॥९८॥
कृष्णआज्ञा मानूनि साच । नग्न सलज्ज तनुसंकोच । नमस्कारिला चंडवर्च । निष्प्रपंच निगमात्मा ॥९९॥
ते काळींचीं मधुरोत्तरें । आश्वासिलें वरदकरें । तें त्तें स्मरतां अभ्यंरें । नयनीं पाझरे बाष्पांबु ॥१००॥
नंदें करितां वासवमख । कृष्णें निषेधिला तो सदोष । गोवर्धनार्चा क्रतु सम्यक । करितां दुःख अमरेंद्रा ॥१॥
विद्युत्पात वृष्टि वारें । जलोपलादि वर्षतां इंद्रें । तैं गोवर्धन धरिला करें । ऐसीं चरित्रें आठविती ॥२॥
इंद्रें कृष्णा अभिषेक केला । स्नान करितां नंद नेला । कृष्ण वरुणलोका गेला । नंद आणिला तें स्मरती ॥३॥
वैकुंठदर्शनें गोपांप्रति । यमुनेमाजि नेऊनि निगुती । दाविता जाला कमलापति । तें त्या गाती व्रजललना ॥४॥
गोपीकंदर्पोद्रेक । हृदयीं जाणूनि यदुकुलतिलक । वेणुवादन रासरसिक । वनीं सम्यक आदरितां ॥१०५॥
विह्वळ जाल्या बल्लवललना । विस्मृतप्रपंचकर्माचरणा । अस्ताव्यस्तवस्त्राभरणा । गेल्या विजना त्या स्मरती ॥६॥
कृष्णें धर्मप्रवृत्तिबोधें । बोधितां अभीष्टप्राप्तिरोधें । म्हणोनि श्रीकृष्णचरणांवरविंदें । धरितां मुकुंदें रमविल्या ॥७॥
ते या सुरतरसिका गोठी । आठवतां त्या विह्वळ पोटीं । निर्लज्ज रुदती गाती वोठीं । होती कष्टी हरिविरहें ॥८॥
स्वलावण्या भुलला हरि । ऐसा गर्व अभ्यंतरीं । उठतां अंतरला मुरारि । मग कांतारीं हुडकिती ॥९॥
तें त्तें स्मरती अन्वेषण । पुन्हा पुलिनीं हरियशोगान । करितां प्रकटला भगवान । चिद्रसघन तो स्मरती ॥११०॥
तया सुखासि नाहीं पार । त्याहूनि रासरससागर । स्वयें जाला नर्तनपर । मंडलाकार मुग्धांसीं ॥११॥
स्थळजळक्रीडा व्यवाय विविधा । तें तें विविच्य स्मरती मुग्धा । निर्लज्ज रुदती वदती शब्दा । जनविरुद्धा न स्मरती ॥१२॥
शंखचूडाचा मौळच्छेद । स्मरती अरिष्टासुराचा वध । अक्रूरागमनीं पावल्या खेद । तदनुवाद त्या गाती ॥१३॥
ऐशीं कैशोरबाल्यकर्में । स्मरता गोपीमानस विरमे । गाती रुदती वदती मर्में । मानुषधर्में सांडवल्या ॥१४॥
विरहावस्थेमाजिवडिया । तत्संकल्पें देती बुडिया । वदती अन्योक्ति सवडिया । सप्रेम वेडिया तद्वेधें ॥११५॥
त्यांचिया व्यंग्योक्तींची परी । कुरुवरवरिष्ठा अवधारीं । भ्रमरगीतव्याख्यानकुसरी । श्रोतीं चतुरीं परिसिजे ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP