अध्याय ११ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तथा यशोदारोहिण्यावेकं शकटमास्थिते । रेजतुः कृष्णरामाभ्यां तत्कथाश्रवणोत्सुके ॥३१॥

तैशाच यशोदा रोहिणी । सालंकृता वस्त्राभरणीं । एके शकटीं दोघीजणी । पुत्र घेऊनि बैसल्या ॥७८॥
रामकृष्णप्रभाकिरणीं । शोभती यशोदा रोहिणी । जैसे दिवस आणि रजनी । शशांक तरणी उजळिती ॥७९॥
रामकृष्णांचीं बालचरितें । सप्रेम आवडती म्हणोनि चित्तें । गुंतलीं गाती गोपिका तेथें । श्रवणसुखातें वेधूनी ॥१८०॥

वृंदावनं संप्रविश्य सर्वकालसुखावहम् । तत्र चक्रुर्व्रजावासं शकटैरर्धचंद्रवत् ॥३२॥

ऐशा सप्रेम कृष्णगुणीं । वेधल्या यशोदा रोहिणी । गाती आनंदें गौळणी । चक्रपाणिगुणचरितें ॥८१॥
परमानंदें वाद्यगजरीं । गोपगोपी सहपरिवारीं । वृंदावनीं बरवे परी । प्रवेशोनि राहिले ॥८२॥
तें वृंदावन पवित्र । कृष्णवसतीसि झालें पात्र । केवळ सच्चित्सुखाचें क्षेत्र । सर्वीं सर्वत्र सफळित ॥८३॥
सर्वकाळ सुखोत्कर्ष । जेथ भोगिती जीव अशेष । ज्याचेनि विकाशें आनंदकोश । तो जगदीश जेथ रमे ॥८४॥
जें कां शतक्रतूंच्या मूल्यें । अमरऐश्वर्य फावलें । तेंही जिहीं तुच्छ केलें । प्रेमाथिले ते गोप ॥१८५॥
मग ते सुखकर वृंदावनीं । मिळोनि समस्त बल्लवगणीं । भंवतीं रचिली शकटश्रेणि । अर्धचंद्रासारिखी ॥८६॥
मध्यें करूनि व्रजनिवास । गौळी उतरले सावकाश । पुढें मंदिरप्रासादांस । यथावकाश निर्मिती ॥८७॥
जरी वर्णावें वृंदावन । तरी मुळीं न वदेचि व्यासनंदन । ऐका तयाचें कारण । सावधान होऊनि ॥८८॥
नृपाचें आयुष्य दिनसप्तक । त्यामाजीं भगवत सांगे शुक । हरिगुण जे जे मुख्य मुख्य । कथी एकैक समासें ॥८९॥
तेथ शृंगारादि नवरसकथनीं । पाल्हाळवनीं भरतां वाणी । अस्ता जाईल आयुष्यतरणि । समाप्तिपाटणीं न पवतां ॥१९०॥
यालागीं उचलतां पाउलीं । संक्षेपकथनीं सवेग चाली । निरूपणाची धांव घेतली । मुकुलित केली रसवृत्ति ॥९१॥
म्हणोनि श्रीमद्भागवत । संख्या अठरा सहस्रगणित । येरव्हीं हें असंख्यात । कोटिखर्वांत न गणतें ॥९२॥
सोळा सहस्रांची संतति । त्यांचे विवाह विक्रम ख्याति । लिहितां समग्र न पुरे क्षिति । यास्तव संकेतीं कथियेलें ॥९३॥
जाणोनि एथींच्या विवेका । वाखाणिलें मुळींच्या श्लोका । सूत्रप्राय रसभूमिका । ते हे टीका हरिवरदा ॥९४॥

वृंदावनं गोवर्धनं यमुनापुलिनानि च । वीक्ष्याऽऽसीदुत्तमा प्रीती राममाधवयोर्नृप ॥३३॥

अनंत तपांचिया राशि । कृष्णक्रीडेचे अभिलाषी । जन्मले अनेक स्थलजलवासी । कृष्णसुखाची भोगावया ॥१९५॥
तें देखोनि वृंदावन । तैसाच सुकृती गोवर्धन । यमुनापुलिनें अतिपावन । देखोनि मन हरिखलें ॥९६॥
ऐकें मत्स्येंद्रनंदिनीतनया । ऐशीं स्थानें देखोनियां । रामकृष्ण बंधु उभयां । क्रीडावया प्रिय वाटे ॥९७॥
स्वलावण्यें गुणचातुर्यें । कामिनी कांता वल्लभा होय । तैसें पुण्याधिक्येंकरूनि ठाय । कृष्णप्रिय ते झाले ॥९८॥

एवं व्रजौकसां प्रीति यच्छंतौ बालचेष्टितैः । कलवाक्यैः स्वकालेन वत्सपालौ बभूवतुः ॥३४॥

ऐसे पुण्योर्जित व्रजवासी । जे कृष्णसुखाचे अभिलाषी । प्रीति तयांचे मानसीं । क्रीडाविशेषीं ओपिती ॥९९॥
काष्ठ बैल गाडे घोडे । गाई व्याघ्रें कृत्रिम झाडें । कपि कुरंग वोडणें खंडें । विचित्र जोडे पुतळिया ॥२००॥
चक्रें भोंवरे चिमणिया । चंपे चौकडे कवडिया । काष्ठ गज रथ गोटिया । वावडिया उडविती ॥१॥
व्रजकुमारी धाकुट्या अबला । नवरानवरीविवाहलीला । करीं कंकणें काजळें डोळां । रामगोपाळा शोभती ॥२॥
गोप नामा जो वृषभानु । राधा तयाचें कन्यारत्न । श्रीकृष्ण तो नंदनंदन । दोघें करून वधुवरें ॥३॥
लेंकुरीं लग्न लटुफटू । केलें धरूनि अंत्रपटु । जननीजनकें देखोनि प्रकट । तोष उत्कट पावती ॥४॥
द्वादशीयुक्त त्रयोदशी । शुक्लपक्षीं प्रहरनिशीं । मधानक्षत्रीं चैत्रमासीं । लग्न राधेशीं हरीचें ॥२०५॥
ऐशीं खेळतां राधाकृष्ण । लेंकुरें मिळोनि लाविलें लग्न । पुढें जनकें गौळी आन । वर पाहून दीधली ॥६॥
परंतु तिचा कृष्णीं प्रेमा । तेणें नेणे प्रपंचकामा । चित्त न गुंते हेमधामा । भवसंभ्रमा विसरली ॥७॥
कार्तिकमासीं नारीनर । पूजिती राधादामोदर । परी हा श्रीकृष्णें साचार । कथिला नक्षत्रतिथिमास ॥८॥
राधाख्यान श्रीभागवतीं । नाहीं म्हणोनि करितां खंती । स्वयें प्रकटोनियां चिन्मूर्ति । मज या रीती बोधिलें ॥९॥
अग्निपुराणीं सविस्तर । असे राधेचें चरित्र । तेथ इतुका उल्लेखमात्र । कथिला विचित्र गोविंदें ॥२१०॥
सप्रेम माझा हृदयीं वास । सत्य प्रत्यय बाणेल त्यास । ऐसें बोलोनि हृषीकेश । करी निरास संशया ॥११॥
श्रीकृष्णाचा लटिका खेळ । जो हा अवघा ब्रह्मांडगोळ । तो हा प्रत्यक्ष श्रीगोपाळ । खेळे बाळ नटनाट्यें ॥१२॥
ऐशीं अनेक बाळचेष्टितें । कोमलमधुरवाक्यामृतें । व्रजौकसांतें प्रीतिदाते । झाले वाढते बालकृष्ण ॥१३॥
जाणोनि यथायोग्य काळ । होते झाले वत्सपाळ । आपणासमान गोप बाळ । त्यांचा मेळ मिळवूनि ॥१४॥

अविदूरे व्रजभुवः सह गोपालदारकैः । चारयामासतुर्वत्सान् नानाक्रीडापरिच्छदौ ॥३५॥

अविदूर म्हणिजे दूर ना निकटीं । व्रजाभोंवतें यमुनातटीं । चारिती वांसुरांची थाटी । धरूनि यष्टि रामकृष्ण ॥२१५॥
नाना खेळांची सामग्री । वेणू विषाणें मोहरीं । ............................ । जाली सिदोरी कांबळिया ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP